Shilpa Desai

Fantasy Inspirational

3  

Shilpa Desai

Fantasy Inspirational

आणि आयुष्यात रंग भरला

आणि आयुष्यात रंग भरला

3 mins
226


स्टेजवर टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना निरजाचे डोळे आनंदाने भरून आले. केलेल्या कामाचा, परिश्रमाचा लेखाजोखा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. अत्यंत गरीबीत वाढलेली ती लहानपणी मकरसंक्रांतीला सुगड रंगवून आपल्या आई बरोबर विकायला बाजारात जात असे. तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायचा तिला जणू छंद लागला होता. त्या मातीच्या घड्यावर नाजुक नक्षी काढताना ती त्या कामात समरसून जायची. म्हणूनच तर तिच्या नाजुक बोटातून उत्तम उत्तम कलाकृती निर्माण होत होती.


नीरजा दहावीत शिकत असताना नागपंचमीसाठी महिनाभर रात्रंदिवस जागून तिने मातीचे नागोबा बनवले होते. ते विकून नीरजाने घरात आई, वडील व भाऊ यांना पुढे येणाऱ्या गणेशोत्सवासाठी नवीन कपड्यांची खरेदी केली होती. त्या गोष्टीमुळे तिच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला होता. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले.

परिस्थितीला तोंड देत मोठी होत असताना गरज म्हणून मातीच्या वस्तू बनवत राहिली. हळूहळू तिचा तो छंदच बनला. नीरजा नावाप्रमाणे पाणीदार निळसर डोळ्यांची. तिचे लांबसडक काळेभोर केस तिच्या सौंदर्यात आणखीन भर घालत होते. तिच्या त्या सोनकांती सुंदरतेला पाहून नारायणशेठ यांनी आपला मुलगा प्रकाश साठी नीरजाला मागणी घातली. काही दिवसातच नीरजा व प्रकाशच लग्न झालं. नीरजा गलेलठ्ठ पगार असलेल्या अधिकाऱ्याची बायको झाली. पण सासरी छंद, आवड याला महत्त्व नव्हते. येथे महत्त्व होते ते खोट्या प्रतिष्ठेला. मॉर्डन राहणीमानाला खूपच इम्पॉर्टन्ट होतं.


नीरजाने आवडीने काहीतरी छंद जोपासला, किंवा कलाकृती बनवली तर तु गांवढंळ आहेस, तुला काडीची अक्कल नाही. आमच्या घरात दहा दहा, वीस वीस हजाराचे शोपीस असताना तु असल्या भिकार गोष्टी का करतेस. असंच नवरा बोलायचा. या सगळ्यामुळे तिला आपली आवड जपता येतच नव्हती.


दिवाळी असल्याने आज नीरजा भल्या पहाटे उठली. अभ्यंगस्नान करून नवरा उठायच्या अगोदर दरवाजासमोर कितीतरी दिवसांनी सुबक रांगोळी काढली. कारण त्यानंतर तिला फराळाचे बनवायचे होते. वेळेवर फराळ, नाश्ता मिळाला नाही तर नवऱ्याची बोलणी खावी लागू नये यासाठी तिचा सगळा खटाटोप चालला होता. पुन्हा एकदा रांगोळीवर नजर टाकत ती स्वतःशीच पुटपुटली खुपच छान रांगोळी आली आणि स्वतःवरच खुप खूष झाली. दुसर्‍याच क्षणी तिला आठवलं. दसऱ्याच्या दिवशी ही अशीच सुबक रांगोळी रेखाटत असताना कपाटातील शर्ट मिळत नव्हता याकारणाने प्रकाशने नाजूक वेलबुट्टी काढलेली रांगोळी पायाने विस्कटून टाकली होती. रांगोळीच्या बाजूला लावलेली झेंडूची फुले कुसकरून गेली होती आणि आंब्याची पाने करपून एका कोपऱ्यात पडली होती. प्रकाशच्या अशा वागण्याने त्यादिवशी तिच्या मनातील रांगोळीचे रंग उडून ती बेरंगी झाली होती.


या गोष्टीच्या आठवण होऊन ती थोडी दचकली आणि लगबगीने उठली व स्वयंपाक घरात जाऊन पुन्हा कामाला लागली. दरवाज्यावरची बेल वाजली. नीरजाने दरवाजा उघडला समोर मध्यम वयाच्या सोसायटीतल्या एक बाई हसत मुखाने उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. "ही रांगोळी तु काढलीस का?" म्हणून त्याच बाईंनी प्रश्न केला. "हो, मीच काढली ती रांगोळी." नीरजा ने नम्रपणाने उत्तर दिलं. "किती छान रांगोळी रेखाटली ग, खरोखरच एखादा फोटो किंवा चित्र असाव असंच वाटतं बघ तुझ्या रांगोळीकडे बघून. खरं सांगू, प्रथम मी तुला सॉरी म्हणते कारण मागची पंधरा मिनिट मी तुला न विचारता ही तुझी रांगोळी बघत आहे. इतकी सुंदर रांगोळी मी कधीच पाहिली नाही." बोलता बोलता त्या काकूंनी मग नीरजाला रांगोळीचे क्लास घेण्याविषयी सुचविले. हळूहळू रांगोळी, मग सॉफ्टटॉईज, टाकाऊतून टिकाऊ कलाकृती, शो वस्तू बनविण्याचा क्लास चालू झाला. आणि हे सगळे नवर्‍याच्या नकळत. जेव्हा तो ऑफिसमध्ये जात होता तेव्हा हे सगळं होतं असे. नीरजाच्या हाती आता थोडा पैसा येऊ लागला. कामाची आवड वाढू लागली. काही झालं तरी आपली आवड जपायची. तेही नवऱ्याला न घाबरता, तिने मनाशी पक्कं ठरवलं.


आदिवासी पाड्यातील दहा बायकांना गोळा करून तिने लघुउद्योग चालू केला. त्यात अगदी मातीच्या वस्तू बनवण्यापासून, टाकाऊ वस्तु पासून नवनिर्मिती कलाकृती बनू लागल्या. हळूहळू त्याचा विस्तार तालुकाभर पसरला मग राज्यभर नावलौकिक मिळालं. आणि आज यशस्वी महिला उद्योगाचा पुरस्कार प्राप्त झाला. पहिल्याच रांगेतील खुर्चीत बसून प्रकाश हे पाहत होता. ती जेव्हा पुरस्कार स्वीकारून त्यांच्याजवळ आली तेव्हा प्रकाश नीरजाचा हात हातात घेत म्हणाला,"प्राउड ऑफ यू निरजा. किती कर्तुत्ववान आणि हुशार आहेस हे आज मला कळाले. सॉरी मला माफ कर मी आता तुला नेहमीच तुझ्या कामात सपोर्ट करत राहीन."

नवऱ्याच्या या शब्दाने नीरजा भारावून गेली खऱ्या अर्थाने तिला आज नवचैतन्य मिळाल होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy