Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Others Abstract

4.6  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Others Abstract

मृगजळ

मृगजळ

3 mins
1.4K


विस्कटलेले केस, रंगांची संगती नसलेला पेहराव, निस्तेज चेहरा, डोळ्यातले सुकलेलं पाणी - असा गबाळा अवतार घेऊन तिशी पार केलेली 'ती' चालत होती. 'का' आणि 'कशासाठी' असे अनंत प्रश्न मनात घेऊन. ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हात वळवाच्या पावसाची चाहुल घेऊन थंडगार वाऱ्याची झुळूक यावी तसा 'तो' तिला भेटला.


नीरसपणे एकेक दिवस पुढे ढकलत असणाऱ्या तिने, 'त्याचे असणे' म्हणजेच 'आयुष्य' असा समज करून घेतला. त्याचे हसणे, त्याचे बोलणे, आणि त्याचे असणे या कारणास्तव आजवर नकोशा वाटणाऱ्या नावडत्या कामातही तिचे मन रमू लागले. त्याच्या सदा हसऱ्या चेहऱ्याकडे बघून आजकाल 'ती'ही हसायला शिकत होती. आजवर कधीही स्वतःच्या दिसण्याबाबत जागरूक नसलेल्या तिला आता सर्वच रंग आवडू लागले. आणि मग त्या रंगांमध्ये बेधुंद होऊन मनातच ती त्याच्या तालावर नाचत होती. 


'का' आणि 'कशासाठी' हे प्रश्न तर होतेच; पण त्यावर आता त्याच्या विचारांचे वलय जमा होऊ लागले. कदाचित त्याच्या नकळत त्यालाही ती आवडू लागली होती. आजवरच्या चाळीस वर्षांच्या प्रवासात अभ्यास, नोकरी आणि संसार यात गुरफटलेल्या त्याला कदाचित आपल्या आवडीचा विचार करायला वेळच मिळाला नसावा. तिच्या दशकभरापूर्वीच मारून टाकलेल्या आकांक्षा पुन्हा एकदा जिवंत होऊ लागल्या. स्वप्न पाहायला विसरलेली ती आता स्वप्न बघू लागली, ज्या स्वप्नांना काही अंतच नव्हता. तिच्या बोलण्यात, तिच्या वागण्यात, तिच्या हसण्यात आणि तिच्या असण्यात आता फक्त आणि फक्त 'तो' होता. समाजाच्या सर्व मर्यादांना तिने कधीच मागे टाकले होते. पण त्याचे आयुष्य मात्र असंख्य मर्यादांनी चाकोरीबद्ध झालेले होते. 


कधीतरी त्यालाही वाटले असावे, आजवर न अनुभवलेल्या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघावे. तिने मात्र प्रेम-आयुष्यभराची सोबत वगैरे या शब्दखेळापासून स्वतःला कधीच अलिप्त केले होते. तिच्या ठायी, 'त्याचे' आजूबाजूला असणे हेच सद्यघडीला मन सुखावणारे होते. तिच्या आनंदाचे गमक होते. तो मात्र निर्विकारपणे समजत असूनही न उमगल्याचे भासवत होता. जोपर्यंत आपल्या फायद्याचे आहे, तोपर्यंत तिच्याशी चार शब्द आपुलकीने बोलण्यात त्याचा तोटा नक्कीच नसावा. कारण शब्दवेड्या तिने त्याच्याकडे शब्दांपलिकडे दुसरे काही मागितलेही नव्हते.


तिच्या स्वप्नांच्या डावात तिलाच हरवण्यात त्याच्या मते काहीच वावगे नसावे. मुळात असा डाव, जो त्याने कधी रचलाच नव्हता. ज्याच्याकडे सगळेच आहे अशा त्याला, तिच्या असण्या किंवा नसण्याने काहीच फरक पडत नव्हता आणि कधी पडणारही नव्हता. मग प्रश्न असा उरतो, की त्याच्या स्वप्नांमध्ये स्वतःला गुरफटून घेऊन आभासी आनंदाच्या मागे धावण्यात तिचा मूर्खपणा होता, की तिच्या निरपेक्ष आपुलकीच्या भावनांना निर्विकारपणे झुलवत ठेवण्यामध्ये त्याचा स्वार्थ होता? 'तो' तिच्या मनाचा खेळ होता की मृगजळ?

                                                      

*****


आपल्याला पक्के ठाऊक असते की समोर दिसणारे मृगजळ आहे. जे कधीच हाती लागणारे नाही. हा केवळ आभास आहे. पण त्याने मनाला इतकी मोहिनी घातलेली असते, की आपण प्रयत्न करूनही स्वतःला त्याच्यामागे धावण्यापासून थांबवू शकत नाही. मृगजळ पुढे आणि आपण त्याच्यामागे. वेळेनुरूप वृद्धिंगत होणाऱ्या आसक्तीने आपला वेगही वाढत राहतो. जसजसे आपला वेग वाढतो तसतसे मृगजळदेखील अधिक चपळाईने आपल्याला हुलकावणी देत पुढे पळत राहते. 


रखरखत्या निर्जीव वाळवंटातून मार्गक्रमण करताना नुसतं चालत राहणंदेखील महत्वाचे असते; जिवंत राहण्यासाठी. जिथे दाही दिशांना सूर्याच्या प्रखर ज्वालांनी घट्ट मिठी मारली आहे, तिथे सगळ्याच दिशा चुकीच्या वाटू लागतात. आपल्यासमोर दोनच पर्याय असतात- एक तर तप्त वाळवंटासमोर हार मानून स्वतःला मृत्यूच्या हवाली करणे किंवा चालत राहणे. अशावेळी हे मृगजळ त्याच्याविषयी ओढ निर्माण करून, आपल्याला चालत राहण्याची सक्ती करते. दिशाहीन वाळवंटातून मृगजळाची दिशा पकडून आपण चालत राहतो आणि यातूनच अनपेक्षितपणे मरुवनापर्यंत जाऊन पोहोचतो. मग त्यावेळी झालेल्या आनंदाच्या परमोच्च क्षणासाठी आपण ज्यामागे फक्त धावत होतो ते 'मृगजळ'च नाही का कारणीभूत ठरत?


आयुष्यात जेव्हा काहीच सकारात्मक दिसत नाही, निराशेने मन ग्रासून गेलेले असते, जगायचे कशासाठी हा प्रश्न मनाला खंगवून टाकतो, सगळे दिशाहीन वाटू लागते, त्यावेळी केवळ 'चालत राहणेदेखील अत्यंत महत्वाचे असते. आपले या भूतलावरील अस्तित्व संपून न जाण्यासाठी. आणि आपल्याला चालत ठेवण्याचे काम हे मृगजळ करत असते. 


मुळात जिथे अभाव आहे, तेथेच मृगजळाचा आभास निर्माण होतो. हिरव्यागार रानात मृगजळ दिसल्याचे कधी आठवत नाही. आपल्या हाती काहीच लागणार नाही हे ठाऊक असूनही, स्वतःला संपविण्याचा टोकाचा निर्णय न घेता आयुष्याप्रती आसक्ती निर्माण करण्याचे काम करते मृगजळ. आपल्याला चालत रहायला भाग पाडते मृगजळ आणि चालत राहणे म्हणजेच तर आयुष्य असते. कारण थांबला तो संपलाच.

.......

तिने चालत राहण्याचा मार्ग निवडला होता. अखंड चालत राहण्याचा. मृगजळापाठी धावत असतांना वाटेत अनाहूतपणे लागणाऱ्या मरुवनापाशीदेखील ती थांबणार नव्हती. आता तिला ओढ लागली होती अथांग असीम सागराची!


Rate this content
Log in