Anuja Dhariya-Sheth

Classics

4.5  

Anuja Dhariya-Sheth

Classics

बाळाची पहिली अंघोळ

बाळाची पहिली अंघोळ

5 mins
537


दोन महिन्यांनी सासूबाई गावाहून आल्या होत्या.. बाळ झाल्या पासून मनाली सुरुवातीचे दोन महिने माहेरी, दोन महिने सासरी राहिली.. चार महिने झाले आणि ती बाळाला घेऊन पुण्यात आली.. दोघेच घरात आणि आता बाळ.. मंदार सकाळी जायचा..तो रात्री ८ वाजता यायचा.. तोपर्यंत बाळ आणि मनाली दोघेच घरी.. सातव्या महीन्यात जी गेली ती आता बाळ झाल्यावर आली.. आईकडे होती.. बाळाचा जन्म झाल्यावर त्याची पहिली अंघोळ तर दवाखान्यात त्या नर्सने घालून आणली.. सिझर झाल्यामुळे थकवा.. त्यामुळे ह्या गोष्टी काही तिला पाहता आल्या नाहीत.. घरी आल्यावर मात्र सुईण मावशी आली, त्याला माॅलीश केले.. तेव्हा तिने त्याची पहिली अंघोळ अगदी एन्जॉय केली.. सुरवातीचे काही दिवस बाळाच सारं समजून घेण्यात गेले...

बारसं करून ती सासरी आली.. तिकडे सुद्धा सासूबाई होत्या त्यामुळे तिला जास्त काही जाणवले नाही.. बाळ चार महिन्याचे झाल्यावर मात्र मंदारने घरात विषय काढला आणि तिला घेऊन इकडे आला.. सर्व व्यवस्थित होईपर्यंत सासूबाई आल्या होत्या.. बाळाची अंघोळ सासूबाईंच्या देखरेखीखाली ती घालत होती.. सासूबाई १० दिवसांनी जायला निघाल्या, मनालीला सर्व समजावून सुचना देत होत्या.. खर तर तिच्या मनात सुद्धा खूप भीती होती कसे जमेल काय होईल? त्या गेल्यावर पहिले दोन दिवस मंदार होता, त्याच्या साथीने तिने बाळाला अंघोळ घातली..


आज तीने एकटीने अंघोळ घालायची हि पहिलीच वेळ.. नक्ष तसा मस्ती करायचा.. तिने त्याला घाबरत घाबरत माॅलीश केले.. तेव्हा त्याने खूप छान साथ दिली तिला.. म्हणुन अंघोळ सुद्धा पायावर घेऊन घालु शकू असे वाटले तिला.. सासूबाईंनी जाताना छोटा टब आणून दिला आणि म्हणाल्या ह्यात बसव आणि अंघोळ घाल.. तसा तो आता ५ महिन्यांचा झाला होता. पण, मनालीला आत्मविश्वास होता की मी पायावर घेऊन त्याला अंघोळ घालु शकेन.. अन् तिचा हाच आत्मविश्वास घातक ठरला.. नक्षने जोरात पाय मारला अन् तिच्या हातांत असलेला पाण्याचा तांब्या जोरात उडाला, नक्षच्या नाका-तोंडात पाणी गेले त्याला लागले.. तिचा घाबरलेला आवाज ऐकून शेजारी रहात असलेली रूपाली धावत अाली, दवाखान्यात जाऊन घरी येईपर्यंत सर्व मदत केली..


मनालीने तिचे आभार मानले.. रोज मला अंघोळ घालताना मदत कराल का असे विचारले... रूपालीला खूप आनंद झाला.. पण लगेचच तीचा चेहरा पडला.. ते पाहून मनालीने विचारले, काय झालं ताई? अगं मला मूल नाही, वांझ म्हणून मला बाळाच्या जवळ सुद्धा कोणी उभे करत नाही आणि तू मला असे विचारले मला खूप बरे वाटले.. पण तुमच्या घरी चालेलं का? नाहीतर नको उगाच... मी अशा गोष्टी मानत नाही.. आणि तुम्ही माझ्या बाळासाठी धावून आलात मला मदत केलीत.. मी तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही येतं जा, नक्षसोबत खेळायला... मनाली


रुपालीला खूप आनंद झाला, जणू काही तिच्या आयुष्याच्या वैशाखवणव्यात नक्षच्या रूपाने हलकीशी पावसाची सर आली.. दोन महिने झाले सासूबाईंचा येणार म्हणून फोन आला.. रुपालीच्या मदतीने मनालीने घर सजवले, सामान आणले.. सासूबाई आल्या तेव्हा सुद्धा रुपाली तिथेच होती.. मनालीने तिची ओळख करून दिली, तिने केलेली मदत सांगितली.. सासूबाईंनी तिचे खूप आभार मानले, साक्षात देवच धावून आला बाई.. जिवतीचे रूपच तू माझ्या लेकरासाठी धावून आली जिवतीमाय... असे म्हणून त्यांनी रूपालीची आेटी भरून यथोचित आभार मानले.


दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई दूध, भाजी आणायला गेल्या तेव्हा त्याच सोसायटीमध्ये वरच्या मजल्यावर राहणार्या भावे आजी त्यांना भेटल्या.. त्यांनी रुपालीबद्दल सर्व काही सांगितले.. सासूबाई अगदी बेचैन झाल्या.. त्यांना काहीच सुचत नव्हते, ह्या भावे आजी नेहमीच रुपालीला कमी लेखत असत.. त्यांनी मनालीला सुद्धा सांगितलं पण तिने काही दाद दिली नाही म्हणून आज त्यांनी सासूबाईंना गाठले.. मनाली नक्षला घेऊन बाल्कनीत उभी होती, तिने हे सर्व बघितले आणि तिला खूप भीती वाटली कारण तिला अंदाज होताच की भावे आजी रुपाली बद्दल सांगत असतिल.. खर तर ती आज सांगणार होतीच.. पण त्या आधी भावे आजी यांनीं त्यांच्या स्वभावा प्रमाणे त्यांचे काम चोख बजावले.. मनात अनेक विचार येत असतानाच सासूबाईंनी दरवाजा उघडला आणि त्या आत आल्या...


मनाली, आपल्या नक्षला अंघोळ घालायला तू त्या बाईला का बोलावतेस? तिच्याजवळ आपल्या नक्षला तू का देतेस? मनालीच्या सासूबाई तिला खूप बोल लावत होत्या...

मनाली घाबरून गेली.. अहो आई, मी तुम्हाला सर्व सांगणार होते पण..

पण, काय..?? सासूबाई जोरात बोलल्या..

बाहेरून भावे आजी ऐकत होत्या.. अन् हे सासूबाईंना चांगलेच माहीत होते म्हणून मुद्दामून त्यांनी रागावण्याच नाटक केले होते.. बिचारी मनाली मात्र घाबरून गेली.. ती रडायला लागली त्यामुळे सासूबाईंना नाटक आवरते घ्यावे लागले..

त्या हसु दाबून ठेवत म्हणाल्या आग, तूला काय मी जुन्या विचारांची वाटले का?

हे ऐकल्यावर मनाली, बघतच बसली.. आणि आश्चर्यचकीत होऊन म्हणाली म्हणजे..

अगं, तिला मूल नाही यात तीचा काय दोष? अन् आपल्या नक्षसाठी तिने जे केलंय त्यावरून ती वाईट कशी असेल सांग मला.. उलट मला तूझं कौतुक वाटतंय की तू तिच्या जवळ आपल्या बाळाला खेळायला देतेस, तिला खूप मोठा आनंद देत आहेस तू.. मी असेच नाटक केले ग.. गम्मत.. पण तू रडायला लागलीस म्हणून मग् जास्त ताणले नाही..

आई... थँक्स.. असे म्हणतं मनालीने नमस्कार केला..


सासूबाईंनी भावे आजीना सुद्धा सांगितलं, असा कोणाच्या दुखर्या कोपर्यावर हात ठेवू नका.. फुंकर मारता आली नाही ना तर मीठ तरी चोळू नका...भावे आजी खजील झाल्या..

रुपाली समोरच्या फ्लॅट मध्ये होती त्यामुळे तिने सर्व ऐकले.. तिने बाहेर येऊन मनालीच्या सासूबाईंना मिठीच मारली.. जणू इतक्या वर्षाचा अश्रूंना घातलेला बांधच तुटला होता..

काकू, तुम्ही आणि मनाली खूप चांगल्या आहात, तुम्ही मला जे प्रेम, जी माया, जो आदर दिला ना तो मला कधीच कॊणी दिला नाही हो.. वांझोंटी म्हणून दुखावणारे कुठे, आणि जिवती मायची उपमा देऊन तुम्ही मला.. परत एकदा अश्रू अनावर झाले..

सासूबाई म्हणाल्या, पोरी.. माझा आशिर्वाद आहे तूला.. लवकरच तुझी कुस उजवेल बाळा...

काकू.. असे होऊ नाहीतर नाही पण आम्ही आता एक मुलगी दत्तक घ्यायची असे ठरवलंय.. रुपाली

छान बाळा, खूप चांगला निर्णय आहे.. तूझं सर्व चांगलच होईल बाळा... हो पण तू बाळ आणलस ना कि त्याला पहिली अंघोळ मी घालणार हो... सासूबाई

चालेल ना काकू.. नक्की.. चला येते मी.. रुपाली


रुपाली गेल्यावर दोघी सासू-सून मात्र एकमेकींकडे वेगळ्याच आदराने बघत होत्या... सासूला सूनेचे अन् सूनेला सासूचे कौतुक वाटत होते.. तेवढ्यात मंदारने त्यांना नक्षची पहिली अंघोळ याची आठवण करून दिली, आणी त्या हसु लागल्या कारण नक्षने पहिल्या अंघोळच्या वेळेस जोरदार पिचकारी सोडत शीSss केली होती.. त्याचे पोट बिघडले होते, जोरात हशा पिकला.. दोघी मैत्रिणी सारख्या टाळी देत हसल्या.. मंदारने मात्र देवाचे आभार मानले.. कारण त्यानेच तर त्याच्या आईला या सर्वाची कल्पना दिली होती, आणि राग यायच्या आधीच मस्का मारला की मी मनालीला सांगितलं माझी आई काही एवढ्या जुन्या विचारांची नाही.. त्याच हे एकच वाक्य जादू करून गेले अन् हे फक्त त्याचे एकट्याच गुपित होते..


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

©® अनुजा धारिया शेठ.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics