Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Romance

5.0  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Romance

अनामिका

अनामिका

10 mins
1.4K


2018

अलीकडेच श्री. ऑर्कुट बुयुक्कोकटेन या तुर्कीश सॉफ्टवेअर इंजिनीअर ने त्याचा 'हॅलो' हा सोशलनेटवर्किंग प्लॅटफार्म भारतात लाँच करत असल्याचे जाहीर केले. हो बरोबर! हा तोच मिस्टर ऑर्कुट, ज्याने ऐंशीच्या दशकात आणि त्या आधी जन्मलेल्या पिढीला 2004 मध्ये पहिल्यांदा 'ऑर्कुट' या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वर आणून ठेवले. नंतर झुकेरबर्ग च्या फेसबुकने नव्या तरुणाईला पाशात अडकविल्यानंतर 'ऑर्कुट' त्याच्या प्रथम वापरकर्त्यांप्रमाणे म्हातारे आणि मागासलेले ठरले. पण दहा वर्षांच्या प्रवासात, म्हणजे 2014 मध्ये फायनल एक्सिट घेईपर्यंत 'ऑर्कुट' ने आभासी पटलावरून सुरु झालेल्या कितीतरी कथांना वास्तवात अविस्मरणीय आणि मूर्तिमंत रूप बहाल केले. तर या ऑर्कुट महाशयांच्या 'ऑर्कुट' च्यानिमित्ताने आज पुन्हा एकवार 'ती' मनाचा कॅनव्हास रंगवून गेली.


*****


2006

तिच्या ऑर्कुट प्रोफाइल वर आज एक नवीन रिक्वेस्ट आली. तिने प्रोफाइल ओपन केला. प्रोफाइलमध्ये त्याचा फोटो नव्हता. फक्त नाव होते. शिक्षण - B. E. सॉफ्टवेअर इंजिनीअर. उंची - सहा फूट. लोकेशन - पुणे.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी तिच्या gtalk च्या विंडो मध्ये त्याचा "Hi".

तिचा रिप्लाय "हॅलो".

तो, "Be Lated Happy Birthday!".

दोन दिवसांपूर्वीच तिचा वाढदिवस झाला होता ना! तिने त्याच्या शुभेच्छा स्वीकारून त्याला धन्यवाद दिले.

त्याने विचारले, "कशी आहेस?"

जणू खूप जुनी ओळख असावी त्यांची.

पुढल्या दिवशी त्याचे gtalk चे स्टेटस, "कसे सरतील सये माझ्याविन दिस तुझे, सरतांना आणि सांग सलतील ना... गुलाबाची फुले दोन रोज रात्री डोळ्यावर मुसुमुसु पाणी सांग भरतील ना..."

तिने न राहवून विचारले, "कोण आहे ही सई, जिचे दिवस तुझ्यावाचून सरणार नाहीत?"

तो, "भेटेल अशीच अवचित कधीतरी".

ती, "म्हणजे तू अजून तिची वाटच बघतोयस?"

तो, "हो. आणि मग एक दिवस ती माझी बघेल".


*****


कधीतरी आपण सहज बोलून जातो, पण त्या शब्दांमध्ये येणाऱ्या भविष्याची चाहूल असते, ज्याची आपल्याला कल्पना पण नसते. आज त्या गोष्टीला बारा वर्षे होऊन गेली, आणि आज बारा वर्षांपूर्वी त्याला अवचित भेटलेल्या 'ती'चा एक एक दिवस सरताना सलत होता मनात खोलवर. आणि रात्री त्याच्या आठवणीत आसवांनी उशी भिजवत होत्या.


*****


त्यांची ओळख ऑर्कुटवर झाली. भाळली होती त्याच्या आवाजातल्या स्पंदनाना ती, ज्या स्पंदनांनी तिच्या हृदयाची स्पंदने खूप जलद झाली होती.. पहिल्या फोन कॉल मधेच. त्या दोघांमधले दोन हजार किलोमीटरचे अंतर दोन दिवसातच किती कमी झाले होते.


कॉलेजनंतर असाइन्मेंट्स, जेवण पटापट उरकून ती वाट बघत बसायची त्याच्या फोन कॉलची. रात्री उशिरा आपल्या कॉम्पुटर वर शोधनिबंध वाचताना तिचे कान मात्र मोबाइलवर पक्के लक्ष ठेऊन असायचे. नाव, गाव, शिक्षण, नोकरी, छंद, घरदार इत्यादी इतिहास-भूगोल चार दिवसातच फोन आणि Gtalk चॅट वर गिरवला गेला होता. तो एका छोट्याशा कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिर म्हणून बऱ्या पगारावर काम करत होता. आणि ती भारतातल्या एका नामांकित शैक्षणिक संस्थेत तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन.


शब्दवेड्या तिच्या मनाला 'तो', तिच्या कानांवर आणि कॉम्प्युटर स्क्रीन वर उमटलेल्या त्याच्या शब्दांमुळे त्याला न पाहताही खूप भावला. हळुवारपणे परिजातकाची फुले वेचावी तसे विचारपूर्वक एक एक शब्द निवडून तो तिच्या कानांना नि अंतरंगाला सुगंधित करत होता. आजवर अनेक मित्रमैत्रिणींच्या गराड्यात वेढलेल्या, पण तरीही एकटेच असलेल्या तिला आता मनातील एक एक कप्पा त्याच्यासमोर उलगडवून दाखवताना बिलकुल संकोच वाटत नव्हता.


आपुलकीने कधी तिच्या दिवसभरातल्या बारीक सारीक गोष्टी, तिचा प्रोजेकट् आणि शोधनिबंधाचे काम वगैरे बाबत विचारून, तर कधी ती बनवत असलेल्या कॉम्प्युटर मॉडेल मध्ये महत्वाचे इनपुट देऊन त्याने तिला विश्वासात घेतले. आणि त्याच्या शब्दांची जादू तिच्या मनावर इतकी बेफाम झाली की, सातव्या दिवशी हिनेच त्याला चॅट करताना टाईप करून विचारले-

"तुला मी तुझ्या आयुष्याची सोबतीण म्हणून हवी आहे का?"

तो बसल्या जागेवर उडालाच. त्याने सगळा धीर एकवटून क्षणाचाही विलंब न लावता टाइप केले, "तसे झाले तर मी जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस असेल. माझ्याशी लग्न करशील का?"

आहा! काय मोहरली ती मनातून त्याच्या शब्दांनी! पण दुसऱ्याच क्षणी आता पर्यंत वेगाने टाइप करणारी तिची लांब चुणचुणीत बोटे एकदम आखडली गेली. इकडे त्याच्या मनाची भयंकर घालमेल झाली. शेवटी दीर्घश्वास घेऊन तिने तिचा "होकार" टाइप केला. आणि तात्काळ तिच्या मोबाइल ची घंटी वाजली.

त्याने दबक्या आवाजात विचारले, "तू माझी चेष्टा तर नाही करत आहेस ना"

ती म्हणाली "सांगितले ना!".

तो, "मला तुझ्या तोंडून ऐकायचेय".

ती, "मी तयार आहे तुझ्यासोबत सगळे आयुष्य जगायला. माझ्याशी लग्न कर."

तो, "हो, मी फक्त तुझाच आहे आणि तू माझी!"

तो आणि ती दोघेही त्या रात्री कधीही न भेटलेल्या न बघितलेल्या आपल्या भावी साथीदाराच्या स्वप्नांत धुंद होऊन जागले. आता ओढ लागली होती भेटीची. तिला तिच्या स्वप्नांतल्या राजकुमाराची आणि त्याला त्याच्या स्वप्नपरीची.


तिचा चेहऱ्यावर त्याचा आवाज मिश्किल स्मित खुलवत होता आणि तिच्या स्वप्नांची धुंदी त्याला मदमस्त करत होती. दिलखुलास पणे जगणारी ती आता अजूनच खोडकर आणि प्रसन्न भासत होती. तिच्या क्लासमधील मित्र मैत्रिणींना बदल जाणवत होता पण आपले अंतरंग कळू न देण्यात माहिर असलेल्या तिने स्वतः व्यक्त होणे सवयीप्रमाणे टाळले. त्यालाही आता आजवर न बघितलेला चेहरा स्वस्त बसू देत नव्हता. उठता बसता जागेपणी आणि स्वप्नांत देखील स्लो मोशन मध्ये एक सुंदर दुपट्टा हवेत उडताना हलकेच त्याला स्पर्श करून जात होता, नि त्याचा सुगंध त्याच्या मनात खोलवर दरवळत होता.


दहा बारा दिवसांच्या चॅट आणि फोन कॉल्स नंतर विमानाची तिकिटे बुक झाली. सायकल-रिक्षा, ट्रेन, टॅक्सी करत तिने कोलकाता विमानतळ गाठले. विमानातून प्रवास करण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. आभासी दुनियेत भेटलेल्या पण वास्तवात काही हजार किलोमीटर दूर असलेल्या तिच्या प्रियकराला साक्षात भेटण्यासाठी ती निघाली होती.


*****


दिसायला साधारण आणि रंगानेही तशी सावळीच होती ती. पण आजवर अनुभवलेल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामांवर आपल्या प्रविण्याचा ठसा उमटवून तिच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या आत्मविश्वासामुळे चारचौघींमध्ये ती नक्कीच उठून दिसायची. स्वतःहून कामाशिवाय कधी कुणाशी बोलणार देखील नाही. भलेही कुणी हेकट म्हणू देत किंवा गर्विष्ठ. पण कधी बोललीच तर समोरच्याला तिच्याशी बोलण्याचं वेड लागल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.


अभ्यासात नेहमी टॉपरच असायची. तिच्या आजवर गाजवलेल्या वक्तृत्व वादविवाद स्पर्धा, एकांकिकांमधून केलेला अभिनय, कधी फॅशनशो मध्ये केलेला रॅम्प वॉक, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि तिने केलेले काव्यवाचन, तिचे पेंटिंग, तिची रांगोळी, तिची मेहंदी, तिचे व्हॉलीबॉल खेळणे आणि असे काही नव्हतेच ज्यात तिचा हात कुणी धरावा.


कॉलेजमधल्या तिच्या प्रत्येक परफॉर्मन्स नंतर तिचा एक तरी नवीन फॅन येऊन तिला प्रोपोज करायचा. आणि ही फक्त मिश्कीलपणे 'अजून एक' म्हणत यादीत नाव ऍड करून सोडून द्यायची. तो तिच्या आभासी आयुष्यात आला आणि 'अजून एक' नाही तर "हाच एकमेव" असे म्हणून ती मनोमन खूप सुखावली होती.


*****


आज तिने लाल-काळा रंगाचा रेशमी कुर्ता आणि सलवार घातली होती आणि त्यावर लाल रंगाचा रेशमी दुपट्टा. ज्यावर खूप सारी फुले आणि कॉलरवर रंगीत खड्यांचे सुंदर नक्षीकाम होते. तिच्या रंगीबेरंगी प्रफुल्लित मनासारखे.


ती विमानात आपल्या सीट वर येऊन बसली. विमानाने टेकऑफ केले नि तिच्या मनाला अनामिक हुरहूर लागली. हे सत्य आहे की स्वप्न? तो वास्तवात कसा असेल? तो येईल का? तो मला फसवणार तर नाही ना? एक ना अनेक हजार प्रश्नांचा गुंता डोक्यात होता.. विमानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या पिंजलेल्या कापसासारख्या अनंत ढगांप्रमाणे. पण त्याच्या भेटीची ओढ इतकी तीव्र होती की जसे जसे विमान अलगद त्या ढगांवरून तरंगू लागले तसे तिचे मन देखील हलके हलके होऊ लागले.


इकडे पुण्यात त्यालाही अपार उत्सुकता लागली होती त्याच्या स्वप्नपरीला भेटण्याची! तिच्या स्वप्नांमध्ये जागलेला त्याने भल्या पहाटे उठून क्लीन शेव केले. स्नान आटोपून घातलेल्या आवडीच्या शर्टवर आवडीचा परफ्युम शिंपडायला तो विसरला नाही. आवरून तयार झाल्यावर आरशासमोर उभा राहून तो स्वतःला निरखु लागला. सहा फूट उंची. नीट सावरून बसवलेले सिल्की केस. ओठांच्या आधी मनातले बोलणारे डोळे. आणि शांत चेहऱ्यावर असलेला समजदार पणाचा मेकअप. खुश होता आज तो खूप - स्वतःच्या रूपावर आणि नक्कीच नशीबावरही. शूजमध्ये पाय घालताना त्याचे ओठ त्याच्या आवडीचे गाणे गुणगुणत होते. शर्टवर काळ्या रंगाचे जर्किन चढवलं आणि बॅग उचलून तो निघाला. पुणे पासून मुंबई पर्यंतच्या प्रवासात त्याचे शरीरच बस मध्ये बसले होते; मन तर कधीच मुंबई विमानतळावर पोहचून त्याच्या प्रियतमेची वाट बघत होते.


*****


फ्लाइटच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधीच तो मुंबई विमानतळावर येऊन पोहोचला. तिच्याप्रमाणेच खूप सारी स्वप्न आणि आकांक्षा सोबत घेऊन.


इकडे कोलकाता ते मुंबई हा तीन तासांचा प्रवास कधी संपला हे तिला देखील जाणवले नाही. तिच्या विचारांची तंद्री हवाईसुंदरीच्या शब्दांनी भंग पावली. घाईघाईने आपले सामान घेऊन ती एक्सिट कडे निघाली. पण तिचे अवखळ मन तिच्या पावलांच्या पुढे धावत होते.. त्याला शोधण्यासाठी. काही मिनिटांचा अवकाश तिच्या आयुष्यात कायमस्वरूपी लख्ख प्रकाश घेऊन येणार होता.


एक्सिटवर प्रवाशांना घेण्यासाठी आलेले लोक हातात त्यांच्या नावाचे बोर्ड उंचावून उभे होते. ती त्या सर्व नावांच्या बोर्ड मध्ये तिचे नाव शोधू लागली. पण दुर्दैवाने तिच्या नावाचा बोर्ड उंचावलेला तिला दिसला नाही. म्हणजे तो आलाच नाही का? ती जराशी भांबावली. तिने पटकन तिचा मोबाइल चालू करण्यासाठी पर्स मध्ये हात घातला. चालू केलेल्या मोबाइल ने नेटवर्क केव्हाच सोडले होते. आणि नेटवर्क शोधण्याच्या नादात इतर सहप्रवाशांच्या आणि त्यांना घ्यायला आलेल्या जीवलगांच्या गर्दीत ती कधी एक्सिटमधून बाहेर पडली तिला समजलेच नाही.


त्याचा मोबाइलही मुंबईतल्या रोमिंगच्या ऍलर्जीमुळे बंद पडला होता. कसे काय माहित नाही पण एक्सिट मधून बाहेर पडणाऱ्या गर्दीतून ती त्याच्या नजरेतून निसटली. आणि खरे तर त्याने तरी कुठे तिला यापूर्वी कधी बघितले होते? फोटो न बघता एकमेकांना ओळखायचे ठरले होते, पण निदान तिच्या ड्रेसचा रंग तरी विचारायला हवा होता. त्याने पुन्हा एकदा आलेली फ्लाइट तिचीच असल्याची खात्री केली. त्याला वाटले कदाचित चेंज करण्यासाठी वॉशरूमला गेली असेल येईल. आलेल्या प्रवाशांची गर्दी एक एक करून एव्हाना विमानतळाच्या बाहेर गेली होती. एक्सिट वर फक्त सेक्युरिटी गार्डस उरले होते. पण जिला बघण्यासाठी त्याची नजर आतुर झाली होती ती कुठेच दिसत नव्हती. तासभर तो तिच्यासाठी अधीर होऊन तिथेच उभा होता.


तिचा फोन बंद असल्याने तिला वाटले फोन बूथ वरून त्याला कॉल करावा. ती विमानतळाच्या बाहेर रस्त्यावर फोन बूथ शोधण्यासाठी आली. रस्त्यावरच्या अमाप गर्दीतून चालताना कुणाचा तरी धक्का लागून बॅग आणि पर्स सांभाळताना एकवार जवळजवळ तिचा तोलच गेला. कसेबसे एक बूथ समोर दिसला. कॉइन टाकून तिने त्याचा नंबर डायल केला. पण त्याचा मोबाइल नॉट रीचेबल लागत होता. वारंवार प्रयत्न करून झाल्यावर एव्हाना तिच्या मनात धडकी भरली होती. का आला नसेल. फोन का बंद करून ठेवला? काही प्रॉब्लेम मध्ये फसला असेल का?


रिटर्नची फ्लाइट तर परवाची आहे. पर्स मध्ये पुरेसे पैसे पण नाहीत. विमानाच्या तिकिटासाठी दोन महिन्यांची स्कॉलरशिप संपवली. त्यासमयी तिला तीव्रतेने तिच्या आईवडिलांची आठवण आली. जेमतेम तीनशे किलोमीटर वर आईवडील आहेत. पण त्यांना काय आणि कसे सांगणार होती ती? कारण मुंबईला येण्याबद्दल घरी काही कळवलेच नव्हते.

एकीकडे तिचे अंतर्मन खोलवर तिला साद घालत होते की तो येणारच. पण शेकडो लोकांच्या गर्दीतून या अनोळखी शहरात कसे शोधणार होती ती आजवर कधीही न बघितलेल्या तिच्या प्रियकराला? ज्याचं फक्त नाव माहित होते आणि फोन नंबर.


इकडे दुसऱ्या फ्लाइट च्या आगमनाची अनौन्समेंट झाली होती दिल्लीवरून येणाऱ्या. या फ्लाइटमधील प्रवासी एक एक करून जसजसे बाहेर पडू लागले तशी त्याच्या मनाची घालमेल वाढू लागली. ती कोलकाता वरून माघारी गेली असेल का? तिचा विचार बदलला असेल का? ती कुठल्या संकटात तर सापडली नसेल ना? माझ्या रुपाला नसेल ओळखले तिने पण माझा आवाज तर ओळखेल ना नक्कीच? तिला तिच्या नावाने जोराने आवाज द्यावा म्हणून त्याने ओठ उघडले. पण भीतीने ग्रासलेल्या त्याच्या कंठातून आवाजही निघवेना. प्रवाशांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या क्षणोक्षणी वाढत जाणाऱ्या गर्दीसोबत त्याच्या मनातल्या शंकांची गर्दीही वाढत होती. आणि हृदयाची अखंड धडधड आता त्याला असह्य झाली होती.


रस्त्यावरची अनोळखी गर्दी जड पावलांनी पार करत तासाभराने ती पुन्हा विमानतळावर पोहोचली.. एक्सिट पाशी. तिच्या समोर प्रवाशांना घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातलगांची गर्दी पाठमोरी उभी होती. तिने एकवार डोळे घट्ट मिटून दीर्घश्वास घेतला. आणि मग आपल्या उजव्या हाताने सुरुवात करून ती गर्दीत एक एक आकृती सावकाश न्याहाळू लागली. एक दोन पंधरा पंचवीस करत सर्वांना बघून झाले होते. आता मात्र तिच्या उत्कंठेची परिसीमा तिच्या अश्रुंमध्ये परावर्तित होण्याच्या मार्गावर होती. डोळ्यात भरून आलेल्या पाण्यामुळे समोरचे सगळे पुसट दिसू लागले. तिचा पहिला हुंदका घशातून बाहेर पडणार तोच त्या ब्लर झालेल्या दृश्यात तिला एक उंचच उंच पाठमोरी आकृती दिसली. काळे जर्किन घातलेली. ती उंच व्यक्ती सभोवतालच्या गर्दीत सगळ्यात उंच असूनही टाचा आणि मान वर करून एक्सिट मधून बाहेर पडलेल्या प्रत्येकाला आपल्या नजरेत पकडण्याचा आटापिटा करत होती.


"उंची? हो... सहा फूट उंची.. ??" क्षणात तिच्या डोक्यात बल्ब पेटला.. नि सगळं अवसान एकवटून ती हळुवारपणे एक एक पाऊल पुढे टाकू लागली. तिच्या पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांना पंचवीस तीस पावलांचे अंतर आता हजारो मैलांप्रमाणे भासले. ती त्या पाठमोऱ्या उंच आकृतीपाशी पोहोचली. तिने मागून त्याच्या जर्किनला हाताने पकडून ते एकवार हळूच हलवले. आपल्या जर्किन ला पाठीमागून बसलेल्या दबक्या हिसक्यामुळे तो थबकला. एक दीर्घश्वास घेऊन तो मागे वळला. पाणावलेल्या एक नजरेस दुसरी नजर मिळाली. त्यांच्या डोळ्यांमधून टपकणारी आसवे, हृदयांची वेगावलेली स्पंदने, आजूबाजूची गर्दी, गर्दीतला गोंगाट, विमानतळावर होणाऱ्या अनौन्समेंट्स, सगळे एका क्षणात शून्य. शरीर, ध्वनी, हवा, दिशा, स्थळ, काळ - सगळेच पैलू त्या क्षणात लुप्त झाले होते. 'हे'च ते, ज्यासाठी आजवरचा आयुष्याचा प्रवास अपूर्ण होता. तिच्या आणि त्याच्या हृदयाच्या स्पंदनांच्या समांतर लयीवरून त्यांनी एकमेकाला ओळखले. त्यांचा अंतरात्मा सांगत होता त्यांना- ही आपली पहिली भेट नक्कीच नाही. या आधीही दोन जीव स्थलकाळाच्या पलीकडे अपार अनंत अशा अवकाशात भेटले होते.. अनंत वेळी- अनंत ठिकाणी. हा क्षण केवळ त्यांच्या पुनर्मिलनाचा होता.. नव्या रुपात.. नव्या ठिकाणी आणि नव्या काळात.


दोघांच्याही ओठावर अप्रतिम अबोल असे स्मित फुलले. तिचे हात त्याच्या हातात कैद झाले. नव्याने होणाऱ्या त्या स्पर्शात ओढ होती, अधीरता होती, आपुलकी होती, आश्वासन होते आणि शब्दांच्या पलीकडचे बरेच काही. पुढल्या क्षणी दोन जीव एका मिठीत घट्ट बिलगले गेले. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेकडे वळले नि त्याने तिला अलगद वर उचलून घेतले. त्या उंचीवर तिला भुतलावरील सर्वोच्च शिखर सर केल्याचा आभास झाला. या उंचीवरून जमिनीवर परतणे आता शक्य नव्हतं. त्याने हळुवार तिला खाली घेतले. तिच्या पायाचे तळवे आता त्याच्या पायांवर होते आणि ओठ त्याच्या ओठांमध्ये. ही सुरुवात होती एका नव्याने प्रसव होऊ पाहणाऱ्या प्रेमकहानीची. मुंबई विमानतळाच्या साक्षीने.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance