Pranjali Lele

Inspirational

2  

Pranjali Lele

Inspirational

पितृत्वाची वाटचाल

पितृत्वाची वाटचाल

2 mins
256


लहानपण देगा देवा..अस प्रत्येकाला अजूनही म्हणावंस वाटत कारण त्या रम्य बालपणात आई बाबांनी केलेल्या कोड कौतुकाच्या आणि त्यांनी पुरवलेल्या हट्टांच्या गोड आठवणी असतात. लहानपणी काहीही हवे असले की आई कडे आम्ही भावंड हट्ट करत असे. पण बाबांचा मात्र कायम एक धाक वाटे. आम्हा बहीण भावाच कितीही भांडणं झाले तरी बाबा येताच आम्ही शांत होत असू असा त्यांचा दरारा होता. तरीही बरेचदा खरे पाहता आई ने नको म्हंटले तरी बाबा आमचे अनेक हट्ट पुरवत.


बाबांना फिरण्याचा छंद त्यामुळे आम्हा मुलांना फिरायला घेऊन जायला त्यांना फार आवडे. महिन्याचा पगार झाला की न चुकता आमच्या आवडीचा खाऊ आणायला बाबा कधीही विसरत नसत. बाबा नेहमी सगळ्यांच्या मदतीला तत्पर असल्याने घरात नेहमी मित्रांची, नातेवाईकांची ये जा असे..त्यामुळे गप्पांची मैफिल घरी रंगत असे आणि त्यातूनच नात्यांची जपणूक कशी करावी याचे धडे आम्हाला बाबांकडून नकळत मिळत गेले. आजही त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.


बाबांची शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच आम्ही आमचे आयुष्य चांगल्या प्रकारे घडवू शकलो. आज आम्ही भावंड आपापल्या मुलांचे आई बाबा झालो तरीही आई बाबांच्या मायेची ऊब आम्हाला नेहमीच आधार देते. आजही बाबा आपल्या नातवंडांत त्याच उत्साहाने रमताना बघून खूप आनंद होतो.


माझी मुलंदेखील त्यांच्या बाबांशी वेगवेगळ्या विषयावर मोकळेपणाने चर्चा करताना बघून जाणवत की आजची पिढी खरंच खूप बदलली आहे. त्यांचा बाबा पण अगदी संयमाने कितीही बिझी असेल तरीही वेळ काढून त्यांच्याशी गप्पा मारतो अणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे शंका निरसन करतो. त्यांनी काही अयोग्य केल्यास वेळ प्रसंगी त्यांना रागावतो देखील.


एरवी कधीही इतका फ्री न मिळणारा बाबा लॉक डाउन मुळे मुलाच्या अधिक जवळ आलेला पाहून खूप बरे वाटले. रोज त्यांचे कॅरम बोर्ड, पत्ते यांचे डाव रंगले. बाबा आणि मुले मिळून नवीन रेसिपीज पण ट्राय करून बघितल्या. याबरोबरच बाबा त्यांच्या अभ्यासात पण जातीने लक्ष घालतो. बाबांनी आईला कामात केलेली मदत बघून मुले देखील आपसूकच न सांगता छोटी मोठी कामे करू लागली आहेत. बाबांनी आपल्या वागणुकीतून मुलांना देखील छोट्या छोट्या कामाचे महत्व पटवून दिले.


काळ कुठलाही असो प्रत्येक काळात बाबांचा आदर्श मुलं नेहमीच डोळ्यासमोर ठेवतात . आणि त्यांच्या वागण्याचे अनुसरण मुले करतात. तेव्हा एक चांगलं मुलं घडवणं हे आई इतकंच बाबांचं ही कर्तव्य ठरत. असं हे बाबा आणि मुलांचं नात अतूट राहावं आणि नेहमी फुलत राहावं हीच सदिच्छा.


फादर्स डे च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational