आठवणीतील ती....
आठवणीतील ती....


ज्या व्यक्तीशी खुप काही बोलावं आणि तीच व्यक्ती जवळ नसावी याचीही सवय होते हळूहळू. कॉलेजची सोनेरी वर्ष संपली आणि ती ही एखाद्या पाहुण्यासारखी दूर निघून गेली. त्या भारलेल्या दिवसांची मैफल तशीच मनात रेंगाळते, पण एखादा सूर लावावसा वाटला तरी तानपुरा जुळतोच असं नाही. यालाही किती वर्ष उलटून गेलीत. पण त्या दिवशी अचानक ती भेटली आणि आठवणीतले कित्येक क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले.
दूर लांबच्या गावाहून अकरावीत आलेल्या त्या मुलींच्या घोळक्यात त्या एकाच मुलीबद्दल माझ्या मनात विलक्षण ओढ का असावी. असा कधी कधी मलाच प्रश्न पडायचा. खरंतर माझा तो नेहमीचा मित्र, बडबड्या सवंगडी, आणि शायनिंग फ्रेंड यांच्याही पलीकडे जाऊन मी कधी कुठल्या मुलीशी मैत्री करेल हे शक्यच नव्हतं. पण तरीही या मुलींशी आणि बहुतांशी त्याच एका मुलीशी माझी मैत्री असावी असं कित्येक वेळा वाटुनही जायचं. चुकून कधीतरी तिच्याशी बोलणं होत होतं तेंव्हा खुप छान वाटायचं. पण तरीही तिच्यात आणि माझ्यात बरीच तफावत आहे असं वाटत रहायचं. ती हुशार मी असा टवाळखोर, ती थोडी चांगल्या घरातील तर माझी परिस्थिती हालाकीची.. याही पलीकडे जाऊन विचार करायचा झालाच तर वर्गात कितीतरी माझ्यापेक्षा स्मार्ट मुलांच्या गळ्यातील ती ताईत होती. या सर्वांचाच मला कुठे मेळ घालता येत नव्हता. पण तिच्या त्या नजरेतील ओलावा मला बऱ्याचदा ओळखीचा वाटायचा. अगदी अकृत्रिम स्वतःच्या जाणिवेशी आणि मैत्र या भावनेशी प्रामाणिक. जिवाभावाचं "सख्य" असं सहकंपातूनच जन्म घेत असावं. तारुण्याची लहर नवा उन्मेष जागवत होती. आणि बघता बघता कॉलेज संपलं.
हातातून अलगद वाळू निसटून जावी त्या प्रमाणे ते सोनेरी क्षण निघून गेले. कॉलेज संपल्यावर आम्ही सर्वच जण आपापल्या विश्वात हरवून गेलो. तिच्याही असण्याची सवय हळूहळू कमी केली मग मी. वेगळं आभाळ तिचंही आणि माझंही. त्यादिवशी ती भेटली होती त्यानंतर कधीतरी फोनवर बोलणं होतं आमचं. बरंच काही शेअर करतो आम्ही जेंव्हा ती फोन करते आणि म्हणते "तुला ना माणसं ओळखता नाही येत रे माझं प्रेम होतं तुझ्यावर..."