बदललेली मानसिकता
बदललेली मानसिकता


रोज येते संध्याकाळ
तीन प्रहरांचा जणू मेळ
वाट पाहणे आप्तांची
हाची माझा नित्य खेळ
सकाळ दुपार संध्याकाळ रोजचेच हे तिन्ही त्रिकाळ.. आणि स्त्रीच्या आयुष्यातील न चुकणारे प्रत्येकाचे वाट पाहणे.. आता मात्र मुलाच्या लग्नाची वाट पाहणे सुरु आहे..
रोजच्यासारखी नियमाने येणारी आजची संध्याकाळ.. मी किचनमधे संध्याकाळची कामे चहा आल्यावर लागणारा नाष्टा हीच कामे करीत होते आणि दरावरची बेल वाजली म्हणून हातातील काम बाजूला ठेवून दार उघडले तर समोर आमचे चिरंजीव.. टणटण करीत घरात शिरले.. बॅग सोफ्यावर फेकली शुज आणि सॉक्स काढत बडबड सुरु केली..
मी म्हटलं, अरे अरे जरा शांत हो काय झाले ते तर सांगशील..
चिन्मय - काहीही झालेलं नाहीये मला काहीही बोलायचं नाहीये.. जरा चहा मिळाला तर बरं होईल मातोश्री मिळेल का?
हं देते पण तू आधी शांत हो आणि सांग काय झालं ते म्हणजे तुलाही जरा हलकं वाटेल..
आई चहा आणून देते आणि त्याच्या समोर बसते.. घे चहा घे आधी आणि मग बोल.. हं बोल आता झालास का थोडातरी शांत.. काय झालं तरी काय इतक?
चिन्मय - तुझंच ना गं आई लग्न कर लग्न कर.. मी तर नाहीच म्हणत होतो.. काय अर्थ आहे या लग्न करण्यात.. ते सांगू शकशील का गं जरा तू तरी.. तुम्ही काय केलंत गं लग्न करुन.. मुलांना जन्म देणे आणि स्वत:चे मन मारुन या संसार नावाच्या गाड्याला जुंपून घेणे.. बोल ना.. आहेस का तू सुखी?? पण फक्त तू मागे लागलीस म्हणून मी त्या मुलीला भेटायला गेलो होतो बरं का.. पण तीही तुझ्यासारखीच संसार संसार आणि मुलं याच्यातच आनंद वाटत असणारी. तेच रहाटगाडगं चालवायचंय म्हणे तिला..
आई - हं हे बघ चिन्मय अरे ही जगरहाटी आहे बाळा... अनादी काळापासून सुरु आहे ही विवाह संस्कृती..
हो गं पण मग अनेक वर्षापासून किती जण सुखी झाले यामुळे? मुलीला नवऱ्याच्या बंधनात अडकून राहावे लागते आणि मुलाला आई आणि बायको या दोघींच्या कात्रीत.. आणि मग काय तर तुमच्या निसर्ग नियमाने म्हणे मुलं होतात.. म वाढवा त्यांना कसेतरी ओढाताण करुन.. हवेच कशाला पण हे सर्व.. एक तर आपली परवड आणि अजून त्यासोबत त्या मुलांची परवड.. आपण आत्ता आहोत ते काही दुखा:त आहोत का? रहातोय ना मस्त आनंदात सुखात.. हो आणि त्यात ती मुले जन्माला घालणे म्हणजे आधीच असलेल्या भरमसाठ लोकसंख्येत भरघोस वाढ करणे.. वा लै भारी.. आधीच आम्हीच काशीतरी कसरत करीत ऑफिसला जातोय.. त्या बॉसच्या शिव्या खातोय.. महागाईचा भस्मासुर आ वासून उभाच आहे.. त्याला आम्हीच कसेतरी तोंड देतोय तेच आमच्या मुलांनीही करायचे का?हेच ते प्रेम आणि ममता का आपली मुलांवरची.. छान हो ती लखलाभ असो तुम्हालाच.. मला अजिबात लग्न वगैरे करायचे नाहीये.. यापुढे आपल्यात हा विषय बंद बरं का .. मला तुलाही दु:खी करायचं नाहीये गं आई.. पण थोडा विचार कर ना.. तुझ्या नातवंडांचे भवितव्य हे असे असलेले चालणार आहे का तुला तरी..
चिन्मय चहा पिऊन त्याच्या रुममधे गेला.. पण मी मात्र होते तिथेच स्तब्ध होऊन विचार करु लागले.. की त्याचे म्हणणे खरंच विचार करण्यासारखे आहे ज्याचा जगरहाटीच्या नावाखाली विचारच करु शकलो नाही.. आज माझ्या डोळ्यात माझ्या मुलाने एका नवीन समाज प्रबोधनाचे अंजन घातले आहे.. जे विचार करुन अंमलात आणणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाहीये.. आता या अंजनाने डोळ्यात पाणी आणायचे की ते समाजात पसरवायचे ते मात्र माझ्यावर आहे..