Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Tragedy Others

3.3  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Tragedy Others

अनामिका भाग ५

अनामिका भाग ५

3 mins
680


एकमेकांच्या सहवासातील ते दोन सुखद दिवस काळाच्या असीमपटलावर कापराप्रमाणे क्षणात विरून गेले. सलग दोन दिवस एकाच बिंदूवर खिळलेली वेळ कटिबद्ध होण्यासाठी पुन्हा एकदा जलद गतीने पुढे सरकू पाहत होती. वेळेचा अखंड प्रवासच तो काय या भूतलावरील अबाधित सत्य असावा... आणि वेळेसोबत आपल्यालाही पळणे भाग असते.


लोणावळा ते दादर पर्यंतचा दोघांचा प्रवास अबोल असला तरी त्यांची मने विना अडथळा एकमेकांशी अखंड संवाद साधत होती. काचेतून बाहेरचं निसर्गसौंदर्य न्याहाळताना वैभवला जाणवले, दीर्घावधीच्या दुष्काळानंतर वैराण झालेली धरित्री मेघराजाच्या अविरत बरसण्याने आता हिरव्यागार निसर्गाचा शृंगार लेऊन नि धुक्याच्या रूपातील सोज्वळ लज्जा ओढून अधिकच लाघवी दिसत होती... अगदी त्याच्या अनामिकेप्रमाणेच.


मुंबईत पोहोचल्यानंतर तिच्या फ्लाइटला अजूनही अवकाश असल्यामुळे दोघं गेट वे ऑफ इंडिया ला गेले. ‘ताज' कडे पाठ करून एकमेकांच्या कमरेत हात घालून फोटो काढण्याचा मोह दोघांनाही आवरता आला नाही. दोघांच्या त्या चार दिवसांच्या रम्य आठवणींच्या अनमोल शिदोरीसोबत तेवढा फोटोच तो काय फक्त भौतिक साक्षीदार होता.


सायंकाळी पाच वाजता एक टॅक्सी एअरपोर्ट च्या दिशेने निघाली नि दुसरी बरोबर विरुद्ध दिशेने पुण्याकडे... 

एअरपोर्टकडे निघालेल्या टॅक्सीत एफ. एम. वर संदीप खरेंचे सूर ऐकू येत होते.. "गाडी सुटली रुमाल हलले.. क्षणात डोळे टचकन ओले.. गाडी सुटली.. हातांमधला हात तरीही सुटेना.. अंतरातली ओली माया तुटू दे म्हणता तरीही तुटेना"… त्या आर्त सुरांच्या समवेत नकळत अनामीकाच्या डोळ्यांमधून विरह बरसू लागला..

जड अंतःकरणाने वैभवकडून "पुन्हा भेटण्याचे" आश्वासन घेऊन अनामिका निघाली होती.. पुन्हा एकदा तिच्या विश्वात. पण तिलाही माहीत नव्हते की यापुढे तिचे संपूर्ण विश्व आता वैभवमय असणार होते; तो सोबत असला काय किंवा नसला काय!


एअरपोर्ट वर त्याने दिलेलं ‘वपुर्झा' वाचण्यासाठी तिने उघडले. ज्यात तिने ‘ताज’ समोर काढलेला त्यांचा फोटो ठेवला होता. फोटो बघताना ती स्वतःशीच म्हणाली "किती परफेक्ट आणि खुश दिसतात दोघे एकत्र" आणि पुढल्या क्षणीच तिने स्वतःचीच जीभ चावली. तिच्या सुखाला तिची स्वतःची देखील नजर लागू नये असं तिला त्या क्षणी वाटलं. तरीही न राहवून ती फोटोकडे एकटक बघतच राहिली. आणि तिच्या विचारविश्वात इतकी खोलवर पोहोचली की ती जेव्हा भानावर आली तेव्हा तिच्या हातात फोटोही नव्हता नि पुस्तकही नव्हते. ती प्रचंड अस्वस्थ झाली. तिच्या शेजारी तर कुणीही बसलेलं नव्हते मघाशी नि आताही. मग पुस्तक गेले कुठे?? तिने आजूबाजूला बघितले. तिची बॅग तिच्या पायाशी प्रामाणिकपणे तिथेच पडून होती ज्यात तिने तिची पर्स तिकिट नि मोबाइल ठेवला होता. त्यानं दिलेलं पुस्तक नि फोटो सापडत नाही म्हणून ती भयंकर अस्वस्थ झाली. आजूबाजूला चौकशी केली पण पुस्तक नि फोटो काही सापडलंच नाही. चौकशी कक्षावर जाऊन तिने तक्रार नोंदवली. काहीतरी भलतंच घडतंय हे सगळे असं तिला वारंवार जाणवू लागले. तिच्या पुस्तकाचा नि त्यांच्या फोटोचा कुणाला नि कशासाठी मोह होणार होता? तिने विमानतळाच्या आतच असलेल्या फोनबुथ वरून वैभवाचा नंबर डायल केला. पण तोही अजून नेटवर्क मध्ये आलेला नव्हता.


आता मात्र अनामिका लहान मुलासारखी हमसून हमसून रडू लागली. ती वैभव ला सोडून निघाली म्हणून रडत होती की पुस्तक नि फोटो हरवलं म्हणून रडत होती, हे त्यावेळी कदाचित तिलाही सांगता नसतं आले. तिचे पुस्तक नि फोटो कुठे नि कसे हरवले ते समजलंच नाही तिला. आताशी आयुष्याची सुरुवात करू पाहणाऱ्या तिला नक्कीच अजून तरी समजलं नव्हते की, आयुष्यात काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. ही तर फक्त सुरुवात होती.. भविष्यात तिला सामना कराव्या लागणाऱ्या असंख्य अनुत्तरित प्रश्नांच्या मालिकेची.


Rate this content
Log in

More marathi story from Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Similar marathi story from Tragedy