Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sarita Sawant Bhosale

Drama Tragedy


3  

Sarita Sawant Bhosale

Drama Tragedy


आत्महत्या की खून

आत्महत्या की खून

4 mins 740 4 mins 740

“नेत्रा हे घे पेढे... अग आमच्या ऋतुचं लग्न ठरलं ना... अजून एक वर्ष लग्न नको असंच म्हणत होती ती पण स्थळ खूप चांगलं आहे गं.. सासरे बँकेत नोकरीला होते. मुलगाही बँकेत चांगल्या पोस्टवर आहे... मुंबईत 4BHK फ्लॅट आहे, चारचाकी गाडी आहे बघ, शिवाय घरी प्रत्येक कामाला बाई... गावी जमीन-जुमला, बंगला सगळंच... सासूही चांगली आहे... आता अजून काय हवं मला सांग... म्हणून तिला म्हटलं तुला कसला कोर्स करायचा ते आता नवऱ्याकडेच गेल्यावर बघ, पण इतकं चांगलं स्थळ हातचं नको घालवायला. तू ये हा नक्की लग्नाला...”


काकू म्हणजे ऋतूच्या आई आमच्या शेजारी. अशा चांगल्या बडेजावकी असणाऱ्या बातम्या ताबडतोब सगळीकडे पोहचवणे हा त्यांचा छंदच जणू. ऋतू आणि मी तसं कधी बोललो नाही पण समोर दिसलो की ओळख दाखवण्यापूरती एक स्माईल दोघीही द्यायचो. कॉलेज संपून नुकतीच कुठेतरी नोकरीला लागलेली आणि लगेच लग्नही ठरलं. काकूंच्या मनाप्रमाणे लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर ऋतू तशी एक दोनदाच दिसली माहेरी आलेली, तेही एकाच दिवसात येऊन जायची. काकू सांगायच्या ती सासरी इतकी रमले की तिला इकडे आता करमत नाही.


काही महिन्यांनी ऋतू पुन्हा माहेरी आलेली दिसली... यावेळी मात्र ती महिनाभर राहिली. अधून मधून ऐकायला मिळत होतं की सासरी तिचा खूप छळ होतो... नवरा आणि तिचं पटत नाही त्यामुळे ती निघून आले तिकडून. एक दिवस न राहवून कळजीपोटीच काकूंना कारण विचारलं तर म्हणाल्या, “अगं तिचा नवरा म्हणतोय नोकरी नको करुस... एवढा पैसा आहे आपल्याकडे तुझ्या पगाराची गरज नाही या घराला. एवढ्यावरून ही पोरगी निघून आले बघ. किती समजावते संसारापेक्षा नोकरी महत्वाची का तुला पण ऐकायला तयार नाही.”


आमच्या दोघींचं बोलणं ऋतुने दरवाजा मागून ऐकलं असावं त्यामुळेच काकू घरात गेल्या गेल्या ती त्यांच्यावर ओरडून म्हणाली, “सत्य तुला समजत नसेल पण लोकांना तरी कळू दे... फक्त नोकरीच नाही तर माझ्या जगण्यावरच हक्क दाखवतात ती माणसं... मी चार भिंतीतच राहावी म्हणून कामवाल्या मावशींनाही बंद केलं... घराबाहेर पडू नये म्हणून चोवीस तास कामात अडकवतात मला... खाण्यापासून पेहरावापर्यंत त्यांचीच मर्जी... माहेरी यायचं झालं तरी एकाच दिवसात जाऊन यायचं... नवऱ्याला सगळं सांगावं तर तोही जुनाट विचारांचा... मी काही बोलले तर त्याचा हातच जास्त बोलतो... मैत्रिणींशी बोलून देत नाहीत की कुठे बाहेर जाऊन देत नाहीत... कोणत्या परपुरुषाकडे पाहिलं तरी त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते... पैशाने श्रीमंत असलं म्हणून विचाराने श्रीमंतच असतो माणूस असं नाही ना... नवरा म्हणून ते प्रेम नाही की सासू-सासरे म्हणून कसली माया नाही... स्त्रीला बंधनात ठेवणं म्हणजे त्यांना मोठेपणा वाटतो... माझ्या अस्तित्वाशी सगळा खेळ चाललेला म्हणून आले घर सोडून पण तुला आणि बाबांनाही तुमच्या मुलीचं सुख कशात आहे हे कळण्यापेक्षा त्यांची श्रीमंती दिसते आणि समाज काय म्हणेल याच्या पलीकडे तुमची बुद्धी विचारच करत नाही...”


आज पहिल्यांदाच ऋतूला एवढं चिडून आरडाओरड करून बोलताना मी ऐकलं होतं... मनात साठलेला आक्रोश बाहेर पडत होता. मोठा धक्का बसला तिची परिस्थिती ऐकून पण आश्चर्य वाटलं की मुलीवर एवढा अन्याय होत असूनही काकू तिला सासरी परत जा असंच सांगत होत्या... थोडाफार त्रास प्रत्येकीला असतो सासरी... बाईच्या जातीने सहन करायचं असतं असंच समजावत होत्या... ऋतूला सावरण्याऐवजी तू घरात राहिलीस की तुझ्या मागच्या बहिणीशी लग्न कोण करेल असंच ऐकवत होत्या. त्यानंतर ऋतू बऱ्याचदा ऑफिसला जाताना दिसायची पण ते तेज ते हसू दिसत नव्हतं. आतल्या आत ती घुसमटते असं सारख वाटत होतं.


काकूंच्या सांगण्यावरून तिच्या सासरच्यांनी तिला पुन्हा घरी बोलवलं पण त्याच अटींवर... जिथे तिचा सन्मान होत नाही तिथे ऋतूला परत जायचं नव्हतं... खूप वादावादीतून अखेर तिच्या नवऱ्याने घटस्फोटाची नोटीस पाठवली.


नावालाच नवरा बायको असणाऱ्या या नात्याचा असाच शेवट होईल हे कदाचित ऋतूला माहीत होतं म्हणून नोटीस आल्यावर धक्का न बसता तिच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू आलं. पण काकू मात्र पुरत्या हादरलेल्या... सगळयाच प्रकरणासाठी ऋतूला जबाबदार ठरवत होत्या. ऋतुचं रुटीन नेहमीप्रमाणे ऑफिसला सकाळी जाणे आणि संध्याकाळी घरी येणे चालू होतं आणि घरी आल्यावरही काका-काकू आणि तिच्यातला रोजच होणारा वादही अटळ होता. तू घटस्फोट देऊ नकोस म्हणून दोघेही तिच्यावर खूप दबाव आणत होते... कधी प्रेमाने तर कधी रागावून तर कधी आम्ही तुला सांभाळणार नाही, असं दटावून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते पण ऋतुचं काही झालं तरी घटस्फोट द्यायचं हे ठरलेलंच होतं.


घटस्फोटाची तारीख जवळ येत होती तसा काका-काकूंचा दबावही वाढत होता. भांडणाचं प्रमाण वाढत चाललेलं. एक दिवस काका, काकू, ऋतूची लहान बहीण बाहेरून आले आणि दरवाजा उघडण्यासाठी ऋतूला आवाज देत होते. बराच वेळ झालं तिने दरवाजा उघडला नाही म्हणून माझ्याकडे ठेवलेल्या चावीने त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर पंख्याला लटकून जीव संपवणाऱ्या ऋतूला बघून काका भोवळ येऊन खालीच पडले. काकुही मटकन खाली बसल्या. सगळ्यांचे अवसान गळून पडले.


स्वतःच्या मतांवर ठाम असणारी, परिस्थितीशी चार हात करणारी ऋतू अशा रीतीने आत्महत्या करू शकते यावर विश्वासच बसत नव्हता. का हार मानली असेल तिने? एक नातं तिच्या जीवावर हावी झालं का?? खरंच तिने आत्महत्या केली की तिचा खून केला गेला?? कोणी केला खून - मुलीच्या सुखापेक्षा बुरसटलेल्या समाजाचा जास्त विचार करणाऱ्या आईवडिलांनी? श्रीमंतीचा आणि पुरुषी अहंकार असलेल्या तिच्या नवऱ्याने?? जुन्या परंपरा आणि विचारांची बेडी तिच्या पायात बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासू-सासऱ्यांनी की नवऱ्याने सोडलेली म्हणजे ती available असं समजून रोज तिला छेडणाऱ्या वखवखलेल्या नजरांनी??


तिच्या मनाचा, तिच्या विचारांचा, तिच्या स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा खुनच झाला होता. खून कदाचित टळला असता जर तिच्या आपल्या माणसांनी तिला मायेने गोंजारलं असतं... प्रेमाने जवळ घेऊन थोपटलं असतं... हातात हात घेऊन आम्ही सोबत आहोत असा विश्वास दिला असता तर... तर अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी ऋतुने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला नसता.


आजच्या एकविसाव्या शतकात स्वकर्तृत्वाने अस्तित्व उभं करणारी स्त्री जेव्हा आपल्याच माणसांसमोर हार मानून स्वतःला संपवते तेव्हा मन विषण्ण होतं. स्त्री बाबतीत अजून खूप मानसिकता बदलण्याची, विचारसरणी बदलाची गरज आहे, हे प्रकर्षाने जाणवतं.


Rate this content
Log in

More marathi story from Sarita Sawant Bhosale

Similar marathi story from Drama