आजच्या काळातील सिंदबादची खरी गोष्ट - भाग २
आजच्या काळातील सिंदबादची खरी गोष्ट - भाग २
जलद गतीने बुडत असलेल्या बोटीच्या कॅप्टनच्या केबिनमध्ये मी एकटाच अडकून पडलो होतो ! वादळी वाऱ्याच्या घोंघावातात माझा मदतीसाठी केलेला आरडाओरडा आणी केविलवाण्या हाका कोणालाच बाहेर ऐकू जात नव्हत्या !
इतक्यात खरोखर एखाद्या देवदूतासारखा अचानक दुसरा अधिकारी (सेकंड ऑफिसर) धावत आला. गच्च बंद असलेले दार जोर लावून उघडून त्याने माझी केबिनमधेच जलसमाधीच्या भीषण भोवऱ्यातून सुटका केली ! पण संकट आता तर सुरू झाले होते! आगीतून फुफाट्याट अशी गत होती. आतापर्यंत सौदी बोट 30 डिग्रीच्या कोनाला कलंडली होती. त्यामुळे कुठलाही आधार घेतल्याशिवाय उभे राहणेदेखील अशक्य झाले होते !
तेवढ्यात कॅप्टनने मला "अॅबंडन शिप!" म्हणजे बोट सोडून समुद्रात उडी मार अशा अर्थाचा आदेश दिला! त्यांचा हा आदेश ऐकून मी पूर्ण बुचकळ्यात पडलो. इथपर्यंत मला खरोखरच माझ्या बिनअनुभवी भोळेपणामुळे वाटत होते की बोटीला काहीच धोका किंवा संकट नाही आणि थोड्याच वेळात सर्व काही पूर्ववत नियंत्रणात येउन सगळे शांत अन् सुरळीत होईल. कॅप्टनच्या ह्या निर्वाणीच्या शब्दांनी मला धाडकन भीषण आणि कठोर वास्तव्याशी अवगत केले ! बोट खरोखर बुडतेय आणी आपला वाली कोणी नाही! स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझी मलाच ताबडतोब धडपड करावी लागणार होती !
मी पाहिले की जहाजामध्ये सगळीकडे भीषण हाहाकार माजला होता. प्रवासी, चालक दल, प्रचंड मोठ्याने आक्रोश करत होते, रडत होते. जीव वाचवण्यासाठी आक्रंदून प्रार्थना करत होते. सर्वजण दिशाहीन होऊन सैरावैरा धावत होते.
मला आठवते द्वितीय विद्युत अधिकारी (सेकंड इलेक्ट्रीकल ऑफिसर) आणि बोटीचा डॉक्टर दोघेही वरिष्ठ विद्युत अधिकारी (सीनियर इलेक्ट्रीकल ऑफिसर) ला जहाज सोडायला त्याच्या केबिनच्या बाहेरुन दारावर ठोकत ओरडून ओरडून विनवत होते. पण त्याने आतूनच उत्तर दिले की तो बोटीबरोबार जलसमाधी घेणार कारण तीच त्याची नियती होती!
अखेरीस हार मानून ते स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तिथून निघून गे
ले! पण माझ्या स्मरणातले ते त्यांचे अंतिम दर्शन ठरले! कारण त्यानंतर त्यांचीही गणना "समुद्रावर बेपत्ता" ह्या दुर्दैवी शोकाकुल श्रेणीत झाली!
इतक्यात मी चीफ इंजिनिअर अन् थर्ड ऑफिसरना ऑफिसर्स डेकवर लाइफ जॅकेट घालून उभे असलेले पाहिले. मी त्यांच्या दिशेने जाऊ लागलो. परंतु बोटीच्या हेलकाव्याने तोल जाऊन डेकवर घसरुन मी बोटी बाहेर समुद्रात फेकला गेलो. घसरून समुद्रात कोसळताना माझ्या डोक्यात एकच विचार येत होता "खलास ! आता सारे इथेच संपले ! "धीस इज माय एंड !" बालपणातील एका नर्सरी गाण्याची ओळ सारखी डोक्यात घुमत होती "अँड दॅट इज द एंड ऑफ सोलोमन ग्रंडी !" आपलाही आता शेवट!" पण मी सुदैवी की जास्त इजा किंवा अवयवांना दुखापत न होता मी समुद्रात फेकला गेलो. नंतर वाचलेल्या लोकांकडून कळले की बर्याच जणांचे बोटीच्या ह्या हेलकाव्याने घसरून व समुद्रात कोसळून फ्रॅक्चर्स झाले होते व हाडे मोडली होती !
समुद्रात पडल्यावर मी काही क्रू मेंबर्सना जवळच एका जुन्या फेकून दिलेला, मोडकळीस आलेल्या तराफ्याला धरुन पोहोताना पहिले. मी कसाबसा तराफ्यापाशी तृतीय अधिकारी, ज्याला पोहोतादेखील येत नव्हते, त्यांच्याबरोबर पोहोचलो. नंतर तराफ्याला आणखी मुख्य अधिकारी, वरिष्ठ रेडिओ अधिकारी आणि द्वितीय अभियंत्याची बायको, असे पकडून एकत्रित झालो. पण आम्ही तराफ्यासोबत सोमालियाची किनारपट्टी सोडून अधिकच दूर अथांग अरबी महासागरात खेचले जात होतो! आणि एव्हाना सूर्यास्त होऊन सर्वत्र रात्रीचा काळोख पसरत होता. भयाण अन् भीषण अशा त्या अथांग समुद्रात आम्ही काही मोजके जण त्या एका तराफ्याचा आधार घेऊन जीवासाठी केविलवाणी धडपड करीत होतो. पण वादळ काही केल्या क्षमण्याचे चिन्ह दिसत नव्हते!
द्वितीय अभियंत्याची (सेकंड इंजिनीयर ) बायको ह्या सर्व धुमश्चक्रीत नवर्यापासून तिची ताटातूट झाल्यामुळे सारखी त्याच्या नावाने आक्रोश करीत होती.
अशा सर्व प्रकारच्या प्रतिकूल परीस्थितीमुळे आम्ही पार दमून, थकून, हताश, निराश झालो होतो!