STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

3  

Shabd Gandh

Romance Others

द्वंद्व

द्वंद्व

2 mins
199

आपण किती समजून घेतलेले असते स्वतःला. आयुष्यात एक वय असे येते जिथे जवळ जवळ आपण स्वतःला ओळखू लागतो. आपल्या आवडी निवडी, आपले समाधान .. आपण समजून जातो कुठे आहे आपलं सुख.


 ह्रदयाचे अन् डोक्याचे सगळेच विचार जुळत नाहीत. मग सुरू होते एक आंतरिक द्वंद्व. हृदयाला ते हवे असते. पण डोके समजून असते की ते शक्य नाही.


मग अशा वेळी काय करावं.


ऐकावे कोणाचे.


प्रेम


ही एक अशी भावना आहे ज्यात दोघांचा ताळ मेळ नसतोच. ना हृदयाचं डोक्याला पटत ना डोक्याचे हृदयाला. बस प्रेम असतं ते... होऊन जातं. 

ना रंग पाहत

ना रूप पाहत

 ना वय पाहत

 ना पद पाहत

 ना प्रतिष्ठा पाहत.


खरं तर काहीच पाहून होत नसतं,केवळ ती एक अनुभूती असते. 


एक विलक्षण सुख. त्या व्यक्तीच्या असण्याचे.


कधी वाटते हे विचार झटकून टाकावे. पण ते कुठून येतात ते कळतच नाही. आयुष्य जणू काबीज केले असते त्या विचारांनी.


ती भावना खरं तर सुख देते. नकळतपणे आपले आयुष्य त्यात खुश होते. पण त्या खुशीत साथ हवी असते. ' त्या ' एका व्यक्तीची. प्रत्यक्षात नाही असू शकत सोबत पण मनाने सोबत असली तर ह्या पेक्षा सुख आणखी काय वेगळं.


ह्यात कोणत्याच अटी नसाव्या, कोणते बंधन नसावे. 

' नाते ' असावे पण ना 'ते ' बंधन कारक असावे, ना ' ते ' कधी तोडण्याचे भाव मनी यावे.


बंधनं कोणालाच नको असतात. प्रेमात तर ती नकोच. पण व्यक्त एकदा असं व्हावं की समोरच्याला इतकी खात्री रहावी की ही व्यक्ती आपल्या पासून दुरावणार नाही.. अगदी स्वप्नात ही.


रोज बोलणे व्हावे असे काही नाही..पण जेव्हा बोलावं वाटेल ते अगदी हृदयातून व्हावे. मन ठेवायला नव्हे. 


ह्या प्रेमाचे एक उदाहरण म्हणजे ती सरिता जी भेटते ना सागराला.... ग्रीष्मात तिचे पाणी आटते, म्हणून तिचे त्याच्या पाशी जाणे नाही होत . तिचं न येणं तो ही समजून घेतो ना. नाही रागवत तो तिच्यावर. जेव्हा वर्षा ऋतूत हिच सरिता तुडूंब भरून वाहते.. वाहता वाहता ती त्याला बेभान होऊन भेटते. त्या सगळ्या विरहाच्या क्षणांची ती पूर्ण भरपाई करते . तो ही नेहमी सारखा तिचे हसत स्वागत करतो.


आपले ही असेच असावे. निर्मळ असे नाते असावे. स्वच्छ भाव. त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात असण्याचा आनंद साजरा करता यावा. कसलेच बंधन नसावे. सगळं अंतःकरणाने असावे.


ना कसली अपेक्षा ना कसली खंत. केवळ अन् केवळ प्रेम. त्याचं तिचं. एक जीव होऊन एकमेकांत समरस व्हावे.


परिभाषा काहीच नाही ह्या भावनेला. जशी आज त्या सागर सरितेच्या मिलनाचे आपण साक्षीदार होतो, आपल्या प्रेमाचे ही साक्षीदार होतात ह्या कित्येक गोष्टी.. ही हवा, ती हिरवळ, तो एकांत, तो सागर, ती सरिता.. आणि खूप जणं.


असेच सारे समजून घ्यावे आपण एकमेकांना, स्वतःला, त्यांच्या आपल्या आयुष्यात असण्याला, ते आपल्याला भेटले ह्यात आनंद मानायला.


आपले प्रेम. एक न संपणारे द्वंद्व.. हृदय अन् डोक्याचे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance