आठवणीच्या हिंदोळ्यावर
आठवणीच्या हिंदोळ्यावर
तुला पाहिले मी.. आणि तुझ्या वलयात इतका गुरफटलोय आणि आठवणीच्या हिंदोळ्यावर झोके घेत राहिलो. खरंच की तुझा चेहरा बघायचा राहूनच गेला होता. आता तू मिळाली, नाहीतर या सुगंधाने मी पुरता पछाडलो होतो. माझ्या प्रत्येक श्वासावर तुझेच नाव कोरले होते म्हणून मला या जन्मी तू भेटली. तू खरंच मला भेटली ना मयुरी? मधुर सारखा मयुरीला विचारत होता.
प्रेम काय असंच असतं! हा हृदयाचा कोमल भाव असतो परंतु आठवणीच्या झुल्यात मी पुरता झोके घेत कसे दिवस काढले हे माझं मलाच समजत नाही. जो प्रेमबंधनात अडकतो, त्यालाच या प्रेमाचा अनुभव असतोय. खरंच मयुरी मला आपल्या प्रेमाचा अनुभव काळजातून झाला होता, आणि मधुरने मयुरीला आपल्या अलगद हातांनी कवटाळले. या उमललेल्या भावांतून प्रेमाचं प्रत्यारोपण होवून त्यांचे विश्वच बदलले. तो आधीन होवून एकमेकांप्रती ओढीने पाण्याच्या धारेसारखा वहावत गेलाय. या प्रेमाचा मोहपाश अगदी डोळ्यावर झापड असल्यागत नशेत बेधूुद बेफाम वाऱ्यासारखा बेलगाम पळत होता. दोघांनाही जुन्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलवत बेभान करीत होती.
तो दिसायला सर्वसाधारण होता. त्याचे व्यक्तित्व लोभस व सुरेख होते. भारदस्त कुरळे केस, चमकदार डोळे, मुखावर पाणीदार तेज होते. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळीच चमक दिसायची. तो मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे लहान, मोठ्यांची अनेक कामे तो स्वखुशीने करायचा, घरची परिस्थिती बेताचीच होती. शेतीवाडी करून थोड्या मिळकतीत कुटूंब आपल्या संसारात समाधानाने आईबाबासोबत रहायचे. काटकसर करून त्यांनी आपल्या लाडक्या मुलास बाहेरगावी शिकायला ठेवले होते. चांगल्या कॉलेजात अॅडमिशन केले होते. तो सायन्सचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या वातावरणातही तो चेकाळला नव्हता. त्याचे गंभीर व्यक्तित्व होते व त्याचे नाव मधुर होते.
तो लायब्रेरीत जात असताना एका मुलीची टक्कर झाली आणि मधुरच्या नाकात तो वेगळाच सुगंध आला. तसा सुगंध त्याला या आधी कधीच जाणवला नव्हता. तो मागे पलटून पहात असताना कोण्या मुलीची पाठमोरी आकृती दिसली व क्षणात ती मुलगी नजरेआड झाली. तिच्या कपड्याचा रंगसुद्धा त्याने बघितला नव्हता. त्याचे पूर्ण लक्ष त्या सुगंधावर केंद्रित झाले होते. तो संपूर्ण कॉलेजमध्ये तिचा शोध घेवू लागला, पण त्याला ती मुलगी सापडली नाही. तो विमनस्क मनाने आपल्या घरी आला, पण त्याचे पूर्ण लक्ष त्या सुगंधात सामावलं होते. त्या गंधाने पुरता गोंधळून गेला होता. त्या सुगंधाच्या शोधात दररोज घाईने तयारी करून तो कॉलेजमध्ये जायचा, पण पदरी निराशा घेवून घरी यायचा.
तिकडे त्या मुलीची पण स्थिती जवळपास अशीच झाली होती. ती रोज कॉलेजला येवून त्याच सुंगधाचा सारखा शोध घेवू लागली. ती कॉलेजला आली की मुलामुलींचा घोळका तिच्या मागेपुढे माश्यांसारखा घोंगावत असे. ती प्रतिष्ठित घरची एकुलती एक मुलगी होती. तिचं नाव मयुरी होते. नावाप्रमाणेच ती सौंदर्याची
मूर्ती होती. कमनीय बांधा व गालावर व हनुवटीवर खळी पडायची, लाघवी बोल व स्मितहास्याने तिने सुंदरतेच्या साऱ्या सीमा काबीज केल्या होत्या. कॉलेजमध्ये तिचे पाऊल पडले की सर्वत्र चैतन्य वाहू लागायचं! हास्याचे फवारे उमटायचे. तिची चाल डौलदार असून केसांचा घनदाट मेघाच्या छायेसारखा सळसळणारा तांबूस किरणाच्या प्रकाशासारखा सोनेरी रंग होता. तिची साथ सर्वांनाच हवीहवीशी वाटायची. ती वर्गात हुशार नव्हती, तरीपण तिच्या स्वभावातला गोडवा, मधुर बोल त्यामुळे ती बऱ्याच दिलांची चहेती झाली होती. सर्वांशीच ती प्रेमाने बोलायची, विचारपूस करायची, तिला कुत्सित प्रवृत्ती किंवा लोचट प्रवृत्तीच्या मित्रमैत्रिणी आवडायच्या नाहीत. ती खूप लाघवी कोमल मनाची दयामाया जाणणारी सदा आनंदात राहणारी खुल्या मनाची होती.
सुट्ट्या लागलेल्या होत्या. नाईलाजाने दोघेही आपापल्या घरी गेले होते. परंतु त्या गंधाला दोघेही विसरले नव्हते. दोघानांही सारखीच तळमळ होती. कश्यातच लक्ष लागत नव्हते. सतत आठवणीच्या हिंदोळ्यावर दोघेही झुलत होते. मनात अनेक प्रश्न करीत होते. एकांतात अश्रृ ढाळीत होते. "काय यालाच प्रेम म्हणतात. "पण हे काय आपल्याला प्रेम तर नसेल झाले ना? नको रे बाबा या प्रेमाच्या गोष्टी! असले फालतू काम आपण कधीच नाही करणार. " प्रेमबिम काही नको, ती फक्त मला एकदा मिळायला हवी. दोन गोष्टी करून तू कुठे अन् मी कुठे, परंतु ती मला सत्यात समोरासमोर मिळायला हवी आहे.
सुट्ट्या संपल्या तशीच मधुरने कॉलेजला धाव घेतली. सरळ लायब्ररीत गेला. तिथे कुणीच नव्हतं अनामिक वेदनेने तो पोळून निघाला व त्याचे डोळे भरून आले. इकडे मयुरीला पण कॉलेजला जाण्याची घाई होती, पण बाबा म्हणाले कश्याला घाई करतेस, आज आपणाला आत्याकडे जायचे आहे आणि आईला घेवुन मार्केटला जायचे आहे. मयुरी उदास झाली, मनाची तळमळ ती सांगू शकली नाही. दोन दिवस गेले. इकडे मधुर तडफडत धावपळ करीत रोज लायब्ररीत जावून बसायचा, पुस्तक समोर पण शब्द दिसत नव्हते. पुस्तकावर डोक टेकवून बसायचा. तोच वाऱ्याची झुळूक आली आणि त्याला तो ओळखीचा सुगंध आला. तो क्षणात ताडकन जागेवरून उठला व भिरभिर चहूकडे बघायला लागला.
लगेच कानावर गोड आवाज आला! ओळखलं काय? तिने प्रश्न केला होता. तो गांगरला. तोच सुगंध ओळखीचा होता. लगेच सावध होवुन म्हणाला, म...म... मला ही ओळखलं काय? तिने आधी उत्तर दिलं! होय, मी त्या सुगंधाला ओळखते, तेव्हा आपली टक्कर झाली होती. ती आपली पहिली भेट होती. काही न बोलताच तिने त्याच्या भारदस्त छातीवर आपल डोकं टेकवले होते. मधुर आवाक होवून उभा राहिला, पण काही क्षणांत त्यानेही धीराने तिच्या माथ्यावर अलगद आपले ओठ टेकवले होते. दोघांच्यांही डोळ्यातून सारखे आनंदाश्रू वाहात होते. जणू किती जन्मापासूनची त्यांची ओळख होती आणि भेटीसाठी आतुरलेली मने आज आनंदाने अश्रू ढाळीत होती.
"प्रेमगंध"दुथडी भरून वाहात होता. जसे हिंदोळ्यावर बसून हवेत अधर तरंगत असल्याचा भास होत होता. एक आनंदाचे वलय त्यांच्याभोवती शीतल धुंद करणारा सुगंध चौफेर पसरला होता.