Shilpa Desai

Inspirational Children

3  

Shilpa Desai

Inspirational Children

भाग्य यशोदेचे भाळी

भाग्य यशोदेचे भाळी

8 mins
278


गरमागरम वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन सुनीता खिडकीत जाऊन बसली. फ्रेश मूडमध्ये तिने खिडकीतून बाहेर डोकावले. समोरच्या रोडचे काम चालले होते. कामगारांची मुले रोडच्या बाजूलाच खेळत होती. काही मळके कपडे घातलेली, तर काही उघडी नागडीच होती. साधारणत आठ-दहा महिन्याचे एक शेंबडे पोर मातीत बसून रडत होतं. रात्री पोटाची खळगी भरायला पाहिजे म्हणून त्याची आई घमेले डोक्यावर घेऊन खडी वाहत होती. त्या रडत असलेल्या पोराकडे बघून सुनिताची मनात चलबिचल चालली होती. तिच्या मनात येत होते की त्या पोेराच्या आईला आपल्या मुलाचा कळवळा येत असेल का. काय वाटत असेल यावेळी तिला त्याच्याबद्दल. मनात सारखे उगाचच पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार येत होते. खिन्न होऊन सुनिता तशीच बसून ते दृश्य पाहत राहिली. आणि तिला आठवलं आपण तासाभरापूर्वी टीव्ही ऑन करून ठेवला आहे.आपल्याला सहा वाजताचा 'यशोगाथा' हा कार्यक्रम सेकंदभर ही न चुकवता पाहायचा आहे तिने टक टक करणाऱ्या घड्याळाकडे पाहत मनात म्हटलं अजून सहा मिनिटे अवकाश आहे. अजूनही तिच्या मनात त्या कामगारांच्या मुलाविषयी कणव वाटत होती. बीचारं पोर रडायचं थांबल असेल का पुन्हा त्याच खिडकीत जाऊन ती पाहू लागली आईच्या मांडीवर बसलेलं ते बाळ पदरात लपून मस्तपैकी आपल्या आईच्या स्तनाला बिलगलं होत. मध्येच आईकडे बघून खुदुखुदु हसत होतं. सुनीताला मनोमन खूप समाधान वाटलं जणु काही तीचच बाळ असावं असं.


'कलेक्टर नारायणी' या शब्दाने ती भानावर आली. 'ओ गॉड, म्हणजे कार्यक्रम चालु झाला वाटतं .' स्वतःशीच बोलत ती सोफ्यावर जाऊन बसली. डोळ्याची पापणी न मिटवता ती टीव्ही च्या दिशेने पाहू लागली. तिच्या स्वप्नातला क्षण ती अनुभवत होती.

"नारायणी तुम्ही अत्यंत वेगळ्या आणि कठीण परिस्थितीतून या यशापर्यंत पोहोचलात तर या यशाचे श्रेय कोणाला देऊ इच्छिता "

नारायणीने शांतपणे मृदू आवाजात निर्विकारपणे उत्तर दिलं-" माझा परमेश्वर, माझी सर्वस्व, माझी जीवनदात्री, सर्वेसर्वा फक्त आणि फक्त जिच्यामुळेच मी आज जिवंत आहे आणि इथवर पोहोचले आहे अशा एकमेव व्यक्तीला, म्हणजेच माझ्या आईला याचं सगळं श्रेय जातं."

सुनिताच्या डोळ्यातून आता गंगा जमुना वाहत होत्या. आनंदाश्रूना तिने पुरेपूर वाट करून दिली. खऱ्या अर्थाने ती सुखावली. एकटक नजरेने कार्यक्रम पाहत असणाऱ्या सुनीताने शांतपणे डोळे मिटून घेतले आणि आपला भूतकाळ डोळ्यासमोर पाहू लागली.


कॉलेजमध्ये असताना विराज व सुनीता प्रेमात पडले. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण विराजच्या घरच्यांना हे मान्य नव्हते. शेवटी दोघांनीही पळून जाऊन लग्न केले. काही दिवस भाड्याच्या खोलीत राहून दोघांनी संसार केला. कालांतराने विराजच्या आई बाबांचा राग कमी झाला कारण त्यांनाही विराज हा एकुलता एकच मुलगा होता. त्यामुळे त्याला व सुनेला त्यांनी घरी बोलावले विराज लष्करात लेफ्टनंट असल्याकारणाने वर्षातून एकाच दुसऱ्या वेळा घरी यायचा. पण विराज सैन्यदलात असल्याचा सुनीताला खूप अभिमान होता. लग्नानंतर विराजच्या आई सुनितावर खूपच नाराज होत्या. त्या तिला सतत घालून पाडून बोलत. तरीपण सुनीता नेहमीच घरची सगळी काम करायची. याशिवाय सासू-सासऱ्यांची सेवा ही करायची. त्यामुळे सासूबाईंना आराम मिळत होता. लग्नाला वर्ष होतं न होत तोच सासू सासरे नातवंडा विषयी बोलू लागले. तिलाही आता बाळाची ओढ वाटू लागली. तसही सुनीताला लहान मुलं भारी आवडायची. विराज यावेळेस आला तेव्हा तिने तसे त्याला बोलूनही दाखवलं. विराज चांगला महिनाभर राहिला होता. यावेळेस सासू-सासर्‍यांना तिच्याकडून काही गुड न्यूज मिळाली नाही. अशीच वर्षामागून वर्षे जात होती. लग्नाला अकरा वर्षे झाली सुनीताने सगळे प्रयत्न केले. पण बाळाची चाहूल लागेना. या कारणामुळे सासू-सासरे तिला सतत मानसिक त्रास करायचे. पण ती बिचारी विराजच्या प्रेमाखातर सगळं काही निमूटपणे सहन करायची. आपलं दुःख हलकं करण्यासाठी आदिवासी आणि डोंगराळ भागात शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण द्यायचं काम करायला लागली. त्यासाठी ती स्वतः काही अंतरापर्यंत बसने व पुढे बसची सोय नसल्याने पायी चालत जाऊन गरजू मुलांना शिकवत असे. त्याचा तिने जणू ध्यासच घेतला होता. विराजही तिच्या कामाला प्रोत्साहन द्यायचा. सासूसासराच्या संघर्षाला तोंड देत ती हे काम करत होती.


आज सुनिता शाळेतून घराकडे चालली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने उकाड्याने जीव हैराण झाला होता. उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. 'आता हा उतार पार केला की लगेच बस थांबा मिळेल तेथे बस पकडली मग वीस मिनिटात आपण घरी पोहोचणार.' तिने मनात बेत आखला. उताराला बरीचशी झाडे होती आणि त्यापुढे उन्हाळ्यातही न आटणारा ओहळ होता. उन्हामुळे थकलेली ती विसावा घ्यावा म्हणून एका झाडाखाली दगडावर जाऊन बसली. तोच तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज सुनीताला आला. उत्सुकतेने ती आजूबाजूला पाहू लागली. एकदम तिला मनात धस्स झालं ओहोळाच्या कडेलाच एका टोपलीत बाळ रडत होतं. धावतच त्या बाळा जवळ गेली आता आताच जन्मलेल एक निरागस लोभस बाळ रडून-रडून दमल होतं. वर्ण सावळा असला तरी चेहरा आखीव रेखीव होता. दिसायला सुंदर असलेले ते बाळ अंगाने जेमतेम भरल होतं. डोळे इतके बोलके हृदयस्पर्शी होते की एखाद्याच्या काळजाला भिडतील.


सुनिताला राहावलं नाही."कोणी ठेवलय बाळाला. कोणी आहे का जवळ.. हे बाळ कोणी ठेवलं....... कोणी आहे का इथे....." ती मोठमोठ्याने ओरडून विचारत होती. पण आजुबाजूला दूरवर कोणीच नव्हते. मग तिने त्या बाळाला अलगद उचलले आपल्या छाती पाशी घट्ट धरलं आणि काय आश्चर्य बाळ रडायचं थांबलं. आपल्या पदराने सुनीताने त्या बाळाचे तोंड पुसलं. टोपलीत असलेल्या दुपट्यात त्या बाळाला गुंडाळून ती चालू लागली. कोणी या निरागस जिवाला असं दूर लोटलं, काय चुक आहे या बाळाची. निदान त्याची आई कोणी असेल ती; अशी कशी वागू शकते, असं कसा आपल्या काळजाचा तुकडा वेगळा करू शकते. भयंकर आहे हे. सुनीताच्या मनात विचारांचे थैमान चालू झाले. "मॅडम कोणाचं लेकरू घेऊन चाललासा." गावातल्या धोंडिबाने प्रश्न केला तशी ती भानावर आली. त्याच्या प्रश्नाने ती फारच गोंधळून गेली. ते बाळ मात्र सुनीताच्या खांद्यावर मायेच्या उबेने झोपी गेलं होतं. समोरून बस आली आणि धोंडीबाचा प्रश्न हवेत विरून गेला. सुनिता लगबगीने बस मध्ये चढली.


"बाई बाई बाई--- काय म्हणावं या वांझोटीला? आपल्याला पोर होत नाही त्याचं काहीच नाही. कोणाच तरी पाप घरात घेऊन आली. अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. जिथून कुठून हे कोणाचं कार्ट उचलून आणलं तिथे नेऊन ठेव पहिल्यांदा. आणि मग तू घरात ये." सासुबाई आकांडतांडव करत म्हणाल्या. सासूच्या बोलण्याकडे लक्ष न देता सुनीता आपल्या रूममध्ये बाळाला घेऊन गेली बाळाला भूक लागली होती एका वाटीत थोडे दूध घेऊन ती चमच्याने अलगत बाळाला दूध पाजू लागली. बाळ ही विलक्षण टपोऱ्या डोळ्याने तिच्याकडे पाहत होत; जणूकाही त्या बाळाला आईच मिळाली होती. मग हळूच ती त्या बाळाच्या कानात कुजबुजली. 'नारायणी ' बाळही आता हसायला लागलं. "आवडले की तुला नाव तू माझी नारायणी आणि मी तुझी मम्मा" बराच वेळ ती त्या बाळाबरोबर खेळत राहिली.


आज पहाटेपासूनच नारायणी खूप रडत होती. काही त्रास होत असेल, पोटात दुखत असेल म्हणून हिंगाचे पाणी पोटाला लावले. गरम पाण्यात किंचित ओवा टाकून ते पाणी पाजले. हर एक प्रयत्न करूनही ती रडत होती. काही वेळाने अचानक ती रडायची थांबली आणि झोपी गेली. सुनीता ही मग निश्चिंत झाली. बेडवर बसल्याबसल्या तिने डोळे मिटून घेतले. आणि आपल्या विचारांच्या तंद्रीतच गुंतून गेली.


कितीतरी वेळ फोनची रिंग वाजत होती. सासुबाई फोन उचलतील असे तिला वाटले. पण सासुबाई फोन घेईनात. शेवटी ती उठून आली रिसीव्हर कानाला लावला..

हॅलो.. म्हणायच्या आतच पलीकडून आवाज आला 'विराज शिंदे ची फॅमिली का आपण'.

एस मी सुनीता शिंदे बोलतेय'

'मॅडम तुमच्या घरी आणखीन कोणी मोठा माणूस आहे का.


'हो आहेत; पण तुम्ही मला काय ते सांगू शकता'

मॅडम मी शिंदेचा सह्कारी, मी काय सांगतोय ते तुम्ही खंबीर होऊन ऐका 'विराज शिंदे नो मोर'

'काय?'

'शस्त्र उल्लंघन करणाऱ्या शत्रूला प्रत्युत्तर करता करता ते शहीद झाले.' हातातला रिसीव्हर खाली कधी पडला ते तिला समजलं नाही. भिंतीला धरत तिने स्वतःला सावरले. फोनच्या आवाजाने सासरे जागे झाले.

"काय झालं सकाळी सकाळी कडमडायला", पडलेला रिसिवर उचलत ते बोलले. त्यांनी पुन्हा रिसीव्हर कानाला लावला फोन अजून चालूच होता.

'विराज.....' ती धाय मोकलून रडू लागली.

त्याच्या आवाजाने सासुबाई धावत आल्या. विराज आपल्याला सोडून गेला हे कळतात त्यां मोठ मोठ्याने रडू लागल्या. विराज गेला याचा सगळा दोष त्या सुनीताला देऊ लागल्या. रडण्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा होऊ लागले. दुःख झालं त्यापेक्षा त्या सुनिता मुळे सगळं झालं हेच बोलून दाखवत होत्या.


"ती कोणाची काळ तोंडी पांढऱ्या पायाची पोर घरात आणल्यामुळे अपशकुन झाला. सकाळपासून त्या काळातोंडीने रडारड लावली होती त्यामुळे असं झालं. त्या पोरीला आधी बाहेर काढा. वाईट शक्तीची पोरं आहे ती." सांत्वन करायला आलेल्या माणसांना सासूबाई सांगत होत्या.


सुनिता निःशब्द झाली होती. विराज तिचा सर्वस्व होता तो तिला सोडून गेला याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. परवा परवा तर बोलणं झालं होतं फोनवर. बाळाचं नाव नारायणी ठेवले हे त्याला खूप खूप आवडलं होतं. नारायणीला बघण्यासाठी तो खूप उत्सुक होता. लवकरच येईन असं म्हणाला होता. मग असा कसा अचानक सोडून जाऊ शकतो आम्हाला. तु मला भेटायचं वचन दिले आहेस ना विराज मग आम्हाला सोडून कधी जाऊ शकत नाही. नारायणी बरोबर तुला खूप मजा मस्ती करायची आहे". ती मनाशी बोलत राहिली विराज चे शब्द तिच्या कानात गुंजन करत होते.


विराज तिला सोडून गेला त्याला आता दोन महिने होत आले होते. पण असा एकही क्षण नव्हता की ती त्याला विसरू शकेल. सासू आता तिचा खूपच राग करू लागल्या. तिला घालून पाडून बोलायच्या. नारायणी ला तर शिव्याशापच द्यायच्या. त्या बिचाऱ्या चिमुकल्या जीवाला यातलं काहीच कळायचं नाही. दिवसेंदिवस त्यांचा सुनिता विषयीचा राग इतका विकोपाला गेला की एक दिवस सासूसासर्‍यांनी तिला घराबाहेर काढलं. सुनिता सासऱ्यांच्या हाता पाया पडू लागली, त्यांची विनवणी करू लागली. पण काहीच उपयोग झाला नाही. नेसत्या वस्त्रानिशी नारायणी ला घेऊन ती घराबाहेर पडली.

आता तिला प्रश्न पडला की जायचं कुठे. आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला. आज्जीकडे म्हणजेच आईच्या आईकडे. आजी एकटीच रहायची. म्हातारी असली तरी खमकी होती ह. नव्वदीला टेकलेली ती स्वतःचं काम स्वतः करायची .आजीकडे राहिल्यामुळे तिला चांगली उसंतही मिळायची. आता एकच ध्येय होतं काही झालं तरी मुलीला मोठ करायचं. चांगलं शिक्षण द्यायचं. इतक मोठं करायचं की तिचं नाव सगळेजण आदराने घेतील. 


तिने खाजगी शाळेत क्लर्कची नोकरी पत्करली. हे करत असताना ती सुट्टीच्या दिवशी आदिवासी भागात जाऊन मुलांना शिक्षण देण्याचं कामही करत होती. तेही अगदी मोफत. दिवसामागून दिवस चालले होते चंद्राच्या कलेप्रमाणे नारायणी हळूहळू मोठी होऊ लागली. आईची तळमळ आणि ती करत असलेली मेहनत ती आपल्या डोळ्याने बघत असे. आपल्यासाठी आईने घरदार सोडलं याची तिला पुरेपूर जाणीव होती. सुनिता सतत कष्टाशी हात मिळवणी करत राहिली. समाजासाठी काम करत असताना नारायणीला देखील उत्तम प्रकारे घडवत राहिली. नारायणीला आईचा फार अभिमान होता. आईच्या कष्टाची जाणीव असल्यामुळे ती मन लावून अभ्यास करायची. परिश्रमाशिवाय फळ नाही हे ती आपल्या माऊली कडून शिकली होती. तिच्या पोटी जन्म घेतला नसेल पण तिच्या मनात, हृदयात, तिच्या डोळ्यात, तिच्या संपूर्ण शरीरात आई होती. यशाची चढण चढत असताना तिच्या प्रत्येक पायरीवर आईची साथ होती. म्हणून ती आज कलेक्टर झाली.


सुनीताने टीव्ही ऑफ केला. हॉलमध्ये लावलेल्या विराजच्या फोटो जवळ गेली. त्याला नमस्कार करून फोटोकडे पाहत राहिली. एक क्षण विराज आपल्याकडे बघून कौतुकाने स्मित हास्य करतोय असं वाटलं. "मला पहिली मुलगी हवी अगदी तुझ्यासारखी प्रेमळ आणि खूप हुशार आणि हो तिच्या पण हनुवटीवर काळा तीळ हवा." विराजचे हनिमूनच्या वेळचे बोलणे तिला आठवले आणि त्यावेळीचे लाजणे आज ती पुन्हा एकदा लाजली.

"बघ ना विराज तू म्हणत होतास ना तसाच तीळ नारायणी च्या हनुवटीवर पण आहे, हा योगायोग म्हणावा की आणखी काही असो.. विराज खरं सांगू मी देवकी नाही झाले पण यशोदेचे भाग्य लाभले मला. आज आपली नारायणी मोठी झाली. आशीर्वाद दे तिला."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational