Pranjali Lele

Inspirational

3  

Pranjali Lele

Inspirational

अस्तित्व

अस्तित्व

7 mins
552


पृथाचा आज नव्या नवरीच्या रूपात देशमुखांच्या घरात गृहप्रवेश झाला. आदित्य सारखा देखणा आणि चांगला शिकलेला मुलगा जावई म्हणून आपल्याला लाभला याचा पृथाच्या आईबाबांना खूप आनंद झाला होता. शिवाय देशमुखांसारखे एवढे नामांकित घराणे आपल्या मुलीला लाभल्याबद्दल तर त्यांनी देवाचे आभारच मानले. पृथाच्या माहेरची परिस्थिती तशी साधारणच होती. एवढे श्रीमंत सासर मिळाले त्यामुळे मुलीचे खरंच भाग्य फळफळले हेच ज्याच्या त्याच्या तोंडी होते.

खरे पाहता पृथा मध्ये कसलीच कमी नव्हती. दिसायला अतिशय देखणी, सुस्वभावी आणि त्यावर उच्च शिक्षित पृथा कुणाच्याही मनात भरेल अशीच होती. आणि खरंतर ती ज्या घरात जाईल त्यांचेच भाग्यच उजळेल हे म्हणणे ही तितकेच खरे होते.


घरातील परिस्थिती बेताचीच असली तरी पृथाच्या आईवडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या सगळ्या आवडी पूर्ण केल्या होत्या. तिला लहानपणी नृत्याची आवड होती म्हणून तिला त्यात अगदी नृत्यविशारद केलं होतं. शिवाय अभ्यासात अतिशय तल्लख असणाऱ्या पृथाचे इंजिनिअर व्ह्यायचे स्वप्न होते. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तिने शहरातील सगळ्यात उत्तम कॉलेज मध्ये एडमिशन मिळवून यातही बाजी मारली.


बघता बघता ती इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आली आणि वर्षाच्या अखेरीस कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे तिला चांगल्या जॉब ऑफर्स येऊ लागल्या पण तिला त्या आधी MBA करायचे होते त्यामुळे ती इंजिअरिंग पूर्ण करून MBA च्या तयारीला लागली. इकडे तिचे MBA आटोपले आणि लगेच एका मोठ्या कंपनीत तिला जॉब लागला. आपल्या पहिल्या वहिल्या कमाईतून तिने आईसाठी सुंदर पैठणी आणि बाबांसाठी छानसे घड्याळ घेतले आणि घरी येऊन आई बाबांना मस्त सरप्राइज दिले.


आई बाबांनी माझ्यासाठी झटून मला सगळी सुखं दिलीत..माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या, आता यापुढे त्यांच्या सगळ्या कष्टांची भरपाई मी करेन असे तिने मनाशी ठरविले. आता आपली लाडकी लेक खऱ्या अर्थी सक्षम झाली आहे तेव्हा दोनाचे चार हात करायला हरकत नाही असे पृथाच्या आई बाबांना वाटले आणि त्यांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. त्यांना आता तिच्या लग्नाचे वेध लागले होते.

इकडे संयोगाने पृथाच्या एका मैत्रिणीच्या लग्नात आदित्य ने पृथाला पाहिले. जात्याच सुंदर पृथा त्यादिवशी नटल्यामुळे तर फारच सुंदर दिसत होती. साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तिच्या गोऱ्या रंगाला साजेशी सुंदर मोरपंखी रंगाची साडी, त्यावर मोकळे सोडलेले लांबसडक केस, गळ्यात नाजुकसा नेकलेस, कानात झुलणारे झुमके, हातात एक नाजूक कडे हे सर्वच तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होते. तिला पाहताक्षणी आदित्यच्या मनात ती भरली. मित्राकरवी लगेच त्याने तिची चौकशी करवून घेतली आणि लवकरच आदित्यच्या घरून तिला लग्नाची मागणी घातल्या गेली.


चांगले घराणे आणि आदित्य सारखा स्मार्ट मुलगा असे सर्व मनाजोगे असल्याने नाकारण्यासारखे काहीच नव्हते. पृथाची एकच अट होती ती म्हणजे मुलगा चांगला उच्चशिक्षित हवा आणि ती ही पूर्ण होत असल्याने तिने पण तिचा होकार दिला. पण या सर्वात तिचे ऑफिस सासरहून बरेच दूर असल्याने नाईलाजाने तिला तिच्या हातचा जॉब सोडायला लागला. पृथा ने पण विचार केला , आपण नव्या घरी जातोय तिथल्या माणसांना ओळखायला आणि तिथे रुळायला आपल्याला ही जरा वेळ हवा आहे तेव्हा सध्या हा जॉब सोडणेच योग्य निर्णय होईल. शिवाय पुढे परत आपल्याला नवा जॉब बघता येईलच असा विचार करून तूर्तास तिने लग्नाआधी हा जॉब सोडला आणि लवकरच चांगला मुहूर्त पाहून मोठ्या धूमधडाक्यात दोघांचे लग्न लागले.

आज सासरचे माप ओलांडतांना आयुष्याची सुंदर स्वप्न बघत ती नव्या घरात शिरली. नव्या सुनबाई चे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. घरी सासू सासरे, मोठे दिर, जाऊबाई असा भरला परिवार होता. लग्नानंतर हनिमून च्या निमित्ताने आदित्य आणि पृथा ने एकमेकांबरोबर मनसोक्त दिवस घालवले. एकमेकांची मने जाणली..खूप गोड आठवणी हृदयात साठवून दोघेही घरी परतले. इथे आल्यावर मात्र हळूहळू तिला इथल्या पद्धतीप्रमाणे जुळवून घ्यावे लागले.


श्रीमंत देशमुखांच्या घरात नोकर माणसांचा सतत राबता होता. तरीही घरातील स्वयंपाक हा घरच्या अन्नपूर्णानेच करायचा असा घरातील दंडक होता. ही प्रथा त्यांच्या आज्जेसासूबाईंपासून चालत आलेली होती तेव्हा ती तशीच चालू ठेवणे असे सासूबाईंनी आपल्या दोन्ही सुनांना सांगितले होते. त्याशिवाय सकाळी उठून लवकर आंघोळ आटोपून मगच किचन मध्ये शिरायचे असा सासूबाईंचा नियम असल्याने तिला पण लवकर उठून तिचे पटापट आवरायला लागायचे. नंतर सासरे, दिर आणि आदित्य नाश्ता करून एकत्रच ऑफिसला निघायचे. कामाचा व्याप बराच मोठा असल्याने तिघांना घरी यायला बराच उशीर व्ह्यायचा.


आतापर्यंत तिला यासर्व गोष्टींची सवय नव्हती. माहेरी छोटे कुटुंब त्यामुळे तिथे सगळं ती तिच्या मर्जीप्रमाणे करी. आणि एकुलती एक असल्याने जरा लाडाकोडातच वाढलेली होती. पण आता इथल्या चालीरिती प्रमाणे वागणे तिला भागच होते आणि ती अगदी मनापासून ते सगळं शिकत होती. मोठ्या जावेची तिला कामात बरीच मदत होत होती. दोन सुना आल्याने सासूबाई आता किचन मध्ये फिरकत नसतं. पण सगळीकडे त्यांचे अगदी बारीक लक्ष असायचे.


सकाळचा स्वयंपाक दोघी मिळून करायच्या. खरतर तिला स्वैपाक पाण्याची माहेरी इतकी सवय नव्हती. पण इथे ती मन लावून सगळं करण्याचा प्रयत्न करायची आणि त्यात पृथाला तिची जाऊ नीट सांभाळून घ्यायची शिवाय मदतीला नोकर असल्याने इतर कामाचा विशेष भार जाणवायचा नाही. पण वेळच्या वेळी सर्व करावे लागायचे. दुपारी सर्वांसाठी ऑफिसमध्ये जेवणाचा डबा घरून पाठवावा लागायचा त्यामुळे सकाळची गडबड आटोपली की परत दुपारच्या जेवणाची तयारी असायचीच. यातच तिचा आणि जावेचा सारा वेळ जायचा.


सुरवातीचे नव्या नवलाईचे दिवस सरले तसे तिला आता घरातील या रूटीन मध्ये तोच तो पणा जाणवायला लागला होता. आणि शिवाय एवढे शिकून शेवटी घरात फक्त रांधा वाढा, उष्टी काढा यातच तिला आपले आयुष्य काढायचे नव्हते त्यामुळे आता परत जॉब शोधायला पाहिजे असे मनाशी ठरवून तिने काही चांगल्या कंपनीमध्ये नोकरी साठी ॲप्लिकेशन्स पाठवल्या. आणि काही दिवसातच तिला अगदी तिच्या मनाजोगी जॉब ऑफर मिळाली.


ती आज खूप खुश होती. हे सरप्राइज सगळ्यांना एकत्रच देऊ या म्हणून तिने आदित्यला ही काही सांगितले नाही. रात्री जेवताना तिने ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली. पण ते ऐकून कुणाच्याच चेहेऱ्यावर आनंदाचे भाव नव्हते. आणि सासऱ्यांच्या कपाळावर आलेल्या आठ्या मात्र तिच्या नजरेतून सुटल्या नाहीत. लगेच तिला सासर्यानी एका वाक्यात सांगितले, आपल्या घरच्या सुनांना पैशाची कसलीही कमी नाहीये त्यामुळे त्यांना बाहेरची नोकरी धरायची काहीही आवश्यकता नाही. बाकी सगळे मात्र अगदी चूप होते. तिच्या डोळ्यात तेव्हा टचकन पाणी आले, कसेबसे तिने ते लपवले.

सर्व आवरून पृथा बेडरूममधे आली तेव्हा आदित्य तिच्यावरच नाराज झाला. मला आधी हे सांगावेसे पण वाटले नाही का तुला? निदान माझ्याशी बोलायचे होतेस याबद्दल.. बाबांना खरंच राग असेल तुझ्या अश्या वागण्याचा..काही बोलण्यापूर्वी जरा विचार करावा ना माणसाने ..पृथा आ वासून त्याच्याकडे बघतच राहिली. आपले असे काय चुकले हेच तिला कळेना. आपण खरंच एका पुढारलेल्या घरी सून म्हणून आलोय की अजूनही नियम व रूढी परंपरेच्या आड बायकांच्या महत्त्वकांक्षा चिरडून टाकणाऱ्या मागासलेल्या, बुरसटलेल्या विचारसरणी जोपासणाऱ्या कुटुंबामध्ये राबणारी एक स्त्री हेच तिला कळेना.


आपण खूप आधुनिक विचाराचे आहोत हे त्यांच्या बाह्य रुपावरूनच ते इतरांना फक्त भासवत होते तर! या कुटुंबाची खरी ओळख तर आत्ता होतेय आपल्याला.. चांगली शिकलेली मुलगी तर यांना हवी होती पण ती फक्त एक शोभेची बाहुली म्हणूनच का? जर मला फक्त घरातच बसून अख्खा जन्म काढायचा असेल तर माझ्या शिक्षणाचा उपयोग तरी काय? असे एक ना अनेक प्रश्न तिला भेडसावत होते. मध्यरात्र उलटून गेली तरी तिच्या डोळ्यात झोपेचा मागमूस नव्हता.


सासरे नाही तरी निदान तिच्या आदित्य ने तिला समजून घ्यायला हवे होते पण तो देखील तेव्हा काहीही बोलला नाही याचेच तिला मनापासून वाईट वाटत होते. कुणीतरी तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता असे तिला सारखे वाटत होते पण तसे काहीही झाले नव्हते म्हणून तिला सगळ्यांचा खूपच राग आला होता. मनसोक्त रडल्यावर तिने स्वतः ला सावरले.. तिला यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. शेवटी हा तिच्या अस्तित्वाचा प्रश्न होता.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने तिची सगळी कामे आटोपली. दोघींनी मिळून जेवणाची तयारी केली. आज सासूबाईंनी खास त्यांच्या हातची बासुंदी केली होती. तिघीही एकत्र जेवायला बसल्यावर पृथा ने दोघींकडे विषय काढला, आई, खूप मोठी जॉब ऑफर आलीये मला..तुम्हाला खरंच आनंद नाही झाला का? ते ऐकून त्या म्हणाल्या, अग खूप आनंद झालाय म्हणून तर तुझ्या आवडीची बासुंदी केलीय ना मी..ते बघून पृथाचा चेहेरा खुलला.

त्यांच्या घराण्यात तिच्या एवढं शिकलेलं कुणीही नव्हतं. आपल्या शिक्षणाची कसलीही घमेंड न बाळगता पृथा ने घरातील सगळं सांभाळलं होतं त्यामुळेच तिचं त्यांना खूप कौतुक वाटायचं आणि आज तर दोघींना तिचा खूप अभिमान वाटत होता. पण घरचे तिच्या नोकरी साठी तयार होणार नाही हे पण पुरेपूर जाणून होत्या. आणि म्हणूनच काल सासूबाईंनी सासर्यांशी बोलून यावर मार्ग पण काढला होता. पण पृथा साठी ते एक सरप्राइज ठेवलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे, दिर आणि आदित्य नाश्त्याला बसले तेव्हा तिच्या सासूने पृथाची नाश्त्याची प्लेट भरली आणि तिलाही त्यांच्या बरोबर बसायला सांगितले. ते बघून तिला काही कळेनासे झाले. तेव्हा सासरेच म्हणाले, सुनबाई, तुमच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला इतरांसाठी मान्य नाही म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर नोकरी नाकारली आहे कारण आजपासून तुम्ही आपली कंपनी जॉईन करताय.. तुमच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी करा..तेव्हा पटकन आटपा आणि आदित्य बरोबर आजपासून ऑफिसमध्ये या. हे ऐकून पृथा मनोमन आनंदली. आदित्य ने सगळ्यांच्या नकळत तिच्याकडे बघत आपले डोळे मिचकावले आणि आपले दोन्ही कान धरून तिची माफी मागितली.

आणि हा योग्य सल्ला आम्हाला तुमच्या सासूबाईंनी दिलाय कारण खऱ्या कर्ता धर्ता तर त्याच आहेत ना आपल्या कुटुंबाच्या..त्या घरी असल्या तरी त्यांच्या प्रत्येक मताचा आम्ही आदर करतो आणि त्यांचे अस्तित्व आम्हाला आमच्या प्रत्येक निर्णयात जाणवते आणि त्यांच्या सारखेच त्यांच्या सूनांची देखील स्वतः ची अशी वेगळी ओळख आहे आणि ती जपणे हे एका सुखी आणि यशस्वी कुटुंबाची गुरुकिल्ली होय हे देखील त्यांनीच आमच्या ध्यानी आणून दिले.


हे ऐकल्यावर पृथा ला काय बोलावे कळेना. आज तिच्या मनातले सगळे संभ्रम दूर झाले होते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आपल्यावर सोपवलेला नवा कार्यभार सांभाळण्यासाठी तिने लगेच वाकून सासूबाईंनाचा आशीर्वाद घेतला. तसे त्यांनी तिला जवळ घेत म्हटले, आपण आपल्या जुन्या रुढी परंपरा सांभाळून नव्याचेही मुक्त हस्ताने स्वागत केल्यास नव्या आणि जुन्याचा छान मेळ साधता येतो आणि तेव्हाच व्यक्ती स्वातंत्र्य ही जपल्या जाते. सगळ्यांना त्यांचे म्हणणे अगदी मनोमन पटले. आणि देशमुखांकडे एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational