Shobha Wagle

Drama Horror

5.0  

Shobha Wagle

Drama Horror

भय

भय

4 mins
1.5K


सुरेश रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेहून एक महिन्यासाठी आलेला. अगोदर तो तेथे शिकायला गेला होता. तिथल्या कंपनीने त्याला तेथेच नोकरी दिली होती.


रावसाहेबांना आणि मम्मीना त्याच्या लग्नाची घाई होती. त्याला कारणही होते. शैला रावसाहेबांच्या मित्राची मुलगी तिला त्यांनी लहानपणीच सून म्हणून मानले होते. सुरेशचीही ती बालमैत्रीण होती. दोघंही एकमेकाला आवडत होती. पण रावसाहेबांना भिती वाटत होती. पोरगं अमेरिकेला जॉब करणार मग तेथलीच कोण पकडली तर शैलाचे कसं होणार? तेव्हा लवकरात लवकर लग्न केलं की आपण दिलेल्या वचनातून मुक्त होऊ. म्हणून चहा घेताना त्यांनी सरळ सुरेशला सांगितले,

"आता सुट्टीवर आलाय तर तुझं आणि शैलाचे लग्न उरकून घेऊ!" 


"का घाई करतात मला सेटल होऊ द्या ना?" 


"त्यात काय लग्न कर आणि शैलालाही बरोबर घेऊन जा." 


हो नाही करता शेवटी सुरेश तयार झाला. लगेच पुढच्या आठवड्याचा मुहुर्तही काढला. रावसाहेबांचा वाडा मोठा प्रशस्त होता. शहराप्रमाणे हॉल, कॅटरिंगची काही गरज गावी लागत नसे. घरासमोर मोठा मांडव घालत. सगळा गाव लग्नातले दोन दिवस जेवत असे.


रावसाहेब गावात नावाजलेले व्यक्ती होते. नोकर-चाकर भरपूर असल्याने 

चार दिवसांत मांडव ते आमंत्रण पत्रिका सर्वांना देऊन झाल्या आणि लग्न सोहळाही मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. नंतर देव-देवस्थानही करून झाले. अमेरिकेला जाण्याची तयारी शैलानेही केली. सगळं कसं छान झालं होतं. 


एके संध्याकाळी शैला सुरेशला म्हणाली, “आपण जरा नदीकाठी फेरफटका मारून येवू या का?" 

सुरेशही लगेच "हा” बोलला आणि दोघं गप्पा-गोष्टी करत नदीकाठी निघाली.


मे महिन्याचे दिवस असल्याने दिवसभर गरमी असली तरी संध्याकाळी छान वारा वाहायचा त्यात नदीकाठची जागा मग विचारायलाच नको!


नदीकाठी एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. लहानपणी गावची सगळी मुलं नदीत पोहायची व नंतर तेथे मस्त वनभोजन करायची, त्यात मुलींचाही सहभाग असायचा. शैला-सुरेशने त्या पिंपळाच्या पारावर बसून गप्पा मारायचे ठरवले. बालपणाच्या एक एक आठवणीत दोघंही रमून गेली. सूर्य क्षितिजापलीकडे केव्हाच गेला होता आणि अंधारूनही आले होते. अंधाराकडे बघून शैला म्हणाली, “चल रे निघुया आपण.”


"थांब गं, परत कधी येणार आपण येथे. बसू थोडा वेळ." असे म्हणून दोघं पुन्हा आठवणीत मग्न झाली. 

आता काळोख वाढला होता. गावात शहरासारखी विजेची सोय रस्त्यावर नव्हती.


बऱ्याच वेळाने शैला भानावर आली आणि तिने घाई घाईने सुरेशला उठायला सांगितले व त्याचा हात पकडून त्याला उठवायला लागली तरी सुरेश तटस्थासारखा बसूनच. शैला थोडी घाबरली आणि तिने जोराने त्याच्या हाताला हिसका दिला. सुरेश उठला पण एका वेगळ्याच तंद्रीत असल्यासारखा वागू लागला. शैलाने त्याला जवळ जवळ ओढतच आणला. वाटेत तो एकही शब्द बोलला नाही. त्यामुळे शैलाही जाम घाबरली. घरात शिरताच मम्मी दोघांना ओरडल्या, "काय रे किती उशीर?" तरी सुरेश वेंधळ्या-थकल्यासारखा कुठेतरी पाहत, नजरेला नजर न देता उभा राहिलेला. शैलाने त्याला खुर्चीवर बसवले. मम्मीही त्याच्याकडे पाहून घाबरल्या.


"काय झालयं यावा? बोलत का नाही? कोठे गेला होता तुम्ही?"


शैलाने सगळे सांगितले. रावसाहेबही माडीवरून आले. तरी सुरेश तसाच सताड डोळे उघडे ठेऊन. पण नजरेत काहीच भाव नाहीत.


आता नोकर-चाकर आणि खुद्द रावसाहेबही घाबरले. त्यांनी लगेच डॉक्टरना आणायला माणूस पाठवला. डॉक्टरही लगेच आले. तपासले काही दोष सापडला नाही. तरी त्यांनी त्याला एक इंजेक्शन दिले. "त्याला झोपू दे.मी उद्या सकाळी येतो. पुन्हा उद्या बघू नाहीतर मग शहरात न्यावे लागेल.”


शैलासकट सगळेच घाबरले. म्हातारी नोकराणी रखमा पुढे आली व बोलली, "मी नजर काढते बाबाची. संध्याकाळी पिंपळाच्या पारावर बसताय होय. या बाबाला माहीत. नाही पण शैलाबायना माहीत हाय ना! बेगिन शान घराला यायचं व्हतं नाय!”


नजर काढून झाली. भुता-खेचराने पकडलं असेल असेही नोकर कुजबुजू लागले. शैला शिकलेली भुता-खेचरावर विश्वास ठेवणारी नव्हती तरी अशी परिस्थिती बघून तिच्याही मनाची घालमेल सुरू झाली. गावात सहसा लोक अशाच गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे तिच्याही मनात वाईट विचार येऊ लागले. मम्मी देवघरात बसून देवाची आराधना करायला बसली. रावसाहेबही फेऱ्या घालू लागले. अशावेळी शैलाला ही काही सुचेनासे झाले. तिची बेचैनी वाढली. मनातल्या मनात ती स्वामीचा जप करू लागली.


रात्री घरात कोणीच जेवले नाहीत. शैला रात्रभर सुरेशजवळ जागत बसली. सकाळी सहा वाजता सुरेशला जाग आली आणि त्याने "मम्मी" म्हणून हाक मारली. शैलाच्या जीवात जीव आला. डॉक्टरही आले त्यांनी पुन्हा तपासले.

सगळं नाॅर्मल. तरी त्याच्या डोळ्यांत तेज नव्हते कोठे तरी कसला तरी विचार करत असावा अशा तऱ्हेचे. मुख्य म्हणजे सुरेश बोलत नव्हता शुन्यात नजर लावत होता. डॉक्टरनी त्याला शहरातल्या डॉक्टरना दाखवायला सांगितले.


रावसाहेब सुरेशला घेऊन शहरात गेले तेथे डॉक्टर आणि मोठ्या मानसशास्त्रज्ञांनाही दाखवले. त्यांनी त्याला दोन दिवस ठेऊन घेतले. सगळ्या तपासण्या करुन झालेल्या. सगळं नाॅर्मल होतं.


शैलाच्या मदतीने डॉक्टरनी त्या दिवशी काय घडले ते जाणून घेतले. त्याच्याबरोबर बोललेल्या सगळ्या गोष्टी तिला सुरेश समजून त्यांना सांगायला सांगितले आणि तेही सुरेश समोर बसून. शैला सुरेशकडे बोलते तसेच बोलू लागली. ती बोलत असताना डॉक्टर सुरेशकडे सारखे पाहत होते. जेव्हा नदीत पोहण्याची खबर ती सांगत होती तेव्हा सुरेशने थोडी हालचाल केली आणि नंतर तो जोरात "हेमंत" करुन ओरडला. डॉक्टरनी “हेमंत कोण सुरेश...” असं विचारले. तेव्हा तो सरळ सगळं बोलू लागला.


सुरेश जेव्हा दहा-बारा वर्षाचा होता तेव्हा सगळ्या मुलांबरोबर हेमंत नावाचा एक नवख्या मुलगा होता. त्यावेळी तो पाण्यात बुडत होता हे दृश्य सुरेशने पाहिलेले. तेव्हा तो घाबरलेला आणि पळत घरी आलेला ती गोष्ट त्याने कुणालाच सांगितली नव्हती. आणि नंतर ती गोष्ट तो विसरलाही होता.


आणि खरं म्हणजे हेमंत गटांगळ्या खात होता तेव्हा त्याला मोठ्या मुलांनी वाचवला होता. त्याला पाण्यातून आणताना त्याने पाहिलेले. नंतर त्याच्या पोटातले पाणी काढून त्याला वाचवलेले त्याला माहीत नव्हते. नंतर तो लगेच तालुक्याला शिकायला गेलेला आणि त्याने परत काही पोहण्याचे नाव काढले नव्हते.  


काल जेव्हा पोहण्याची गोष्ट निघाली तेव्हा त्याला ती गोष्ट आठवली. तेव्हाही अशीच सांज आणि अंधार होता. त्या वेळेच्या स्थितीत तो गेल्याने तो प्रसंग त्याला प्रत्यक्ष घडल्यासारखे वाटले. आणि त्यामुळे त्याची स्थिती तशी झाली होती.


डॉक्टरनी त्याला काही न झाल्याचे सांगितले. बालपणात घडलेल्या गोष्टीचा आघात आपल्या मनावर झालेला असतो. कालांतराने आपण तो विसरलेलो असतो पण पुन्हा कधी दैवयोगाने त्याच ठिकाणी किंवा तसा प्रसंग नजरेत आला तर आपण भूतकाळात विचार करू लागतो व ती भीती तशी पुन्हा उभारून येऊ शकते. सर्वांनाच तसे होत नाही पण, भावूक लोकांना त्रास होऊ शकतो तसा त्रास सुरेशला झाला होता. त्या वातावरणातून सुरेश आता बाहेर आला होता.


एक मोठे संकट टळले म्हणून सगळ्यांना हायसे झाले. 

काही दिवसांनी सुरेश आणि शैला अमेरिकेला रवानी झाली आणि सुखाने संसार करू लागली.

              

समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama