Pranjali Lele

Others

3  

Pranjali Lele

Others

आगंतुक पाहुणा

आगंतुक पाहुणा

4 mins
321


एप्रिल महिना आला आणि उन्हाळ्याची चाहूल लागली तरी घरी सकाळ संध्याकाळ वाफारा आणि कोमट पाण्याने गुळण्या करणे काही बंद झाले नव्हते. कारण सगळीकडेच कोरोनाने परत आपले पाय पसरायला सुरुवात केली होती. मध्यंतरीचा काही काळ सगळ्यांसाठी थोडा दिलासा देणारा गेला आणि आता परत सगळं स्थिर स्थावर होते आहे असे वाटते ना वाटते तोच या व्हायरस ने परत आपलं अक्राविक्राळ रूप दाखवायला सुरुवात केली.


पाहता पाहता देशभर कोरोना ची दुसरी लाट हा हा म्हणता पसरली.. परत केसेस खूप वाढल्या. लॉक डाउन सुरू झाले. सगळे जण जीव मुठीत घेऊन घरात राहायला लागले. पण यावेळी मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने अख्खे च्या अख्खे कुटुंब आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली. आता ना त्याने छोट्या मुलांना सोडले ना मोठ्यांचा विचार केला. बघता बघता सर्वत्र याने थैमान घातले. आम्ही देखील घरी अगदी सर्व काळजी घेत होतो. पण कसे कुणास ठाऊक, या आगंतुक पाहुण्या ने हळूच दारावार थाप दिलीच.


शुक्रवारचा दिवस होता..नवरा संध्याकाळी ऑफिस मधून आला तेच मुळी डोके दुखी च्या त्रासाने हैराण होऊन..आल्यावर नेहमीप्रमाणे त्याचे कपडे बदलून गुळण्या आणि वाफारा झाला..मी लगेच गरम आल्याचा चहा त्याला करून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस ला जायला तो वेळेत उठला नाही तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली. जाऊन बघते तर त्याच्या अंगात ताप भरला होता..त्याने स्वतः ला रूम मध्ये isolate केले आणि RTPCR टेस्टसाठी बुकिंग केले..त्याच्या बरोबर माझी दोन्ही मुले आणि मी असे चौघांनी टेस्ट करविली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा देखील तापाने फणफणला होता. मला अचानक खूप टेन्शन आले.


दोन दिवसांनी आमच्या चौघांचे रिपोर्ट्स आलेत तेव्हा नवरा आणि मुलगा कोरोना positive होते आणि मी व माझी मुलगी निगेटिव्ह..झाले मुलगा आणि नवऱ्याची कोरो ना ट्रिटमेंट चालू झाली..त्यांचे औषधपाणी, योग्य आहार आणि नीट अंतर ठेवत सगळं करणे चालूच होते .. त्यात मुलाला मात्र खूप ताप येत होता..त्याच्या काळजीने मला मात्र अजुनच गळल्यासारखे वाटू लागले..त्यात नवऱ्याची स्थिती स्टेबल होती..ती एक दिलासा देणारी बाब होती. पण मुलाचे मात्र temperature खूप असल्याने त्याला डॉक्टरांनी बऱ्याच टेस्ट करायला सांगितल्या. इकडे देवाचा सतत धावा मनी चालुच होता..एरवी सकाळ संध्याकाळ दिवेलागणीला त्या भगवंताला स्मरणारी मी आता नकळतपणे अखंड नामस्मरण आपोआप मनात करू लागली .. खरंच खूप मोठा आधार असतो त्या शक्तीचा .. तीच आपल्याला बळ देत असते अश्या कठीण परिस्थितीत सावरण्याचे.. याची क्षणोक्षणी प्रचिती येत होती..


अश्यावेळी मात्र प्रकर्षाने जाणवते की किती गृहीत धरतो ना आपण आपले जीवन..खरतर आपण घेत असलेल्या प्रत्येक श्वासावर पण आपला ताबा नसतो तरीही किती अभिमान बाळगतो आपण आपल्या देहाचा..तो कर्ता करविता मात्र अश्यावेळी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आपल्याला या पोकळ भ्रमातून अलगद जागे करतो..आणि वास्तवाचे भान करून देतो. खूप अमूल्य आहे हे जीवन याची त्यावेळी खात्री पटते.


इकडे चवथा दिवस उजाडला तोच मुळी मुलीला पण कोरोना ने आपल्या विळख्यात घेतले होते..बघता बघता घरी तीन पेशंट झाले. आठ दिवसांनी मुलाच्या टेस्ट रिपोर्ट्स आल्यात ..आणि सुदैवाने सगळे रिपोर्ट्स ठीक होते..हळूहळू नवरा आणि मुलगा ठीक होत होते..मुलीला पण दोन दिवस ताप आला आणि नंतर हळूहळू बरे वाटू लागले..ते बघून मनोमन देवाचे खूप आभार मानले .मुले आणि नवरा हळूहळू बरे होत होती त्यामुळे या सगळ्यांनी मी जरा निर्धास्त होते न होते तोच हा पाहुणा माझ्याही भेटीला आला. अचानक ताप आणि खोकल्याने मला हैराण करून सोडले.. इकडे मुलांचे करता करता स्वतः ला मी विसरलेच होते तर मला त्याने ह्या आजाराने स्वतःची जाणीव करून दिली..नुसती जाणीव नाही तर पार बेजार आणि अशक्त करून सोडले.


आतापर्यंत सर्वांचे धीराने करणारी मी मात्र पुरती ढासळले. मला सलग दहा दिवस ताप येत होता.. नंतर मुलांना पण माझी ही अवस्था बघवत नव्हती..त्या परिस्थितीत कसलीही जाणीव नव्हती .जाणवत होता तो प्रचंड थकवा आणि नैराश्य..वाटलं आपण हे आता सहनच करू शकणार नाही..पण मुलांकडे बघून धीर एकवटत होते..नवऱ्याचा खूप मोठा आधार होता..आई बाबा, नातेवाईक सगळ्यांचे चौकशीचे सतत फोन येत होते..ते बघून बर वाटत होतं .पण कुणाशीही बोलण्याचे त्राण मात्र माझ्यात नव्हते ..अश्या कठीण परिस्थितीत ही सगळ्यांचा मला खूप आधार मिळाला. सगळ्यांचे फोन, चौकश्या याने मनावरची मरगळ कमी होत होती..मैत्रिणींचे दिलासा देणारे शब्द मनाला उभारी देत होते..माझ्या मैत्रिणीने तर अगदी सख्ख्या बहिणीप्रमाणे मला सर्वतोपरी मदत केली...आपल्या नातेवाईकांपासून दूर परक्या प्रांतात हा खरंच खूप मोठा आधार होता..ती मदत कधीच विसरता येणार नाही आणि याची परतफेड करता येणं तर कधीच शक्य नाही..त्या अनुभवाने माणुसकीचे नाते साऱ्या नात्यांमध्ये श्रेष्ठ असते याची साक्ष पटली.. आपोआप देवापुढे मी नतमस्तक झाले..

या कोरोना काळात आपल्या प्रत्येक श्वासाचे महत्व कळले. म्हणूनच मनात ठरवलेच, यापुढे या शरीराची नीट काळजी घ्यायची..नियमित व्यायामाबरोबरच आवश्यक अशी ध्यान साधना करायची..मनात सकारात्मक विचारांची सुंदर बाग फुलवायची कारण अश्यावेळी सकारात्मक मनोवृत्ती तुम्हाला लढण्याची प्रेरणा देत असते आणि त्याबरोबरच आपल्या दैवतावरील अढळ श्रद्धा तुम्हाला या संकटावर मात करायला खूप मदत करते.

हा आगंतुक पाहुणा असा अचानक आला आणि खूप काही शिकवण देऊन गेला.


Rate this content
Log in