गृहपाठ भाग - 2
गृहपाठ भाग - 2


भाग - 2: माझी डायरी
मुळात 'गृहपाठ' ला गृहपाठ का म्हणतात? इथूनच माझा प्रश्न सुरु होतो. जर इतक सार लिखाण द्यायचं असतं तर मग 'पाठ' या नावाखाली का खपवतात हे मला अजूनही न उलगडलेले कोडे आहे.
असो...
आपल्या कडे पडलेल्या चुकीच्या पद्धती बदलण्यासाठी आंदोलन नाहीतर दंगली करण्याची पध्दत आहे. पण मी मात्र शाळेतून दिलेल्या गृहपाठाकडे 'पाठ' फिरवायची असा गांधीगिरीचा मार्ग अवलंबला होता.
त्यामुळे मी गृहपाठ करण्याच्या भानगडीत कधी पडलीचं नाही. त्याला दोन कारणं होती:
एकतर मला लिखाणाचा फार कंटाळा होता. आणि दुसर म्हणजे मी लिहलेल कधी कुणाला काही कळायचे नाही.
यात समाधान वाटणारी एकच गोष्ट ती म्हणजे, हे दोन्ही गुण अजूनही मी तसेच जपलेले आहेत.
बरं, जो नियम मोडतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे हा शाळेच्या शिस्तीचा भाग असतो. त्यामुळे शिक्षा भोगण्याची वेळ माझ्यावरही येऊन गेलीय.
यात मी जवळ-जवळ सगळ्या प्रकारच्या आदरणीय प्राण्यांना त्यांच्या नकला करून मानवंदना दिली आहे. यावरून माझे प्राणी प्रेम तुम्हाला कळले असेलच! पण एवढं सगळं झाले तरी मी मात्र कधी मार खाला नाही. कारण माझी अंगकाठी अशी होती की, मारल्यानंतर कुठला पार्ट कधी खिळखिळा होऊ शकेल याची ग्वाही कुणीही देऊ शकले नसते.
दिवाळीचा गृहपाठ :
एकतर दिवाळीची सुट्टी द्यायची वर गृहपाठ देऊन आमचं दिवाळ काढायचं अशी ही शाळेची नवीन रीत मी शाळेत जायला लागल्यापासूनच सुरू करण्यात आली होती, त्यामुळे सगळा गृहपाठ माझीच पाठ धरून बसलाय असंच मला वाटायचे.
यामध्येही दिवाळीचा गृहपाठ देण्यासाठी शिक्षक स्वतःच डोकं न वापरता मार्केटिंग कौशल्य वापरायचे. दिवाळी गृहपाठासाठी एक पुस्तक यायचं आणि ते कम्पलसरी सगळ्यांनी विकत घ्याव लागायचं!
दिवाळीचा गृहपाठ ही तर अक्षरक्षः निषेध करण्यासारखी गोष्ट आहे, जी मला अजिबात आणि कधीच पटलेली नव्हती पण इथेही मी मात्र गांधीगिरीने निषेध करायची!!
"बाई आमच्याकडे पुस्तक विकत घ्यायला पैसेच नाहीत" असं रोखठोक उत्तर मी बाईंना द्यायची!
म्युनिसीपालटीच्या शाळेत असल्यामुळे तिथे पैश्याचे व्यवहार फार क्वचीतच व्हायचे! त्यामुळे पैशांचे उत्तर त्यांना पटण्यासारखे होते.
मी फक्त दोनच गोष्टींवर पैसे खर्च करायची एक म्हणजे लाल बाटलीतला गम आणि घोटीव पेपर. दुसर म्हणजे फेपरमिटच्या गोळ्या!
फार-फार तर दोन-चार दिवस बाई सतत मागे तगादा लावायच्या आणि एकदा का सहामाही सुरू झाली की ती संपल्यावर डायरेक्ट सुट्या सुरू व्हायच्या आणि मग फक्त 'गृह' एवढाच काय तो शब्द 'पाठ' व्हायचा!
दोन ते तीन वर्षे मी "दिवाळीचा गृहपाठ" हा विषय पैश्यांचे कारण देत अगदी चतुराईने टाळला होता. पण अखेर तो काळा दिवस आलाच.
सहामाही परिक्षेचा शेवटचा दिवस होता. पेपर संपल्यावर बाई माझ्या जवळ आल्या. माझ्यावर बाईंनी अनंत उपकार करत पहिल्या पाचात आल्याबद्दल ते पुस्तक त्यांनी मला मोफत दिले.
मला दाखवलेल्या त्या सहानुभुतीचा इतका राग आला होता मला! अस वाटत होतं की, आपल्यातले लोकमान्य टिळक जागे व्हावेत आणि ते पुस्तक परत बाईंच्या हातावर टेकवावे आणि सांगावे ही असली सहानुभुती नको आम्हास!
पण मी तस काही केलं नाही, कारण, नुकत्याच झालेल्या इतिहासाच्या पेपरात मी महात्मा गांधींच्या दांडी यात्रेच्या प्रश्नावर हे भले पान-दीड पान उत्तर लिहले होते. म्हणून थांबले!
ते पुस्तक दोन बोटांच्या चिमटीत धरले आणि थेट घरची वाट पकडली.
दिवाळीची सुट्टी संपणार त्याच्या दोन दिवस आधी मी हे पुस्तक उघडले,आणि चित्रं रंगवा, चित्रं काढा.. दिलेल्या चित्रांच्या जोड्या लावा. इतक्याच सुचनांचे पालन मी केले आणि उर्वरीत पुस्तकावर 'खाद्य तेलांची नावे ओळखा. असा उलट प्रश्न बाईंना पडावा एवढे डाग तोंडांत कोंबणार्या फराळाने माझ्या वतीने पाडले होते.
शाळा सुरु झाली आणि मी माझी रंगरंगोटी घेऊन शाळेत हजर झाले. पहिल्याच दिवशी बाईंनी सगळ्यांची पुस्तक तपासायला मागितली. मी माझे पुस्तक मिरवत-मिरवत बाईंच्या टेबलाजवळ नेले. बाईंनी कुतूहलाने आत नजर टाकली... आणि त्या इतक्या धन्य झाल्या की मी पहिल्या पाचात येऊनही त्यानंतर त्यांनी कधी मला "दिवाळीचा गृहपाठ" बक्षिस म्हणून दिला नाही.
हा होता माझा गांधीवादी गृहपाठाचा लढा!
इयत्ता दहावीपर्यंत!