हे गुपित कुणाला सांगु नको!
हे गुपित कुणाला सांगु नको!


आज सकाळी मी ऑफिसला गेल्या गेल्या ऑफिसची सेक्रेटरी अलका हिने मला बातमी दिली, अग बॉस ला प्रमोशन मिळाले आहे पण त्यांनी अजून कुणाला सांगितले नाही ह..ते सगळ्यांना बोलावून सांगणार..ही अगदी आतली बातमी आहे.. प्लीज कुणाला सांगू नकोस..मी म्हटलं बर..पण गम्मत म्हणजे एक एक करता करता अर्ध्या ऑफिसला ही बातमी कळली होती आणि जो तो हेच कुजबुजत होता..
आता मला सांगा हिने थोडा धीर नको होता का धरायला.. पण काय स्वभावाला औषध नाही म्हणतात ना तेच खरे.. अशी मंडळी ऑफिसमध्ये सर्रास दिसतात. आता माझी कलिग रेवती च बघा ना..ऑफिस मधील सगळ्या लोकांबद्दल तिला इथंभुत माहिती असते. तिला मुळी ऑफिस चे काम सोडून गॉसिप करण्यातच जास्त रस असतो..अश्या अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असतात. आमच्या कॉलनीतल्या कांता काकूंचे उदाहरण घ्या ना..
काल सहजच वेळ होता म्हणून ऑफिसमधून येता येता कांता काकूंकडे गेले. त्यांच्या आवडीचा गरमागरम वडापाव पण घेतला होता बरोबर. आज मला अचानक आलेल बघून त्यांना भलताच आनंद झाला. अग काय हे तेजु, किती दिवसांनी दर्शन देतेय अस म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली. हल्ली आमच्या सारख्या रिकाम्या लोकांना भेटायला कुणाकडे वेळच नसतो अशी त्यांची नेहमी तक्रार असते.
काकूंना बोलायला फारच आवडत आणि सगळ्यांची गोड बोलून त्या चौकशी करत असत. खर तर त्यांना दुसऱ्याकडून माहिती काढायला फार आवडतं. आणि जर कुणी भेटले तर त्या व्यक्तीला अजिबात सोडत नाहीत. अख्या गावाची बातमी कळून आणि सांगून झाल्यावरच त्या व्यक्तीची सुटका होते. परत त्यांच्या पोटात काहीच रहात नाही. कुणाचही कुणाला सांगून त्या मोकळ्या होतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलायची बऱ्याच जणांना भीती पण वाटते.
मला आल्या आल्या आधी पाणीही न देता त्यांनी महत्वाची बातमी मात्र दिली. अग कुठे सांगू नको बर का..मला कळले की त्या शेजारच्या मालती काकूंच्या मुलीचे कुठेतरी प्रकरण चालू आहे म्हणे..कुणास ठाऊक कुठला मुलगा बघितला आहे..तसे मी म्हंटले, काकू आताच्या पिढीसाठी ही अगदी सामान्य गोष्ट झालीय. हल्ली बऱ्याचदा स्वतः चे स्वतः च जमवतात मुले..आणि हे ठरवताना नीट विचार देखील करतात..माझी ही थंड प्रतिक्रिया ऐकून त्यांच्या आनंदावर जरा विरजण पडले.
मला चहाचा कप देता देता त्यांनी परत प्रश्न विचारला. काय ग, हल्ली तुझी ती मैत्रीण मिता दिसली नाही बऱ्याच दिवसात? कुठे गेली आहे का ती? तशी मी लगेच उत्तरले, काकू, ती एक कॉन्फरन्स साठी दिल्ली ला गेलीये. अग बाई, मग मुलं आणि नवऱ्याचे काय ? इति काकू..
मावशी अहो आहेत ना त्यांच्या घरी स्वैपाकाला बाई आणि मुलेंपण आता तशी मोठ
ी झालीत..करतात ती आपापले. इति मी.
तश्या त्या म्हणल्या, बर बाई जमतं हल्लीच्या मुलींना असं भटकणं..ते ऐकून मी जरा चिडलेच, अहो काकू ती ऑफिसच्या कामानिमित्त गेली आहे, भटकायला नाही..माझा स्वर ऐकून बर म्हणत त्यांनी विषय आटोपता घेतला. आणि मी देखील तिथून काढता पाय घेतला.
तर अश्या आमच्या या काकू, इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ फार करणाऱ्या..अश्या प्रकारच्या व्यक्ती आपल्याला जागोजागी भेटतात. खर तर त्या स्वभावाने वाईट नसतात पण त्यांचा हा स्वभाव बघून लोक चार हात लांबच राहणं पसंत करतात. आणि मग काकू काकुळतीने म्हणतात की आमच्याशी बोलायला वेळच नसतो कुणाला. कस बोलणारं बुवा कुणी आणि यांना ते सांगणार तरी कोण?..असो…
बर, या कॅटेगरी मध्ये फक्त बायकाच असतात असा सगळ्यांचाच फार मोठा गैरसमज आहे कारण आपण नेहमीच ऐकतो ना की बायकांच्या पोटात काहीच रहात नाही पण पुरुषांनी या कानाने ऐकलेली गोष्ट त्या कानालाही कळत नाही म्हणे. पण असे मुळात काहीच नसते बर! आता आमच्याच शेजारी राहणाऱ्या गंगाधर काकांचीच गोष्ट सांगते.
येता जाता कुणी दिसले रे दिसले की काकांची प्रश्नावली सुरू होते. आजच सकाळी आम्ही दोघे ऑफिसला निघालो असता काका समोर भेटले.. काय मग, ऑफिसला निघालात वाटत..मला सांगा सकाळी नऊच्या कामाच्या वेळी कुणी फेरफटका मारायला निघेल का? पण नाही यांनी तर प्रश्न विचारायलाच पाहिजे..अहो तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे..
अशी रोज सगळ्यांची चौकशी करून मग काकांकडे भरपूर बातम्या गोळा होतात. आणि मग त्यांनी आपलं सकाळ संध्याकाळ कट्ट्यावर मित्रांबरोबर जमावं आणि सगळ्यांना सांगत सुटाव की कोण कुठे गेले..कुणाला काय प्रमोशन मिळाले..कुणाचा मुलगा कुठल्या पदावर आहे..इत्यादी इत्यादी..आणि त्यांच्या अश्या भारंभार चर्चेला उधाण येतं.
मग कुणी अगदी विश्वासाने सांगितलेली गोष्ट का नाही असो पण इथे काकांच्या तोंडून ती बाहेर पडतेच पडते ..अहो काय करणार काहीतरी खाद्य लागते ना चघळायला.. ती बातमी एकदाची सांगून झालं की त्यांना पण अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं. तर सांगायचं तात्पर्य हेच की ही फक्त बायकांनी घेतलेली मक्तेदारी नाहीये तर पुरुष देखील यात तेवढेच अग्रभागी असतात.
तेव्हा आपले गुपित कुणाला न सांगण्यातच खरा शहाणपणा आहे हे पटले ना तुम्हाला.
तुमचे काय मत आहे यावर? तुम्हाला पण असे अनुभव येत असतील ना. तुमची प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. वाचायला आवडेल.
आवडल्यास लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
धन्यवाद