ब्लॅक कॉफी (Black Coffee)
ब्लॅक कॉफी (Black Coffee)
“अनिल, तो टिपॉयवर डबा भरून ठेवलाय तो आठवणीने घेऊन जा आणि संध्याकाळी वेळेवर घरी ये. आज आपल्याला नलू मावशीकडे जायचयं. आहे न लक्षात!!”
“अगं हो, निमा माझ्या सगळं लक्षात आहे. तू निघ वेळेवर. उगाच उशीर नको आणि पोहोचल्यावर मला फोन कर. माझं आवरलं की मी निघेनचं”
अनिल आणि निमा अगदी मेड फॉर ईच अदर काइंड ऑफ जोडी!!
अगदी ६ महिन्यांपूर्वी या दोघांचं लग्न झाले.
अनिल आणि निमा दोघांच्याही घरी स्थळ बघायला सुरुवात झाली. हा नको, ही नको असं म्हणता म्हणता. नलू मावशीच्या मध्यस्तीने दोघांचे सूत जुळले अन् लग्न कधी झाले हे त्या दोघांनाही कळलं नाही.
नलू मावशी ही अनिलची सख्खी मावशी आणि निमाच्या आईची जिवलग मैत्रीण. त्यामुळे निमाला ती अगदी लहानपणापासूनच ओळखत होती. अगदी रोज नसलं तरी महिन्यातून एकदा तरी घरी येणे-जाणे होत असे आणि रोज एक फोन ठरलेला असायचा. तिनेच निमाच्या आईला अनिलचं स्थळ निमासाठी सुचवलं आणि नलूचा भाचा म्हटल्यावर निमाच्या आईनेही लगेच हो म्हटले. मग बघण्याचा कार्यक्रम ठरला. दोघांना एकांतात बोलायला वेळही दिला गेला. दोघांनीही निर्णय घेण्यासाठी दोन दिवसाचा वेळ मागितला.
त्या दोन दिवसांमध्ये त्या दोघांनी पून्हा एकदा भेटण्याचे ठरविले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अनिल आणि निमा एका कॉफी शॉपमध्ये भेटले. बाहेर पाऊस पडत होता आणि कॉफी शॉप मध्ये मंद आवाजात गाणं सुरू होतं.
♫♪ ओल्या सांजवेळी,
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा ♪♫
♪♫कोऱ्या कागदाची,
कविता अनं जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना ♪♫
तसे तर दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. पण पूर्ण आयुष्य फक्त एका भेटीवर काढणे हे त्यांना पटत नव्हते म्हणून अगदी काही नाही तर दोन दिवस तरी विचार करायला मिळावेत आणि त्या दोन दिवसात थोडे तरी मनमोकळेपणाने बोलता यावे म्हणून ते दोघे इथे भेटले होते.
थोडावेळ कोणी काहीच बोलत नव्हते. मग अनिलने कॉफीची ऑर्डर दिली. अनिलने स्वत:ला ब्लॅक कॉफी ऑर्डर केली आणि त्याने निमाकडे पाहिले. निमाला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तिनेही मला पण सेम असे सांगितले. अनिलला मनातल्या मनात वाटलं, “अरे वाह!! ही पण ब्लॅक कॉफी पिते. मस्तच.”
पण जेव्हा ऑर्डर आली तेव्हा एका सीप मध्येच त्याला निमाच्या चेहऱ्यावरचे हाव भाव कळले. मग त्याला हसू आवरले नाही आणि हे निमाच्याही लक्षात आले आणि दोघेही खळखळून हसले. त्या दोघांनी त्या दिवशी मनमुराद गप्पा मारल्या.
त्या दोघांचा होकार कळताचं काही दिवसात घरच्यांनी त्यांचा साखरपुडा उरकून घेतला. मग ते दोघे रोज भेटायला लागले. हा हा म्हणता लग्नाचा दिवस ही उजाडला आणि ते ही निर्विघ्नपणे पार पडले.
अनिलने आधीच त्याच्या आई-वडिलांच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये स्वत:साठी वेगळे घर घेतले होते आणि तो आणि निमा लग्नानंतर तिथेच राहायला गेले. म्हणता म्हणता लग्नाला ६ महीने कधी होऊन गेले कळलेच नाही आणि त्यामध्ये नलू मावशीकडे जायचे राहिले ते राहिले.
आज संध्याकाळी नलू मावशीने दोघांनाही घरी बोलविले होते. मावशीने रात्रीच्या जेवणासाठी आज फक्कड बेत केला होता. दोघेही अगदी वेळेवर मावशीच्या घरी पोहोचले. मावशीने त्या दोघांनाही कॉफी आणून दिली. कॉफीची एक सीप घेतल्यावर त्यांना त्यांच्या कॉफी शॉपच्या भेटीची आठवण झाली व दोघेही खळखळून हसायला लागले. नलू मावशीला काहीच उमजेना.
अहो, कारण ती ब्लॅक कॉफी होती ना !!!!
(हा ब्लॉग वाचून कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेयर करा. धन्यवाद)
@preetisawantdalvi

