Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Nagesh S Shewalkar

Others Inspirational


3  

Nagesh S Shewalkar

Others Inspirational


एका तळ्यात होती...

एका तळ्यात होती...

7 mins 1.9K 7 mins 1.9K

     सहाव्या वर्गात शिकणारी ती पंधरा वीस मुले त्यांच्या धांडे नावाच्या शिक्षकासोबत सहलीसाठी निघाली होती. त्यांच्या शहरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नयनरम्य, नैसर्गिक अशा ठिकाणी ती सारी मुले उतरली. एकामागोमाग एक याप्रमाणे, अत्यंत आनंदात ती मुले त्या उद्यानात शिरली. वयाने फार मोठी नसली तरीही त्यांची शिस्त अत्यंत वाखाणण्याजोगी होती. ते उद्यानही अत्यंत सुंदर, पाहता क्षणी नजर भिरभिर फिरेल असे होते. मुलांना काय पाहू आणि काय नको असे झाले होते. आकर्षक फुले, छोटी छोटी झाडे बघतच राहावीत अशी मुलांची स्थिती झाली. धांडे गुरूजींच्या पाठोपाठ बागेतील सारे काही डोळ्यात साठवत मुले उद्यानात असलेल्या एका तळ्याशेजारी येऊन थांबली.

"अरे, व्वा! तळे! किती सुंदर आहे." एक मुलगा म्हणाला.

पाठोपाठ दुसरा मुलगा म्हणाला,"बघा तर, तळ्यात किती छान छान बदके आहेत. छोटी छोटी बदकं किती सुंदर दिसत आहेत ना. त्यांचे पाय तर बघा त्यांच्या शरीरापासून थोडे दूर आहेत असे वाटतात. चोचही मोठी, रूंद आणि पिवळ्या रंगाची आहे. सर, मी बदकाचे वाचलेले सारे वर्णन या बदकांशी जुळते आहे पण मी तर असे वाचले होते की, बदकांचा रंग पिवळा असतो पण ही सारी बदकं तर पांढरी दिसत आहेत. " एका विद्यार्थ्याने विचारले.

"अगदी बरोबर आहे. ही पाळलेली बदके आहेत. पाळलेल्या बदकांचा रंग जसा पांढरा असतो तसाच तो काळा आणि तपकिरीही असतो. शिवाय त्यावर हिरव्या रंगाची अशी एक चमक असते. बदकाच्या डोक्यावर आणि मानेवर एक प्रकारची काळ्या रंगाची छटा असते. हे सारे रंग मिळून बदकाला आकर्षक बनवतात. आज मी तुम्हाला इथे मुद्दाम घेऊन आलोय त्याचे कारण माहिती आहे का?"

"नाही. सर, सांगा ना. आपण इथे का आलो आहोत ते."

"सांगतो. या अशा वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात, तळ्याच्या काठी बसून तुम्हाला एक छान गाणे शिकवावे आणि त्या गाण्यातील तळे आणि तळ्यात विहार करणाऱ्या पक्ष्यांची प्रत्यक्ष भेट घालावी म्हणून इथे आलो आहोत."

"कोणते गाणे? कोणते पक्षी? कुठे आहेत? सांगा ना."

"सांगतो. सांगतो. आधी मला सांगा, तुम्ही ग. दि. माडगूळकर म्हणजे गदिमांचे नाव ऐकले आहे का?" धांडे गुरूजींनी विचारले. एका मुलाने हात वर केल्याचे पाहून गुरुजींनी त्याला हातानेच 'सांग' असे खुणावले. तो मुलगा म्हणाला,

"आपण 'मामाच्या गावाला जाऊ या, पळती झाडे पाहू या...' हे गाणे म्हणतो ते गाणे गदिमांनी लिहिले आहे."

"अगदी बरोबर आहे. त्याच गदिमांनी लिहिलेले आणखी एक सुमधूर, श्रवणीय, नेहमी ऐकावेसे वाटणारे गीत म्हणजे... 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..."

"म्हणजे ही ती बदके. म्हणून इथे आणले होय. खरेच सर, हा परिसर, ही झाडी, फुले सारेच किती सुंदर आहे. हे तळे बघा, त्यामध्ये खेळणारी, बागडणारी ही छोटी छोटी बदके तर किती सुरेख आहेत ना. एक सारखे त्यांच्याकडेच पाहावे वाटते. सर, फोटो काढू नका असे या बागेत ठिकठिकाणी लिहिले आहे. शिवाय त्यांचे सीसीटीव्ही चालू आहेत म्हणून नाहीतर या बदकांची सारी धिंगामस्ती मी मोबाईलवर टिपली असती."

"छान! असे कोणतेही कृत्य करायचे नाही. आता थोडे बारकाईने हे तळे, बदके यांचे निरीक्षण करा आणि काही वेगळे दिसतेय का ते सांगा." गुरुजी म्हणाले आणि मुले तळ्याभोवती फिरताना तळ्यातील बदकांचे सुक्ष्मपणे निरीक्षण करू लागले.


त्यांच्याकडे कौतुकाने बघत गुरूजी म्हणाले,

"अगदी शांतपणे पहा. आरडाओरडा करू नका. पाण्यात दगड वगैरे फेकू नका."

काही क्षण जाताच एक मुलगा म्हणाला," सर, सर, बघा ना. ते एक बदक मला वेगळे वाटतेय."

"कोणते रे कोणते?" काही मुलांनी विचारले. तसा तो मुलगा म्हणाला,

"अरे ते बघा. ते इतर बदकांपेक्षा रंगानेही थोडे वेगळे आहे. ते..ते.. पिवळट.. थोडेसे राखी रंगाचे आहे ना ते. त्याच्या डोक्यावर काळपट दोन रेषा आहेत. दिसले का?"

"अरे, हो की. आणि शिवाय त्याच्या पंखावरही दोन काळ्या रेषा दिसत आहेत. चोच तर बघा, कशी नारंगी पिवळी आहे. पायाचा रंगही पिवळा आहे."

"खरेच की. इतर बदकापेक्षा हा वेगळाच आहे. त्याची शेपूट पाहिली का, सुरूवातीला आणि शेवटी पांढरी आहे."

"हो. हो. सर, असे का आहे हो?" दोन-तीन मुलांनी गुरूजींना विचारले.

"बरोबर आहे तुमचे. तो इतर बदकांपेक्षा वेगळाच आहे. म्हणून तर तुम्हाला इथे आणले आहे. इतरांपेक्षा हे जे वेगळेपण आहे ना, त्याबद्दल कवी म्हणतात,

         'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

          होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

          कोणी न तयास घेई खेळावयास संगे

          सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे...'      

इतरांपेक्षा आपण निराळे आहोत याचा अर्थ आपल्यात काहीतरी कमी आहे. आपण इतर बदकांप्रमाणे दिसायला सुंदर नाही आहोत तर आपण काळे, कुरूप असे वेगळेच आहोत. म्हणून त्याला असेही वाटते की, ही सारी बदके सोबत सोबत खेळतात. आपल्याला सोबत खेळायला घेत नाहीत असा समज करून हा पक्षी, इतरांपेक्षा थोडा वेगळा असलेला पक्षी हा त्यांच्यापासून दूर जाऊन तरंगतो, आपला निराळा खेळ खेळतो. पण असे होते का मुळीच नाही. याचे वेगळेपण, बाजूला बाजूला राहणे पाहून ती बदकेही याच्यापासून दूर राहतात. या सर्वांना एकत्र खेळतांना पाहून आणि विशेषतः या पक्षाचे वेगळेपण पाहून त्याला पाहणारे लोक कौतुकाने याकडे पाहतात. याच्याकडे पाहून बोट दाखवून त्याचे कौतुक करतात. त्यावेळी त्याला काय वाटत असेल? सांगेल का कुणी?"

गुरुजींनी विचारताच एक मुलगा म्हणाला,"त्याला त्यावेळी असे वाटत असणार की, मी या सर्वांपेक्षा वेगळा आहे, कुरूप आहे म्हणून हे सारे हसत आहेत."

"अगदी बरोबर. कवी गदिमांनी त्याच्या भावना नेमक्या शब्दात पकडलेल्या आहेत.

कवी म्हणतात,'दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक

            आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक

            पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी..' 

लोक हसून त्याचे वेगळेपण, त्याचे सौंदर्य दाखवत असताना या पिल्लास वेगळेच वाटते. आपल्या न्यूनतेवर हे सारे हसतात याचे त्याला दुःख होते आणि ते भोळसट पिल्लू स्वतःशीच रडायला लागते. किती सुंदर भावना गदिमांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. याला म्हणतात कवी कल्पना! 'जे न देखे रवी, ते देखे कवी !' अशा एका म्हणीप्रमाणे आहे. पुढे जाऊन त्या पिल्लाची मनःस्थिती वर्णन करताना कवी म्हणतात,'भावंडं ना विचारी, सांगेल ते कुणाशी जे ते तयास टोची दावी उगाच धाक...' 

त्या दुःखी झालेल्या पिल्लासही असे वाटते की, आपले दुःख कुणालातरी सांगावे पण सांगावे तरी कुणाला? कारण त्याची जी ही इतर भावंडं... बदके आहेत ते तर त्याला विचारतही नाहीत. शिवाय जो येतो तो या वेगळ्या दिसणाऱ्या पिलाकडे बोट दाखवतो. हे जे बोट दाखवणे आहे ते म्हणजे त्याला टोचल्यासारखे होते..."


"सर, असे होते खरे कधीकधी. आपल्याकडे पाहून कुणी बोलत असेल तर आपल्याला उगीच वाटते की, ते आपल्याविषयी बोलत आहेत, आपली गाऱ्हाणी करीत आहेत..."

"व्वा! छान. पण तसे नसते. त्यांचा विषय वेगळा असतो. एखादेवेळी ते आपले कौतुकही करीत असतात पण जसे आपल्याला वेगळे वाटते तसे या गोजिरवाण्या पिल्लाचे होते.

म्हणून कवी गदिमा पुढे म्हणतात,

  'एके दिनी परंतु त्या पिल्लास कळाले

   भय वेडे पार त्याचे वाऱ्यासवे पळाले

   पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक

   त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक....."

"हा..हा.. राजहंस आहे?" एका मुलाने विचारले.

"हो. पण कवींनी त्याला त्याची ओळख, परिचय कसा छान करून दिला आहे. बघा. एके दिवशी छान हवाहवासा वारा सुटला होता. सारी बदके तळ्यातील पाण्यात धिंगामस्ती करीत असताना त्या पिल्लास काय वाटले कुणास ठाऊक पण त्याने सर्वांपासून दूर जाऊन एक क्षणभर पाण्यात पाहिले... स्वतःपासून आणि इतरांपासून चोरून, लपवून पाहिल्याप्रमाणे! दुसऱ्याच क्षणी त्याचे भय, त्याचे वेडेपण, त्याचा न्यूनगंड सारे काही जणू त्या वाऱ्यासवे पळाले, दूर गेले. त्याला त्या पाण्यामध्ये स्वतःचे सौंदर्य, स्वतःचा डौलदारपणा आणि राजस्व लक्षात आले. त्याला कळाले की, मी इतरांपेक्षा वेगळा जरूर आहे पण कुरूप, ओबडधोबड नाही.मी ही सुंदर आहे. मी एक राजा आहे आणि तेव्हापासून त्याला राजहंस हे नाव मिळाले. कदाचित त्याने तसे नामकरण स्वतःच करून घेतले असावे...."

"राजहंस.... किती गोड आणि त्याला साजेसे नाव आहे." 

"बरोबर आहे. तुम्हाला राजहंसाबद्दल मी ऐकलेली माहिती थोडक्यात सांगतो. असे म्हणतात की, राजहंसासमोर पाणी मिसळून दूध ठेवले तर राजहंस पाणी आणि दूध वेगवेगळे करतो. मात्र हे जाणून घेण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही."


धांडे गुरुजी सांगत असताना एक जण म्हणाला,"सर, आपण प्रयोग करून पाहू या का?"

"कसा करणार? येथे दूध कुठे मिळेल?" दुसऱ्या मुलाने त्याला विचारले."

"न मिळायला काय झाले? तिथे बाजूला तर हॉटेल आहे. तिथून आणतो. आपण विज्ञानाचे विद्यार्थी, प्रयोग करून पाहू या. काय हरकत आहे?"

"अहो, विज्ञानेश्वर, तो फलक वाचा. काय लिहिले आहे, इथल्या कोणत्याही प्राण्यांना, पक्ष्यांना कोणतेही खाद्यपदार्थ किंवा द्रवपदार्थ देऊ नका..." दुसरा मुलगा म्हणाला

"असे आहे का? जाऊ देत." तो मुलगा म्हणाला.

"अरे, असू देत. नाराज होऊ नको. अजून एक गमतीदार माहिती अशी आहे की, माझ्या असे वाचण्यात आले आहे की, राजहंस त्याच्या मृत्यूच्यावेळी एक छान गाणे म्हणतो."

"किती छान आहे ना ही गोष्ट."

"बरे. चला. चला. जेवायची वेळ झाली. कुठे बसू या आपण?" गुरुजींनी विचारले.

"मला काय वाटते, दुसरीकडे कशाला? हे वातावरण किती छान आहे. शिवाय राजहंस या आपल्या नव्या मित्रासोबत आणि या बदकांसोबत जेवण करु या."

"कल्पना खूप मस्त आहे पण एका अटीवर, तळ्यात कोणताही खाण्याचा पदार्थ टाकायचा नाही." धांडे गुरुजी म्हणाले आणि सर्व मुलांनी होकार देत आपापले डब्बे काढले आणि त्यांची छान अंगतपंगत बसली...


Rate this content
Log in