दाभोळ फाटा - अकल्पित वळण
दाभोळ फाटा - अकल्पित वळण


बऱ्याच वर्षांनी कोकणात आजोळी जाण्याचा योग आला होता. मुलांना तर माझे आजोळ पाहण्याची खूपच उत्सुकता होती. मामाने पण बऱ्याच दिवसांपासून येण्याचा आग्रह केला होता. कोकणच्या रम्य निसर्ग सानिध्यात मामाचे गाव होते. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दाभोळ फाट्यावरून साधारण तीन किलोमीटर आत ते छोटेसे गाव होते. मुलांच्या थंडीच्या सुट्ट्या चालू झाल्या झाल्या आम्ही मुंबईहुन रत्नागिरीला ट्रेननी निघालो. रत्नागिरीहून पुढे बसने आमचा प्रवास सुरु झाला.
बस सुटल्या सुटल्या मुलांनी लगेच आजोळच्या गोष्टी ऐकायचा हट्ट धरला. माझ्या डोळ्यापुढे आजोळी घालवलेले दिवस सरसर उभे राहिले. मुले अगदी तल्लीन होऊन ऐकू लागले, दाभोळ फाटा ते मामाचे गाव हे अंतर आम्हाला पायी किंवा बैलगाडीने पार करावे लागे. दिवसां सहसा आम्ही फाट्यावरून पायीच गावी जात असू. या वाटेवर बरेच अनाकलनीय प्रसंग घडलेले आम्ही लहानपणी गावाच्या लोकांकडून ऐकले होते. त्यामुळे रात्री मात्र या रस्त्याने पायी न जाता इतरांच्या सोबतीने बैलगाडीनेच प्रवास करत असू.
आम्ही मामाच्या गावी आलो की मामा आम्हाला खूप गोष्टी सांगत असे. त्यात खासकरून भुताखेताच्या गोष्टी तो रात्रीच्या वेळी इतक्या रंगवून सांगे की आमची घाबरगुंडीच उडत असे. आम्हा मुलांना त्याच्या त्या गोष्टींची खूप भीती वाटे पण ऐकायला मजा देखील येई. हे ऐकुन माझी मुलं खुदुखुदू हसायला लागली. काय आई तू पण किती घाबरट होतीस ग.. अग अस भूत वगैरे काही असत तरी का?
मुले असे गोष्टींमध्ये रंगले असतानाच आमचा स्टॉप आला... इथून पुढे आम्हाला घ्यायला मामानी सोय केली होती. बस दाभोळ फाट्यावर थांबली... आम्ही तिथे उतरलो ..पण कुठलेच वाहन तिथे दिसेना आणि मामा पण आलेला दिसत नव्हता..फोन करावा तर इथे नेटवर्क पण मिळत नव्हते. इथ फाट्यावर उतरणारे आम्ही व इतर एक दोनच प्रवासी होते. ते तर पायवाटेने झपाझप पुढे निघून गेले होते. आता तर फक्त आम्हीच तेव्हढे उरलो तिथे. बाहेर आता काळोख पडायला लागला होता...आता तर मला पण थोडी भीती वाटू लागली होती..
तेवढ्यात समोरून बैलगाडी वर कुणीतरी येताना दिसलं. जवळ येताच त्या आकृतीला मी बरोबर ओळखले. तो तर आमच्या लहानपणी शेतावर काम करणारा दगडू दादा होता. मला अगदी हायसे वाटले. मी काही बोलणार तितक्यात त्यांनी सामान बैलगाडीत भरले आणि आम्ही निघालो.
मुलांचा हा पहिलाच बैलगाडी प्रवास त्यामुळे ते खूप आनंदले होते. माझी अव्याहत बडबड चालू होती... अरे मामांनी तुम्हाला अगदी बरोबर वेळी पाठवले. आम्ही तर आता घाबरलोच होतो. फोन पण लागत नव्हता. तुम्हाला बघून आता कुठे आमचा जीव भांड्यात पडला होता. दगडू दादाने होकारार्थी मान हलविली आणि तो मुकाटपणे गाडी हाकु लागला. मुलांनी परत गोष्टी साठी हट्ट धरला..तशी मी म्हंटले की आता बाकीच्या भुताखेताच्या गोष्टी तुम्ही उद्या मामा आजोबांकडून ऐका.
हवेतला गारवा वाढला होता..रस्तावर एक चिटपाखरू देखील नव्हते. रस्त्
याच्या दुतर्फा पसरलेले रान काळोखात अजुनच भयावह वाटत होते..किर्र असा काजव्यांचाच काय तो आवाज येत होता...आकाशात स्वच्छ चांदणे पडले होते..त्याचाच तेव्हढा काय तो रस्त्यावर प्रकाश होता.. नकळत माझ्या लहानपणीच्या दाभोळ प्रवासाची आठवण झाली..आणि अंगावर काटा उभा राहिला..
आम्ही एव्हाना गावच्या वेशिजवळ पोहचलो. तिथे बैलगाडी थांबवून दगडू दादाने आमचे सामान खाली उतरवले..मी काही विचारणार तितक्यात तो परत निघाला देखील.. तेव्हड्यात गावातून एक गाडी जवळ येताना दिसली..मामाने आम्हाला हात दाखवला. जवळ येऊन लगेच सामान गाडीत भरले..आणि म्हणाला, अग नलू , उशिराच झाला बघ यायला..वेळेत निघालो आम्ही पण थंडीमुळे की काय गाडी लवकर चालूच होइना आणि तुला कळवावे तर तुझा फोन पण लागेना.
तशी मी लगेच म्हंटले, अरे पण तू दगडू दादा ला पाठवलेस ना बैलगाडी घेऊन आम्हाला घ्यायला..मुले तर जाम खुश झाली..मामाच्या चेहऱ्यावर अचानक प्रश्नचिन्ह पडले. एवढ्या थंडीत पण त्याने चेहऱ्यावरचा आलेला घाम टिपला..पण काही बोलला नाही..चला आता लवकर लवकर घरी पोचू..मामी आजी वाट बघतेय मुलांची..काय काय खाऊ करून ठेवलाय तिने तुमच्यासाठी.. आम्ही तडक घरच्या वाटेने निघालो. ड्रायव्हरने गाडी भरधाव सोडली..
मुलांना मामा आजोबांचा वाडा भारी आवडला..उद्यापासून काय काय गमती जमती करणार ते सर्व प्लॅन आखले. आणि त्यातला सर्व प्रथम त्यांच्या लिस्टवर होते आजोबांकडून ऐकायच्या भुताच्या गोष्टी..त्या सर्व गडबडीत मुले झोपी गेली.
सकाळी उठून गावात सहज फेरफटका मारायला मी निघाले. तिथली मोकळी हवा मनाला प्रसन्न करत होती. आजूबाजूची चौकशी करत मी जुन्या ओळखीच्या लोकांना भेटत होते.. गावातली ती लोक अजूनही तशीच होती भोळी भाबडी..पण गावात आता बऱ्याच सोयी झाल्या होत्या…वीज, नवीन शाळा अशी बरीच प्रगती गावाने केली होती.
एका बाजूला पसरलेले भाताचे शेतं आणि दुसरीकडे गर्द झाडात बांधलेली कौलारू टुमदार घर छान दिसत होती. चालता चालता दगडू दादाचे घर समोर
दिसले..त्याला कालचे धन्यवाद द्यायचे राहूनच गेले होते....म्हणून मुद्दाम त्याच्या घरात शिरले आणि समोरच भिंतीवर लागलेला दगडू दादाचा हार घातलेला फोटो बघून मी जागच्या जागीच खिळले.. तेव्हड्यात दगडू दादाची बायको आली..माझी फोटोवरची नजर बघून तिने डोळ्याला पदर लावला नी म्हणाली, काय सांगू ताई साहेब..आमचं धनी अचानकच आम्हाला सोडून गेलं..अजून वर्ष बी सरल न्हाई..त्या दाभोळ फाट्यान खाल्ल त्याईला..बैलगाडी घेऊन शेतावरून परत येत होत्ये नी तेव्हाच फांट्यापशी ट्रकन जोरदार धडक दिली अन् संपलं सगळं..अन् तिने डोळे पुसले..
माझ्या तर तोंडातून शब्दच फुटत नव्हते….मामाच्या कालच्या प्रश्नार्थक नजरेचे गूढ उमगले होते... कालच्या आठवणीनेच अंगाला दरदरून घाम फुटला... हात पाय थरथर कापू लागले.....मी तशीच मागे फिरले..अन् वाड्याच्या दिशेने झपाझप चालू लागले. ही गोष्ट मात्र मी मुलांना कधीच सांगणार नव्हते.