माहेरची आठवण
माहेरची आठवण


महिला सहकारी उद्योग मंदिर आणि दि आदर्श सहकारी ग्राहक संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा भव्यदिव्य कार्यक्रम .. महिला सहकारी उद्योग मंदिरच्या अध्यक्षा आणि माझ्या सखी सौ मेधा आधारकर ह्यांनी मला ह्या कार्यक्रमाची पोस्ट १९ डिसेंबर रोजी वॉट्स ॲप वर पाठवली होती .. कार्यक्रम २१ जानेवारीला असल्यामुळे मी सांगते नंतर नक्की इतकाच मेसेज केला त्यांना .. आणि माझे इतरही बरेच काही सुरु असते त्यामुळे मी संपूर्ण ब्लॅंक झालेले .. कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक होती .. कल्याण महिला मंडळाची मी एक जुनी सदस्य आहे .. आणि महिला सहकारी उद्योग मंदिर आणि कल्याण महिला मंडळ ह्या दोन्ही संस्था म्हणजे दोघी भगिनीच जणु .. दर शुक्रवारी मी कल्याण महिला मंडळात जात असते तशीच १७ तारखेच्या शुक्रवारीही गेले आणि तिथे २१ तारखेच्या कार्यक्रमाची लगबग दिसून आली .. आणि मग मात्र एकाही क्षणाचा विलंब न करता माझी मैत्रिण अनुजा पिंपळखरे हिच्याकडे मी माझी नावनोंदणी करुन टाकली ..
माहेरची आठवण ह्या विषयासाठी सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .. विषय होते .. १) लग्नानंतरचे पहिले माघारपण २) पहिली मंगळागौर माहेरची ३) पहिला दिवाळसण माहेरचा ४) पहिला संक्रांतसण माहेरचा ५) डोहाळेजेवण सोहळा माहेरचा ६) बाळंतपण माहेरचे मी खरतर ह्यावर काहीही विचार केलेला नव्हता आणि अनुजाने मला विचारलेले तु काही सादरीकरण करणार आहेस का ? मी तिला म्हटलेल नाही ग बाई माझी काहीच तयारी नाही .. आणि सोमवारी अचानक असे वाटले आपण काहीतरी करावे .. आणि अक्षरशः रात्री १० वाजता मी .. *पहिली मंगळागौर माहेरची* वर स्क्रिप्ट लिहुन काढले .. त्यावर फक्त २/४ दाच नजर टाकलेली .. आणि अखेर मंगळवार २१ जानेवारी कार्यक्रमाचा दिवस उजाडला .. मी साधारण ९ वाजता बदलापूरहुन निघाले .. बरोबर १० . ३० वाजता महिला सहाकारी उद्योग मंदिर च्या हॉलवर पोहोचले .. माझी मैत्रिण लता मला खालीच भेटली .. आणि आम्ही दोघीही मजला चढुन वर गेलो .. एक दैदिप्यमान अनुभव माहेरी आल्याचा माहेरच्यांच्या प्रेमाचा .. इथे येणाऱ्या प्रत्येक माहेरवाशिणीला औक्षण करुन फुल उधळून आत घेण्यात आले .. आत गेल्यावर चाफ्याचे फुल वही पेन आणि अत्तराचा सुगंध .. ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यांना नंबर दिले गेले .. आणि स्पर्धेत भाग घेतलेल्यांना पहिल्या दोन रांगांमधे बसण्याची व्यवस्था केलेली .. मन आनंदाने बहरुन जात होते एक एक पाऊल टाकतांना .. प्रत्येक क्षणात माहेरचा आभास .. अनुजाने आलेल्या मान्यवरांचे आणि सर्व माहेरवाशिणींचे सन्मानपुर्वक स्वागत केले .. आणि माहेरची आठवण कार्यक्रमाला सुरुवात झालेली .. प्रत्येकीचे सादरीकरण निराळे वैशिष्ट्यपुर्ण .. माहेरच्या आठवणीत गुंतवून टाकणारे .. मी देखील मला जमले तसे सादरीकरण केले .. फार काही नव्हते पण झटकन जे सुचलेले ते केलेले .. प्रत्येक माहेरवाशिणीला सादरीकरण करुन व्यासपीठावरुन खाली उतरतांना दिलेली माहेरची प्रेमाची भेट ..
आज बाकी काहीही दिसत नव्हत सुचतही नव्हत .. किती किती डुंबावे ह्या माहेरपय सागरात हेही कळत नव्हते .. ह्यानंतर ठीक १२ . ४५ ला झालेली भोजनाची सुट्टी माहेरी मिळालेले आयते सुग्रास जेवण आणि माहेरवाशिणींना आवर्जून काय हवे नको विचारणाऱ्या आमच्याच काकू मावशी .. जेवणापेक्षा ह्या प्रेमानेच पोट भरुन गेलेले .. आणि ह्या तृप्ततेचा ढेकर दिल्यानंतर सुरु झाले कार्यक्रमाचे दुसरे पर्व .. ह्यातही २/३ स्पर्धा म्हणजे माहेरचे खेळ घेण्यात आले .. जवळजवळ सर्वच सखींना बक्षिसे / नाही नाही माहेरची प्रेमाची भेट देण्यात आली .. आणि आता निकाल सादरीकरण स्पर्धेचा .. परिक्षक होत्या डॉ . लीनाताई काटकर / प्रीती बोरकर मॅडम आणि सबनिस ताई .. मलाही उत्तेजनार्थ मधे काढलेले एकच बक्षीस मिळाले .. जणूकाही ते माझ्यासाठीच असलेले .. त्यातच एका ७० वर्षीय सखीने लावणी नृत्य सादर केले .. माझ्या सर्व सखींनी नृत्यासाठी मलाही आग्रह केला .. आणि मग काय .. फड सांभाळ तुर्याला ग आला .. वर भन्नाट नाच रंगला .. कुठली कुठली म्हणून आस बाकी नाही राहिली ह्या माहेरपणात .. आणि आता समोर आला सांगता समारंभ .. मन आणि डोळे दोन्हीही भरुन आलेले .. पण स्वताला सावरले .. कारण माहेरची माणस लेकीच्या डोळ्यात अश्रू नाही ना पाहू शकत .. त्यासाठी तर हा सर्व कार्यक्रमाचा खटाटोप केलेला .. लेकींना आनंद देण्याचा .. म आपण त्यांच्यासमोर अश्रू काढणे म्हणजे त्यांना दुखावणे .. निघतांना प्रत्येक माहेरवाशिणीची ओटी भरण्यात आली आणि पाठवणी केली गेली .. १५ वर्षानंतर मी अनुभवलेले कधीही विसरता न येणारे हे सहयोगी माघारपण .. लिहितांना मात्र डोळे घळघळा वहात आहेत .. पण मी मात्र पुन्हापुन्हा ह्या माहेरी येणार आहे बर का ? हक्काने .. सर्व कार्यकारिणींचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता .. असे हे कधीही न विसरता येणारे निराळे माहेरपण .. माहेरची आठवण करुन देणारे...