Sangita Tathod

Drama


3  

Sangita Tathod

Drama


बाहुली

बाहुली

3 mins 281 3 mins 281

तसे पाहिले तर सुजाताला लहानपणी, बाहुलीसोबत फारशी खेळल्याचे आठवत नाही. लगोरी, लंगडी, लपाछपी, चंफुल, डीग्गर असे खेळ तिलाआठवतात. पण या स्मरणशक्तीच्या आधीचे काय माहित? शालेय शिक्षणानंतर सुजाताने नर्सिंगचा कोर्स केला.


योग्य वयात सुजाताचे लग्न झाले. दोन मुले झालीत. घरची परिस्थिती तशी चांगली. घरी सासू, सासरे होते. संसाराला आर्थिक मदत म्हणून तिने एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब सुरु केला.


कामातील प्रामाणिकपणा आणि कौशल्ये यामुळे ती एकाच हॉस्पिटलमध्ये टिकून राहिली. सर्वात जुनी एम्प्लॉई म्हणून तिला मान होता. तिच्या नंतर किती स्टाफ आला आणि जॉब सोडून निघून गेला. तिच्या सोनाली मॅडम (डॉक्टर)च्या अंगी

असलेली शिस्त, कारारीपणा तिच्यात आली होती. म्हणतात ना, ढवळ्या संग पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण आला... अगदी तसेच.

     

सोनाली मॅडमचा विश्वास संपादन केल्यामुळे, सुजातावर बऱ्याच कामांची जबाबदारी आली होती. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इतर स्टाफच्या सुट्या मंजूर करणे, त्यांचे पगार करणे इतर समस्या सोडविणे. एक दिवस स्टाफमधील चार पाच महिला

वेगळीच समस्या घेऊन सुजाताजवळ आल्या.


"सुजाता मॅडम, आता शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार आहेत. आमच्या पोरींना एखादा महिना कामावर घेऊन येण्याची परमिशन द्या." एक महिला कर्मचारी बोलली.


"शाळांना उन्हाळ्याची सुटी, दरवर्षी असते. या वर्षीच असा काय प्रॉब्लेम झाला?" सुजाता.


"मी दरवर्षी माझ्या बबलीला मामाच्या घरी ठेवत होती, पण आता भावजयला गुण फुटले. ती नाही म्हणते."


प्रत्येकीने आपापल्या समस्या सांगितल्या. सोनाली मॅडमशी बोलून यावर तोडगा काढायचे ठरते. सोनाली मॅडमनी परमिशन दिली. बबली, सोनम, चैताली, नंदनी आणि गौरी रोज आईसोबत येऊ लागल्या. हॉस्पिटलच्या आवारात असणाऱ्या गार्डनला लागून असलेल्या खोलीत मुली खेळू लागल्या.


मुलींच्या जातीच एक बरं असतं. कोणत्याही परिस्थितीत त्या लवकर ऍडजस्ट होतात. पाच कन्यांची मैत्री होते. सुजाताचे काम त्याच बाजूला असते. येता जाता ती मुलींकडे लक्ष द्यायची.


मुली बहुलीच्या खेळात तासनतास रममाण होतात. हे सुजाताच्या लक्षात आले होते. पेशंट कमी असले की सुजाता मुलींच्या खेळाचे निरीक्षण करायची.


प्रत्येकीची बाहुली वेगळी. बबलीची बाहुली मोठी, सोनमची छोटी, पण गुबगुबीत. नंदनीच्या बाहुलीचे केस मोठे, चैतालीच्या बाहुलीचे डोळे निळे निळे आणि गौरीजवळ बाहुली नव्हती. तरीही ती सर्वांशी खेळायची.

         

घरून येताना मुली बाहुलीला सजवायला त्यांचे साहित्य घेऊन येत. छोट्याशा जरीच्या कापडाची साडी करत, डोक्यावर पदर देत. टिकली लावत. दुपारी बाहुल्या घेऊन डबापार्टी करत.

सुजाताला मुलींचे कौतुक वाटायचे. तिला आधी वाटले होते मुली आल्या तर त्यांच्या आईच्या कामात व्यत्यय येईल. पण तसे काही झाले नाही. सर्वच समवयस्क होत्या. एकमेकींत छान रमल्या.

एकदा सोनमच्या बहुलीला लावायला टिकली नसते. सुजाता पर्समधून काढून देते. कधी कधी ती बाहुलीच्या लग्नासाठी खाऊ आणते. गौरीच्या आग्रहास्तव मंगलाष्टके म्हणते. सुजाताला या पाच कन्यांचा लळा लागतो.


त्या दिवशी सुजाता ड्युटी संपवून घरी जाण्यास निघते. तिची नजर चैताली, गौरीवर पडते. ती जवळ जाते. बाकी तिघींच्या आईची ड्युटी संपल्याने निघून गेलेल्या असतात. या दोघींच्या आईला काम निघाल्याने घरी जाण्यास वेळ असतो. अंधार पडायला आलेला असल्याने दोघींच्या चेहऱ्यावर भीती दिसते.

चैताली हिंमत करून विचारते, "सुजाता मावशी आई येईपर्यंत आमच्याशी खेळशील का?" अंधार पडत असतो, म्हणून सुजाता हो म्हणते. चैताली लगेच बाहुली काढते.


असे म्हणतात की, मनातील सुप्त इच्छा पूर्ण करायला मिळाले की, मन तृप्त होऊन जाते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण तन, मन, धनाने प्रयत्न करतो. असेच काहीसे त्या दिवशी सुजाताच्या बाबतीत झाले असावे. बाहुलीसोबत खेळण्याची तिची सुप्त इच्छा आज पूर्ण होणार असेल.


ती मुलींसोबत लहान मुलगी होऊन मनसोक्त खेळते. तिच्याच ओढणीचा पाळणा करुन बाहुलीला झोपवत असते, तेवढ्यात आवाज येतो, "सुजाता मॅडम, काय करताय तुम्ही? पोरींपेक्षाही पोर झाल्या तुम्ही."


सुजाता भानावर येते. दोघी खो खो हसतात आणि मुलींना घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी दुपारी, सुजाता मुलींजवळ जाते. गौरीला जवळ बोलावते. पर्समधुन एक सुंदर बाहुली काढून गौरीला देते. वयाच्या पन्नाशीत गौरीसाठी मनापासून खरेदी केलेली, ही सुजाताची पहिली बाहुली असते.


Rate this content
Log in

More marathi story from Sangita Tathod

Similar marathi story from Drama