भेट...
भेट...


मित्र, मैत्रिणींनो... नमस्कार करते. अन् तुम्हाला मी आज भेट या शब्दातूनच भेटतेय...
किती सारे अर्थ भेट देत असतो आपल्याला, भेट... हा दोन अक्षरी शब्द सुख, दुःख, आनंद, प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी, आठवण... अजूनही कितीतरी. अशी ही भेट अगदी काळजाला भिडणारी अगदी प्रत्येकाच्याच.
राधा आसुसलेली वेडी होऊन वाट बघते ती कृष्णाच्या भेटीची... कृष्ण अन् सुदामा यांचीही गळा भेट झाली. अगदी भरभरुन. शिवशंकरांनीही म्हाळसा अन् बानुला खंडोबाचे रूपात भेट देऊन पार्वतीला दिलेले वचन पूर्ण केले. प्रभू रामचंद्रांना कांचनमृगाचे वस्र भेट द्यायचे होते सितेसाठी. माता शबरीने स्वतःची उष्टी बोरे भेट दिली प्रभू रामचंद्रांना. हिरण्यकश्यपू व भक्त प्रल्हाद यांचीही झाली होती गळाभेट. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जिजाऊ पुत्र यांना माता तुळजाभवानी यांनी स्वराज्य रक्षणासाठी तलवार भेट दिली होती. छत्रपती शिवराय व अफजलखान यांचीही गळाभेट
झाली होती... राक्षसी अवतार पुतनाच्या वधानंतर माता यशोदा नटखट कृष्ण कन्हैय्याची झालेली हिच ती ममतेची गळाभेट.
ज्योतींनी साऊंना दिलेली खापराच्या पाटीची भेट मोठा कायापालट करून गेली स्त्रियांच्या जीवनात.
अवनीची आकाशाशी होणारी हिच ती क्षितिज भेट.... सागराची किनाऱ्यावर होणारी हिच ती क्षणाक्षणाची स्पर्श भेट.... निळ्याशार सागरात हळूवार लुप्त होणारा हा लालबुंद आदि यांची न चुकता न होणारी भेट... पौर्णिमेच्या शशीची अन् शुक्राच्या चांदणीची महिन्यात होणारी पौर्णिमेची भेट.... पहाटे पहाटे हिरव्यागार पर्णांना दिलेली वसुंधरेने दिलेली अलगद दवबिंदूची भेट भक्ताची आपल्या देवाशी झालेली नतमस्तक भेट..
खूप वर्षांनी अचानक आवडती व्यक्ती भेटल्यावर मनात होणाऱ्या भावनांचा कल्लोळ करणारी ती भेट... कधी कधी खूप वाटते पण नाहीच होत ती भेट... कधी इच्छा नसूनही झालेली ती नकोशी भेट. कधीकधी नकोशी असतानाही फायद्याची ठरलेली ती भेट.
पहिल्यांदाच एकमेकांना भेटलेल्या त्या दोघांची लाजरी बुजरी वाटणारी, थोडी अबोल, थोडी नयनांची झालेली ती नजरभेट. पहिल्या भेटीत एकमेकांना दिलेली ती अविस्मरणीय भेटवस्तू. काॅफीचा कप खाली ठेवत पुढच्या भेटीसाठी आतुरलेला त्याचा शब्द... पुन्हा कधी परत भेट...
पहिल्या भेटीचे स्वप्न मनात ठेऊन स्वप्नात पुन्हा होणारी ती मृगजळ भेटच. गर्द अत्तराचा सुवास आवडत नसतानाही बळेच दिलेल्या अत्तराची...ती भेट...
कधी आयुष्यभर आठवणीत राहणारी अविस्मरणीय भेट... कधी लक्षात ठेवायचे असूनही विसरलेल्या त्या क्षणांची भेट. कधी विसरण्याच
ा खूप प्रयत्न केला तरी विसरली जात नाही अशी भेट.
कधी कोणाकडून मिळालेली घरातच लपून ठेवलेली भेट... कधी त्याने तिला दिलेली सुवासिक मोगऱ्याच्या गजऱ्याची भेट. कधी असा विचार मनात काय भेट द्यावी बरं तिला?
कधी पहिल्या पगारातून आईला आणलेली साडीची भेट तर कधी बायकोला चोरून लपून आणलेली भेट.
पहिल्यांदा सासरहून माहेरी परतलेली लेक बघायला आईच्या डोळ्यातील ती आतुरलेली भेट...
लग्न झाल्यावर विदाईच्या वेळी बापाने ओल्या डोळ्यांनी दिलेली गळाभेट... नवरीच्या भावाला कान पिळल्याची फुकट मिळालेली कोणतीही भेट... माहेरी येऊन दोन बालमैत्रिणींची दिवाळीचे फराळ एकत्र बसून खाताना झालेली ती गप्पा भेट... अगदी नाक पुसता येत नव्हते त्यावेळच्या दोन दशकानंतर झालेली गुरुजनांची जुन्या आठवणींची भेट... कधी साहेबांनी अचानक शाळेला दिलेली शालेय तपासणीची भेट...
कधी ऐन अडचणीच्या काळात मिळालेल्या आर्थिक आश्वासनांची भेट... आवडणारे पुस्तक मिळालेली भेट... वाढदिवसला मिळालेली फुलांची भेट... वास्तुशांती, लग्नसमारंभात मिळालेल्या ढीगभर भेटवस्तू... कधी आयुष्यात एकदाच होणारी पण कायम लक्षात राहणारी ती भेट... दिवाळीला माहेराहून भावाकडून हक्काने मागून घेणार साडीची ती भेट...
कधी रोज होणारी पण टाळावी असे वाटते ती भेट... कधी नियोजित भेट रद्द तर कधी क्षणात होणारी ती भेट... कधी अाल्हाददायक तर कधी दुःखदायक. कधी प्रवासातील क्षणभराची भेट तर कधी आयुष्यभरासाठी रक्ताच्या नात्याची भेट... कधी नुसतंच भेटकार्ड तर कधी गुलाबाची भेट... कधी भाऊ नसलेल्या बहिणीला कोणाकडून मिळालेली भेट... किती मोठा आनंद मिळतो भेटीतून. कधी परदेशातील मुलगा आज अचानक येतोय म्हटल्यावर आईबाबांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंसाठी निदान या दिवशी तरी मिळालेली अमुल्य भेट...
गोरज मुहुर्तावर होणारी गाय अन् वासराची भेट... पिल्ले अन् पाखरांची भेट... कालच भेटलो होतो आम्ही आज असे कसे झाले अचानक मनाला हुरहुर लावणारी ही भेट... कधी कधी अगदी शेवटची ठरणारी... सुद्धा...
दुसऱ्याच्या आनंदासाठी आपणही द्यावी की आपल्या माणसांना भेट... की जी राहूनच गेली आजपर्यंत द्यायची. ती आज देऊ या आपण.
अन् तुमच्याही आयुष्यात नक्कीच असणार एक अविस्मरणीय भेट... हो ना मग काढा ती आज बाहेर मनातून, आठवणीतून अगदी अलमारीतूनसुद्धा. आणि हो जपावं प्रत्येकाने कस्तुरीच्या डबीत ठेवल्यागत एखाद नाजुक मोरपीस फिरवल्यागत हळूवार स्पर्शाने या भेटीला.... अन् मिळालेल्या भेटवस्तुलाही मनापासून. कारण हा अविस्मरणीय क्षण असेल तुमच्या आयुष्याचा. तुम्हाला मिळालेली भेट किंवा तुम्ही दिलेली भेट तरी......
चला भेटू पुन्हा.. पुढच्या भेटीत.