गत व गती : एक सत्य व्यथा
गत व गती : एक सत्य व्यथा
हॉटेलच्या काऊंटरवर एक मॅडम आल्या, म्हणाल्या ओळखलं का? म्हटलं नाही! तर त्या म्हणाल्या "तुमच्याकडे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याला एक काका काकू यायचे, मी अधून मधून त्यांच्यासोबत असायची. ते बँकेत जात होते पेन्शनसाठी, अन दर महिन्याला न विसरता तुमच्याकडे वडा सांबर आवडीने खायचे. त्या दोघेही आता राहिले नाहीत! बाजारात आले होते म्हटलं तुम्हाला सांगून जावं. काकू कॅन्सरनं गेले व एका महिन्यानंतरच काका झोपेतच वारले". सांगता सांगता दहा मिनिटांत त्यांनी सगळं सांगितलं व म्हटल्या - "बरं येते मी!" मॅडमने पार्सलचा पुडा त्यांच्या हॅण्डबॅगमध्ये टाकला. बिल दिला व निघून गेले. त्यांनी सांगितलेली कथा माझ्या मनाला सुन्न करुन गेली. मागच्या पाच वर्षांपासून मी काऊंटरवर बसणं खूप कमी केलं आहे. परभणीसारख्या शहरात हॉटेल व्यवसाय करण्याचा एक सर्वात मोठा दुःख म्हणजे "सर्व्हिस प्रोव्हायडर" हा तुमचा "सर्व्हंट" नसतो, हे ज्ञान आजपर्यंत कोणताच होटेलवाला आपल्या वागणुकीतून जनतेला शिकवूच शकला नाही, म्हणूनच तर नवीन नवीन हॉटेल उघडत राहतात अन जुनी टिकत नाहीत. वरती घरी असलेल्या मॉनीटरमधे, खाली दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यां द्वारे जुनी, वडिलधारी माणसं दिसली, तर लगेच खाली जाऊन त्यांना बोलणं व अटेंड करणं, एवढ्या पुरता माझा व काऊंटरचा संबंध उरला होता. बाकी कामकाज बघायला विश्वासाची माणसं हेच पर्याय. माझे मन, काका काकूंच्या, त्यांनीच इतक्या वर्षांपासून सांगत आलेल्या, तुकड्या तुकड्यांच्या संदर्भ व गोष्टी जुळवत, फ्लॅशबॅक मध्ये जाऊ लागले.
बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट, त्याने दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी आपले गाव व घर सोडले होते. त्याच्या पेक्षाही जास्त तिव्र इच्छा त्याच्या वडिलाची होती, अथवा आईची असेल, आज ते सांगणे कठीण होते. ऑफिसमधल्या साध्या प्रामाणिक चपराशाची मुलं इंजिनीअरिंगला लागल्या पासुन मात्र, बाबांची इच्छा जास्तच तीव्र होत गेली. "ईर्षा" हे तर त्याच्या बाबांच्या रक्तातच नव्हतं, पण आपल्याला जे आयुष्यात साधता आले नाही ते आपल्या मुलाने साधावे, मेहनत करून यशस्वी व्हावे व आपल्यासारखी मरमर न करता आयुष्य जगून दाखवावे, अशी एक इच्छा त्या पालकांची असावी.
सर्व काही पणाला लावून व कर्ज काढुन, क्लास टूची नोकरी करत पगारातून कर्ज फेडत, जेमतेम असलेल्या पाच एकर जमिनीतील तीन एकर विकून, वडीलाने आपल्या एकुलत्या एक, मुलाला बाहेर पाठवण्यासाठी तडजोड केली होते. आपल्या आजूबाजूची सर्व मुले उच्च शिक्षणासाठी व नौकरी साठि बाहेर जात आहेत, आपल्याकडे भांडे धुण्यासाठी येणारी बाईची मुलगीही एम.बी.बी.एस. ला लागली होती हे बघून, त्याच्या आई बाबांना स्वत: आपण मुलांना वेळ न दिल्याची, अपराध भावना, कदाचित वाटली होती. मुलाला आपल्याला नेमके काय करायचे होते हे कऴण्या अगोदारच ट्युशन्स व कोचिंग क्लासेस करत, दोनदा ड्रॉप घेत इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी च्या सुनामीत तो वाहत गेला होता. सगळीकडे अपयशी होऊन शेवटी पोस्ट ग्रॅच्युइट होऊन, चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता.
जसे गरिबीला पैसे नसल्याचा श्राप असतो, तसेच पैशाच्या श्रीमंतीला वेळ नसल्याचा श्राप असतो. गरिबांची मुलं आपल्या, दिवसंरात्र कामासाठी बाहेर असलेल्या आई बाबांना हे कधीच म्हणणार नाही की, त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही, किंतु त्यांनी जितका हवा तितका "पैसा" न दिल्याची कंप्लेंट ते आयुष्यभर तरी करत राहतात. उद्रेक करून जेव्हा अशी मुलं चांगल्या किंवा वाईट मार्गाने, खुप पैसे कमवायला लागतात तेव्हा, त्यांचे जग खूप मोठे पण मन फार छोटे झालेल्या असतात. या उलट श्रीमंत लोकांची पोरं हे कधीच बोलणार नाही की, त्यांच्या आई बाबांनी हवा तितका पैसा त्यांना पुरवला नाही, पण, शराबी मध्ये अमिताभ ने साकारलेल्या 'विकी बाबू' सारखे, आम्हाला जेवढा पाहिजे तेवढा "वेळ" दिला नाही म्हणून, व्यसनी बनत जातात, आपले मन मोठे व जग अन आयुष्य छोटे करत जातात, ह्यात काही नवल नाही.
"आमचं काही नाही ओ! त्यांनी आपल्या पायावर स्वतः उभा राहून स्वतः, आनंदाने जगला तरी आमच्यासाठी खूप आहे" असे म्हणणारे पालकच आपल्या मुलाने आपल्या वृद्धापकाळात आपली काळजी घ्यावी, अशी इच्छा आपल्या सुप्त मनात बाळगतात, हे ओळखण्यासाठी फार मोठ्या मानसतज्ञाची गरज नाही.
नोकरीच्या दुसऱ्या वर्षी जेव्हा विदेश जाण्याचा योग आला तेव्हा, तिघांनी आपल्या मनातले बाहेर काढून, मन मोकळे पणाने बोलायची कधी हिम्मत किंवा इच्छा केलीच नाही, कारण, करिअर व सहा अंकि पगार समोर स्माईल देत उभा होता. तिघांच्या मनांत मात्र एक विचित
्र असमाधानकारक गगनभेदी आनंद, व समाजाला दाखवण्यासाठी, त्यांच्या चेहर्यावर एक अभिमानाचे सर्टिफिकेट छापलेले मात्र दिसत होते.
बाहेरच्या बाहेर बारावी, पदवी, पदव्युत्तर, संपवुन तो विदेशात गेला होता. शिक्षण संपवत संपवत त्याने कधी घरच्या परंपरा, महालक्ष्म्या, दिवाळी, दसरा सुद्धा संपवुन टाकल्या हे तिघांना कळालेच नाही. मग विदेशात असला तर काय झालं, आपल्याला न सांगता त्यांच्या मनासारखेच, पण आपल्या मुलाने एका भारतीयाशीच लग्न केले ना, हे शेजाऱयांना, नातेवाईकांना व आपल्या अंतर्मनाला सांगत पटवत, चार वर्षा पर्यंत आपल्या सुनेचे दर्शन न झालेले, हे आई बाबा कधी म्हातारे झाले कळालेच नाही.
अगदी मागच्या पाच वर्षांपासून वृध्दाप्यात आलेले हे आई बाबांनी लांबचा हवाई प्रवास करुन हॅलोवीन, इस्टर, व्हॅलेंटाइन्स डे, न्यू इयर व ख्रिसमस सारख्या पाश्चात्य सणी नाईलाजाने, पण मानसिकता बदलून, खेचून आणलेल्या आनंदाने, साजरा केले होते. मुलांच्या व नातवांच्या अकृत्रिम आनंदात, ते आपले जुने आनंद शोधत, हजारो मीलचा हवाई प्रवास, कृत्रिम कपड्यात व चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य घेऊन, करत होते. मुलगा येणाजाण्याचे तिकीटं पाठवत असे व हे जोडपे विदेशी हेलपाटे मारत असे. परभणीत जेव्हा हे जोडपे असायचे दर महिन्याच्या पाच तारखेला बँकेत येऊन पेन्शनचे पैसे काढून माझ्याकडे वडा सांबार व गुलाब जामून खाऊन घरी जात असे. कुण्या एकेकाळी यांच्या मुलाला मी शिकवलेले होत. म्हणजे तो माझाच विद्यार्थी.
विदेशात पट्टय़ापट्टय़ांचा त्रिकोणी टोप्या घालून, पुंग्या वाजवून, केक कापून, तोंडाला क्रिम फासून, विंग्रजी गाणी गाऊन, आग्रहाखातर थोडेसे कंबर व हात हलवून, या म्हातार्या जोडप्याने, आपले नातवंडांचे जन्मदिन नाचून साजरा केले होते. कानावर जोरजोरात इंग्रजी गाणी पडत असताना, आईच्या मनात तेवढ्याच जोरात, सुरुवातीच्या काळात जे "सुखहर्ता दुखहर्ता" आपोआप वाजत होता ते हल्ली काही दिवसात मंद होऊन, आता संपुर्ण बंद पडला होता. अगोदर मुलाच्या मनात फक्त "आई" आली तरी, "आई" शब्द लेकराच्या तोंडातुन बाहेर पडण्यापुर्वीच, "काय रे बाळा" म्हणणारी म्हातारी, आता तिला तिसऱ्यांदा जोरात "ए-आई! कितीदा बोलावावं लागतं गं तुला, जरा ऐक ना" असं संबोधावं लागत होतं.
विदेशाला गेल्यापासून मुलगा कधीच भारतात परत यायला तयार नव्हता. पण प्रामाणिकपणे आई बाबांना तो तिकडे बोलवायचा. पण हे आता आई बाबा थकले होते, वा तो भारताला थकला होता. तीन महिन्यांपूर्वी हे सुंदर म्हातारं जोडपं जेव्हा आमच्या हॉटेलमधून वडा सांबर खाऊन निघत होती, तेव्हा मी त्यांना बोललो होतो, व काकांनी माझ्या कानात सांगितलं होतं की "हिच्या गळयाचे सॅम्पल बायोप्सी साठी पाठवलेला आहे, व मला खुप भिती वाटत आहे. आता तर हीच माझी आई आहे व हीच्या विना मी जगूच शकत नाही" काकांनी सांगितलेले शब्द माझ्या कानात अजून वाजत आहे "शिवा ऐ मॅन मे बी समथिंग ड्यु टु हिस सन्स, बट नथिंग विधाउट हिस वाइफ" व नंतर माझ्या बायकोची विचारपूस करून, आम्हा दोघांना आनंदी राहण्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले होते".
त्या दहा मिनिटात शेजारच्या काकूंनी सर्व व्यथा माझ्यासमोर मांडताना सांगितले की, कसं त्यांच्या मुलाला यायला जमलं नव्हतं, शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी कसं सर्व उरकल. पण त्यांने सहकुटुंब दहाव्या दिवशी येऊन अकरावं, बारावं व तेरवी लाखो रुपये खरचुन व दान धर्म करुन व्यवस्थितरीत्या पूर्ण केले होते. काही दिवसांनंतर माझा एका ट्रॅव्हल एजंट मित्राने सांगितले की त्या मुलाने, माझ्या विध्यार्थांने, परीवारासकट कसे वाराणसी व गया इथे हवाई तिकीट व स्टार हॉटेल्स बुक करून आपल्या वडिलांच्या अंत्यविधी पूर्ण करून, व कसे परत परत येता येत नाही म्हणून नॉर्थ इस्टचं टूर पॅकेज घेऊन, सहकुटुंब कम्प्लीट टुरिंग करुन समाधानाने परत परदेशात गेला होता.
स्पाईनोजा ने "ऐथीक्स" मध्ये "ईच्छा" हिच मानवी जीवनाचे मुल्य असल्याचे सांगितले आहे व अरिस्टोटल "डी अनीमा" मध्ये सांगतो की आपण सर्व प्राण्यांना "इच्छा" आहे म्हणूनच "गती" (मोशन) आहे, म्हणुनच तर आपण प्रवास करतो. अन प्रवासाची इच्छा माणसाला सुख व समाधानाच्या शोधात खूप दूरपर्यंत नेते. इच्छा या वैयक्तिक असतात. दोन "इच्छा" जेव्हा एक होतात तेव्हा संबंधात गोडी व प्रेम फुलतं. दोघांचं प्रवास जो पर्यंत एकाच दिशेने होत राहतो तोपर्यंत गंतव्याची चिंता तर दुर पण प्रवासाचा थकवा सुद्धा जाणवत नाही. पण दिशा बदलल्या की गती व गत दोन्ही बदलतात. शरीर व मन थकत, आयुष्य संपुष्टात येतो. बट लाईफ गोज ऑन.........!!