Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Tragedy

4.8  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Tragedy

चूक

चूक

5 mins
1.7K


जेव्हा प्रेमाच्या धुंदीत बेधुंद होऊन बहरायचे दिवस होते तेव्हा तू तिच्या आयुष्यात आलास, त्या दोघांच्या प्रेमात वाटेकरी झालास.

तुझ्या येण्याची चाहूल लागताच तिचा कण अन कण शहारला होता. दिवसागणिक न बघितलेल्या तुझे रूप ती स्वतःच्या डोळ्यांत सजवत होती. एरवी स्वतःच्या शरीराविषयी तिला शृंगारसमयी देखील मोह झाला नसेल, पण तिच्या उदरात रुजलेल्या अंकुराच्या जाणीवेने ती स्वतःच्या अंगावरून मायेने हात फिरवू लागली. तुझ्या स्पर्शासाठी आतुर झालेल्या तिला स्वतःच्या स्पर्शात तुझी जाणीव होऊ लागली.


सकाळी उठताच येणारा प्रचंड थकवा, मळमळ आणि जीव गलबलून टाकणाऱ्या उलट्या.. अनामिक आळस यावर मात करून ती प्रसन्न मनाने आता तुझे ओझे (?) ओझे कसले? तिचा अभिमानच मिरवू लागली. आताशा तिचे पाय पण तिला चालताना जड वाटत होते.


तू आधीपासूनच मुजोर. बाहेर येण्यासाठी आतुर. कितीदा तू तिला लाथ मारलीस पोटात. तिला राग नाही आला रे. तू मारलेली लाथ तिने मायेने तिच्या पोटावर हात फिरवून गोंजारली. आतमध्ये होतास तेव्हा किती एकरूप होतास तिच्याशी. किती सुरक्षित वाटत होते तुला.


आणि जेव्हा तू तिच्या जीवाशी बंड पुकारून बाहेर यायला निघालास.. तुला ठाऊक आहे? त्या मरण यातनांमध्ये देखील "माझ्या पिलाला सुखरूप बाहेर येऊ दे." म्हणून ती देवाचा धाव करत होती. तुझा पहिला स्वतंत्र श्वास आणि रडण्याचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून तिचा जीव तिच्या कानात एकवटला. तिच्या यातना कुठल्या कुठे पळाल्या. आणि अंगात नसलेले बळ एकवटून तिने तुला छातीशी घट्ट धरले. तुझे टप्पोरे डोळे, तुझे लालचुटुक ओठ, तूझे कापसासारखे मऊ गाल, तुझ्या टाळू वरचे काळेशार जावळ, तुझ्या हाताची नाजूक लांब लांब बोटे, तुझे इवलेसे हात आणि इवलेसे पाय .. असे एक एक सगळे काही ती वारंवार न्याहाळत होती आणि तुझे पटापट एक ना अनेक असंख्य मुके घेत होती. तू आलास आणि तिचे आयुष्य बदलून गेले.


तुझ्या रात्री बेरात्री रडण्यामुळे ती कधीच डिस्टर्ब नाही झाली. तुझे शी-शु साफ करताना तिला कधी किळसही नाही वाटली. त्या शी-शु च्या कपड्यांना येणाऱ्या कुबट वासाचा अडसर तिला कधी जाणवलाच नाही.

तू पहिल्यांदा तिला 'आई' म्हणून हाक मारली तेव्हा तिला 'आपण सगळ्या जगावर राज्य करणारी महाराणी असल्याचा' भास झाला. तिच्या हाताला धरून तूझी पावले जेव्हा चालू लागली तेव्हा तिला स्वतःचा वेग दुणावल्यागत वाटले. तुझ्यामध्ये ती इतकी रमली की प्रसंगी तिच्या नवऱ्याचाही रोष तिने पत्करला. तुला कडेवर घेऊन ती मैल न मैल चालायची. तिला कधीच तुझे ओझे नाही वाटले.


तुझे हट्ट पुरवताना तिच्या नाकी दम यायचा. कधी तरी तू पडलास आणि तुझा गुडघा फुटला तर तुला वेदनेची जाणीव होण्याआधी तीच रडायची. एका रात्री तू तापाने फणफणलास तेव्हा तिच्या जीवाची किती घालमेल झाली होती ते तुला कसे ठाऊक असणार!


एकदा काहीतरी देताना उशीर झाला म्हणून तू घर डोक्यावर घेतले.. मोठ्याने भोकाड पसरून. ती तुला समजवायला म्हणून तुला जवळ घेऊ लागली तर तू चक्क तिच्यावर हात उगारलास. तिने फक्त मायेने तूला घट्ट छातीशी धरले. तू शाळेत जाताना घातलेला धिंगाणा, खोटे बोलून केलेल्या कितीतरी खोड्या, तिला रागावून दिलेली उत्तरे.... हे सगळे दिसूनही तिने तुला नेहमीच प्रेमाने समजावले.


वडीलांसमोर तुझ्या चुका उघडकीस येऊन तुला मार बसू नये म्हणून तिने कित्येकदा त्या चुका स्वतःवर घेतल्या. एकदा तुझ्या चुकांपुढे हताश होऊन तिने हात उगारला (चुकून) तुझ्यावर. तू थोडासा रडला असशील.. आणि शांतही झालास थोड्या वेळाने. पण ती मात्र रात्र भर रडत होती. तुझ्यावर हात उगारला म्हणून कित्येक दिवस मनात कुढत होती.


तुझे प्रत्येक यश तिने मनसोक्त साजरे केले. तुझ्या अपयशातही तीच तुझ्या पाठीशी खंबीर उभी होती. तुझी उमेद आणि उत्साह कायम राहावा म्हणून अतोनात झटत होती. तुझ्या कित्येक फालतू आणि न परवडणाऱ्या हट्टांना पुरविण्यासाठी तिने स्वतःची हौसमौजच नाही, तर तिच्या कित्येक दैनंदिन आवश्यक गरजांना सुद्धा मुरड घातली होती. तुला नसेलच ठाऊक ते.

तू 'आई ..आई..' करून सतत तिच्या अवतीभोवती घुटमळायचास.. कारण तुला नेहमीच तिचा आधार लागायचा.. कधी प्रेमाने जवळ घेण्यासाठी, तर कधी मित्राकडे बघितलेले नवीन काही विकत घेण्यासाठी, तर कधी बाबांकडून कसली तरी परवानगी मिळवण्यासाठी.


चूकच झाली तिची जरा. "तुला डोक्यावर बसवून ठेवले" यावरून बाबांची किती बोलणी खायची बिचारी. तू कित्येकदा अभ्यास चुकवून, शाळेला दांडी मारून परस्पर खेळायला जायचास मित्रांसोबत. (परस्पर रीतसर तिला न विचारता निघून जायची तुझी सवय तशी जुनीच म्हणायची!) दिवसभर वाट बघून तू उशिरा घरी आलास, की तीदेखील नाटकी रागावायची तुझ्यावर. पण नंतर प्रेमाने जवळ घेऊन कित्येकदा समजावले असेल तुला तिने, "असे करू नकोस पुन्हा कधी". आणि तू पण तिला कित्येकदा "आई तुझी शपथ! तुला न विचारता, न सांगता कुठे जाणार नाही" असे वचन दिलेस. पुढल्या वेळी पुन्हा पुन्हा ते मोडत राहिलास. आणि ती पण पुन्हा पुन्हा तुझ्या मोडलेल्या शपथा नि चुका माफ करत राहिली.. विसरत राहिली. कारण तू तिच्याच जीवाचा अंश ना...


चुकलेच तिचे जरा. पहिल्यांदा तू चुकलास तेव्हाच तिने तुला पदरात घ्यायला नको होते. तुझे वारंवार खोटे बोलणे तिने विसरायला नको होते. तुझे तिच्यावर चिडणे, तिला ओरडणे तिने ऐकूनच घ्यायला नको होते. काय गरज होती तिला स्वतः आजारी असताना उसने अवसान आणून स्वयंपाक करून तुला घास भरवायची? नवऱ्याची राणी बनून स्वतःचे सौंदर्य मिरवण्याच्या वयात, तुला या जगात आणून स्वतःच्या शरीराला बेढब बनवून, नवऱ्याला द्यायच्या प्रेमात तिने तुला वाटा दिला. चुकलेच तिचे. कालही आणि आजही.


तुझ्या चुकांवर पांघरून घालताना ती स्वतः चुकत होती हे तिला उमगलेच नाही रे. तू मोठा झालास. वयाने नि पदानेही. आणि तुझ्यातली "ती" कुठेतरी हरवली गेली. तिची जागा तुझ्यातल्या "मी" ने घेतली. आणि तुझ्या चुकांवर जगासमोर वारंवार पांघरून घालून तुला बरोबर सिद्ध करता करता.. तिच्या लक्षातच नाही आले, की तुला 'आपण स्वतः नेहमीच बरोबर असल्याचा' वास्तवरूपी भ्रम होऊ लागला. तुझ्यातला "अहं" इतका मोठा झाला, की तू आता तिच्या चुका शोधू लागलास. आता 'वास्तव', 'सत्य', 'तत्व', 'मान', 'सामाजिक भान', 'प्रतिष्ठा' या अवजड शब्दांमध्ये तू 'तिच्या नि तुझ्या नात्याची' व्याख्या शोधू लागलास.


'चुक' ही चूकच असते. शिक्षा तर व्हायलाच हवी. जरा उशिराच लक्षात आल्या तिला तिने तुझ्या जन्मापासून केलेल्या चुका. काय फरक पडतो? कितीही मनातून हळहळली काय किंवा तुझ्या विरहाने व्याकुळ होऊन रडली काय?


तिचे किती बरोबर आहे ठाऊक नाही. पण 'तू चुकत नाही आहेस' याची खात्री तुझ्या अंतर्मनाला तिचीच खोटी शपथ खाऊनही देता येत नाही. चूक कोणाची हा प्रश्नच इथे चुकीचा आहे.


ती 'तुला स्वतःमध्ये रुजविण्याच्या क्षणापासून', 'तुझ्यात' 'तिला' शोधत राहिली. दमली असेल आजवर. कदाचित वाट बघत असेल.. नक्कीच, तू तुझ्यातला "मी" बाजूला काढून तुझ्यातल्या "तिला" शोधशील याची. एक चूक करंच तू, तिला संधी देऊ नकोस यावेळी.. तुझ्या चुकीवर पांघरूण घालण्याची!



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy