Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

घर चंद्रमौळी

घर चंद्रमौळी

2 mins
298


एका गावामध्ये एक सावकार असतो. त्याला आपली मुलगी आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाला द्यायची असते. त्यामुळे त्याचे नेहमी वर संशोधन चालू असते. परंतु त्याला काही केल्या मनासारखा मुलगा मिळत नाही. 

प्रत्येक जण त्याला आपल्यापेक्षा कमी श्रीमंत वाटतो. 

एकदा त्या मुलीला पाहण्यासाठी एक भटजी जातो. साधारणतः भटजी म्हणजे गरीबच, त्यामुळे सावकाराला आश्चर्य वाटते. 


हा भटजी आपल्या मुलीला बघण्यासाठी कसा काय आला? म्हणून तो पहिले आगत-स्वागत केल्यानंतर, त्याला आपल्या आर्थिक स्थितीचे वर्णन करण्याबद्दल सांगतो. 

त्यावर तो भटजी खालील शब्दात आपल्या आर्थिक स्थितीचे वर्णन करतो. 


"घर चंद्रमौळी 

चुलीवर हरळी 

केळीवर नारळी

अन्नावर अन्न आणि

वस्त्रावर वस्त्र"


त्याबरोबरती त्या सावकाराला वाटते,हा भरपूर श्रीमंत आहे.

आपली मुलगी येथे सुखात राहील. आणि तो दोघांचे लग्न लावून देतो. 


जेव्हा मुलगी त्याच्यामागे नांदायला जाते,तेव्हा ती बघते तर घर म्हणजे एक कौलारू झोपडी असते. मुलीला देखील असे वाटत असते की, 

घर चंद्रमौळी म्हणजे चंद्रासारखा प्रकाशणारा एखादा राजवाडा असेल. मग ती नवऱ्याला विचारते


अहो घर चंद्रमौळी म्हणालात ना? मग हे काय? 


तो म्हणतो प्रिये, आपण रात्री झोपल्यानंतर या कौलांच्या फटींमधून चंद्र दिसतो, शिवाय त्याचे किरण आपल्या अंगावरती पडतात म्हणून घर चंद्रमौळी आहे. 


आत जाऊन पाहते तर स्वयंपाकाला साधी चुल असते, आणि त्यावर देखील गवत उगवलेले असते. 


ती विचारते हे काय? 


तो म्हणतो चुलीवर हरळी! 


ती विचारते म्हणजे काय? 


तो सांगतो या चुलीवरती पावसाळ्यामध्ये गळते, त्यामुळे चुलीवर गवत उगवलेले आहे. त्याला हरळी असे म्हणतात. 


परत आता केळीवर नारळी म्हणजे काय? 


तो म्हणाला त्याचं काय आहे! 

मी पूजा सांगायला गेल्यानंतर, कधी केळी, कधी नारळी, तर कधी दोन्ही बरोबर मिळतात. कधी कधी एकाच दिवशी अनेक ठिकाणी पूजा असतात. तेव्हा केळी आणि नारळ हे दोन्ही घरामध्ये भरपूर प्रमाणात असतात.


आणि अन्नावर अन्न आणि वस्त्रावर वस्त्र म्हणजे काय? 


अन्नावर अन्न म्हणजे कधीकधी सणावाराला, एका वेळी अनेक ठिकाणी जेवणासाठी आमंत्रण असते. 

त्यावेळी अन्नावर अन्न असते.


आणि वस्त्रावर वस्त्र म्हणजे काय? मला असे वाटले होते की तुम्ही सतत मला नवीन नवीन साड्या घेणार! 


अगं वेडी काय तू भटजीकडे कुठे आल्या नवीन नवीन साड्या नवीन नवीन कपडे! 


कधी कुठे पोथ्यापुराण वाचले की तुला सांगितल्या प्रमाणे, त्या दोन चार ठिकाणांहून एकाच दिवशी नवीन कपडे मिळतात. 

हे झाले वस्त्रावर वस्त्र. 

मी माझी खरी परिस्थिती तुम्हाला सांगितली होती. परंतु ती तुला आणि तुझ्या वडिलांना कळली नाही. 

मग मुलगी पुन्हा रडत आपल्या वडिलांकडे जाते आणि जावयाची खरी परिस्थिती सांगते.

परंतु त्याच्या शब्द चातुर्यावरती सासरा प्रसन्न होतो आणि त्याला घर जावई करून घेतो. 


तर असे आहे

घर चंद्रमौळी

चुलीवर हरळी

केळीवर नारळी 

अन्नावर अन्न 

आणि वस्त्रावर वस्र


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy