ही दिवाळी
ही दिवाळी
आज लक्ष्मीपूजन..बरोबर एक वर्ष झालं,रीमा अंथरुणाला खिळली . हसत खेळत जगणारी .स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःही आनंदी रहाणारी आणि इतरांनाही आनंद देणारी रीमा या आजारानं लाचार झाली..खरंच स्त्रीचं जगणं कसं हतबल होतं ना!! जो पर्यंत रीमा पैसे कमवत होती तो पर्यंत ती आदर्श मुलगी,आदर्श बहीण ,आदर्श पत्नी,आदर्श सून सगळं काही होती..रीमानं खूप मेहनतीनं सगळं मिळवलं होतं. लहानपणापासूनच खूप कष्ट घेतले होते..खूप जिद्दी,खूप हुशार रीमा ,लहानपणापासुनच खूप छान जीवन जगण्याची स्वप्न बघत आली.जे कधीच मिळत नव्हतं, छोटया छोट्या गोष्टींसाठी ती जे तरसली होती ते तिला मिळवायचं होतं त्यासाठी ती खूप कष्ट करायला तयार होती.. आणि ती करतही होती..म्हणूनच आज ती इतक्या छान पोस्टवर होती. भाऊ,बहिणी ,आई ,वडील यांच्यासाठी तीने खूप कष्ट घेतले,त्यांना चांगलं जीवन देण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न.त्यांना आनंद देतांना तिलाही खूप आनंद व्हायचा.त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदानं हिचाच चेहरा उजळून निघायचा..बहिणीच्या शिक्षणाचं टेंशन,नंतर लग्नाचं.. यांतच तिचं लग्न ठरलं .लग्नाचं वय झालंच होतं.. दोघंही चांगल्या पोस्टवर ..सासू,सासरे,दीर,नणंद असा परिवार..
रीमाला माहेरची माणसं जितकी जवळची तितकीच सासरची देखील.ती सासरच्यांचही खूप करायची ..प्रत्येकाचा दवाखाना,शिक्षण याबाबत कधीच कंटाळा करत नव्हती.प्रत्येकाचं मन जपण्याचा प्रयत्न करत होती.प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करणं.. सगळं अगदी मनापासून करायची..रीमाकडे स्वतःकडे पैसा होता म्हणून तिला पैशाबाबत आता खूप असं वाटत नव्हतं. सगळ्यांचं करून तीनं आणखी एक फ्लॅट घेतला,गाडी घेतली..कष्ट चालूच होते..सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणे हेंच जणू तिचे जीवन झाले होते.दिसायला सगळं छान दिसत होतं पण कधी कधी तिला स्वतःलाच प्रश्न पडायचा ..हे काय चालू आहे,नुसतंच ओढतोय आपण ..नोकरीतील स्टेटस जपता जपता स्वतःला विसरलो आहोत..प्रत्येक नात्या ला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करतो पण आपल्या आनंददाचं काय??असे प्रश्न पडायचे पण ..पणच रहायचा..असंच मागची दिवाळी आली..सगळ्यांसाठी हे घ्यायचं ते घ्यायचं हा सगळा विचार तिच्या मनात सतत.एकीकडे नवऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न आणि एकीकडे हे सगळे..सगळंच अवघड..दिवाळी जवळ आली होती चांगलाच बोनस मिळाला होता तिला ..ऑफिस चालू होतं आणि दिवाळीच्या दोन दिवस आधी ती ऑफिसमध्येच चक्कर येऊन पडली..असं वाटलं दगदगीमुळे आली असेल चक्कर..पण तीन दिवस झाले तरी बरं वाटेना..सतत अशक्तपणा,डोकेदुखी..खूप तपासण्या झाल्या आणि त्यात ब्रेनट्युमर निघाला..दिवाळी प्रकाश देण्याऐवजी अंधार करून गेली..ऑपरेशन झालं..गाठ काढली गेली..ती आता घरीचं होती ,खूप पैसे ट्रीटमेंटला लागत होता ..हळूहळू सासरचे आणि माहेरचे दोघेही तिच्या या आजरपणाला कंटाळले..तिच्या ट्रीटमेंटला लागणारा पैसा आता त्यांना खर्च करणं जड वाटू लागला.तिला या सगळ्यांच्या वागण्यातला बदल समजत होता .खरं तर तिला जगण्याची खूप आशा होती.., माझी माणसं माझ्या जवळ आहेत हे तिला वाटत होतं..पण एक वर्षांच्याआत ही सगळी कंटाळली होती..कधी कधी तर तिच्या मरण्याची वाटही बघत होती..हे सगळं बघून ती हतबल झाली होती.कॅन्सर ने नव्हे तर तिच्याच माणसांमुळे.
आज दिवाळी .. या सगळ्या गोष्टी तिला आठवत होत्या..मनातून तुटलेली रीमा अंधारात लुकलुकणाऱ्या पणतीकडे एकटक बघत होती आणि मग तिला लक्षात आलं या सगळया अंधाराला कापणारा तो पणतीचा प्रकाश..मग तिनं विचार केला ही नाती मी निर्माण केली आहेत..मी आनंदानं ही नाती स्वीकारली म्हणून मी त्यांच्यात गुंतले,त्यांची काळजी केली,त्यांना पैसे दिले..पण बहुदा ते माझ्यावर नाही तर माझ्या पैशावर प्रेम करत असावे आणि हे मला या अंधारामुळे कधीच कळले नसावे..पण जर मी यांच्याकडून जर अपेक्षा सोडली तर मी माझ्यासाठी जगू शकेल. बहुदा मी यांच्यासाठी खूप केलं आणि यांनी आता माझं करावं ही अपेक्षाच मला बरं होऊ देत नाही आहे .मी इतकी वर्षे या सर्वांसाठी जगले आणि यात स्वतःसाठी जगायचं राहून गेलं पण या पणतीच्या प्रकाशाने एक नवी दिशा,आशा दाखवली आहे..रिमात कुठून बळ आलं माहीत नाही ती अंथरुणातून उठली आणि सगळे लाईट लावले.या दिवाळीने तिला तिच्यासाठी जगण्याची संधी दिली होती..पण एक प्रश्न तिच्या मनात होताच ..माणसापेक्षा पैसा खरंच मोठा का???
