Pranjali Lele

Inspirational

3  

Pranjali Lele

Inspirational

तिलाही घ्यायचाय मोकळा श्वास

तिलाही घ्यायचाय मोकळा श्वास

3 mins
301


मिनू आपल्या बाबांबरोबर आज भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन सोहळा टीव्ही वर बघत होती. प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या भाषणाने ती खूप प्रभावित झाली. ते ऐकून बाबांना तिने देशाच्या विविध धोरणांबाबत विचारले. तिची ती चिकित्सक बुद्धी आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याबद्दल असलेली उत्सुकता बाबांना खूप आवडायची. ते देखील नेहमी तिच्याशी सर्व विषयांवर चर्चा करत. आणि आज तिने विचारलेल्या प्रश्नांबाबत बाबा तिला नवनवीन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देऊ लागले.


देशाने या काही वर्षात केलेली प्रगती अगदी वाखाणण्याजोगी होती. उत्पादन तंत्रज्ञान असो की माहिती तंत्रज्ञान आपण सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबद्दल बोलत असताना मधेच मिनू म्हणाली, "बाबा आपण इतकी प्रगती केली तर मग अजून आपली पृथ्वी प्रदूषण मुक्त का नाही करू शकलो. आम्ही शाळेत शिकतोय की की जागतिक तापमान वाढतच आहे मग ते कमी करण्यासाठी अजूनपर्यंत का नाही आपण एखादे तंत्रज्ञान विकसित केले?" तिचा हा प्रश्न ऐकून बाबा देखील विचारात पडले. आणि यावर उपाय काय करता येईल यावर तिच्याशी चर्चा करू लागले. आणि तिला बऱ्याच गोष्टी सांगू लागले.


ते मिनुला म्हणाले, खरंच मनुष्य आज चंद्रावर जाऊन पोचला आणि आता तर मंगळ पण पादाक्रांत करायला निघालाय पण पृथ्वी मात्र या प्रदूषणाच्या विळख्यात अजुनच घट्ट अडकत चालली आहे. तिला यातून मुक्त करणे हे आपल्या सर्वांचे एकमेव कर्तव्य आहे. हा विडा धरतीच्या प्रत्येक बांधवाने उचलायला हवाय तरच आपण तिला खऱ्या अर्थाने ग्लोबल वॉर्मिग आणि पर्यावरणाच्या अनेक समस्यांपासून स्वातंत्र्य मिळवून देऊ. 


मिनू अगदी कान देऊन बाबांचे बोलणे ऐकत होती. बाबांनी पुढे सांगितले की, आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण सर्वच क्षेत्रात उंची गाठली मग ते मेडिकल सायन्स असो की मास कम्युनिकेशन असो की ऑटोमोबाईल इंडस्ट्री असू देत पण त्याबरोबरच त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामाना देखील आपण सामोरे जातोय. यासर्व प्रगती बरोबरच आपल्या वाटेला आले हवा प्रदूषण, माती प्रदूषण आणि जल प्रदूषण... आणि या सर्वापासून आपल्या भूमातेला वाचवून तिचे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही पण आपलीच आहे. बाबांचे बोलणे तिला तंतोतंत पटत होते.


मिनू बाळा, आपण आपल्या परीने थोडफार का होईना पण पर्यावरणाच्या रक्षणासाठी काही पावलं नक्कीच उचलू शकतो. जसे की, आपलं प्रथम कर्तव्य म्हणजे आपल्या जीवन पद्धतीत आपल्याला करावयाचा बदल जेणेकरून पर्यावरणाचा होणारा विनाश थांबण्यास मदत होईल. प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवून त्याठिकाणी कापडी किंवा ज्यूट पिशव्या वापरणे. अगदी जवळ कुठे जायचे असल्यास आपले वाहन न वापरता पायी जाणे किंवा सायकल वापरणे. पब्लिक ट्रांसपोर्ट चा जास्तीत जास्त वापर करणे. इले्ट्रॉनिक्स वेस्ट कमी करणे, फूड वेस्टेज तसेच पेपर वेस्टेज कमी करणे. जर प्रत्येक नागरिकाने जागरूकतेने याचे अनुसरण केले तर नक्कीच आपण पर्यावरण संरक्षण करण्यात यशस्वी होऊ. तिने ह सर्व करण्याचे मनोमन ठरविले.


बाबा पुढे म्हणाले, सध्या चंगळवादाची प्रवृत्ती समाजात बोकाळली आहे. जंक फूडचां अधिकाधिक वापर केला जातोय. त्यामुळेच नानाविध आजारांना मनुष्यप्राणी ते पशू पक्षी सर्वच बळी पडत आहेत. या जंक फुडमध्ये भेसळीचे प्रमाण खूप असल्याने नवनवीन रोगांना आमंत्रण दिल्या जात आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करून सेंद्रीय अन्नाचे उत्पादन वाढविणे आणि त्याचेच सेवन करणे.


थोडक्यात आपल्याला नैसर्गिक संसाधनांचा वापर दैनंदिन जीवनात करायला हवा. जसे सोलर पॅनल चा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे तंत्र वापरून आपण आपल्या पर्यावरणाचे संतुलन नीट ठेऊ शकतो. हरित तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर आता करायला पाहिजे. आपल्या शूर वीर जवानांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केले. आता आपले कर्तव्य आहे की या भारतभूमीचे हरित क्रांतीवीर बनून आपण आपल्या वसुंधरेला प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिग या शत्रूंच्या विळख्यातून बाहेर काढून पुन्हा एकदा तिला स्वतंत्र करूया. तिलाही मोकळा श्वास घेऊ देऊया.


बाबांचे हे बोलणे मिनूने अगदी मनापासून ऐकले आणि तसे वागण्याचा संकल्प पण केला. तिने आपल्या परीने होईल तितके पर्यावरण संरक्षण करण्याचे बाबांना प्रॉमिस दिले. तिने तिच्या सर्व मैत्रिणी आणि शाळेच्या मुलांमध्येदेखील याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असे मनोमन ठरविले. शेवटी बूँद बूँद से बनता है सागर हेच खरे ना!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational