Nagesh S Shewalkar

Inspirational

3  

Nagesh S Shewalkar

Inspirational

अपघात... एक खेळ

अपघात... एक खेळ

5 mins
1.4K


     हरिनाम संकुलातील लहान मुले संकुलाच्या वाहनतळावर खेळत होती. रविवारची सुट्टी असल्यामुळे मुले आनंदाने जल्लोष करीत होती. त्या छोट्या संकुलात एकूण सहा कुटुंबं राहात होती. जोशी नावाचे पती-पत्नी सर्वात वयस्कर असल्यामुळे सारे त्यांना 'काका-काकू' याच नावाने संबोधत असत. काकाकाकूंना संकुलातील लहान मुलांचा अतिशय लळा होता. जणू ती त्यांची नातवंडे होती. राम, रहिम, मालिनी आणि समीर या मुलांचेही काकाकाकूंवर विशेष प्रेम होते. राम-रहिम ही जोडी चौथ्या वर्गात, मालिनी तिसऱ्या इयत्तेत शिकत होते तर तीन वर्षाचा, सर्वांचा लाडका, छोटा समीर नुकताच शाळेत जाऊ लागला होता. आठ दिवसांपूर्वीच मालिनीचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. संकुलाची एक प्रथा अशी होती की, संकुलातील सर्वांचे वाढदिवस सारे मिळून साजरे करत असत. त्याप्रमाणे मालिनीचा वाढदिवस अत्यंत धुमधडाक्यात साजरा तर झालाच सोबत सर्वांनी मिळून मालिनीचा एक छोटी कार भेट दिली. आठ - नऊ वर्षाच्या मुलाला सहज खेळता येईल अशी ती आकर्षक कार होती. त्या दिवशी ती कार घेऊन सारी मुले खेळत होती. विशेष म्हणजे, साऱ्या मुलांचे एकमेकांवर भावा-बहिणींप्रमाणे प्रेम होते. कुणी कुणाचीही खेळणी खेळत असे. लहान मुले एकमेकांना आपली वस्तू देत नाहीत, तसा दुजाभाव या मुलांजवळ नव्हता. शेजारच्या इमारतीमधील दोन - तीन मुले ही या मुलांसोबत खेळायला येत होती. त्या दिवशी खेळ रंगात आला होता. मालिनी कारमध्ये बसून कार इकडून तिकडे पळवत असताना इतर मुले कारच्या मागे धावताना आरडाओरडा करीत होती. अचानक रामने सर्वांना थांबविले आणि म्हणाला, 
"ऐका रे, आपण की नाही, एक गंमत करू या."
"गंमत? कोणती रे?"
"सांगतो, ऐका...." असे म्हणत रामने हळू आवाजात त्यांना काही तरी सांगितले. ते ऐकून मालिनी म्हणाली,
"नको रे बाबा. असे खोटे बोलू नये. कधीकधी खोटे बोललेले खरे होते म्हणे. माझ्या मिस सांगतात की, खोटे बोलणे पाप असते. "
" मालू, आपण गंमत करत आहोत, खोटे नाही बोलत. समुदादा, तू जोशीकाकांकडे जा आणि सांग की....."
असे म्हणत रामने समीरला हळूच काही तरी सांगितले. कोणतेही काम करायला एका पायावर तयार असणारा समीर लगेचच दुडूदुडू धावत पहिल्या मजल्यावरील जोशीकाकांकडे गेला. जोशीकाका बाहेर गेले होते आणि मुले खाली खेळत असल्याने संकुलातील बायकांची मैफल मस्तपैकी रंगली होती. तितक्यात तिथे धावत आलेला समीर स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, "का.. का.. काकू, ती.. ती आपली मालू पडलीय."
"पडली? कुठे? कशी?"
"तिच्या अंगावर की नाही, कार पडली. चला."म्हणत समीर पुन्हा खाली वाहनतळाकडे निघाला. त्याच्यापाठोपाठ सर्व बायकाही निघाल्या. घाबरलेल्या अवस्थेत साऱ्या बायका खाली पोहचल्या. तितक्यात जोशीकाकाही बाहेरून आले. तिथली परिस्थिती पाहून हसावे की रडावे अशी सर्वांची स्थिती झाली.
" का रे, काय झाले? " रामच्या आईने विचारले.
"माले, हा काय आगाऊपणा आहे?" मालिनीच्या आईने विचारताच कारखाली झोपलेली मालिनी जोरजोरात हसत बाहेर आली. इतर मुलेही हसू लागली. समीरचा आनंद तर गगनात मावत नव्हता. तोही गगनभेदी हास्य करीत दुडक्या चालीने टाळ्या वाजवत पळू लागला.
" काय झाले? काय धिंगाणा घालत आहात?" काकांनी विचारले. 
" काका, आम्ही की नाही, कार खेळत असताना राम म्हणाला की, आपण 'अपघात - अपघात' खेळू या." 
रहिम म्हणाला. तशी मालिनी म्हणाली, 
"हो काका. रामच म्हणाला. मी नको म्हणाले. खोटे बोलू नये असेही सांगितले. पण, तो ऐकलाच नाही. त्याने की नाही, मला इथे झोपवले. माझ्या पोटावर कार ठेवून 'अपघात झाला' असे सांगायला समूला वर पाठवले. "
" काका, सर्वांची गंमत करावी असे वाटले मला..." राम अपराधी स्वरात म्हणाला.
" बरे, झाले ते झाले. पुन्हा असे काही करू नका. नाहीतर मी फटके देईन. "जोशीकाका म्हणाले. 
" काका, ह्यांना आत्ता शिक्षा नाही केली ना तर ह्यांची हिंमत वाढेल आणि मग ते कुणाचेही ऐकणार नाहीत."
"ऐकतील. नक्कीच ऐकतील. लहान आहेत. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आहे. मुलांनो, आपापले कान धरून 'सॉरी' म्हणा. " काका म्हणाले आणि समीरसह सर्वांनीच कान धरले. मुलांची ती कृती पाहून लगेच बायकांचे डोळे भरून आले आणि एका मागोमाग एक साऱ्या मिळून वर गेल्या. तसे काका म्हणाले, 
" बसा बरे इथे. मागे मी तुम्हाला एका शेळ्या राखणाऱ्या मुलाची गोष्ट सांगितली होती. आठवते का? "
" हो काका.तो मुलगा की नाही, शेळ्या घेऊन रोज रानामध्ये जात असे. एकदा तो की नाही 'लांडगा आला रे...' असे जोरजोरात ओरडत होता. गावातली माणसे त्याला मदत करायला धावत गेली. तिथे जाऊन पाहतात तर तिथे लांडगा नव्हता आणि लोकांना फसवले म्हणून तो मुलगा मोठ्याने हसत होता.... " रहिम म्हणाला. 
" त्या मुलाने लोकांना असे चार - पाच वेळा फसविले. पण, एकदा खरोखरीचा लांडगा तिथे आला. त्याला पाहून तो मुलगा जोरजोराने ओरडून लोकांना बोलावू लागला. परंतु, मुलगा खोटारडा आहे. तो नेहमी प्रमाणे खोटे - खोटे ओरडतोय असा विचार करून कुणीही त्याच्या मदतीला धावून गेले नाही. त्या लांडग्याने साऱ्या शेळ्या मारून..... " राम सांगत असतानाच अचानक समीर म्हणाला,
" मग की नाही काका, त्या लांडगूने शेळ्या गपागप खाऊन टाकल्या या अशा.... "म्हणत समीरने गपागप खाण्याचा अभिनयही केला. ते पाहून काका म्हणाले,
" शाब्बास! मी सांगितलेली गोष्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे तर... परंतु, मुलांनो तुम्हीसुद्धा त्या मुलाप्रमाणे नेहमी गंमत करावी म्हणून खोटे बोलत राहिलात तर एखाद्यावेळी तुमच्यापैकी कुणी संकटात सापडले ना तर तुमच्याही मदतीला कुणी धावून येणार नाही...."
"काका, बरोबर आहे. सॉरी! " कान पकडून राम म्हणाला. त्याचे पाहून इतर मुलांनीही आपापले कान पकडले.
" ठीक आहे. पुन्हा असे करू नका. खेळा आता... "असे सांगून जोशीकाका वर आले. तिथे त्यांच्याकडे संकुलातील बायका बसल्या होत्या. काकांना पाहताच रहिमची आई म्हणाली,
" काका, तुम्ही होता म्हणून आज मुलं वाचली हो..."
"हो ना. आज मी रामला असा धडा शिकवणार होते ना...." रामाचआई रागाने बोलत असताना काका म्हणाले,
" हे बघा, तुमचा राग मी समजू शकतो. मुलांचे चुकले हे खरे आहे पण, म्हणून रट्टे, फटके हे पर्याय होऊ शकत नाहीत. थोडा त्यांचाही विचार करा, त्यांची विचारसरणी, अफलातून कल्पनाशक्ती लक्षात घ्या.
घडलेला प्रकार निश्चितच वाईट आणि विचित्र आहे. पण, त्यांचे प्रकटीकरण किती हुबेहुब होते हेही लक्षात घ्यायला हवे. आज तुम्ही त्यांना फटकारले असते, मारले असते तर कदाचित भविष्यात त्यांच्याकडे असलेली विनोदीवृत्ती हिरमुसली असती. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या चुकीच्या वागण्याला पाठीशी घालायला हवे. त्यांची चूक त्यांना समजलीच पाहिजे, चुकीच्या वर्तनाबद्दल त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. शिक्षा म्हणजे शिव्या देणे, रागाने मारणे, उपाशी ठेवणे असे नव्हे तर त्यांना न दुखवता त्यांची चूक योग्य शब्दात, एखाद्या उदाहरणातून त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवी. आजची पिढी फार हुशार आहे. ही मुले काय करतील याचा आपण विचारही करू शकत नाही.... "
" बरोबर आहे, काका तुमचे. आत्ताची समीरची हुशारी बघितली ना तर आश्चर्य वाटते. अपघाताची खोटी बातमी सांगायला आला पण, बेट्याने चेहऱ्यावरील भाव अगदीच खरे सांगतोय असे गंभीर ठेवले. एक क्षणभर सुद्धा तो खोटे बोलतोय हे त्याने जाणवू दिले नाही. चेहऱ्यावर खट्याळपणाही येऊ दिला नाही."
मालिनीची आई म्हणाली.
" अगदी बरोबर. मला हेच म्हणायचे आहे. "काका म्हणाले.
" हो काका. जमाना बदलला आहे. आजच्या आईवडिलांनाच बदलून घ्यावे लागेल. चला. स्वयंपाक करावा लागेल.. " मालिनीची आई म्हणाली आणि एका नंतर एक सर्व बायकांनी काका - काकुंचा निरोप घेतला.....
=================================





Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational