दुधावरची साय
दुधावरची साय
संध्याकाळी भावाचा फोन आला .आमच्या गावची काकी खूप आजारी होती. रहायला ती मुंबईतच. तसे वय ही खूप म्हणजे पंच्याहत्तरी गाठली होती. एक मुलगा एक मुलगी . मुलगी परदेशात स्थाईक. मुलगा व सून खाजगी कंपनीत कामाला.छोटा चुणचुणीत नातू. असा तिचा परिवार.
आई बाबांच्या काळात आमच्या घरी नातेवाईकांची रेलचेल असायची. त्यावेळी लांबची जवळची असा भेदभाव नसे.प्रेम ओतप्रोत भरलेले असायचे. काकी वरचेवर यायची आमच्याकडे. तसा कडक करारी स्वभाव . उंच गोरीगोरी पान.कामेही एकदम झटपट. कधीही तिच्या घरी गेले की जेवल्याशिवाय पाठवत नसे.जेवण नको म्हटले की चिडायची. परिस्थिती जेमतेम.नियम बाकी कडक.पण त्यामुळेच दोन्ही मुले छान शिकली. त्यामागे दोघां उभयतांचे कष्ट बाकी खूप. राकेश लहानपणी खूप मस्ती करायचा. शाळेतून काकी घरी येताना रडतच येत असे कारण फक्त बाई च नाही तर पालक हि तिला बडबडायचे.मुलाला शिकवून मोठे करायचे ह्या एकाच ध्येयापोटी तिने अनेक अपमान सहन केले. राकेश चे शिक्षण पूर्ण झाले. तिचे टेंशन संपले. माझे आई बाबा होते तोवर नाती तशीच होती. हळूहळू जाणेयेणे बंद झाले. त्या पिढीतील एकएक पान गळून पडले.तसे प्रेमाचा झराही आटत गेला.
आणि खूप वर्षांनी भावाच्या फोन ने आठवणी जाग्या केल्या.काकीला भेटायला जायचेच नक्की केले. राकेश इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर मार्ग मिळतो ते उगाच नाही. आम्हाला काही कारणास्तव कामावरून लवकर सोडण्यात आले. म्हटलं चला लवकरच जाऊन आले. राकेशला फोन लावला पण फोन काही लागेना. म्हटले अशी संधी पुन्हा नाही. जाऊया परत वेळ मिळेल न मिळेल.
खाऊ घेतला कधी एकदा काकीला भेटते असे झाले होते. उंचपुरी गोरीगोरी तिची छबी डोळ्यासमोर येत होती.
लिफ्ट ने घरी पोहोचली. सकाळ असल्याने व अचानक सर्वांना सुट्टी मिळाल्याने सगळे घरातच होते. तिचा काही वेगळा रुम नव्हता. घराच्या एका कोपर्यात ती होती. केस तेल न लावल्याने पांढरे भुरभुरलेले,अंगाला सूज आलेली,पाठीला पोक आलेले,बिछान्यावर चादर नाही मेण कापड फक्त,उशीला कव्हर नाही. आजूबाजूला कुबट मलमूत्राचा वास!अंगावर शिरशिरी आली.
तिने मला पाहिले अन् आरडाओरडा सुरू केला.
आत्ता आलीस मला पहायला ,इतके दिवस कुठे होतीस?काकी कशी आहे पहावेसे नाही वाटले. काय करू सगळ्यांना नोकर्या मोठ्या. माझेही आयुष्य संपत नाही. घर सोडून दुसरीकडे (कदाचित तिला वृद्धाश्रम म्हणायचे असेल) मला जायचे नाही. आता तूच सांग मी काय करू?
माझी मती गुंग झाली.राकेश त्याच्या बायकोला बोलण्याचा मला कुठलाच हक्क नव्हता. कारण मी तिला सांभाळू शकत नव्हते.मला चहा नाश्ता विचारण्यात आले पण परिस्थिती पाहता मला कोणतीच ईच्छा नव्हती. आतून रडू फुटत होते. ते पण करायची चोरी .पण काकी हळूच बोलली . अग जे काय मिळतेय ते गपचूप घे कारण तिथून खायचे येत नाही. पुन्हा एकदा मन आतूनच आंक्रदले.राकेशने चहा बिस्कीट आणून ठेवले. बायकोला नाश्ता बनवण्यास सांगितला
माझी बहीण खूप दिवसांनी आलीय.बोलू लागला .मला कुठे ठेवू कुठे नको असे करू लागला. पण का कोण जाणे ते मला आवडत नव्हते. मी त्याला अजून चहा देण्यास सांगितला.काकी ला दे तर म्हणाला अजून अंघोळ नाही झाली तिची. नंतरचा चहा घेतला तिला चहा बिस्किट भरवली. तिला खूप भूक लागली होती बहुतेक . गरम गरम चहाही ती पटकन् प्यायली.
मग राकेश बोलू लागला. आईने ही स्वतंः ची परिस्थिती स्वतंःच करून घेतली आहे. बायकोला कशीही बडबडते म्हणून ती तिला पहात नाही . तिलाही काहीतरी आहे ना?कामवाली ठेवावी तर पंधरा हजार मागतात ते मला परवडत नाही.
त्याची मिसेस माझ्याकडे प्रश्नचिन्ह घेऊन पहात होती.
तिथून काकी ओरडली कर आता फैसला तूच ?खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.मी कशी मध्ये पडणार ?मी तर जबाबदारी घेऊ शकत नाही.त्यांचे प्रश्न त्यांनाच माहीत.मी जर काही बोलले आणि मी गेल्यावर तिला त्रास झाला तर!काकी माझ्याकडे बुडत्याला काठीचा आधार या नजरेने पहात होती.पण खरा आधार मलाच हवा होता.
शेवटी खूप विचार करून काकीला बोलले. अग काकांना कसे त्यांच्या आजारपणात तुझ्या मुला-मुलीने पाहिले. मुलगी परदेशात मग राकेशच पाहील तुला .सुनेला मुलीची जागा दे.ती पटकन म्हणाली मरण येत नाही त्यासाठी काय करू सांग.तुझ्या काकांच आजारपण काढायला मी होते. मी जे सांगेन तेच ही मुले करत होती. मी कडक वागले म्हणून काकांनी पथ्य पाळले. त्यांचे आयुष्य थोडे का होईना वाढले. नंतर जोपर्यंत कामे करू शकत होते तेव्हडी केली. आता माझ्या अवयवांनी हार मानली. मी काय करु?मी पुन्हा निरुत्तर. शेवटी देवाचा सहारा घेतला. काकी कोण काय करतो? किती आयुष्य द्यायचे हे आपण कोण ठरवणार?देवाचे नामस्मरण कर. वेदना कमी होतील.शेवटी हेच आपल्या हातात आहे.का कोण जाणे आक्रमक झालेली काकी शांत झाली. कदाचित मी हतबल आहे हे तिने ओळखले .माझा त्रास तिला समजला असावा.शेवटी लहानांना मोठी माणसेच माफ करण्याचा मोठेपणा दाखवू शकतात हेच खरे.
एव्हडे बोलून तिच्या पाया पडून मी अक्षरशः पळ काढला. तरिही तिने सुखी रहा. तुझ्या आयुष्यात माझ्यासारखे नको. असा मनापासून आशिर्वाद दिला.
खाली उतरले खूप खूप रडले.तिने दिलेल्या प्रेमाची मी सासुरवाशीण उतराई होऊ शकले नाही. याची खंत घेऊन घराच्या दिशेने निघाले.
बसमध्ये बसल्यावर मी अंतर्मुख झाले. मी माझ्या मुलांना शिस्तीसाठी ओरडते. घरात शांतता लाभावी आरोग्य लाभावे म्हणून काही नियम केले.त्याची जाचकता माझ्या मुलांना जाणवते .पण आता ती एेकतात ते त्यांची मजबूरी की प्रेम ??त्यांचे सहचारी आले तर मी ही त्यांना जाचक वाटेल का? मुलांच्या भल्यासाठी आपण जे करतो ते चुकीचे तर नाही ना? मग आपले म्हातारपण चांगले जावे म्हणून मुलांना वाया जाऊ द्यायचे का? माया, प्रेम हे सर्व धकाधकीच्या जीवनात नष्ट होत चालले आहे.पैशाच्या मागे धावणार्या ह्या पिढीला मायेचे महत्त्व कसे समजणार?
मती चालेना . गती येईना .दुधापेक्षा साय गोड असते असे म्हणतात. पण पुढील पिढी गोडव्याशिवाय प्रक्टिकल जन्माला आली तर??