Pranjali Lele

Romance

3  

Pranjali Lele

Romance

अबोल प्रीत

अबोल प्रीत

5 mins
310


आज प्रकाश खूप खुश होता. आपले शिक्षण पूर्ण करून सिव्हिल इंजिनिअरची डिग्री त्याने आज मिळविली होती. बरीच वर्ष घरापासून दूर राहिल्यामुळे केव्हा एकदा घरी सर्वांना भेटतो असे त्याला झाले होते. घरी आई बाबांनी त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. त्यांच्या एकुलत्या एक मुलाने त्यांचे स्वप्न आज साकारले होते. घरात प्रवेश करताच त्याने आई बाबांना आणि देवाला नमस्कार केला. आईने पेढे देवापुढे ठेवले आणि त्याला ओवाळले. त्याच्या येण्याने घरात जणु चैतन्य परत आले होते.


आता घरच्याच बिझनेस मध्ये तो आपल्या नवीन तंत्रज्ञान वापर करणार होता.

बाबांनी अथक प्रयत्नाने साकारलेल्या घरकुल कन्स्ट्रक्शन कंपनीला यशोशिखरावर नेण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याने लवकरच बाबांबरोबर काम करण्यास सुरुवात केली. बाबांच्या सध्या चालू असलेल्या प्रोजेक्ट चे काम तो बघायला लागला. त्यांच्याबरोबर कन्स्ट्रक्शन साईट वर जाऊन कामातील छोटे मोठे बारकावे तो शिकला. हळूहळू दोनेक वर्षात त्याचा यात चांगलाच जम बसला.


अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने नुकत्याच मिळालेल्या प्रोजेक्टसाठी आपल्या नव्या डिझाईन्स तयार केल्या. त्यांचा हा प्रोजेक्ट खूप यशस्वी झाला. त्याच्या मामाला पण त्याचे काम फार आवडले. मामाला घरातील वरच्या मजल्याचे बांधकाम करायचे होते, त्यांनी ते काम प्रकाशला दिले. हा प्रोजेक्ट त्याने एकट्याने पूर्ण करावा अशी बाबांची ईच्छा होती. त्यामुळे तो अगदी उत्साहाने कामाला लागला.


प्रकाशच्या नवीन कामाला जोरदार सुरवात झाली. प्रकाश स्वतः सगळ्या कामाची जातीने लक्ष देऊन पाहणी करत होता. आज सकाळी जरा लवकरच तो कामासाठी आला तर अजून त्याचे लोक तिथे यायचेच होते. तेवढ्यात मामीने त्याला गरमागरम आल्याचा चहा प्यायला बोलाविले..तो खाली जायला निघाला तितक्यात त्याचे लक्ष समोरच्या घरातील बाल्कनी कडे गेले.


एक मुलगी आपले ओले लांबसडक काळेभोर केस समोर घेऊन हलकेच ते टॉवेलने पुसत होती..तिचा तो नाजूक बांधा, सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकणारी तिची नितळ कांती बघून क्षणभर तो तिथेच थबकला. तिची एक झलक बघायला तो तसाच स्तब्ध उभा राहिला. सूर्य ढगातून हळूच बाहेर पडावा तसे तिने हळूवारपणे आपले पुढील केस तोंडावरून मागे सारले आणि तिच्या त्या सात्विक सौंदर्यावर त्याचे डोळे खिळले.


एकाएक दोघांची नजरभेट झाली. तिने हळूच कटाक्ष दुसरीकडे टाकला. त्याची नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती. ती वळुन आत शिरली तरी तो तसाच तिकडे पाहत स्तब्ध उभा होता. मामाच्या मोठ्या हाकेने तो भानावर आला आणि अगदी धावतच खाली गेला. नंतर साऱ्या दिवसभर त्याची नजर सारखी बाल्कनीकडे जात तिलाच शोधत होती.


संध्याकाळी घरी आल्यावर पण त्याचे मन थाऱ्यावर नव्हते. जणू त्या पहिल्या नजरेत तिने त्याचे हृदय काबीज केले होते. आता ही रात्र केव्हा संपते आणि केव्हां एकदा दिवस उजाडतो असे प्रकाशला झाले होते. दुसऱ्या दिवशी वेळेच्या जरा आधीच तयार होऊन स्वारी निघाली तसे आईने त्याला विचारलेच. अरे, आज जरा जास्तच लवकर निघालास, तुला कामाने फार झपाटले आहे रे, त्यावर आईला काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देत तो मनातल्या मनात हसत लगेच बाहेर पडला.


आज सकाळपासून काम जोरात चालू होते. मामा पण आपल्या भाच्याची कामाप्रती डेडिकेशन बघून खूप खुश होता. दुपारी जेवणाची वेळ झाली तसा तो निघाला. आज दिवसा एकदाही ती बाल्कनीत फिरकली नाही. आज काही तिचे दर्शन झाले नाही त्यामुळे त्याचा जरा मूड ऑफ झाला. घरी आल्यावर उगाचच त्याची चिडचिड होत होती. आईने न राहवून विचारलेच, आज काय बिनसले रे एवढे ? काही नाही ग! नेहमीचेच वर्कर्सचे प्रॉब्लेम्स असे म्हणत त्याने विषय बदलला. रात्री गादीवर पडल्यावर डोळ्यापुढे तिचाच चेहरा येत होता. यालाच प्रेम म्हणतात का असे स्वतःच्याच हृदयाला विचारत तिच्या गोड स्वप्नात तो झोपी गेला.


पावसाळ्यातील ढगाळ वातावरणात सूर्य खूप दिवसांनी उगवतो तशी ती आज तब्बल एका आठवड्याने त्याला बाल्कनीत झाडांना पाणी घालताना दिसली. तो आनंदला. त्याने डोळे भरुन तिला पाहिले. तिनेही अधून मधून हलकासा कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि त्याने ते अचूक हेरले . तो मनोमन सुखावला.


हळूहळू आता ती रोजच या ना त्या कारणाने बाल्कनीत रेंगाळत राहायची. हा तर जणू तिच्यासाठी वेडावलाच होता. डोळ्यांनीच ते मग एकमेकांशी बोलायचे. बऱ्याचदा लाजून ती निघून जायची. ती लाजली हे बघून तो समजायचा की हेच ते अबोल प्रेम. पण हिच्या डोळ्यात जे दिसते ते खरंच मनात पण आहे का, की हा केवळ माझा भास? हा प्रश्न त्याला पडायचा.


खरतर तिलाही तो खूप आवडायचा. पण तिच्यासाठी तिची घरातली जबाबदारी, बहिणीचे शिक्षण हे जास्त महत्वाचे होते..आपल्याला लग्नचं करायचे नाही असे ती बऱ्याचदा आई बाबांना म्हणायची. पण त्याला बघितल्यापासून तिच्याही नकळत त्याच्याबद्दल मनात कोमल भावना फुलू लागल्या होत्या.


याचे काम मात्र एव्हाना संपत आले होते आणि बाबा, मामा सगळेच त्याच्या कामावर जाम खुश होते. पाहता पाहता मामाच्या घराचे काम पूर्ण झाले. आणि आता इंटेरियर तेवढे राहिले होते.

प्रकाश बऱ्यापैकी बिझनेस सांभाळतो आहे तर आता त्याचे दोनाचे चार हात करायला हरकत नाही अशी चर्चा पण घरात व्ह्यायला लागली होती. भरपूर स्थळ पण त्याच्यासाठी सांगून येत होती. तो मात्र सध्या तरी नाही असे म्हणत दिवस पुढे ढकलत होता. ती अशी अबोल तर आता आपल्यालाच काहीतरी करावे लागणार या विचाराने त्याने मामीकडे तिच्या घरची चौकशी सुरू केली.


मामीशी चहा घेत गप्पा मारताना आजूबाजूच्या शेजाऱ्यांची तो आवर्जून चौकशी करू लागला. त्यातूनच शेजारच्या जोशी काकांच्या चांगल्या शिकल्या सवरलेल्या दोन मुली आहेत ही माहिती त्याला मिळाली. तशी एकदोनदा त्याच्यासमोर ती मामी कडे काही कारणाने आली होती तेव्हा तिचे नाव सुवर्णा आहे हे त्याला कळले होते. मामीच्या चाणाक्ष नजरेने त्याची ही एवढी विचारपूस लगेच हेरली. आणि काय आवडली की काय तुला एखादी असे मामीने गमतीने त्याला विचारले देखील.


न राहवून मामीला त्याने मनातले बोलुन दाखवले. मामी ते ऐकल्यावर म्हणाली, अरे, त्यांच्या घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे बरं का. आपल्यासारखे सुखवस्तू घराणे नव्हे. काका आता पेन्शनर आहेत..मोठी मुलगी सुवर्णा शाळेत जॉब करते आणि धाकटी कल्पना अजून शिक्षण घेतेय. तसा तो मामीला लगेच म्हणाला, अग, मला मुलीशी लग्न करायचे आहे, त्यांच्या संपत्तीशी नव्हे. घरी आई, बाबांशी आजच बोलायचे असे त्याने ठरविले.


मामाच्या घरी वास्तू पूजनाला आलेली शेजाऱ्यांची सुवर्णा आपल्या प्रकाशच्या मनात भरली आहे हे ऐकून आईला आनंदच झाला. एवढ्या श्रीमंत घरची स्थळे नाकारून एक सालस, सुंदर आणि सुशिक्षित अश्या मुलीची आपल्या मुलाने निवड केल्याचे बघून त्यांना समाधान वाटले.


लगेचच त्यांनी सुवर्णाला मागणी घातली. एवढे चांगले स्थळ चालून आलेले बघून जोशी काका, काकूंना खूप आनंद झाला. पण सुवर्णा ने मात्र एका अटीवर या लग्नाला मान्यता द्यायचे कबूल केले होते, ती म्हणजे लग्नानंतरही ती आपला पगार आपल्या आईबाबांसाठी आणि बहिणीच्या शिक्षणासाठी खर्च करणार. ते ऐकून तिची आई तिच्यावर चिडलीच. एवढं चांगलं स्थळ सांगून आलंय आणि हे काय खुळ घेऊन बसलीये तू .. पण सुवर्णा काहीएक ऐकायला तयार नव्हती आणि तिने अगदी स्पष्टपणें आपली ही अट प्रकाशला सांगितली.


तिच्या या निर्णयाचे प्रकाशला खूप कौतुक वाटले. आज मुलां इतक्याच मुली पण आपल्या घराचे कर्तव्य पार पाडण्यास सक्षम आहेत आणि मुलींची पण ही जबाबदारी आहे ही विचारसरणी त्याला तंतोतंत पटत होती. प्रकाशने आणि त्याच्या घरच्यांनी तिच्या या निर्णयाचे अगदी मनापासून स्वागत केले आणि जोशी दाम्पत्याच्या मनावरचे मोठे दडपण गेले.

आणि लवकरच त्यांच्या अबोल प्रितीचे एका गोड बंधनात रूपांतर झाले.


कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक करा आणि नावासकट पुढे शेअर करा. तुमच्या कमेंट्स खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.

धन्यवाद.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance