The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Anu Dessai

Drama Romance Others

4.4  

Anu Dessai

Drama Romance Others

एक भेट अशीही...

एक भेट अशीही...

12 mins
812


त्यादिवशी ती खूप अस्वस्थ होती... कोण कुठले म्हणे बालपणीचे मित्र बाबांचे येणार होते, आपल्या कुटुंब कबिल्यासकट संध्याकाळी... हिची भलतीच कढली होती...


"काय बाई.. ना ओळख ना पाळख अन् येतायत आणि ते ही दोन दिवस राहायला म्हणे.." तिची सारखी आईमागे भूणभूण सुरू होती.. आई देखील तशी खूष नव्हती पण बाबांचा उत्साह बघता या दोघांना गप्प बसणं भाग होतं... दिवसभर बाबा वर-खाली करत होते... हे उचल, ते ठेव, इकडे पुसून घे, तिकडे झाडून घे.. एका मागून एक सूचना सुरू होत्या.. कुठूनतरी येणाऱ्या या तिऱ्हायतांसाठी मी का खपायचं..?? या विचाराने तिची धुसफूस सुरू होती.. एरवी तिचा स्वभाव असा नव्हता पण कधी नव्हे ती निवांत सुट्टी होती त्यात आता यांचा खोडा कशाला... पण आता चरफडून तरी काय उपयोग दुपारीच ते यायला निघालेत असा फोन आला होता... आता तर नाईलाजाने का होईना पण तयारी करावी लागणार होती त्यामुळे काहीशा नाराजीने ती आणि तिची आई कामाला लागल्या...


शेवटी संध्याकाळी सहाच्या सुमारास स्वारी आली... सोबत कुटुंब... बायको, मुलगी आणि मुलगा.. आल्या आल्या चहा-पाणी झालं, जरा गप्पा झाल्या आणि ती आणि तिची आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या... ते दाम्पत्य बाबांचे तरुणपणीचे मित्र-मैत्रीण होते, त्यामुळे ते तिघे आणि त्यांची मुलं चांगलीच गप्पांमध्ये रमली होती... एकीकडे ओसरीवर आठवणींचे कंगोरे उलगडत होते, तर दुसरीकडे ती आणि तिची आई स्वयंपाकघरात राबत होत्या... तेवढ्यात तो आत आला...


"काकू, थोडं पाणी मिळेल का..??"


तिच्या आईचे हात कणकेत असल्याने त्या म्हणाल्या, "अनु... दे गं त्याला थोडं पाणी... बाळा, साधं हवयं की फ्रिजमधलं...?"


"फ्रिजमधलं चालेल.." तो म्हणाला.. भांडी घासत असलेल्या तिने पटकन हात धुतले आणि ती फ्रिज जवळ आली.. दार उघडताना तिने सवयीने खांद्यावरची वेणी मागे सारली.. तो अगदी तिच्या मागे उभा असल्यामुळे तिची दाट लांबसडक वेणी त्याच्या छातीवर आपटली... पण हे तिच्या ध्यानी आलं नाही तिने बाटली बाहेर काढली.. ग्लासमध्ये पाणी ओतून त्याच्या समोर धरला.. तो जरासा जागीच थिजल्यागत झाला होता.. पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि पाणी गटागट प्यायला आणि वेगाने बाहेर गेला... "काय विचित्र ध्यान आहे..!! "या दृष्टीने ती त्याला पाहतच राहिली..


तर हे चित्र होतं अशोक साठेंच्या घरचं... अशोक साठे, अस्मिता साठे आणि त्यांची एकुलती एक लेक अनघा साठे असं हे सुखवस्तू कुटुंब गोव्यात सत्तरी तालुक्यातील केरी गावी यांचं घरकुल वसलं होतं.. केरी तसा निसर्गरम्य गाव.. हिरवाईने सजलेला.. मेच्या कडक उन्हाळ्यातदेखील दोन दिवस पाऊस पडून गेलेला त्यामुळे वातावरण तसं उष्ण नव्हतं आणि वाराही चोवीस तास घरात झुळझुळत असायचा... असं ते आल्हाददायक ठिकाण होतं.. मे महिना म्हटल्यावर काॅलेजच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या अनघाला उन्हाळी सुट्टी होती.. म्हणून ती जरा निवांत होती पण इतक्यात ही कधीतरी वर्षभराआधी धावती भेट देऊन गेलेली मंडळी चार दिवस राहायला येत होती.. मडगांवसारख्या शहरी वातावरणातून जरा हवापालट म्हणून अशोकरावांचे तरूणपणीचे मित्र अजित मराठे त्यांची बायको विजया, मुलगी वैष्णवी आणि मुलगा अर्णव यांच्यासोबत राहायला आले होते... त्यांची मुलगी यंदाच एम एपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून तिथल्याच एका उच्च माध्यमिक विद्यालयात रूजू झाली होती आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता... 


रात्रीची जेवणं आटपून सगळे झोपले... अनघा काम करून खूप थकली होती... तिला पडल्या पडल्या झोप लागली.. बाहेर पाहुण्यांचीही निजानिज झाली होती... पहाटे लवकरच तिला जाग आली.. अजून उजाडलं नव्हतं.. बाहेर सारं गपगार होतं.. ती कुशीवर वळली तर तिला खिडकीतून कोणीतरी बाहेर उभं असल्याचं दिसलं... तिने डोळे चोळत नीट पाहायचा प्रयत्न केला... तो अर्णव होता... पाठमोरा उभा होता.. दूर कुठेतरी डोंगरापल्याड उगवणाऱ्या सूर्याचा वेध घेत होती त्याची नजर.. रात्री अजागळ वाटणारा हाच होता का तो... असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला... कारण आता झुंजूमुंजू होता होता त्या उबदार उजेडात त्याचा राजबिंडा देह लकाकत होता.. तेवढ्यात कुणाचा तरी आवाज आला.. ते तिचे बाबा होते.. ते दोघे बोलण्यात व्यस्त होते आणि ती पांघरूणाआडून त्याला निरखत होती... त्याची भरदार छाती, दणकट बाहू, एकूण बळकट स्नायूंची पिळदार शरीरयष्टी त्यात चेहऱ्यावर लाघवी स्मितहास्य आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज तिला भुल पाडत होता खरा पण तिने स्वतःला सावरलं आणि उठली.. आवरून बाहेर आली.. सगळे नाश्ता करत होते तिलाही आईने चहा नाश्ता दिला, ती खात असताना आई तिला म्हणाली, "अनु, अगं जा बघू लवकर माडी जरा झाडून घे.. जमीनही पुसून घे आणि त्या खिडकीची कडी गच्च झालीये तेल घाल मगच उघडेल म्हणजे वारा घोळेल खोलीत.. "


"का गं..?? आता माडीवर कोणाला जायचंय..??" तिनं विचारलं..


"अगं तो अर्णव आहे ना... त्याला काही काम करायचयं म्हणे लॅपटॉप घेऊन आलाय तो सोबत.. मग तुझे बाबाच म्हणाले वर माडीवर बस म्हणजे तुला डिस्टर्ब होणार नाही.."


"धन्य आहेत बाई बाबासुद्धा.. " पुटपुटत अनघा उठली आणि सरळ माडीवर गेली... 

   

तसा जास्त केर नव्हता माडीवर.. आठवड्यातून एकदा तरी अनुच माडी झाडून स्वच्छ करायची.. कधीतरी पुसायची सुद्धा... पण खिडकीच्या कडीवर तेल घालणं राहून गेलं होतं... ती पटापट हात चालवत होती. पण तीन खोल्यांची माडी स्वच्छ करायला वेळ लागणारच होता.. तेवढ्यात तिथे अर्णव आला.. त्याला खोकला आला तो खोकल्यामुळे तिने वळून पाहिलं..


"अरे.. तुम्ही आधीच वर आलात.. मी सफाई झाल्यावर बोलावलं असतं की.. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जा खाली.. झालं की मी बोलावते.."


"नाही नको मी थांबतो इथेच.. काही मदत लागली तर सांगा.." तो बाजूला उभं राहत म्हणाला..


"नको नको.. तुम्ही पाहुणे.. तुम्हाला कामाला लावलं तर फटके पडतील मला.." ती गमतीनं हसत म्हणाली...तिचं निर्झरापरी नितळ खळखळतं हसू पुन्हा त्याला भुरळ पाडायला पुरेसं होतं... तिने त्याला बसायला खुर्ची दिली आणि दुसऱ्या खोलीत केर काढायला गेली... तो त्या खिडकीजवळ गेला आणि उघडायचा प्रयत्न करू लागला..


"का हो, ही खिडकी उघडत नाही का..??"


"नाही ना..तिला तेल घालते म्हणजे उघडेल..."


असं म्हणत ती त्या खोलीत आली "आलेच हं.. " असं म्हणत ती खाली गेली..


"अगं ए कुठे जातेस.. " तो असं म्हणेपर्यंत ती खाली पोहोचली सुद्धा.. थोड्याच वेळात ती पाणी आणि फडकं घेऊन आली जमीन पुसायला.. तिने ओढणी कमरेला बांधली.. पायजमा ढोपरापर्यंत खेचला आणि बसून जमीन पुसू लागली त्यात त्यांच्या गप्पाही रंगात आल्या होत्या... तिच्या सहज होणाऱ्या हालचाली, रेखीव बांधा, बोलका स्वभाव, तिचा गोल चेहरा, गोबरे गाल, गुलाब पाकळ्यांपरी गुलाबी ओठ, चाफेकळी नाक आणि त्या चेहऱ्यावर उमटणारे असंख्य मोहक हावभाव तो डोळे भरून टिपत होता...

    

इतक्यात तिचा अंबाडा सुटला आणि तिचे काळेभोर केस तिच्या कमरेखाली घसरले... ओल्या जमिनीवर पडण्याआधी ती पटकन उठून उभी राहिली तिचे हात चिखलाच्या पाण्याने ओले झाले होते तरी काय करणार केस बांधले नाहीत तर काम कसं उरकणार म्हणून तसेच केस बांधणार होती इतक्यात मागून तो आला..


"अगं थांब थांब मी मदत करतो, तुझे हात ओले आहेत.." असं म्हणत त्याने ते मऊसूत रेशमी केस हातात घेतले आणि क्षणभर त्यांच्या मधूर गंधामध्ये गुरफटला..


"काय हो बांधताय ना..??" तिच्या आवाजाने तो भानावर आला..


"हो हो.. बांधतो ना.."


"अं... साॅरी हं.. म्हणजे गडबडीत मी तुम्हाला तू म्हणालो..." तो केस बांधत म्हणाला...


"साॅरी का... असू दे तसंही मला पण ते विचित्र वाटत होतं तसंही मी तुमच्यापेक्षा लहान आहे..." ती म्हणाली..


"हो का...पण कितीशी लहान आहेस फक्त दोन वर्ष त्यामुळे आता तू पण मला अरे तुरे केलंस तरी चालेल..." असं म्हणत त्याने छान अंबाडा बांधून दिला...


"अरे वा...छान बांधता येतो की तुला अंबाडा.. ते पण एवढ्या लांबसडक केसांचा.. मला वाटलं इंजिनिअर म्हणजे फक्त मशिनींमध्ये रमतोस तू.." असं म्हणत तिने परत पुसायला सुरुवात केली..


"नाही गं.. इंजिनिअर असलो म्हणून काय झालं.. मला नाटक, संगीत अशा सगळ्या कलांमध्ये रस आहे आणि त्याचमुळे एका नाटकाच्या टीममध्ये असताना मी हेअर स्टायलिस्ट म्हणूनही काम केलं होतं त्याचाच हा फायदा.." अशा गप्पांमध्ये रमता रमता तिने तिन्ही खोल्या पुसल्या आणि जायला निघाली...


जाता जाता म्हणाली, "आता इंजिनिअर साहेब निवांत आपलं काम करा.. कोणी येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला..."


"अगं ए थांब.. ती खिडकी राहिलीच ना.. तेवढी उघडून दे मघापासून प्रयत्न करतोय..."


"हो हो आलेच... थांब आतल्या खोलीत तेलाची बाटली असेल.." असं म्हणत ती आत गेली तेलाची बाटली घेऊन आली.. पटकन कडीवर लावलं आणि जरा जोर दिला तोच पटकन उघडली खिडकी... खिडकी उघडल्या उघडल्या मंद वाऱ्याची झुळूक तिच्या गालाला स्पर्शून गेली.. आणि खोलीत वारा खेळता झाला...

    

त्या खिडकीच्या वर दोन लहान खिडक्या होत्या त्या सुद्धा हल्लीच्या वर्षात उघडल्या नव्हत्या.. त्या जरा उंचावर होत्या... तिथंवर तिचा हात पोहोचत नव्हता म्हणून तिने बाजूची खुर्ची घेतली आणि त्यावर उभी राहून ती त्या खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करत होती... खाली जमीन ओली होती त्यामुळे तिने थोडा जोर लावला असता खुर्ची जागेवरून सटकली आणि ती जमिनीवर धाडदिशी आपटणार इतक्यात त्याने तिला अलगद फुलासारखं झेललं... तिचा कोमल देह त्याच्या दणकट बाहूंमध्ये विसावला होता... एकमेकांच्या स्पर्शाने दोघेही मोहरले होते.. दोघांची नजरानजर होताच दोघे भानावर आले, त्याने चटकन तिला खाली उतरवलं... तो गोरामोरा झाला होता.. ती लाजून खाली गेली... तो ही लगेच सावरून आपल्या कामात व्यस्त झाला... ती सुद्ध स्वयंपाकघरात आईला मदत करण्यात गुंतली.. पण झाल्या प्रकाराने दोघांना एकमेकांच्या मनातलं गोड गुपित न सांगताच उमगलं... आता त्याची कबुली द्यायची होती त्याचीही संधी त्यांना लवकरच मिळणार होती... जेवण उरकल्यावर तिचे बाबा म्हणाले, संध्याकाळी नदीवर जाऊ फिरायला... होडी असली तर एक चक्कर मारून आणीन म्हणाले... 

     

सगळं आटपून थोडा आराम करून उन्हं जराशी कलल्यावर सगळे नदीच्या दिशेने निघाले... नदी तशी जास्त दूर नव्हती फार तर फार दहा मिनिटं लागायची चालत... आणि माडीवरून तर नदीचं पात्र दिसायचं दुरवर... सगळे तिथे पोहोचले तेव्हा सुदैवाने एक होडी तिथे होती... तिच्या बाबांनी दोन दोन जणांना बसवून नदीतून चक्कर मारून आणली.. सगळ्यांनी नौकाविहाराचा मनमुराद आनंद घेतला आणि सगळे परतीच्या वाटेला लागले तोच त्याने फोटोग्राफीसाठी थांबतो असं सांगितलं... तिच्या बाबांनी तिला त्याच्या सोबत राहून सगळा सभोवताल फिरवायला सांगितलं.. तिच्याही ती गोष्ट पचनीच पडली... नदी किनारी पडक्या किल्ल्याचे अवशेष होते, काही चार दोन भिंती शाबूत होत्या.. सगळे गेल्यावर ते दोघे आत गेले.. आता तिथं त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं... हे ध्यानी येऊन ती त्याला घट्ट बिलगली... त्याने तिच्याभोवती आपले बाहुपाश अलगद अडकवले... एकमेकांच्या मिठीत त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली... त्यानंतर सगळा सभोवताल फिरले, फोटो काढले आणि सांज सरता सरता भावी भविष्याची गोड स्वप्न रंगवत घरी परतले आणि काही घडलचं नाही असं भासवत दोघे आपापल्या कामात गुंतले... 

    

रात्रीची जेवण झाल्यावर अनु आणि वैष्णवी गप्पा मारत बसल्या होत्या... तोच आईने हाक मारली तशी ती आत गेली.. मागोमाग वैष्णवी सुद्धा आत आली... "अनु, अर्णव माडीवरच झोपायचं म्हणतो त्याला अंथरूणं देऊन ये.." तिने होकारार्थी मान डोलावली आणि अंथरूणं घ्यायला आतल्या खोलीत गेली.. अंथरूणं घेऊन ती माडीवर आली तेव्हा तो कुठेच दिसला नाही.. ती हाक मारणार इतक्यात त्याने मागून तिला मिठी मारली..


"अं....काय हे...माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर..."


"दुसरं कोणी कसं असेल... आलोय तेव्हापासून घरभर तुझ्याच पैंजणांची रूणझूण ऐकतोय.. जिन्यातून तुझ्या पैंजणांची रूणझूण तू येण्याचा निरोप घेऊनच आली होती मग मी चुकणार कसा सांग..." तिने अलगद मिठी सोडवली आणि अंथरूणं अंथरायला लागली... ती झाल्यावर अनु जायला वळली, "अनु, उद्या निघतोय आम्ही.. आजची शेवटची रात्र... तेव्हा रात्री इथे ये, मी वाट पाहीन..." तिने एकवार त्याला वळून पाहिलं आणि खाली निघून गेली.. रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची निजानिज झाल्यानंतर ती हळूच उठून माडीवर गेली.. तो वाट बघत होता.. त्याने दरवाजा लावला... दोघे खिडकीजवळ बसले.. खिडकीतून मंद वाऱ्याच्या झुळका येत होत्या.. दुरवर चांदणप्रकाशात नदीच्या पात्रातलं पाणी चकाकत होतं... त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती...


"उद्या निघणार ना..?? आता पुन्हा भेट कधी..??" ती खोल स्वरात विचारत होती...


"ए वेडूबाई रडतेस काय.. मी कुठे बाहेर देशी चाललोय.. हा थोडं दूर आहे आता... पण वेळ काढून येत जाईन ना मी... नको काळजी करू.." त्याने तिची समजूत घातली.. "हम्म... " हुंकार देऊन ती तशीच बसून राहिली... कितीतरी वेळ गेला त्यानंतर ती उठून खाली गेली.... 

    

दुसऱ्या दिवशी ते सगळे गेले... काही दिवसांनी उन्हाळी सुट्टी सरली.. अनघाचं काॅलेज सुरू झालं आणि फोन असल्यामुळे त्यांच्यात संवाद सुरू होताच... वारंवार नसल्या तरी चार सहा महिन्याने त्यांची एखादी भेट असायची.. अनेकदा बाहेरच भेटायचे दोघं कधी समुद्रकिनारा, कधी कॅफे तर कधी तरी क्वचित एखादी फिल्म वगैरे.. दिवाळी, गणपतीला एखाद्या दिवशी तो घरीही जाऊन यायचा.. अशीच चार वर्ष सरली.. अनघा एम एच्या शेवटच्या वर्षाला होती तर अर्णव साॅफ्टवेयर इंजिनिअर म्हणून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता... एक दिवस असेच भेटले तेव्हा... तिने त्याला विचारलं, "काय रे.. इतकी वर्ष झाली आपण एकत्र आहोत तुला कधीच मला एखादी भेट द्यावीशी वाटली नाही का...??" ती नाराजीच्या स्वरात म्हणाली..


"अगं तूच नेहमी टाळतेस ना मी काही द्यावं म्हटलं तर... आज अजबच कुठल्या दिशेनं वारे वाहतायेत..." तो हसत म्हणाला...


"मी म्हणाले रे.. पण मलाही आवडतं ना कोणीतरी सरप्राइज दिलेलं... मग तू ओळखायचंस ना आणि काही मोठं नको द्यायला लहानसं काहीतरी चाललं असतं तुझी खुण म्हणून जपून ठेवायला.."


"अरे देवा.. तुम्हा बायकांच्या मनातलं ओळखायचं म्हणजे देवाची सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागेल.. बरं चल आता निघूया.. वेळ होतोय.. आणि एक दिवस इतकी मोठी भेट देईन मी तुला की आनंदाने रडशील.." असं म्हणत तो उठला आणि तिलाही हात देऊन उठवलं.. त्याने तिला बस स्टँडवर सोडलं आणि तो ही घरी गेला...

    

काही महिने उलटले अनघा एम ए होऊन सहा महिने झाले होते.. ती नोकरीसाठी खटपट करीत होती.. इंटरव्ह्यू देऊन येत होती पण अजून कुठून उत्तर आलं नव्हतं.. आणि एका रात्री रूममध्ये होती पण झोप लागत नव्हती म्हणून ती बाहेर येणार इतक्यात आई-बाबांचा संवाद कानी पडला...


"काय हो, मी काय म्हणते पोर वयात आली.. यंदा करून टाकू तिचे दोनाचे चार हात.."


आई बाबांना सांगत होती.. "हो गं मला सुद्धा पटतंय तुझं.. पण ती नोकरी शोधतेय ना म्हणून गप्प बसलोय.." बाबा म्हणाले..


"अहो, नोकरी काय लग्नानंतर सुद्धा करता येईल..." आई समजावत म्हणाली..


"असं म्हणतेस.. ठीक तर मग लागतो उद्यापासून जावई शोधायला.. बघू काय होतयं ते.." बाबा म्हणाले.


"हो बघा.. आणि पोर नक्षत्र आहे आपली कोणीही सहज पसंत करील तिला.. बरं बाकीचं उद्या बघू काय ते झोपा आता.." असं म्हणत आईने खोलीतला दिवा मालवला आणि दोघे झोपी गेले.. अनघा खोलीत आली.. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती.. हे लवकरात लवकर अर्णवला कळवायला हवं म्हणून तिने फोन हातात घेतला पण बरीच रात्र झाली होती.. सकाळी कळवू असा विचार करून ती ही झोपली... विचारांच्या गराड्यात तिचा कधीतरी डोळा लागला... 

    

दुसऱ्या दिवशी तिने अर्णवला फोन केला पण त्याने तो उचलला नाही मग तिने मॅसेज केला... ऐकलेलं सारं लिहून पाठवलं पण त्याचं काही उत्तर आलं नाही... त्यानंतर सतत त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत होती... पण तो फोन केला तर उचलत नव्हता आणि मेसेजला रिप्लाय देत नव्हता.. आता ती वेडी व्हायची बाकी होती..


शेवटी तिने त्याला एक शेवटचा मेसेज केला, "अर्णव, बाबा माझं लग्न कुणा दुसऱ्या सोबत ठरवतायेत.. मी कधीपासून तुला फोन करतेय पण तुझं उत्तर नाही.. लवकरात लवकर येऊन मला मागणी घाल.. मी कुणा दुसऱ्याची होऊ इच्छित नाही.. हा माझा शेवटचा मेसेज.. मी वाट बघतेय.." पण दुर्दैवाने त्या मेसेजला ही उत्तर आलं नाही... आठवड्यानंतर अर्णव नाही पण बाबा लग्न ठरवून आल्याची बातमी घेऊन आले.. घरी सगळ्यांना खूप आनंद झाला... फोनवरून मामी, मावशी, काका सगळ्यांना बातमी कळवली जात होती... आईला तर अनुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं...


"अहो, मुलाचा एखादा फोटो तरी आणायचा.." दुपारी जेवताना आई म्हणाली..


"अगं मुलगा एकदम राजबिंडा आहे, अगदी आपल्या नक्षत्राला शोभेल असा पोर्णिमेचा चंद्र... त्यात म्हटलं आपली पोर काही आपल्या शब्दाबाहेर नाही.. म्हणून नाही आणला.. आता थेट भेट बोहल्यावरच..." असं म्हणत बाबा हसत जेवू लागले...


"तू खूष आहेस ना अनु.." आईने विचारलं..


"हो..." असं म्हणत ती बाहेर ओसरीवर आली... बाबांचा केवढा विश्वास आपल्यावर, आपल्या विश्वासावर शब्द देऊन आले.. असा विचार करत तिनेही ठरवलं सात जन्म साथ देईन म्हणणाऱ्याने अर्ध्यावर साथ सोडली पण आता बाबांचा शब्द राखायचा... त्यांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करायचं तेवढंच पित्याचे ऋण फेडल्याचं समाधान...

    

हे सगळं झाल्यानंतर महिन्याभरात सगळी तयारी झाली.. दारी मंडप उभा राहिला.. सगळे पाहुणे जमले.. सगळे विधी पार पडले आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला... ती गौरीहार पुजत होती तेवढ्यात भटजीबुवांचा पुकारा आला, "नवरीचे मामा नवरीला घेऊन या..." अनघा बोहल्यावर चढली.. अंतरपाटाआड तो उभा होता.. ज्याला तिने कधी पाहिलंदेखील नव्हतं आणि त्याच्याबरोबर उभं आयुष्य काढायचं होतं.. अंतरपाट दुर झाला आणि माळ घालण्यासाठी तिने मान वर केली आणि पाहतच राहिली तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.. समोर तिचा साता जन्माचा साथीदार, तिचा हक्काचा जोडीदार उभा होता... 'अर्णव'...तिने चटकन त्याच्या गळ्यात माळ घातली... सगळे विधी पार पडले.. पाठवणीची वेळ आली...


"जावईबापू, इतके दिवस सगळं तुमच्या म्हणण्यानुसार वागलो.. पोरीची तगमग जाणवत होती पण तुमच्या शब्दाखातर शांत राहिलो पण आता माझ्या नक्षत्राला सांभाळा..." बाबांनी हात जोडले...


"अरे बाबा हे काय करताय...??? तुम्ही एवढी माझी मदत केलीत मी जन्मभर तुमचा ऋणी राहीन आणि वचन देतो तुम्हाला तुमच्या मुलीला फुलासारखं जपेन..." त्यांचे हात धरीत तो म्हणाला आणि नंतर तिच्याकडे वळत म्हणाला, "काय राणी सरकार... कशी वाटली आमची भेट..?? आवडली का..?? बोललो होतो ना अशी भेट देईन की हसता हसता कधी रडू येईल तुझं तुला सुद्धा कळणार नाही..." शब्द तिच्या ओठातच गोठले पण तिच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूंच्या धारा सारं सांगून जात होत्या...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama