आमचे चुकले
आमचे चुकले
एकदा सानेगुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संत्री खात होते. टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफले, साली गोळा केल्या. कागदात बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. सानेगुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला, तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करताच ते सानेगुरुजी आहेत, हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले, "गुरुजी, आमचे चुकले. क्षमा करा.
गुरुजी नम्रपणे म्हणाले, "मी कोण तुम्हांला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये, म्हणून मी ती स्वच्छ केली.
अशी ही गुरुजींची वृत्ती ! आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही.
