चला जाऊ दर्शनला
चला जाऊ दर्शनला
त्या दिवशी कालापूर तालुक्यातील तारगाव विभागातील तीन केंद्रिय प्राथमिक शाळांंचे केंद्र संमेलन होते. कधी नव्हे ते बरोबर अकरा वाजता संमेलन सुरू झाले. आजकाल अशी संमेलनं, प्रशिक्षणं ही शिक्षकांच्यासाठी 'पिकनिक डे' असतो की काय अशी शंका उपस्थित होते आहे. त्या दिवशी त्या संमेलनासाठी तारगाव विभागाचे नुतन आणि शिस्तप्रिय अशी ख्यातीप्राप्त शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित राहणार असल्याची बातमी कानोकानी शिक्षकांपर्यंत पोहोचली आणि शिक्षकांची पाऊले तारगावी चालू लागली. बरोबर अकरा वाजता तीनही केंद्राचे केंद्र प्रमुख यांच्यासोबत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे आगमन झाले. संमेलनाचे उद्घाटन आणि पाहुण्यांच्या सत्काराचे सोपस्कार पार पडले. संमेलनाच्या प्रथेप्रमाणे परिपाठ झाला. व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासह तिन्ही केंद्राचे केंद्र प्रमुख, तिन्ही केंद्राचे मुख्याध्यापक बसले होते. कार्यक्रमात हस्तक्षेप करून विस्तार अधिकारी म्हणाले,
"उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींनो, या संमेलनात आपले हार्दिक स्वागत. केंद्र संमेलन का व कशासाठी या विषयाकडे मी जाणार नाही. ते सारे आपल्याला तोंडपाठ झाले आहे. अशा संमेलनाचा तुम्हाला किती फायदा झाला, संमेलनात मिळालेल्या माहितीचा आपण आपल्या शाळेत किती उपयोग करून घेतला हे ज्याचे त्याला चांगले माहिती आहे. आजच्या कार्यक्रम पत्रिकेतील विषय वेगळे असले तरीही मी 'महाराष्ट्र दर्शन' या विषयावर ...." असे सांगत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, त्यांनी महाराष्ट्र दर्शन असे म्हणताच अनेक शिक्षकांचे चेहरे खुलले आहेत. ते जाणून ते पुढे म्हणाले,
"महाराष्ट्र दर्शन का आणि कशासाठी? ही चर्चा मी करणार नाही. आपण या योजनेचा सरळसरळ अर्थ असा काढत असतो की, कुठेही न जाता आपल्या शाळेपासून सर्वात दूर असलेले ठिकाणी गेलो असे दाखवून पैसे उचलायचे. ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे, पदाप्रमाणे वाटा मिळताच त्या देयकाचे महाराष्ट्र दर्शन पूर्ण होते. परंतु कसाही का असेना डोळ्यात अंजन घालण्यासाठी 'तिसरा डोळा... पत्रकार' आपल्या या दर्शनावर डोळा ठेवून आहे. आपल्या विभागातील पाटेगाव केंद्र शाळेच्या महाराष्ट्र दर्शनाचे चविष्ट वर्णन परवाच वर्तमानपत्रात छापून आले आहे. काल झालेल्या बैठकीत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी मला खूप झापले....."
"पण साहेब, हा प्रकार केवळ आमच्या एकाच केंद्रात घडला नाही. सर्वत्र हेच सुरु असताना आम्हालाच का गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे केले जाते आहे?..." पाटेगाव शाळेतील एक शिक्षक आणि शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते तावातावाने बोलत असताना केंद्र प्रमुख म्हणाले,
"कुल डाऊन! शांत व्हा ! आपल्या महाराष्ट्र दर्शनाला वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाली म्हणून साहेब आले आहेत. आत्तापर्यंत कुणी काही विचारले होते का? ..."
"आणि तुम्ही इथे येवढे तावातावाने बोलताय, जरा तुमच्या त्या पत्रकार मित्राला आधीच समजावले असते तर ही भांडाफोड झालीच नसती. महाराष्ट्र दर्शन पंजिका दाखल करीत असताना केवळ तुम्ही एकट्यानेच विरोध केला होता आणि नंतर त्या पत्रकाराला हाताशी धरून....." पाटेगाव केंद्राचे मुख्याध्यापक बोलत असताना ते शिक्षक तावातावाने म्हणाले,
"तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की ही सारी माहिती मीच त्यांना दिली आहे?...." ते बोलत असताना त्यांना थांबवून साहेब म्हणाले,
"एक एक मिनिट ... तुमचा वाद थांबवा. तुम्ही एवढे का गरजताय? तुम्ही विरोध केला... तुम्हाला भ्रष्टाचार नकोय ना, स्वागत आहे तुमचे.... भ्रष्टाचार झालाच असेल तर तो शोधून काढण्यासाठी मी आलोय ना. एक मिनिट हं...." असे म्हणत त्यांनी पाटेगाव केंद्राचा महाराष्ट्र दर्शन पंजिकांंचा गट्ठा काढला. सुरुवातीच्या पंजिकेवरील नाव वाचून ते म्हणाले,
"हां.. आनंद बारमाहे...छान नाव आहे. तुमची प्रथम नेमणूक कधीची?"
"सर, ०१ जुलै २००८..."
"तुमचे लग्न कधी झाले आहे?"
"सर, लग्नाचा आणि महाराष्ट्र दर्शनचा काय संबंध काय?" बारमाहे यांनी विचारले.
"नाही कसा? तुम्ही सहकुटुंब गेला होता ना? पण मला आठवते, तुमचे लग्न बहुतेक दोन महिन्यांपूर्वी झाले आहे ना?"
"ह..ह..हो..." उतरलेल्या आवाजात बारमाहे म्हणाले.
"असे आहे मिस्टर आनंदराव, तुमची नेमणूक २००८ बरोबर? आणि तुम्ही या प्रस्तावानुसार २००७ ला महाराष्ट्र दर्शन करून आलात. बरोबर का हेडमास्तर?"
"ह..हो..." मुख्याध्यापक कसेबसे म्हणाले.
"अजून असे की, तुमचा विवाह मार्च २००९ या वर्षी झालेला..... मिस्टर आनंदराव बारमाहे, आपण संघटनेचे कार्यकर्ते आहात. थोडे समजून घ्या... या पंजिकेचा आणि आपल्या सेवापुस्तिकेतील नोंदी नुसार सरळसरळ अर्थ असा होतो की, तुम्ही जिल्हा परिषदेच्या सेवेत नसताना आणि अविवाहित असताना पत्नीसह महाराष्ट्र दर्शनाचा लाभ घेतला...."
"प..पण सर्वत्र हेच चालू आहे...."
"प्रश्न तो नाही हो. बरे, तुमच्या म्हणण्यानुसार सर्वत्र हेच चालू आहे ना, तर मला अशी लग्न न करता बायकोला घेऊन महाराष्ट्र दर्शन घेऊन आलेले कुणी दाखवून द्या..... हेडमास्तर, आपण केंद्र शाळेचे जबाबदार अधिकारी आहात..... तुमच्या सहीनेच हा प्रस्ताव दाखल झाला, तुम्हीच स्वतःच्या सहीने धनादेश वटवून यांना रक्कम वाटप केली..."
"साहेब, यांचा प्रस्ताव मी नाकारला होता परंतु यांनी थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांंना फोन लावताच त्यांनी मला खूप झापले..."
"तुम्ही त्यांच्या लक्षात हा खोटेपणा लक्षात आणून दिला का?"
"हो. दिला. पण साहेब काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते." "ठीक आहे. मी मुद्दाम चौकशी करण्यासाठी आलोय. प्रत्येक पंजिका आजच तपासणार आहे. हे राजेभाजे....कोण आहेत?"
"मी..मी..."असे म्हणत तिशी ओलांडलेले एक शिक्षक उभे राहिले.
"का हो, तुमच्या पत्नी...."
"ती पण याच शाळेत आहे. साजेबाई..." राजेभाजे सांगत असताना एक शिक्षिका उठत असल्याचे पाहून विस्तार अधिकारी म्हणाले,
"बसा. बसा.तर राजेभाजे आणि साजे एकमेकांना साजेशी नावे आहेत. दोघांनीही प्रस्ताव सादर केले होते. का हो, तुम्हाला अपत्ये किती?"
"नाही साहेब, अजून झाले नाही." साजे घाबरलेल्या आवाजात म्हणाले.
"अच्छा! कुटुंब कल्याण! राष्ट्रीय कार्यात हातभार! व्वा! छान! अभिनंदन! तर हा राजेभाजे तुमचा प्रस्ताव, अरेच्चा! दोन अपत्ये... मोठा अजय वय वर्षे तेरा आणि बारा वर्षांचा लहाना विजय! आता ही साजेबाईंची पंजिका. व्वा, तुम्हाला दोन मुली. अजया नि विजया...बारा आणि तेरा वर्षाच्या..."
"स..स..सर, चुकलो, प्रस्ताव मागे घेतो.दोघांपैकी कुणाचा एकाचा ठेवतो...मुले न दाखवता.."
"तो नंतरचा भाग. निर्णय वरिष्ठ घेतील. मी फक्त अहवाल सादर करणार. बसा. हा खाजेसर..."
"होय सर.." म्हणत एक शिक्षक उभे राहिले.
"खाजे, सेवापुस्तिकेतील नोंदीनुसार तुमचे वय किती हो?"
"साहेब, ब..ब..बावीस वर्षे.... अरे, बापरे ! चुकलो. उचललेले सारे पैसे भरून लेखी माफीनामा लिहून देतो. "
"ते नंतर... वरिष्ठ ठरवतील.... बसा.हे कोण? दांडेसर,तुम्हीसुद्धा?..."
"साहेब, मी माझ्या पंजिकेत माझं आणि माझ्या पत्नीचे दोघांचीच नावे लिहिली आहेत. मुलगा परदेशात आहे. त्याचे नाव टाकलेले नाही. रक्कम ही दोघांचीच मिळाली आहे."
"अहो, इथे तर दोन मुलांची नावे आहेत. हेडमास्तर हा काय प्रकार आहे?"
"सर, आपण यावर नंतर चर्चा करूया." मुख्याध्यापक हळू आवाजात म्हणाले.
"मुळीच नाही. सर्वांसमक्ष आमचे वाभाडे निघताहेत. त्यामुळे दांडेसरांना त्यांच्या प्रस्तावाबाबत काय झाले ते कळालेच पाहिजे. ती दोन नावे कुणी टाकली? सर, प्रामाणिकपणे वागले तरीही त्यांची फसवणूक कुणी आणि का केली?" एक तरुण शिक्षक तावातावाने म्हणाले.
"शांत व्हा. मोठ्याने बोलू नका. तुमचा प्रस्ताव...." साहेब बोलत असताना त्यांना अडवून तो शिक्षक म्हणाला,
"मी दांडेसरांची बाजू घेतली त्यामुळे माझा प्रस्ताव तुम्ही आधी काढाल ही कल्पना मला होती. मी अविवाहित आहे. त्यामुळे मी एकट्याचाच प्रस्ताव देत होतो पण...."
"कुठे माशी शिंकली?" साहेबांनी विचारले. कुणी काही बोलण्यापूर्वी हेडमास्तर म्हणाले,
"सर, मी सांगतो, दांडेसरांनी दोघांचाच प्रस्ताव दाखल केला होता. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला म्हणून त्यांना कमी खर्च लागणार नव्हता. प्रस्ताव प्रामाणिक असो वा अप्रामाणिकपणे सादर केलेला असो वरिष्ठ कार्यालयात सर्वांना सारखेच रेट आहेत. त्यामुळे सारा खर्च वजा जाता सरांच्या हातात पंचवीस टक्के ही रक्कम पडली नसती म्हणून मी त्यांंना मुलाचे नाव टाकायला सांगितले पण त्यांनी ऐकले नाही. म्हणून मग मीच त्यांना न सांगता ....."
"मग त्यांना रक्कम किती वाटप केली? बरे, यांचे काय?"
"मी यांना सारे समजावून सांगितले. तेव्हा यांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतांना स्वतः अविवाहित असताना पत्नीचे आणि न झालेल्या मुलाचे ही नाव टाकले...."
"अच्छा! असे असतानाही हे शिरजोर होताहेत का?" साहेबांनी विचारले.
"स..स..सर,जाऊ द्या ना.कोण धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छआहे...."
"एक एक मिनिट .... आपण सर्व प्रस्ताव तपासत आहात. सारे दोषी असल्याचे दिसून येत आहे. दांडेसर असोत किंवा इतर कुणी असो... अनेकांनी खरेखुरे प्रस्ताव दाखल केलेले असताना त्यांच्या पंजिकांंवर परस्पर बदल करणाऱ्या मुख्याध्यापकांंचा प्रस्ताव अगोदर तपासायला हवा."
"हे हे जास्त होतेय हं....." मुख्याध्यापक बोलत असताना बारमाहे मध्येच म्हणाले,
"ते काय बोलणार? हेडमास्तरांनी एक महिन्यापूर्वीच एक रुपया खर्च न करता रक्कम उचलली आहे. पत्नी आणि दोन मुली दाखवून.... माफ करा, मुख्याध्यापक साहेब, मला तुम्हाला दुखवायचे नाही पण सत्य समोर यावे म्हणून सांगतो, साहेब, यांची पत्नी दोन वर्षापूर्वीच मरण..."
"बास झाले. चूप बसा. माणसाला थोडी तरी..." मुख्याध्यापक बोलत असताना तिथे बसलेले दुसऱ्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले,
"साहेब, खरे सांगू का, ह्या महाराष्ट्र दर्शनाचा आम्हा मुख्याध्यापकांना खूपच ताप झालाय हो. आमची स्थिती ना 'इकडे आड तिकडे विहीर' अशी झाली आहे."
"खरे आहे तुमचे. गंमत कशी होते बघा, जिल्हा परिषदेच्या लक्षात आली आहे, ती अशी की, नव्वद टक्के शिक्षक एकाच ठिकाणी महाराष्ट्र दर्शनासाठी गेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे सर्वांचा कालावधी एकच. काय गर्दी झाली असेल ना?...."
"खरे आहे साहेब, मला फक्त सही करावी लागली. एक रुपयाही मिळाला नाही. सारी रक्कम वाटण्यात गेली. झाले काय तर आम्ही पती-पत्नी दोघेही शिक्षक. मी या केंद्रात तर पत्नी शेजारच्या केंद्रात. उगाच भानगड नको म्हणून माझ्या प्रस्तावात मी माझे एकट्याचे नाव टाकले तर तिकडे पत्नीने स्वतःचे आणि मुलीचे नाव टाकले. आमच्या अशा सत्याच्या प्रयोगामुळे आम्ही स्वतः उपाशी राहिलो पण इतरांना जगवले."
तितक्यात आनंद बारमाहे म्हणाले," साहेब, महाराष्ट्र दर्शनाला जा अथवा न जा परंतु प्रसाद सर्वांंनाच वाटायला लागतो. वर्तमानपत्रातील बातमीचे खापर माझ्यावर फोडले जातेय परंतु आधी प्रस्तावाच्या मान्यतेसाठी आणि नंतर देयके मिळावीत म्हणून आम्ही बयाना म्हणून प्रत्येकी दोन-दोन हजार रूपये जमा केले आहेत परंतु अजूनही काही शिक्षकांना रक्कम मिळालेली नाही...."
"साहेब, बातमी आली म्हणून बारमाहे यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. त्यात त्यांची चूक नाही. आपल्या तिन्ही केंद्र शाळांंचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे तारगाव फाटा! शाळेत जाताना-येताना जवळपास सर्वच शिक्षक फाट्यावर थांबतात. त्यावेळी तिथे इत्थंभूत चर्चा होत असतात. या साऱ्या गप्पांचा आस्वाद शिक्षकांसह नागरिक आणि पत्रकारही घेतात...." एक शिक्षक बारमाहे यांची बाजू घेत म्हणाले.
"बरोबर आहे. आपल्यातील चर्चा ऐकून त्यात काही रंग भरून बातमीच्या स्वरूपात जगासमोर आली आहे. बाकी काही नाही...." दुसरे शिक्षक बोलत असताना त्यांना थांबवून विस्तार अधिकारी म्हणाले,
" ते राहू द्या हो. मला चौकशी करून अहवाल तर द्यावाच लागेल.... हे कोण? वाटलावे...तुम्ही पण महाराष्ट्र दर्शनाची वाट लावलीत? छान! ..."
"साहेब, माझ्या प्रस्तावात शोधूनही चूक किंवा लबाडी सापडणार नाही. मी, पत्नी, मुलगा आणि मुलगी असे आम्ही चौघेजण आहोत. वाटल्यास मी जाण्या-येण्याची तिकीटे दाखवू शकतो...."
"कंडक्टरला पैसे दिले ना तर अशी कितीही तिकीटे मिळतात....." विस्तार अधिकारी बोलत असताना वाटलावे मध्येच उसळून म्हणाले,
"अशी किती रक्कम देते हो तुमचे सरकार? चार वर्षाला चार तिकीटे आणि त्यात होतात चारशे वाटे! मिळणाऱ्या पैशाची अपेक्षा न ठेवता मी दरवर्षी महाराष्ट्र दर्शन राहू द्या भारत दर्शन करतो ....." वाटलावेंंना पूर्ण बोलू न देता त्यांचे केंद्र प्रमुख तावातावाने म्हणाले,
"एवढा का राग येतो तुम्हाला? एवढे प्रामाणिक असाल तर मग मुख्यालयी का राहात नाहीत? मुख्यालयी राहात नसताना घरभाडे भत्ता बरे उचलता?" केंद्र प्रमुखांच्या 'पार्टी'च्या मागणीला वाटलावे अनेक वर्षांपासून वाटाण्याच्या अक्षता लावत होते त्याचा राग केंद्र प्रमुखांनी काढला.
"सर, तुम्हाला घरभाडे भत्त्यावर बोलण्याचा काही एक अधिकार नाही. मुख्यालयी राहणे तुम्हाला बंधनकारक असताना तुम्ही चक्क दुसऱ्या जिल्ह्यातून ये-जा करता? ..."अजून एक शिक्षक तावातावाने बोलत असताना त्यांना थांबवून विस्तार अधिकारी म्हणाले ,
" थांबा. अशी बाचाबाची करायला हे न्यायालय नाही किंवा हमरीतुमरीवर यायला कुस्तीचा आखाडा नाही. तुमच्या प्रस्तावात तुम्ही काय दिवे लावले आहेत?"
"मला माहिती होते, तुम्ही शेवटी हेच अस्त्र वापरणार... होय! इतरांप्रमाणेच मी ही माझे, पत्नीचे आणि दोन्ही मुलांचे वय वाढवून दिले आहेत. सर्वांंसोबत शिक्षा भोगायला ही तयार आहे...."
"ठीक आहे. शिक्षेचे नंतर बघू. हे कोण? कोटे ? ह्यांना निव्रुत्त होऊन चार वर्षे झाली आहेत ना? अच्छा! म्हणजे हेडमास्तर, ही तुमची कर्तबगारी म्हणायची. व्वा! छानच की! हे ...कुमारी आशा पांडुरंग भाते.... अरे, बाईसाहेब, तुम्ही वडिलांचे नाव..."
"नाही सर, ते माझे मिस्टर आहेत."
"मग कुमारी कसे लिहिले?"
"सवयीप्रमाणे! माझे लग्न व्हायचे आहे...म्हणजे नुकतेच ठरले आहे."
"म्हणजे लग्नापूर्वी तुम्ही भावी पतीला घेऊन महाराष्ट्र दर्शन करून आलात? कुठे? माथेरान?"
"त..त..ते असेच....म्हणजे कुठेही न जाता, सर्वांप्रमाणे...." भातेबाई बोलत असताना एक शिक्षक मध्येच म्हणाले,
"सर, महाराष्ट्र दर्शनाचे घबाड हाती यावे म्हणून लबाड बोलावे लागते. हे सारे उघड उघड आहे. आणि ही चौकशी ही एक प्रकारचा फार्स आहे. काय निष्पन्न होईल यातून"
"खोटी माहिती देणाऱ्यास शिक्षा होईल."
"कुणा कुणाला आणि कोण-कोणत्या प्रकारात शिक्षा देणार? आत्ताच घरभाड्याचा प्रश्न निघाला. काय होणार? आम्ही मुख्यालयी राहतो याचा पुरावा म्हणून गावातील एखाद्या नागरिकाचे प्रमाणपत्र देणार. भलेही त्याच्या नावावर घर नसले तरी तो पुरावा शासन ग्राह्य धरणार. तो माणूस फुकटात लिहून देतो का ? मुळीच नाही. त्याचेही हात भरावे लागतातच. भ्रष्टाचार करावाच लागतो."
"बारमाहे, कार्यवाही करायला फारसा वेळ लागत नाही हो. परंतु आपले वरिष्ठ त्याचा नाही तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा विचार करतात. सस्पेंडच काय परंतु डिसमिसही करायला वेळ लागत नाही.परंतु प्रत्येकाला सुधारण्यासाठी संधी द्यावी लागते."
"पण मग हे चौकशीचे..."
"करावी लागते. कदाचित त्यामुळे एक प्रकारचा वचक निर्माण होऊन भविष्यात तसे घडू नये यासाठी सर्व काही करावे लागते. ठीक आहे. अजून बरेच पंजिका तपासायच्या आहेत."
" सर, मी काय म्हणतो, एवढे प्रस्ताव एका दिवसात तपासणे शक्य नाही. तेंव्हा ज्यांनी ज्यांनी खोटे प्रस्ताव दाखल केले आहेत.... म्हणजे जवळपास सर्वांंनीच केले आहेत तेव्हा द्या एकदा सर्वांंना जीवदान. पुढील वेळी प्रस्ताव दाखल करतानाच योग्य प्रकारे...." एक केंद्र प्रमुख असे सांगत असताना त्याला थांबवून विस्तार अधिकारी म्हणाले,
"नाही. मी अशी पळवाट शोधली तर सीईओ साहेब मला घरी पाठवतील. मी हे सारे प्रस्ताव केंद्र प्रमुख आणि केंद्राचे मुख्याध्यापक यांच्याकडे देतो. दोघांनी सारे प्रस्ताव काटेकोरपणे तपासून दोघांच्या स्पष्ट अभिप्रायासह दोन दिवसात माझ्याकडे द्यावेत. अस करा, सर्व शिक्षकांना दहा मिनिटांचे मध्यंतर द्या. ..."
ताबडतोब सारे सभागृह रिकामे झाले. विस्तार अधिकारी यांनी तिन्ही केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना सूचना केल्या आणि ते निघून गेले.....
दहा मिनिटे म्हणता म्हणता एक तास निघून गेला. संमेलनाचा उत्तरार्ध सुरु झाला त्यावेळी शिक्षकांची भरपूर प्रमाणात गळती झाली होती. त्या कालावधीत विस्तार अधिकारी यांनी केलेल्या सूचना कर्णोपकर्णी सर्वांना समजल्या होत्या. शिक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली....
"काssय ? प्रत्येकी दोन? खूप झाले हो."
"साहेबाचा हिसका तसाच असतो."
"अहो, असे वाटत बसलो तर आपल्या हातात पडले तेवढेही जातील की."
"जेवढे पडतील तेवढेच सही. आपण कुठे खरोखर महाराष्ट्र दर्शनाला गेलो होतो."
"आओ चोरो बाँधो भारा, आधा मेरा आधा तुम्हारा । "
शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे. प्रत्येक महाराष्ट्र दर्शन धारकाला दोन हजार रुपये रडत पडत, उसनवारी करून भरावेच लागले.....
त्या गोष्टीला पंधरा दिवस झाले न झाले की ती बातमी एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे त्या जिल्ह्यातील शिक्षकांवर कोसळली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असा आदेश काढला की, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे महाराष्ट्र दर्शनाचे प्रस्ताव आणि देयके फेटाळण्यात येत असून ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्या सर्वांना अदा करण्यात आलेली शंभर टक्के रक्कम सलग तीन महिन्याच्या पगारातून वसूल करण्यात यावी.
ते ऐकून एका शिक्षकाने बारमाहे यांना विचारले ,"पण आपण दिलेली रक्कम.... लाच....शेवटी दिलेले दोन हजार त्याचे काय?"
"मुर्ख खाती टाकून द्या. त्या पैशातून अनेक जण मधुचंद्राला जातील. तेरी भी चूप, मेरी भी चूप! असे आहे सारे..." बारमाहे म्हणाले.