एक दैवी सुख...
एक दैवी सुख...
आज खिडकी बाहेर डोकावून पाहिलं. स्वच्छ निरभ्र आकाश त्यात वावरणारे ते ढग शुभ्र
इतके शुभ्र जणू शांतीचा संदेश देत आहेत ते त्यांना पाहूनच मन आपले शांत होते
एका हिरव्या गालिच्यावर बसावे आणि एक सुरेख अनुभव घ्यावा
वाऱ्याची ती थंडावा देणारी झुळूक आजूबाजूला रंगबिरंगी फुले हलक्या वाऱ्याने ते त्यांचे डोलने त्यावर भिरभिरणारी ती फुलपाखरे त्या फुलपाखरांची अन् फुलांची जुळून आलेली रंगसंगती. निसर्ग एक सुरेख प्रयत्न करत असतो असा सुंदर योगा योग जुळवून आणायचा
ती हिरवी झाडे त्यांच्या आडून दिसणारे ते ढग झाडांच्या फांद्यां मधून डोकावणारे ढग दिसले की वाटते ते बोलावत आहेत त्यांच्यात बसून एक विहार करुन यावा असेच वाटते पळणारा वारा त्या ढगांचा एक फेरा करतो.
मग तो ही असतोच की सर्वांना तेजोमय करणारा आपल्याला सुतेज करणारा आपल्यातील सकारात्मक ऊर्जेची आपल्यालाच अनुभूती करून देणारा तो तेजोमय सूर्य अन् त्या सूर्याची येणारी ती सुखावणारी किरणे.
प्रत्येक फूल डोलत असते एक आनंद साजरा करत असते एक विलक्षण मिलाप असतो. त्या सुगंधाने बहरलेल्या फुलांचा त्यांच्यातल्या मधूचा आस्वाद घेत बागडणारी ती फुलपाखरे ती हिरवाई ने नटलेली धरा ते हिरव्या पानांनी बहरलेली झाडे तो आकाशात चमकणारा सूर्य त्याची सुतेज करणारी ती किरणे आणि कापसापेक्षा हलके अन् शुभ्र ते ढग.आगळीवेगळी निर्मिती एक दैवी सुख निसर्ग आपल्यातल्या ऊर्जेची आपल्याला अनुभूती देऊ करणारे समीकरण जर हा निसर्ग इतकी ऊर्जा आणू शकतो आपल्यात जगण्याची उमेद आणायचा प्रयत्न करू शकतो तर आपण ही थोडा हातभार लावू शकतो ना स्वतःलाच ह्या ऊर्जेचा भागीदार करण्याचा
बहरुया ह्या नैसर्गिक वातावरणात स्वतःला शोधून आला क्षण जगून घेऊ मनावरचे ओझे हलके करू त्या शुभ्र ढगांसारखे जगूया नव्याने क्षण अन् क्षण
