Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Others

5.0  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Others

अंतिम क्षण

अंतिम क्षण

5 mins
1.0K


गेल्या मंथेन्ड ला (जानेवारी 2019) ऑफिस मधून घरी आले! जरा वैतागलेलेच होते. कारण काय, तर ऑफिस मध्ये विनाकारण बॉसशी झालेली कचकच.. (मार्च एन्ड मुळे बॉस च्या डोक्यावर कामाचे वाढलेले प्रेशर साहजिकच झिरपत्या सिद्धांतानुसार आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांच्या माथ्यावर ठिबकत ठिबकत खालपर्यंत येत असते.. नव्हे ठिबकत येत नाही, तर फ्लश केले जाते!) त्यातच अलीकडे जुने पाठीचे दुखणे अधून मधून डोके वर काढत होते. घरी आल्यावर नेहमी प्रमाणे दिवाबत्ती करून, स्वयंपाक जेवण आटपून बसले. तेवढ्यात आईच फोन वाजला. जरा त्रासावूनच बोलले तिच्याशी पण. कारण काय? तर मानसिक तणाव! म्हणजे ऑफिस मधल्या, माझ्या आईच्या समवयस्क बाईच्या 'नासमंजस'पणामुळे निर्माण होणाऱ्या, माझ्या या तणावात, 'समंजस आणि सहनशील' असलेली, बिचारी 'माझी आई' बऱ्याचदा भरडली जाते. हे मला नेहमीच समजते; पण ते उमजून घेऊन आमच्यात सुधारणा मात्र होत नाही. तर, 'एक शिक्षित व गॅझेटेड पदावर बसलेली बाई', जी माझी 'बॉस' आणि 'एक सुशिक्षित व सुसंस्कृत बाई', जी माझी 'आई' - या दोन चपखल विरुद्धार्थी शब्दांप्रमाणे भासणाऱ्या महिलांमध्ये, मी कित्येकदा मनातून तुलना केली असेल. पहिली, जी मला गृहीत धरते आणि दुसरी, जिला मी गृहीत धरते. जोंपर्यंत समोरून कुठला विरोध किंवा बंड होत नाहीना, तोपर्यंत गृहीत धरणे अविरत चालूच राहते, हा इतिहास आहे. आणि म्हणूनच नऊ महिने गप्प राहिल्यानंतर, दोन दिवसांपूर्वीच मी बॉस ला निक्षून सांगितले होते, "मला किरकिर, कटकट, रागावणे या गोष्टी अजिबात सहन होत नाहीत. त्याचा माझ्यावर आणि माझ्या कौटुंबिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. माझ्यावर ओरडून धाक दपटशहा दाखवून प्रेशराईज कराल, तर तुमची सबोर्डीनेट म्हणून काम करणे मला जमणार नाही, तेच शांततेत सांगाल, तर कामाचे आउटपुट नक्कीच काही पटीत मिळेल. कृपया, सौम्य भाषेत आणि शांततेत बोलत जा."


असो! तर प्रयत्नपूर्वक दिवसभरात झालेला घटनाक्रम विसरून एक पुस्तक हाती घेतले आणि डाव्या कुशीवर वाचत बिछान्यावर पडले. वाचता वाचता कधी डोळा लागला ते समजलेच नाही. कधीतरी अचानक जाग आली.. जरा कूस बदलावी म्हणून उजव्या कुशीवर वळणार तर, डाव्या हातात भयंकर कळ आली, हात जागचा हालेना. हाताच्या पाची बोटांना मुंग्या आलेल्या आणि हात जड पडलेला. जिवाच्या आकांताने जोरात ओरडले. पण माझा आवाज खोलीच्या भिंतींमध्येच जिरून गेला. मोठ्या कष्टाने उजव्या हाताने जोर लावून डावा हात वर उचलण्याचा एकवार नाही कित्येकदा प्रयत्न केला पण थोडा वर उचलून धरला, की डावा हात धपकन खाली पडत होता. जणू त्याचे आणि या शरीराचे काही घेणेदेणेच नसावे. मानेपासून खांदा आणि संपूर्ण डावा हात तीव्र वेदनांनी फणफणत होता. कोपरा जवळची एक शीर जोरजोरात फडफडत होती. डावी बाजू.. अरे देवा! माझे हृदय पण डाव्याच बाजूला आहे ना. म्हणजे मी... मला ...माझे.. आता... राम कृष्ण हरी?.. नको नको ते विचार काही क्षणात मनात डोकावून गेले..


सगळे अवसान एकवटून बिछान्यावरून उठले. त्या तीव्र वेदनांनी जखडलेला आणि जवळपास बाकीच्या शरीराशी समन्वय संपलेले असावा असा तो जड डावा हात उजव्या हाताने तोलून धरला, नि उठून बाजूलाच पडलेल्या मोबाइलमध्ये बघितले. आताशी सकाळचे पाच वाजले होते. सर्व प्रथम गिरीशची आठवण झाली. फोन करून त्याला विचारावे का? झोपला असेल, नकोच. पण समजा, जर हा माझा 'शेवटचा क्षण' असेल तर, निदान माझे काय आणि कसे झाले, हे तरी घरी माहित असावे ना! त्याला फोन लावला. असा अवेळी आलेला माझा फोन बघून, तो देखील घाबरला. त्याचा आवाज ऐकून मी रडायलाच लागले, त्याला म्हटले, "गिरीश, मला डाव्या बाजूला.. मान, खांदा.. प्रचंड वेदना होतात आणि हात जड पडलाय, म्हणजे मला अटॅक येतोय का? सगळे संपलंय का?" त्याचाही आवाज घाबरलेला. पण, तरीही मला धीर देऊन तो म्हणाला, "नाही गं, असे काही नाही होत तुला. एवढ्या लवकर नाही मरायचीस तू." (खरे तर अशा भयानक प्रसंगीदेखील जागृत असलेल्या त्याच्या 'विनोदी बुद्धी'चा मला त्या क्षणी प्रचंड राग आला.) तो म्हणाला, "एक गोळी घे आणि उठलीच आहेस तर जा सायकलवर चक्कर मारून ये.. वाटेल तुला बरे काही तासांत." त्याने सांगितलेली गोळी डब्यातून शोधून मी घेतली. आणि पुन्हा बिछान्यावर अंग टाकले.


इतक्या असह्य वेदना असताना देखील माझा मेंदू जरा जास्तच वेगाने विचार करू लागला. त्या क्षणी, हृदयाच्या वाढलेल्या धडधडीचा वेग जास्त होता, की डोक्यात येणाऱ्या असंख्य विचारांचे पर्मुटेशन कॉम्बिनेशन करून, विभिन्न निष्कर्ष काढण्याचा मेंदूचा वेग अधिक होता - हे आता तरी मला सांगता येणार नाही. समजा, आता मला झोप लागली आणि मी उठलेच नाही तर? अरे देवा! अजून तर खूप काही करायचे बाकी आहे. खूप काही बघायचे अनुभवायचं बाकी आहे. खूप काही सांगायचे बाकी आहे. आणि खूप काही ऐकायचे बाकी आहे. नाही! एवढ्यात माझा श्वास मला थांबू द्यायचा नाहीये!!


मरणाचे भय खरेच किती भयंकर असते, हे त्या क्षणी माझ्या शरीरातल्या कणाकणाने अनुभवले. आपण कितीही ठरवले, की आता झालेय सगळे करून, मिळवून आणि बघून; तरी जीवनाची आसक्ती इतकी तीव्र असते, की मरणाच्या दारातूनही कित्येकदा या जीवनाच्या आसक्तीमुळे माणसे सहीसलामत परत येतात. मुळात जीवन म्हणजेच आसक्ती. जगण्याची, अनुभवण्याची, काही तरी मिळवण्याची, ते मिळवण्यासाठी धावण्याची आणि मिळाल्यानंतर झालेल्या आनंदात न्हाऊन निघण्याची. माणसाचा 'जन्म'च जर दोन जीवांना एकमेकाप्रति असलेल्या 'प्रेमाच्या आसक्ती' मधून झाला असेल; तर आईच्या गर्भातून या भूतलावर अवतरल्या नंतरच्या क्षणापासून - शेवटपर्यंत निरंतर जगण्याची आसक्ती असणे स्वाभाविकच आहे.


मग प्रश्न पडतो, माणसे आत्महत्या का करतात? जगण्याच्या आसक्तीवर मात करणारी इतकी निराशा कुठून येते त्यांच्या ठायी? अंहं! याची उहापोह इथे नको! पुन्हा कधीतरी!

तर, 'माणूस हा असक्तीने ओतप्रत भारावून गेलेला प्राणी आहे' याचा मला खऱ्या अर्थाने त्या दिवशी साक्षात्कार झाला! पण असं असले, तरी एक दिवस असा एक क्षण येणारच, की जो आपला 'अंतिम क्षण' असणार. आणि 'त्या क्षणी' तरी मला सगळे समाधानाने संपवायला आवडेल. नक्कीच! त्या क्षणी मला कुठलेही भय नसावे, आसक्ती नसावी, हुरहूर नसावी नि ओढही नसावी. असावे ते फक्त समाधान. जे समाधान, माझे आजोबा गेले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ओथंबून वाहिलेले मी बघितलंय.

आजोबा नेहमी म्हणत, "आजचा दिवस माझा. काळावर मात करणे मानवाच्या हाती नाही. कित्येक स्वप्न उराशी बाळगून आणि कित्येक योजना डोक्यात घेऊन आपण रात्री झोपतो. झोपताना न चुकता घड्याळाचा अलार्म लावतो. घड्याळ नवीन आहे, घड्याळाचा सेलही नवा आहे. उद्या सकाळी आपण ठरवलेल्या वेळी अलार्म वाजणारच. पण रात्रीतून आपल्या आयुष्याचा सेल संपला तर? घड्याळाचा अलार्म वाजतच राहील न चुकता.... आणि आपण मात्र - राम कृष्ण हरी!"


तात्पर्य हेच, की आहे त्या दिवशी जे करायचेय ते करून घ्यावे. उद्यावर विसंबून राहायलाच नको मुळी. 'आताचा' आहे तो क्षण आपला. पुढल्या क्षणाची आपण खात्री नाहीच देऊ शकत. या आयुष्यात मिळविण्यासारखे सगळ्यात मौल्यवान जर काही असेल तर ते म्हणजे 'आताचा क्षण'. जो तुम्ही अनुभवा किंवा नका अनुभवू, पण पुढल्या क्षणी तो हातून निसटणार आहे.. कायमचाच. म्हणून जे जगायचंय ते आता आणि याच क्षणी! बाकी सब राम कृष्ण हरी!Rate this content
Log in