The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Charumati Ramdas

Inspirational

3  

Charumati Ramdas

Inspirational

बिच्चारा म्हातारा

बिच्चारा म्हातारा

8 mins
1.8K


लेखक : मिखाइल ज़ोशेन्काभाषांतर : आ. चारुमति रामदास

आमच्या लेनिनग्रादमधे एक म्हातारा मुडद्याप्रमाणे झोपून गेला. गेल्याच वर्षी, माहीत आहे का तुम्हांला, त्याला रातांधळेपण आले होते, पण त्यातून तो बरा झाला. इतकेच नाही, तर कॉमन-किचनमध्ये जाऊन त्या बिल्डिंगमधे राहणा-यांशी सांस्कृतिक प्रश्नांवर वाद-विवादसुद्धा करून आला.

आणि घ्या, थोड्याच दिवसांपूर्वी अनपेक्षितपणे झोपूनच गेला. रात्री तो मुडद्यासारखा झोपला, सकाळी उठून बघतो कि काहीतरी गडबड आहे. म्हणजे असं की नातेवाईक तर बघताहेत की एक निर्जीव शरीर पडलं आहे, जिवंत असल्याची कोणतीही खूण देत नाहीये. नाडीपण बन्द पडली आहे. छातीचा भाता पण वर-खाली होत नाहीये, तोंडाजवळ आरसा नेऊन बघितला तर त्यावरसुद्धा श्वासोच्छ्वासाने जमणारी वाफ़ दिसत नाहीये.

आता मात्र सर्वांची खात्री झाली की म्हातारबुवा झोपेतंच शांतपणे गेले , आणि ते लगेच पुढच्या तयारीला लागले.

लगेचंच पुढच्या तयारीला ते अशासाठी लागले की एका लहानशा खोलीतंच पूर्ण कुटुम्ब राहत होतं. त्या खोलीच्या चहुबाजूला होती कम्युनिटी बिल्डिंग (एकाच इमारतीत वेगवेगळ्या खोल्यांमधे वेगवेगळ्या फॅमिलीज़ राहायच्या) आणि दुसरे असे की म्हातारबुवाला, माफ़ कर,पण ठेवायलासुद्धा कुठे जागा नव्हती...इतकी अडचण होती त्या खोलीत. मग इच्छा असो किंवा नसो, घाई करणे भागंच होते. हो, मला सांगावं लागेल की हे झोपलेले म्हातारबुवा आपल्या नातेवाईकांबरोबर राहात होते. म्हणजे नवरा, बायको, लहान मूल आणि त्याची आया. शिवाय ते स्वतः, म्हणजे वडील किंवा सोप्या शब्दांत सांगितले तर, त्याच्या बायकोचे पप्पा, म्हणजे तिचे पप्पा, भूतपूर्व कामगार, जसे असायला पाहिजेत तसे. पेन्शनर. आणि आया...सोळा वर्षाची मुलगी, कुटुम्बाच्या मदतीसाठी ठेवलेली मुलगी, कारण की ती दोघं नवरा आणि बायको किंवा सोप्या शब्दांत सांगितले तर आपल्या पप्पांची मुलगी फैक्टरीत काम करतात.

तर ते नोकरी करतात आणि, म्हणजे, सकाळी-सकाळी अघटित बघतात...पप्पा गेले!

तर, साहजिकंच, दुःखाची गोष्ट आहे...भावनांचा कल्लोळ उडालेला आहे, कारण की खोली तर फारंच लहान आहे आणि तिथेच ही एक एक्स्ट्रा वस्तू!

तर, ही एक्स्ट्रा वस्तू सध्या पडली आहे खोलीत. ती वस्तू आहे इतकी स्वच्छ! साजरा म्हातारा, लोभस म्हातारा, जो राहत्या जागेबद्दल, तिथल्या अडचणींबद्दल आणि अप्रियतेबद्दल काही विचारंच करू शकंत नाही. तो बापडा अगदी फ्रेश वाटतो आहे, जणु काही मलूल झालेलं फरगेट–मी–नॉट, जणु काही सोललेलं शेवफळ. तो पडला आहे आणि त्याला काहीही माहीत नाहींये, त्याला काहीसुद्धा नको आहे, फक्त त्याच्याकडे शेवटचे एकदा लक्ष द्यावे, अशी मागणी करतो आहे.

त्याची मागणी आहे की त्याला लवकरात लवकर काहीतरी घालावे आणि शेवटचे ‘क्षमा करम्हणावे, आणि लवकर कुठेतरी दफ़न करावे.

त्याची मागणी आहे की हे सगळे लवकरांत लवकर करावे, कारण की फक्त एकंच लहानशी खोली आहे आणि प्रचण्ड दाटी आहे तेथे;

आणि, कारण की मूल चिरचिर करंत आहे आणि आयाला मेलेल्या माणसांबरोबर एकाच खोलीत राहायची भीती वाटते, आणि असे वाटते, की जीवन कधीच न संपणारी गोष्ट आहे. तिला प्रेतं बघायची भीती वाटते. ती मूर्ख आहे!

नवरा, म्हणजे हा आपला कुटुम्बप्रमुख तेव्हां पटकन् स्थानीय अंत्य-यात्रा ब्यूरोकडे धावतो आणि लगेच तेथून परंतही येतो.

तर, तो सांगतो, सगळं ठीक आहे, फक्त घोड्यांबद्दल थोडासा प्रॉब्लेम आहे, गाडी (शव-वाहिनी), म्हणतात की लगेच देतो, पण घोड्यासाठी चार दिवस थांबावं लागेल. काहीच प्रॉमिस नाहीं करता येत. बायको म्हणते, मला माहीतंच होतं, तू आयुष्यभर माझ्या पप्पांना बोचकारंत राहिलास आणि आता पण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही....त्यांच्यासाठी घोडेपण नाहीं आणू शकंत...

नवरा किंचाळतो, आँSSS, मी काही घोडेस्वार नाही, घोड्यांचा ऑफिसर पण नाही, मी...पुढे तो म्हणतो, मला स्वतःलासुद्धा इतका वेळ वाट बघंत बसणे आवडत नाही. तुझ्या वडिलांना बघंत बसण्यांत मला काही म्हणजे काही इंटरेस्ट नाही.मग भलताच सीन क्रिएट होतो. मुलगा, ज्याला मेलेल्या माणसांना बघायची सवय नसते, घाबरतो आणि किंचाळू लागतो.

आणि आया अश्या घरी काम करण्यास चक्क नकार देते, जिथे मेलेला माणूस राहतो.

पण तिला कसे तरी समजावतात, काम न सोडण्याबद्दल विनवण्या करतात, आणि वचन देतात की मेलेल्या माणसाला पट्कन काढून टाकू.

तेव्हां मालकीण स्वतः या अश्या गोष्टींना कंटाळून ब्यूरोमध्ये जाते, पण चादरीसारखी पांढरीफट्ट होऊन परत येते.

घोडे, ती सांगते, एका आठवड्यानंतरंच देणार आहेत. जर माझा नवरोबा, हा मूर्खोबा, जो जिवन्त आहे, तेथे गेला तेव्हां स्वतःचे नाव रजिस्टर करून आला असता, तर तीन दिवसांत मिळाले असते, पण आता आपला नंबर सोळावा आहे. पण गाडी, म्हणे वाटलं तर आत्ताच घेऊन जाऊ शकता.

मग लगेच ती पट्कन मुलाला ड्रेस चढवते, ओरडणा-या आयाला बरोबर घेते आणि सेस्त्रोरेत्स्कला जाते, आपल्या मित्रांकडे राहायला.

मला, ती म्हणते, मूल जास्त प्रिय आहे. लहानपणापासून त्याला असले सीन्स दाखविण्याची माझी इच्छा नाहीये, तुला जे करायचंय ते तू करू शकतोस.

नवरा म्हणतो, मी पण त्याच्यासोबत नाही थांबणार. तुला जे करायचंय ते कर! हा म्हातारा काही माझा नाहीये! तो जिवन्त असताना पण मला विशेष नाही आवडायचा, आणि आता तर त्याच्याबरोबर राहण्याची मला चीडंच आलीये. नाहीतर, मी त्याला कॉरीडोरमधे ठेवून देईन किंवा मी माझ्या भावाकडे चालला जाईन. त्याला इथे राहून घोड्याची वाट बघ म्हणावं.

तर, बायको सेस्त्रोरेत्स्कला निघून जाते आणि नवरा, म्हणजे गृहस्वामी आपल्या भावाकडे पळतो, पण दुर्दैवाने भावाच्या घरी सगळ्यांना दिप्तेरिया झालेला असतो आणि त्याला कोणी खोलीत पाऊलसुद्धा ठेवू देत नाही.

तेव्हां तो परत आला, त्याने झोपलेल्या म्हाता-याला एका छोट्याशा बेंचवर ठेवलं आणि ते सर्व लटाम्बर कॉरीडोरमधे कॉमन बाथरूमजवळ नेऊन ठेवलं, स्वतः मात्र आपल्या खोलीत शेजा-यांच्या आरडाओरड्यावर आणि त्यांच्या दार ठोठावण्यावर काहीही लक्ष न देता दोन दिवस लपून राहिला.

आता तर त्या कम्युनिटी आवासगृहात भलतेच स्कैण्डल झाले. भाडेकरू किंचाळतात, ओरडतात, बायका आणि मुलं तिकडे फिरकायची थांबलीय, जिथे जायला त्यांना भीती वाटायची. तेव्हां पुरुष हे लटाम्बर उचलून त्या बिल्डिंगच्या प्रवेशकक्षात ठेवतात, त्याने बिल्डिंगमधे येणा-या लोकांमधे भीती पसरली, मोठीच गडबड उडाली.

कम्युनिटी बिल्डिंगचा डाइरेक्टर जो कोप-यावरच्या खोलीत राहायचा, म्हणतात की, त्याच्याकडे, माहीत नाही कशासाठी, बायका येत असतात, म्हणाला की त्यांचे मनःस्वास्थ्य बिघडवण्याची रिस्क तो घेऊ शकत नाही.

हाउसिंग सोसाइटीची बैठक तातडीने बोलावण्यात आली, पण काही उपयोग नाही झाला. मीटिंगमधे असे सुचविण्यात आले की हे लटाम्बर अंगणांत ठेवावे.

पण सोसाइटीच्या प्रेसिडेन्टने ठामपणे सांगितले – अश्याने उरलेल्या जिवंत माणसांवर वाईट परिणाम होईल आणि बिल्डिंगच्या भाड्यावर पण परिणाम होईल, जे आधीच सहा महिन्यांपासून तुंबलेय.

तेव्हां म्हाता-याच्या मालकावर ओरडणे, त्याला धमकावणे सुरू झाले. मालक आपल्या खोलीत लपून बसला होता आणि म्हाता-याच्या उरलेल्या वस्तू आणि इतरही रद्दी सामान जाळंत होता.

मग त्यांनी असे ठरविले की ज़बर्दस्तीने दार उघडावे आणि हे लटाम्बर खोलीत लोटून द्यावे.

ते सगळे आरडाओरडा करंत बेंच ढकलू लागले, त्याचा परिणाम असा झाला की म्हाता-याने हळूच श्वास घेतला आणि त्याचे हातपाय थरथरू लागले.

थोडा वेळ भीती वाटली, थोडी गडबड झाली, पण मग आता त्यांच्यासमोर नवीनंच प्रॉब्लेम उभा राहिला. नव्या जोमाने ते खोलीकडे झेप घेऊ लागले. त्यांनी दार ठोठावण्यास व ओरडण्यास सुरुवात केली की म्हातारबुवा जिवन्त आहेत आणि त्यांना आत यायचे आहे.

पण आतल्या माणसाने बराच वेळ उत्तर दिले नाही. एका तासानंतरंच तो बोलला, “हे तुमचे सगळे जोक्स बाजूला ठेवा. मला माहीत आहे की तुम्हाला मला पकडायचंय.”

ब-याच वाटाघाटी झाल्या, नंतर म्हाता-याचा मालक म्हणाला की म्हाता-याने स्वतः त्याच्याशी बोलावे. म्हाता-याला ह्या अद्भुत नाटकाची काहीच कल्पना नसल्याने तो अशक्त आवाजांत म्हणाला, “हो...हो...”

पण हा आवाज आतल्या माणसाला म्हाता-याचा खरा आवाज नही वाटला.

शेवटी त्याने म्हाता-याला समोर आणायला सांगून कुलूपाच्या भोकातून बघितले.

उभ्या केलेल्या म्हाता-याला तो बराच वेळ जिवन्त मानायला तयारंच होईना, म्हणे की बिल्डिंगचे लोक मुद्दामच त्याचे हातपाय हालवंत आहेत.

आता मात्र म्हाता-याला राग आला, त्याने शिवा द्यायला आणि थयथयाट करायला सुरूवात केली, जसा तो जिवन्त असताना करायचा. आता मात्र दार उघडले आणि म्हाता-याला समारंभपूर्वक आत घेण्यांत आले.

आपल्या नातलगाबरोबर भांडभांड भांडल्यावर जिवन्त झालेल्या म्हाता-याने बघितलं की त्याची सर्व मालमत्ता गायब झाली आहे, आणि तिचा थोडासा भाग शेकोटीत जळताना त्याच्या दृष्टीस पडला आणि ज्या फोल्डिंग कॉटवर तो मेला होता, ती पण त्याला दिसली नाही.

तेव्हां म्हातारा आपल्या वयाला साजेशा गुंडगिरीप्रमाणे मोठ्या कॉमन पलंगावर पसरला आणि त्याने खायला मागितले. तो खात होता आणि दूध पीत होता. दूध पिता-पिता तो धमकावंत होता की तो हे नाही बघणार की ते त्याचे नातलग आहेत. सरळ त्यांना पोलिसात देऊन कम्प्लेंट करेल की त्यांनी त्याची मालमत्ता हिसकावली आहे.

लवकरंच त्याची बायको, म्हणजे ह्याची – ह्या मेलेल्या पप्पांची मुलगीसुद्धा सेस्त्रोरेत्स्कहून परंत आली. आनंदाच्या आणि भीतीच्या किंचाळ्या फुटल्या. लहान मूल, जीवशास्त्रापासून अगदीच अनभिज्ञ, फार सहनशीलतेने हे पुनर्जन्माचे प्रकरण बघंत होते. पण आया, ही सोळा वर्षांची मुलगी पुन्हां अशा कुटुम्बात काम करणार नाही असे म्हणाली, जिथे घडी-घडी माणसं मरतात काय आणि पुन्हां जिवंत होतात काय!

नवव्या दिवशी मशाल लावलेली पांढरी गाडी आली. गाडीला एक घोडा जुंपलेला होता. डोळ्यांवर टोप्या लावलेला.

नव-याने, म्हणजे ह्या कुटुम्बप्रमुखाने, अगदीच नर्वस होऊन खिडकीतून पांढ-या गाडीचे आगमन बघितले. तो म्हणाला, बघा, पप्पा! शेवटी तुमच्यासाठी गाडी आलीय.

म्हातारा हातवारे करंत, थुंकत म्हणाला की आता त्याला कुठेही जायचे नाहीये.

त्याने छोटे वेंटीलेटर उघडले आणि रस्त्यावर थुंकू लागला. अशक्त आवाजांत ओरडू लागला की गाडीवाल्याने लगेच तेथून चालते व्हावे आणि जिवंत लोकांवर आपली दृष्टी गडवूं नये.

पांढरा शर्ट आणि पिवळा डगला घातलेला गाडीवान मुडदा खाली आणेपर्यंत धीर नाही धरू शकला आणि वर जाऊन भसाड्या आवाजांत शिव्या देऊं लागला, म्हणू लागला की त्याला कमीतकमी ते तरी द्यावे, ज्याच्यासाठी तो येथे आला आहे, आणि ओल्या दमट रस्त्यावर वाट बघायला त्याला भाग पाडू नये. तो म्हणंत होता, “मला ह्या बिल्डिंगमधल्या लोकांचे लो-स्टैण्डर्ड कळतंच नाही. सगळ्यांना माहीत आहे, कि घोड्यांचा तुटवडा चालू आहे. फुकट त्यांना बोलावणे, म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टम कोलमडून पडेल. ते काही नाही! मी आता ह्या बिल्डिंगमध्ये पुन्हां कधी नाही येणार!”

पुनर्जीवित झालेल्या म्हाता-यासकट बिल्डिंगमध्ये राहणा‌-या सर्व लोकांनी त्या गाडीवानाला त्याच्या पांढ-या शर्टासकट आणि पिवळ्या डगल्यासकट खाली ढकलून लावले.

तरी गाडीवान बिल्डिंगपासून दूर हलायला तयारंच होईना, त्याने मागणी केली की त्याला कमीतकमी ट्रॅव्हलिंग सर्टिफिकेट तरी लिहून द्यावे.

जिवन्त झालेला म्हातारा वेंटिलेटरमधून पुन्हा थुंकला आणि तो गाडीवाल्याला मुक्का दाखवीत धमकावू लागला. दोघेही एकमेकांना भयानक शिवीगाळ करूं लागले.

शेवटी ओरडून-ओरडून घसा बसलेला, मुक्के खाऊन पस्त झालेला गाडीवान तेथून निघून गेला. तो गेल्यावर जीवन हळूहळू सुरळीत होऊ लागले. चौदाव्या दिवशी, उघड्या वेंटिलेटरजवळ बसल्याने सर्दी झालेला म्हातारा तापाने फणफणंत मरून गेला. ह्या वेळेस तो खरोखरीच मेला.

आधी कुणालाच विश्वास बसला नाही. सर्वांना वाटले की म्हातारा मागच्यासारखेच नाटक करीत आहे, पण बोलावलेल्या डॉक्टरने सर्वांचे समाधान केले, त्याने डिक्लेयर केले की ह्या वेळेस काही दगाफटका नाही. आता बिल्डिंगमधे राहणा-या लोकांची एकंच गडबड उडाली.

बरेचसे भाडेकरू आपापल्या खोल्यांमधून तात्पुरते कुठे-कुठे निघून गेले.

बायको, म्हणजे, सोप्या शब्दांत सांगायचं म्हटलं तर, आपल्या पप्पांची मुलगी, ब्यूरोत जाण्यास घाबरून पुन्हा आपल्या मुलासह आणि आरडाओरडा करंत आसलेल्या आयासह सेस्त्रोरेत्स्कला चालती झाली. नवरा, म्हणजे कुटुम्बप्रमुख हा हेल्थ रिसॉर्टला जाण्याबद्दल विचार करंत होता, पण तेवढ्यांत अनपेक्षितपणे गाडीच दुस-या दिवशी दाराशी येऊन ठेपली.

थोडक्यात म्हणजे, काही दिवस गाड्यांच्या कार्यप्रणालीत व्यत्यय आला होता. टेम्पररी व्यत्यय, नेहमीच ते उशीर लावतात असे नाही.

आणि आता, असे म्हणतात, की त्यांनी दफ़नाची सम्पूर्ण वेटिंग लिस्ट संपवली आहे आणि लगेच गाड्या देता, अगदी सुखद आश्चर्य म्हणायचे – यापेक्षा जास्त काय पाहिजे?

******Rate this content
Log in

More marathi story from Charumati Ramdas

Similar marathi story from Inspirational