गणेशोत्सव आणि ती...
गणेशोत्सव आणि ती...
माझं नाव कमलेश पवार. ही आहे माझी कहाणी. नाव सांगायचं कष्ट घेतोय कारण कथा कशीही सुरू केली तरी वाचणारे त्या बिचाऱ्या निल्याला सारखे तेच विचारत असतात की काय रे हीसुद्धा कहाणी तुझीच का...? पण तसं काही नाही. ही कथा आहे माझी. माझ्या आठवणीत अगदी मनात ठळक अक्षरात छापलेल्या गणेशोत्सवाची. त्यावेळी आम्ही नुकतंच पुण्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या एका ग्रामीण भागात घर घेतलं होतं. घर तसं चाळीतीलच आहे, कारण त्यावेळी हे असलं फ्लॅट घेणं वगैरे ट्रेंडींगमध्ये नव्हतं. मी त्यावेळी आठवीत असेल. हळूहळू वस्ती गजबजून गेली होती. तिथल्या मुलांची अर्थात सर्वच जण एकमेकांसाठी नवीनच होते म्हणून सर्वांचीच नव्याने ओळख होत होती.
आमच्याही वस्तीत गणेशोत्सव साजरा करायचा हे तेथील तरुण मुलांनी ठरवलं आणि तयारी चालू झाली. एक नवीन मंडळ उदयाला आलं. आम्ही लहान मुलांनी पण असं ठरवलं की यार आपला पण गणपती बसवायचा. मग काय आम्हीपण एक छोटा मंडप घालून गणपतीचं आगमन केलं या सर्वात मोठ्या मुलांनी आमच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं. आम्ही लहान होतो असा त्यांचा समज होता. पण तेही चुकीचं होतं असं नाही कारण आमची ओढ आपोआपच मोठ्या मंडळाकडे होत होती हेही तितकंच खरं.
आमच्यात विशल्या त्यामानाने जरा जास्तच पुढचा होता. तो एका मुलीवर लाईन मारायचा हे आम्हालाही माहीत होतं. पण त्याचं हे सर्व पाहून कधीतरी वाटायचं आपणही एखादी मुलगी पटवायला हवी. सर्व मुली या मोठ्या मंडळाकडेच गेल्या आणि पहिल्याच दिवशी आमचा मूड ऑफ झाला. मग काय त्या गणपती बाप्पाला एकट्यालाच सोडून आम्ही पण मोठ्या मंडळाकडे धाव घेतली. दुसऱ्या दिवसापासूनच मंडळाने वेगवेगळ्या स्पर्धेचे नियोजन केले. चमचा लिंबू, संगीत खुर्ची, चित्रकला, अशा बऱ्याच स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. एक दिवशी डान्सची स्पर्धा होती आणि माझी नजर त्या दिवशी पहिल्यांदा तिच्यावर खिळली. आमच्या समोरच्या चाळीत राहायची. तसं आमचं बोलणं होत असायचंच म्हणा. पण त्यावेळी तिने अचानक मनात एन्ट्री केली. तिने केलेला तो डान्स आजही आठवतो मला. त्या स्पर्धेत तिला पहिला क्रमांक मिळाला होता. बास त्याच वेळी ठरवलं हेच आपलं सामान, छावी, आयटम, माल जे काही असेल ते. कारण हे असलं काहीतरी चुकून ऐकायला मिळायचं.
मग काय त्या गणपतीच्या उरलेल्या आठ दिवसात फक्त तिच्याकडे बघणं झालं. मनातलं बोलायला तेव्हा एवढी हिंमत पण नव्हती. असंच एकदा तिच्याशी सहज बोलावं म्हणून तिच्या ओट्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तितक्यात तिथे विशल्या लाईन मारायचा ती मुलगी येऊन बसली हिला सोडून तिच्याशीच गप्पा मारण्याला उधाण आलं. तेव्हाही हेच क्लिक झालं की यार ही आपल्याला लाईन देते की काय.? देतही असेल कदाचित कारण ती मुलगी थोडी फॉरवर्ड होती हे सर्वांना माहीत होतं. पण मी फारसं लक्ष दिलं नाही. पण त्या नंतरच्या काळात आरतीच्या वेळी आणि स्पर्धेतील कार्यक्रमाच्या वेळी तिचं माझ्याकडे बघणं हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. मी जिच्याकडे बघत होतो ती मला भावच देत नव्हती की तिला काही कळत नव्हतं हेच मला कळत नव्हतं.
अशातच एकदा गोट्या खेळताना एका मारवाड्याच्या पोराशी माझं भांडण झालं. फुल अस्सल मराठी भाषेत मी त्याला दोन-तीन शिव्या हासडल्या होत्या. तेव्हा त्याची बहीण जी माझ्याच वयाची होती. तिने आमचं भांडण सोडवलं आणि मला काहीच न बोलता तिने उलट तिच्याच भावाला सांगितलं की याला काहीच बोलू नकोस वगैरे वगैरे. काय मुलगी होती यार ती गोरीपान नाक एकदम तरतरीत, ओठ तर डाळिंबाच्या दाण्यासारखे लाल भडक. तिचं वागणं मला कळलं नाही पण विशल्या मला म्हणाला अरे ही लाईन देतेय तुला. तसं तर तू लाईन मारतोय ती मुलगी पण लाईन देतेय हे मात्र मी त्याला सांगू शकत नव्हतो.
मस्त दिवस चालले होते. या सर्व गोष्टी मनात ठेवून, गणपती पुढे मस्ती करत आनंदाचे क्षण जगत होतो. त्यादिवशी सातवा दिवस होता आणि माईकवर घोषणा दिली गेली की आजची स्पर्धा आहे निबंध स्पर्धा. मनातून मी खुश झालो कारण ही तर माझ्या आवडीची गोष्ट होती. विषय होता "आमच्या घरचे गौरी-गणेश." पहिल्यांदा जाऊन मी नाव नोंदणी केली. स्पर्धा तर झाली. मीही सर्व मनापासून लिहिलं. स्पर्धेचा निकाल मात्र दुसरे दिवशी लागणार होता. कारण सर्व निबंध वाचून बघायचे होते. झालं आठवा दिवस उजाडला. बाकी गोष्टींपेक्षा मला आज निकालाबाबत उत्सुकता होती. झालं माझा क्रमांक दुसरा आला होता. आमच्या चाळीतल्या पुजाचा पहिला क्रमांक आला होता. तेव्हा मला पहिल्यांदा कुठल्यातरी मुलीचा इतका राग आला होता. माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडत होती ती म्हणजे मी पहिल्यांदा माईकवर बोलण्यासाठी स्टेज शेअर करत होतो. मी लिहिलेलं सर्व घाबऱ्या आवाजात पटकन वाचून मोकळा झालो होतो. माझ्यात असलेल्या या कलेला खऱ्या अर्थाने इथेच वाव मिळाला होता. अगदी मी पहिलीत होतो ना तेव्हा सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मला बक्षीस मिळालं होतं त्याची आठवण येत होती. सगळं आटोपल्यानंतर आम्ही सर्व मुलं तिथे खेळत असताना स्पर्धेत तिसरा क्रमांक आलेली मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाली, ये छान लिहिलं होतंस रे तू. बास हे बोलणं होत असतानाही हा विशल्या तिथेच होता.
विसर्जनाचा दिवस उजाडला. मस्त डीजे वगैरे लावून नाचत मिरवणूक पुढे सरकत होती. आमच्या लहान मंडळाचा गणपतीसुद्धा मोठ्या मुलांनी सांभाळून घेतला होता. या चारही मुली तिथे आसपास होत्याच पण यातली सुंदर कोण किंवा आपण जीव कोणाला लावायचा अर्थात प्रेम कोणावर करायचं हे मात्र आतासुद्धा कळत नव्हतं. हळूहळू सर्व धूसर झालं. त्या गणेशोत्सवाची दहा दिवसांची मज्जा संपली होती आता मात्र पुढच्या वर्षीची वाट बघायची होती. पण नंतरच्या काही दिवसात मी त्या मला आवडलेल्या मुलीवरच लाईन मारत होतो हे नक्की. पुढे काय झालं ते मात्र विचारू नका...