अजूनही तू माझी गौराई आहेस
अजूनही तू माझी गौराई आहेस


वसुधा ताई दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उत्साहात गौरीच्या आगमनाची तयारी करण्यात व्यस्त होत्या. नाही म्हणायला कोरोना, लॉकडाऊन मुळे यावर्षी फार काही आरास करता येणार नव्हती त्यांना पण काही झालं तरी यावर्षीही स्वतःच्या हाताने गौरीला गजरे मीच बनवणार या मतावर त्या ठाम होत्या. सगळे सणवार हौसेने आणि श्रद्धेने करणाऱ्या वसुधा ताईंपुढे याबाबतीत त्यांच्या नवऱ्याचं,मुलाचं आणि सुनेचही काही चालत नव्हतं. यावेळीही दादरच्या फुल मार्केटमधून त्यांच्या मुलाने त्यांना मोगरा,चाफा,निशिगंध, कण्हेरीची फुलं आणून दिली. सकाळीच सगळं आवरून वसुधा ताई फुल ताटात घेऊन गौरीसाठी गजरे तयार बसल्या. एकेक फुल धाग्यात गुंफताना त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वाढत होतं. लॉकडाऊन मुळे आलेलं सावट जणू आतास निवळत होतं. त्या गजरे करण्यात गुंग असताना त्यांची पाच वर्षाची नातही त्यांच्याकडून गजरे शिकायला आली... तसं त्यांचं लक्ष खिडकीतून बाहेर नजर लावून बसलेल्या अस्मिकडे गेलं.
"अग अस्मि तिथे काय बसलीस...तुलाही आवड आहे ना गजरे करायची...ये मग दरवर्षी प्रमाणे मदत कर". वसुधाताई अस्मिकडे बघून म्हणाल्या.
तसं किचनमधून त्यांची सून रमा बाहेर येऊन म्हणाली, "आई त्यांना कशाला त्रास देताय...आहे ना छकुली आता तुमच्या मदतीला. करा दोघीच गजरे..छकुलीही शिकेल म्हणजे".
आपल्या वहिनीच म्हणजे रमाच हे बोलणं ऐकून अस्मि जागेवरून उठता उठता परत खिडकीत बसून बाहेर बघू लागली. वसुधा ताईंनीही रमाच म्हणणं ऐकून घेतलं आणि काहीच न बोलता गजरे बनवायला लागल्या. पण त्यांचा प्रसन्न चेहरा चिंतीत झाला...अस्मिकडे बघून त्यांचं मन भूतकाळात गेलं. बँकेत चांगल्या पोस्ट वर नोकरीला असलेल्या अस्मिच लग्न त्यांनी पाच वर्षाआधी गडगंज श्रीमंत घरात जन्मलेल्या आणि घरचाच बिझनेस सांभाळत असलेल्या अशोक सोबत धुमधडाक्यात लावून दिल होतं. घर,श्रीमंती,बिझनेस सगळं अगदी सोन्यासारख असलं तरी ज्याच्या सोबत अस्मिची सात जन्माची गाठ बांधली होती त्या पैशाचा माज असलेल्या, स्त्रीला केवळ आणि केवळ उपभोगती समजणाऱ्या अशोक सोबत स्वाभिमानी अस्मिचा संसार मात्र फार काळ टिकला नाही. बरेच वाद, आरोप, प्रत्यारोप झेलून अस्मिने दोन वर्षातच अशोक पासून घटस्फोट घेतला आणि आई वडिलांकडे राहायला आली. स्वावलंबी, स्वाभिमानी अस्मिला या लग्नातून इतका धक्का बसलेला की दुसऱ्या लग्नाचं नाव काढल तरी तिला त्रास व्हायचा. "मी जड झाले का तुम्हाला?? एकदा लग्न करून गेली म्हणजे मी या घरासाठी कायमची परकी झाली का? आता या घरावर काहीच हक्क नाही का राहिला माझा?" या तिच्या प्रश्नांसमोर तिच्या भविष्याची चिंता असणारे आई वडील अनुत्तरित व्हायचे. मागच्या तीन वर्षात स्वतःला सावरत अस्मिने घरची आणि आई वडिलांचीही जबाबदारी चोख सांभाळली होती. भाऊ वहिनी हे परगावी राहत असल्यामुळे आई वडिलांसाठी अस्मिच जवळचा आधार देखील होती आणि काळजीही.
गेल्या तीन वर्षात अस्मिच बँकेत प्रोमोशन होऊन ती करिअर मध्ये बऱ्यापैकी सेटल झाली होती. आई वडिलांचे छोटे मोठे आजार, त्यांची औषध, घरखर्च या जबाबदाऱ्या पार पाडत तिने राहत्या घराचं बरचसं कामदेखील करून घेतलं होतं. भावाला उद्योग धंद्यासाठी पैसे द्यायला तिच्या वडिलांनी जे कर्ज घेतल होत ते देखील तिने फेडल होतं. 1bhk ची रूम तिने काम करून 2 बीएचके करून घेतली होती. संसारात गुंतलेला भाऊ परगावावरून कधी परत येईल ही आशाच तिने आणि तिच्या आई वडिलांनी सोडून दिली होती. पण कोरोनाच भयंकर संकट आलं आणि तिचे भाऊ वहिनी छोट्या चिमुकलीला घेऊन, संसार गुंडाळून तडक इकडे घरी परतले. अस्मिला आनंदच झाला ते आल्यावर पण रमा मात्र अस्मिसोबत तितकी खुश नव्हती. घरी परतल्यावर आपसूकच सून म्हणून घराचा सगळा ताबा तिच्या कडे गेला. भावाचा बिझनेस लॉकडाउनच्या काळात मंदावला आणि आणखी तीन पोटांची जबादारी अस्मि वरच आली. विनातक्रार अस्मि सगळ्यांना खुश ठेवत होती पण रमाच्या वागण्यात तिला बदल जाणवत होता. घरातील कोणत्याही मोठ्या निर्णयात, सणवारात, धार्मिक कार्यात कुठंही अस्मिची लुडबुड तिला चालत नव्हती. "आता स्वतःच घर, संसार उभारण्याचाही विचार करा वंत्स." अस बोलता बोलता ती बोलून गेली होती. रमा तशी मनाने वाईट नव्हतीच पण शेजारी पाजारी, तिच्या माहेरचे अस्मिबद्दल जसे तिचे कान भरायचे त्याचा तिच्यावर जबर परिणाम होत होता.
वसुधा ताईंना रमाच वागणं खटकत होतं पण घरातील वाद विकोपाला जायला नको म्हणून त्या मूग गिळून शांतच बसण्यात धन्यता मानायच्या. आजही रमाने जाणून बुजून अस्मिला गजरा करण्यापासून लांब ठेवलं तरी त्या शांतच बसल्या. डोळ्यात पाणी आणून विचार करू लागल्या, काय चूक माझ्या पोरीची? आजही हा संसार, घर तिच्याच जीवावर चालतं... ही रमा घरात येण्याआधीही ती या घरात आली, मुलगी म्हणून तिचा तितकाच अधिकार आहे या घरावर. आणि तिचा जीवनसाथी अयोग्य लाभला यामुळे ती अशुभ झाली का??? घरासाठी राब राबावं तिने आणि घरात शुभ कार्य असलं की कुठल्यातरी कोपऱ्यात अडगळी सारखं बसून राहावं तिने??? का?? एका घटनेने तिच्या माणूस असण्यावर,तिच्या भावनांवर, तिच्या आनंदावर कसा ठपका बसू शकतो?? तिला जस आहे तस राहायची, वागायची मुभा मिळालीच पाहिजे..तो तिचाच अधिकार आहे. या विचारातच वसुधाताई अस्मि जवळ गेल्या व तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. तसं अस्मि आईच्या कुशीत शिरून रडू लागली. कदाचित याच मायेच्या हातासाठी ती गेले कित्येक दिवस आसुसलेली होती. आईच्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली, "मूर्तीरूपी लेकी साठी एवढी तयारी करतेस...तिचं एवढं कौतुक सगळ्या घरालाच. याबद्दल मला द्वेष किंवा तक्रार नाही ग पण मलाही या घरात फक्त आपलेपणाच प्रेम हवंय. मी हक्क दाखवते घरावर वगैरे अस काहीच नाही पण तुमच्याच कुटुंबातील व्यक्ती म्हणून मला स्वीकारा.... का तुला आणि बाबांनाही मी आता..."
अस्मिच बोलणं पूर्ण होण्याआधीच वसुधाताईंनी तिच्या तोंडावर हात ठेवला. तिचे डोळे पुसत म्हणाल्या, "मी आजवर मुलगा मुलगी कधीच भेद केला नाही..करणारही नाही पण कदाचित परिस्थितीच्या प्रवाहात मी ही वाहवत गेले...तू या घराचा आधार असून, या घरचाच एक भाग असूनही तू दुर्लक्षित होतेस हे कळत असूनही शांतच बसले. एका तुटलेल्या नात्याची झळ तुला तुझ्याच माणसांपासून दूर नेते... त्या झळीचे चटके अजूनही तुला सहन करावे लागतायत हे दिसूनही डोळे बंद करून घेतले. पण आता नाही बाळा...तू लहानपणी प्रत्येक गौरीला एक प्रश्न विचारायचीस "आई मीच तुझी गौरी आहे ना ग" आणि मी ही तुला कुशीत घेत म्हणायचे "हो ग राणी तूच माझी गौराई आहेस". आजही तेच म्हणेन अजूनही तूच माझी गौराई आहेस आणि कायम राहशील. बाबा आणि माझ्यासाठी तू आमचा जीव होतीस आणि राहशीलच आणि या घरात तुला तुझं स्थान नक्कीच मिळेल. एक पाहुणी म्हणून नाही तर लेक म्हणूनच. हे घर तुला कधीच परक मानणार नाही "
वसुधाताईंनी अस्मिच्या हाताला धरत गजरे बनवायला बसवलं. नवीन साडी आणले ती गौरी आल्यावर तूच नेसून गौराईची पूजाही तूच कर असंही सांगितलं. रमा पुढे येऊन काही बोलणार इतक्यात त्यांनी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला ज्यात तिला सगळं समजून गेलं. अस्मि खरी गौराई आहे आणि तिचा योग्य तो आदर आपण करायला हवं हे तिलाही समजून चुकलं.आज घरातली गौराई प्रसन्नतेने हसत होती.
लेकीचं लग्न झालं, काही कारणाने ते तुटलं किंवा अजून काही विपरीत घडल्यानंतर ती माहेरी येते (आपला हक्काचा आधार समजून) पण पुन्हा लेक म्हणून तिला मनापासून स्वीकारलं जात का??? का ती जबाबदारी किंवा ओझं म्हणून वागवली जाते?? काय हरकत असते तिला तीच स्थान परत देण्यात?? याच विषयावर भाष्य करणारी ही कथा वाचून तुमची मते मांडायला विसरू नका.