Pranjali Lele

Drama

3  

Pranjali Lele

Drama

घालमेल

घालमेल

4 mins
384


लहान मुलांचे संगोपन म्हंटले की आनंद, प्रेम, जपणूक, काळजी, गडबड, गोंधळ, जबाबदारी अश्या नानाविध भावनांनी भरलेल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर सहज येतात. प्रत्येक आईने याविविध भावना आपल्या मातृत्वाच्या प्रवासात अनुभवल्या असतात. लहानपण देगा देवा असे मनोमन वाटणारा तो रम्य बाल काळ असतो. आपल्या मुलांचे ते निरागस बालपण अनुभवताना प्रत्येक आई त्यांच्या विश्वात आकंठ बुडालेली असते. पण त्याबरोबरच एक जबाबदार पालकाची भूमिका पण ती वठवित असते.


या आईपणाच्या सुंदर प्रवासात अनेक किस्से असतात जे ती कधीच विसरू शकत नाही. मला देखील असाच एक किस्सा आज अचानक आठवला. आज कपाट आवरताना मला मुलांचे जुने फोटो अल्बम मिळाले. ते बघता बघता नकळत मी भूतकाळात शिरले. 


आम्ही नुकतेच दिल्ली ला शिफ्ट झालो होतो. अनायसे तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी चालू होती म्हणून आमच्याकडे माझी भाची, नणंद राहायला आली होती. ताई आणि आत्या आल्याने माझी चार वर्षांची लेक सई खुप खुश होती. ताई आणि तिची छान गट्टी होती. आता सगळं काही तिला ताई बरोबर करायचे होते. बऱ्याचदा तिला ताईचे अनुकरण करताना बघून आम्हाला हसू येई. आता काही दिवस तरी आईशिवाय तिला चालणार होते. एरवी आई आई करणारी सई सध्या ताईमय झाली होती.


दिल्ली बघण्याच्या निमित्ताने आमचे कुठे ना कुठे फिरणे चालू झाले. एक दिवस आग्रा, मथुरा बघून झाले. आणि आज आमचा दिल्ली रेल म्युझियम बघण्याचा प्लॅन होता. सकाळी लवकर आटोपून आम्ही सारे निघालो. आज रविवार असल्याने तिथे बऱ्यापैकी गर्दी होती. जुन्या काळातील रेल इंजिन आणि इतर नानविध रेलंचे मॉडेल्स बघायला लोकांची झुंबड उडाली होती.  


आम्ही सगळं बघत बघत पुढे जात होतो. तेवढ्यात समोरून एक छोटी ट्रेन येताना दिसली. ती खास तिथल्या मुझियम च्या  टूर साठी होती. ती येताच पटापट लोक आत शिरले. आणि ट्रेन पुढे निघाली. ती ट्रेन बघून सईने त्यात बसायचा हट्ट धरला. आम्ही मग तिथे ट्रेन ची तिकीट काढायला उभे राहिलो. ट्रेन ला यायला वेळ होता म्हणून माझी भाची शेजारीच असलेल्या लहान मुलांचे स्विंग आणि इतर खेळणे यावर खेळायला गेली. तिला बघून सई पण माझा हात सोडून धावतच समोर नणंद उभी होती तिकडे पळाली. मला वाटले ती समोर आत्याकडे गेली. त्याचवेळी मी तिकीट काढत होते त्यामुळे मी तिकीट काढून मग मुलींकडे गेले.


तिकडे जाऊन बघते तर काय माझी भाची आणि नणंद तर होत्या पण सई काही तिथे दिसेना. मी विचारले असता सई तर इथे आली नाही ती तर तुझ्याबरोबर होती ना असे त्या म्हणाल्या. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच एकदम सरकली. मला काही सुचेना. आम्ही तिथे खेळण्यावर सगळीकडे सईला शोधू लागलो. पण ती कुठेच दिसेना. काय करावं काही सुचत नव्हत. माझी घालमेल सुरू झाली. ज्याला त्याला आपण ब्ल्यू ड्रेस मध्ये एक छोटी मुलगी बघितली का ते विचारू लागलो. मन अगदी सैरभैर झाले होते.


दर पाच मिनिटांनी समोरून ट्रेन येत होती. त्यात लोकांची गर्दी लोटत होती. ती चुकून ट्रेन मध्ये तर चढली नसेल ना असा मनात विचार आला. आता इतक्या गर्दीत तिला शोधायचे तरी कसे कळत नव्हते. आम्ही वेगवेगळ्या दिशेने जात सईला शोधू लागलो. मी मनात सारखा परमेश्वराचा धावा करत होते. डोळ्यातल्या अश्रूंचा आता बांध फुटला. राहून राहून सारखे एकच मनात येत होते मी असे कसे तिला जाऊ दिले. तेवढ्यात मला समोर प्रशासक कार्यालय दिसले. तडक तिथे गेलो. आत शिरताच तिथे समोर सई दृष्टीस पडली. तिला पाहताच माझा जीव भांड्यात पडला.


ड्युटी वरील एका कर्मचाऱ्याने तिला ट्रेन जवळ पाहिले. तिच्या आजुबाजुला कुणी मोठे दिसले नाही म्हणून त्याने तिला नाव विचारले आणि थेट इथे आणले. आमच्या बाईसाहेब ती ट्रेन बघण्यात इतक्या रमून गेल्या होत्या की ताईकडे जायचे विसरल्याच. आणि नंतर आई दिसली नाही म्हणून रडारड सुरू केली. नशिबाने त्या कर्मचाऱ्याचे लगेच लक्ष गेले त्यामुळे ती सुरक्षित होती. जरा शांत झाल्यावर तिने त्यांना आपले पूर्ण नाव पण सांगितले.  


तेवढ्यात आम्ही तिथे पोचलोच. मला पाहताच सई येऊन घट्ट बिलगली. तेथील कर्मचाऱ्यांनी मात्र मला चांगलेच सुनावले. अहो गर्दीत असा मुलांचा हात अजिबात सोडायचा नाही. मी त्यांना समजावले की, कसा आमचा तेव्हा गैरसमज झाला. मला वाटले की ती तिच्या आत्याकडे आहे आणि त्यांना वाटले की ती माझ्याकडे..असो पण असा कुठलाही चान्स मुलांच्या बाबतीत कधी घ्यायचा नाही याचा मी कानाला खडा लावला. आणि पालक म्हणून तर आपण . खुपचं जागरूक राहायला हवे हे पण मनोमन ठरवले.


सईला लहान असल्याने तिला त्यातले गांभीर्य काहीच कळले नव्हते. तिचा ट्रेन चा हट्ट परत सुरु होता. आम्ही लगेच ट्रेन ची राईड घेतली आणि थेट घरी आलो. आल्यावर मात्र सईला नीट समजावून सांगितले की, बाहेर कुठेही गेले की मोठ्यांचा हात घट्ट धरायचा. अजिबात सोडायचा नाही. नाहीतर पोटली वाला बाबा येऊन पकडून नेतो. त्यानंतर कुठेही बाहेर जाताना तिला हे मी कायम सांगत असे. आणि सई मग आईचे हे वाक्य कधीच विसरली नाही. उलट बाहेर कुठे मॉल मध्ये सामान घेताना पण माझा हात चुकून सुटला तर तिच घट्ट धरत असे आणि मला आठवण करून देत असे.


सईला तिचे पूर्ण नाव मी आधीच शिकवले होते पण त्याबरोबरच घराचा पत्ता आणि फोन नंबर पण पाठ करवून घेतला. या लहान वाटणाऱ्या सवयी केव्हा कामी येतील ते काही सांगता यायचे नाही. कुठेही जायचे असले तरी आईला सांगुनच जायचे हे पण तिच्या मनावर बिंबवले.


आता इतकी वर्षे सरली त्या गोष्टीला पण अजूनही ती आठवण मात्र ताजी आहे. लहानपणी त्या घटनेनंतर तिला लावलेल्या सवयी आजही माझी मुलगी न विसरता पाळते. एरवी कॉलेजमधून निघाली की मला लगेच फोन करते. कुठेही बाहेर गेली की आधी तिचा पोहोचल्याचा फोन येतो आणि उशीर होणार असेल तर वेळोवेळी ती मला कॉल करते. ही जबाबदारीची जाणीव अगदी लहानपणापासूनच तिच्या मनावर बिंबविल्या गेली. त्यामुळे आता मी निश्चिंत असते.


आपल्या मुलांना लहानपणापासून एक जबाबदार नागरिक बनवणे हे सर्वस्वी पालकांच्या हाती असते. एरवी आपल्याला शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी मुलांच्या दृष्टीने किती महत्वाच्या असतात याची जाणीव असा अनुभव करवून देते. आपल्याला एरवी वाटते की आपण आपल्या मुलाची नीट काळजी घेतो पण कधीतरी असा परिक्षेचा प्रसंग येतो जो आपल्याला जाणीव करून देतो आपल्या खऱ्या पालकत्वाची. तेव्हा एक जबाबदार पालक म्हणून आपण मुलांच्या बाबतीत नेहमीच जागरूक राहायला हवे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama