Pranjali Lele

Others

4  

Pranjali Lele

Others

परीसस्पर्श

परीसस्पर्श

3 mins
336


सतीश राधाक्काचा एकुलता एक मुलगा होता. पतीच्या निधनानंतर त्यांनी एकटीने त्याचे चांगले लालन पालन केले. तो देखील अतिशय होतकरू आणि प्रामाणिक मुलगा होता. गावात लहानाचा मोठा झालेला सतीश चांगलं शिकून शहरात नोकरीला लागला. त्याचे लग्नाचे वय झाले तसे राधाक्काने आपल्याच गावातील एका सुशील घराण्यातील सालस आणि दिसायला देखण्या अश्या प्रियाशी त्याचे लग्न लावून दिले. लग्नानंतर सतीश बरोबर काही दिवस गावी राहून प्रिया शहरात जायला निघाली. राधाक्का मात्र आपले गाव सोडून शहरात यायला तयार नव्हती. मुलांना पोटभर आशीर्वाद आणि बरोबर भरपूर गावाचा मेवा देऊन तिने त्यांना पाठविले.


इतके वर्ष गावात राहिलेल्या प्रियाला शहराचे मोठेच अप्रूप वाटत होते. लवकरच ती तिथल्या आधुनिक वातावरणात रमली. हळूहळू प्रियाला इकडचे राहणीमान, वेशभूषा आवडू लागली. आपल्या शेजारच्या घरातील आर्थिक सुबत्ता बघून आपल्याकडे पण या सर्व सुखसोयी असाव्या असे तिला मनोमन वाटत असे. परंतु सतिशच्या जेमतेम पगारात हे सर्व त्यांना शक्य नव्हते याची तिला पूर्ण कल्पना होती. त्यासाठी त्याच्याकडे कधीही तिने अट्टाहास धरला नाही. पण आपल्या परिने प्रयत्न मात्र चालू केले. गावी असताना ती शिवणकाम, विणकाम खूप करी आणि त्यात तिचा हात कोणी धरू शकत नसे. आपल्या या गुणांच्या आधारावर तिने मग इथे घरच्या घरी शिवणकाम चालू केले आणि हळूहळू तिचा छान जाम बसला आणि तिला कामाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. आणि मग एक एक पैसा जमवून तिने मोठ्या आवडीने आपला संसार सजविला. तिच्या या गुणांचा सतीशला फार अभिमान वाटे.


दोघेही मोठ्या गुण्या गोविंदाने आपला नव्या नवलाईचा संसार करत होते. काही महिन्यातच त्यांच्या या संसार वेलीवर एक गोंडस फुल फुलले. बाळंतपणासाठी गेलेली ती बाळंतपणानंतर काही महिने माहेरी राहून मग बाळाचे बारसे आटोपून आपल्या गोड परीला घेऊन ती राधक्का बरोबर आपल्या शहरातल्या घरी आली. दोघांचा तो छान सजवलेला संसार बघुन राधाक्काला खूप आनंद झाला. बाळ जरा मोठे होईतोवर त्या तिथे राहिल्या आणि मग परीचा पहिला वाढदिवस साजरा करून त्या मोठ्या समाधानात आपल्या गावी परतल्या.


सतीशला नेहमीच आपल्या गुणी बायकोचे खूप कौतुक करत असे. किती पटकन तिने स्वतः ला इथल्या वातावरणात सामावून घेतले आणि सगळ्याशी छान जुळवून घेतले होते शिवाय थोड्याच दिवसात स्वतः चा छोटा व्यवसाय देखील चालू करून आपले छोटेसे घरकुल छान सजविले होते. आजवर तिने त्याला काहीही मागितले नव्हते. आहे त्यात समाधान मानून ती त्याच्या बरोबर खुप सुखात होती. आता तर परीमुळे तिला सर्वस्व मिळाले होते. परीच्या संगे तिला आता दिवस पुरेनासा झाला होता. तिच्या कोडकौतुकात दिवस मजेत जात होते.


सतीश चे पण एक स्वप्न होते आपल्या बायकोसाठी काहीतरी नवे घेण्याचे..प्रत्येक स्त्री ला दागिन्यांची हौस असते..तशी प्रियाला पण होती.. आजवर लग्नात दिलेल्या एक पदरी सोन्याच्या मंगळसूत्रा खेरीज त्याने तिला काहीही घेतले नव्हते. पण तिने एका शब्दाने कधी काही घेण्यासाठी हट्ट केला नव्हता. तेव्हा लग्नाच्या येत्या वाढदिवसाला प्रियाला एक नाजूक से नेकलेस गिफ्ट देण्याचे त्याने मनोमन ठरविले होते.


इकडे पाहता पाहता परी तीन वर्षांची झाली. आणि त्यांची शाळेची खटपट चालू झाली. प्रियाला तेथील सगळ्यात चांगल्या शाळेत आपल्या परी ला घालायचे होते. नशिबाने परीला तिथे एडमिशन मिळाली पण तिथली वार्षिक फीज खूपच जास्त होती. प्रियाने यावेळी मात्र पहिल्यांदा सतीशकडे पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी हट्ट केला. सतीश ने साठवलेल्या पैशातून परीची शाळेत एडमिशन घेतली. त्यामुळे प्रिया खूप खुश होती. 


आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. प्रियाने सतिशच्या आवडीची साडी नेसली होती. ती आतुरतेने त्याची वाट बघत होती. संध्याकाळी सतीश ऑफिस मधून आला आणि तिने दार उघडताच टवटवीत मोगऱ्याचा सुंदर गजरा हळूच त्याने तिच्या केसात माळला आणि म्हणाला, प्रिया तुझ्यासाठी नेकलेस घेणार होतो ग पण नाही जमले. आज तुला द्यायला माझ्याकडे काहीही नाहीये..त्यावर प्रिया त्याचा हात आपल्या हाती घेत म्हणाली, तुमचे प्रेम हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. तेवढ्यात परी ने येऊन तिला मिठी मारली. तिचा तो परीस स्पर्श होताच प्रिया तिला बिलगत म्हणाली, हाच तर माझा सर्वात मौल्यवान दागिना आहे तुम्ही दिलेला..याची सर तर कुठल्याच दागिन्याला नाही..सतीशने अलगद दोघींना आपल्या कवेत घेतले.


Rate this content
Log in