Poonam Wankar ( पूरवा )

Romance

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

दो दिल एक जान... ( भाग -12 )

दो दिल एक जान... ( भाग -12 )

5 mins
277


सियाला राधिकाच्या बोलण्याने जरा चीडचिडच होत होती. राधिकाचं राघवविषयी असं बोलणं तिला आवडत नव्हतं.  रात्री सियाला काही झोपच लागत नव्हती. सारखं राधिकाचं बोलणं तिला आठवत होतं. तिला खूप अस्वस्थ वाटायला लागलं होतं. तिला झोपच येत नव्हती. ती उठून खिडकीशी येते. बाहेर गार वारा वाहत होता. आकाश तारकांनी सजलं होतं. अधे मधे चंद्रसुद्धा झाडामागून वाकून बघत होता. इतक्यात तिचं लक्ष खाली जातं. राघव त्याच्या घराबाहेर असलेल्या झाडाखाली बसून गाण्याचा रियाज करत होता.


सिया : " जरा चांगला रियाज कर ना... म्हणजे उद्या परत ती राधिका येईल मागे मागे तारीफ करत."


सिया आपल्यावर चिडलेली आहे हे राघवलाही माहिती होतं. तो हसायला लागतो.


राघव : "अगं वेडी आहेस का तू काही काय बोलतेस..?? मी का तिच्यासाठी रियाज करणार..? आणि काय गं? तू का इतकी चिडलीस?? "


सिया : " हो का?? मी कशाला चिडू?? मला काय करायचं?? आणि तसंही मी तुला नाही या चंद्राला बघायला आले होते. इतक्या रात्री कोणी रियाज करतं का?? जा जाऊन झोप आत. "


राघव : " अगं तर मी कुठे रियाज करतोय? हा चंद्र एकटाच बसला होता ना! त्याला सोबत म्हणून गात होतो त्याच्यासाठी.


चांद तू नभातला नि

बावळा चकोर मी

गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी

तू चंचला तू कामिनी

तू पद्मिनी तू रागिणी

तनामनात माझिया तुझी सदैव मोहिनी”


सिया : " ए.. पुरे हं तुझं आता. मी खूप रागावले आहे. उगाच मला हसवण्याचा प्रयत्न करू नकोस आधीच सांगते. "


राघव : " हो का? तरीच एका मुलीच नाक लाल झालंय


उरात श्वास कोंडतो

उगा अशी नको रुसू

शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू

तू प्रेमला तू शामला

तू कोमला तू दामिनी

वेंधळा जरी तरी तुझाच चित्तचोर मी”


राघवच गाणं ऐकून मात्र तिच्या ओठांवर गोड हास्य खुलतं. कितीही भांडण झालं तरी सिया फार काळ राघववर रुसू शकत नव्हती. आणि राघवसुद्धा सियाला हसवल्याशिवाय राहत नव्हता. सियाच्या ओठांवर फुललेलं हसू बघून राघव लगेच चंद्राकडे बघून म्हणतो, " काय रे.. ए चंद्रा? जरा बघ की इकडे.. तुला काय वाटतं की तूच गोड दिसतोस?? बघ माझी सिया हसली की किती गोड दिसते .. तुझ्याहीपेक्षा गोड आणि सुंदर..."


सिया : " पुरे पुरे... खूप झाल आता. जा झोप... उशीर झालाय.. "


दोघेही एकमेकांना शुभ रात्री म्हणून झोपी जातात. दुसऱ्या दिवशीची सकाळ सियाच्या आयुष्यातील सगळ्यात स्पेशल सकाळ होती. कारण आज सियाचा वाढदिवस होता. सकाळी अलार्म वाजतो. सिया तो बंद करण्यासाठी हात टेबलकडे नेते. तर तिच्या हाताला एक बॉक्स लागतो. ती डोळे उघडते आणि बघते. तिला एका सुंदर पेपरमधे रॅप केलेलं एक गिफ्ट दिसतं. तिला माहिती होतं की, राघव आजूबाजूला कुठेतरी असेल म्हणून. कारण सगळ्यात पहिलं गिफ्ट लहानपणापासूनच त्याचंच असायचं. ती उठून बसते ते गिफ्ट उघडून बघते. त्यात एक सुंदर घड्याळ असतं. सिया आवरून लगेच खाली येते. राघव आणि सियाचे आई बाबा तयार होऊन तिचीच वाट बघत असतात. सियाला येताना बघून सगळे मिळून तिला शुभेच्छा देतात.


सिया : " काय रे राघव..? याची काय गरज होती? "


राघव : " सिया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला .. सिया जसा जसा वेळ जाईल ना आपल्या मैत्रीचे धागे ही तितकेच घट्ट होत जाईल. आणि जेव्हाही तू वेळ बघशील तूला त्याची जाणीव होत जाईल.


बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये

तू जिए हज़ारों साल, ये मेरी है आरज़ू

Happy Birthday to you

Happy Birthday to you

Happy Birthday dear Siya

Happy Birthday to you”


आई : " अरे मुलांनो, तुमचं आवरा लवकर.. महादेवाच्या देवळात जायचंय आपल्याला. आज अभिषेक घालायचाय सियाच्या वाढदिवसानिमित्त. "

  

सगळे मिळून देवळात जातात. गावाच्या सुरुवातीलाच महादेवाचं मोठं हेमाडपंथी देऊळ होतं. काळ्या दगडावर कोरलेलं नक्षीकाम देवळाची शोभा वाढवत होते. देवळाच्या बाजूला असलेलं मोठं वडाचं झाड, त्याच्या पारंब्या देवळाच्या भिंतीवर लोंबकळत होत्या. त्यावर असलेले बगळ्यांचे घरटे, प्रत्येक फांदीवर बगळेच दिसत होते. जणू काही त्या वडाने पांढरी शुभ्र शालच पांघरली असावी. देवळाच्या काठाने खळखळून वाहत असलेली सुंदर नागमोडी वळणाची नदी, आजूबाजूला असलेले गुलाबी शिखर.. सगळं वातावरण आल्हाददायक वाटतं होतं. महादेवाला अभिषेक घालून होतो. पूजा, आरती होते. आरतीच्या तालावर देवळाच्या घंटेचा 'टण टण' होणारा घंटानाद मन प्रसन्न करीत होता. इतक्यात तिथे राघव आणि सियाचे मित्र मैत्रिणी जमतात. सगळ्यांचं मिळून नदीवर जायचं ठरतं. सियाचे आई-बाबा सर्वांना प्रसाद वाटून घरी परतात. आणि सगळे मित्र मैत्रिणी मिळून नदीवर भटकायला जातात.


आज सिया खूप सुंदर दिसत होती. राघव खर तर तिच्या प्रेमातच पडला होता. तिचे ते सुंदर काळे टपोर डोळे, ते गुलाबी ओठ, रेशमी सुंदर लांब काळे केस तिचं सौन्दर्य आणखीनच खुलवत होते. सगळे पाण्यात उतरतात. त्यांची खूप मज्जा मस्ती सुरु होती. सिया काठावर पाण्यात पाय टाकून बसली होती. राघव नदीत एका खडकावर उभा होता. इतक्यात राघव खाली वाकतो आणि त्याच्या हाताने पाणी सियाच्या अंगावर फेकतो. सिया पाण्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ते गार पाणी अंगावर स्पर्शल्याने तिला हसायला येत होतं. सगळेच त्या गार पाण्याचा आस्वाद घेत होते. तिचं ते सुंदर निखळ हास्य बघून राघव म्हणतो, " ए सिया... तू खूप गोड हसतेस ! नेहमी अशीच हसत राहा. "


सिया : " राघव काय रे?? मस्का लावतोस की काय?? "


राघव : " ए नाही हं सिया..! खरंच तुझं हास्य खूप सुंदर आहे. उमलणाऱ्या चाफेकळी टसारखं. सुंदर आणि गोड .."


आज राघव सियाची तारीफ करतोय हे सियाला खूप छान वाटत होतं. तिला राघवला ऐकतच राहावंसं वाटत होतं. तिच्या मनात होणारी हुरहूर राघवच्याही मनात होत असेल का? राघवला ही मी आवडत असेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. सगळे परत घराच्या दिशेने निघतात. घरी पोहोचताच सियाची आई सिया आणि राघवला म्हणते, "अरे मुलांनो लवकर या..! एक आनंदाची बातमी सांगते तुम्हाला. "


सिया : " काय गं आई! काय झालं? "


बाबा : " अरे राघवा, तुझ्यासाठी स्थळ आलंय., सिया तुझा राघव आता घोड्यावर चढणार.. बरं का??


राघव आणि सिया दोघांचेही चेहरे उतरून जातात. राघवला कळतच नाही. सियाच्या आई-बाबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांचं मन त्याला मोडायचं नव्हतं. आणि त्याने अजूनपर्यंत सियाला तरी कुठे सांगितलं होतं की ती त्याला आवडते. शिवाय सियाच्या मनात काय? हे सुद्धा त्याला माहितीच नव्हतं. तो काहीही न बोलता, ओठावर खोटं हसू आणत तिथून निघून जातो. सगळ्यांना वाटतं तो लाजला असावा. इकडे सियासुद्धा खूप अस्वस्थ झाली होती. काय बोलावं तिलाही कळत नव्हतं. ती सरळ तिच्या खोलीत जाते. तिचे डोळे पाणावलेले होते. आपल्याला असं का होतंय? हे तिलाही कळत नव्हतं. खर तर राघव इतर कुणाचा होणार हेच मुळी तिला मान्य नव्हतं. ती उशीत तोंड खुपसून रडायला लागते. तिकडे राघव देखील डोळ्यातील आसवे लपवत उगाच खोटं हसण्याचा आव आणत होता.


दोघेही सांगतील का त्यांच्या मनातलं आई-बाबांना? ते समजून घेतील का दोघांनाही? हे कळण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance