आजच्या काळातील सिंदबादची खरी गोष्ट - भाग ३
आजच्या काळातील सिंदबादची खरी गोष्ट - भाग ३
अशा ह्या नैराश्यपूर्ण अवस्थेत रेडिओ अधिकाऱ्याने सांगितले की त्याने जहाजावरुन एस.ओ.एस. सिग्नल पाठवला होता. जेणेकरुन आम्ही जवळपासच्या बोटींकडून मदतीची अपेक्षा करु शकत होतो. मुख्य अधिकाऱ्यांनीपण धीर दिला की बोट नेहमीच्या जलवाहतुकीच्या मार्गाने जात होती. त्यामुळे त्याच मार्गावरील इतर प्रवाशी अथवा माल वाहतुकीच्या बोटी आमच्या मदतीला नक्की येतील.
अशा त्या कातरवेळी मी इतक्या दिवसांच्या माझ्या आश्रयाला, सौदी बोटीला दृष्टीक्षेपाच्या बाहेर जाताना अखेरचे पाहिले. त्याचा भला मोठ्ठा, म्हणजे टोलेजंग खांब, आता पूर्णपणे समुद्रात बुडू लागला होता. आता तराफ्याभोवती आमचा नऊ जणांचा समूह झाला होता. एक म्हातारा फायरमॅन, एक सुतार, काही खलाशी असे एकत्रित होतो. इतर तरंगणारे तराफे आणि त्यातील वाचलेले लोक असे सर्वजण एका रस्सीने बांधून एक मोठा ताफा बनवला, जेणेकरुन वरुन कुठल्याही बचाव विमानाला आम्ही पटकन हेरले किंवा दिसू शकू. पण रात्रीचा काळोख वाढतच होता. काही काळानंतर आम्हाला दूरवर जाणाऱ्या एका बोटीचे दिवे दिसले. कंठशोष करुन आम्ही सर्व जोराजोरात ओरडू लागलो. पण त्या झंझावातात त्या बोटीला काहीच ऐकू जात नव्हते. काळोखात तर आम्ही दिसेनासे होतो. आशेचा किरण तसाच दूरून निघून जाताना बघून आमच्या थकलेल्या शरीराचा आणि मनाचा असहाय्य अगतिकपणा अतिशय दारूण होता. अखेरीस ती भयंकर रात्र अशीच तराफ्याला धरुन काढावी लागणार हे अटळ झाले. तराफ्यामध्ये आम्ही शिरू शकत नव्हतो कारण मोठमोठ्या लाटांनी आम्ही सारखे तिच्या बाहेर फेकले जात होतो. 4/5 मीटर उंचीच्या प्रचंड मोठ्या लाटा सतत आमच्या डोक्यावर जोरजोराने आदळत होत्या.
हळूहळू त्या लाटांना चुकविण्यासाठी किंवा त्यातून कसेबसे निभावण्याचे तंत्र किंवा युक्ती आम्हाला सुचली. मोठी लाट आमच्या दिशेनी येताना दिसली की आम्ही श्वास रोखून समुद्रात डोके बुडवून घ्यायचो. त्यामुळे त्या लाटेच्या जोरदार तडाख्यातून आम्ही कसेबसे वाचत होतो. ह्यात भर म्हणजे माझ्या बाजूलाच समुद्री आजाराने तृतीय अधिकार्याला उलट्या सुरू झाल्या. मला ते बघून आणखीनच मळमळू लागले.
ती काळरात्र आम्ही कशीबशी एकमेकांना धीर देत, मदत करत, काढली. आजही इतक्या वर्षांनंतर ती आठवली की शहारा येतो. एक म्हातारा फायरमॅन सारखा लाटांच्या जोराने तराफ्यापासून सारखा दूर फेकला जात होता. आम्हाला सारखे त्याला परत तराफ्यापाशी सुरक्षित आणणे हा आणखी एक घोर उपक्रम झाला.
ह्या सर्व भयानक रात्रीत कुठल्याही क्षणी मृत्यू होऊ शकेल हे जाणवत असले तरी, आश्चर्य म्हणजे मला मृत्यूची भीती वाटत नव्हती. मनात एकच विचार होता. आपली आई तर लहानपणीच वारली. मी तेव्हा अर्थातच अविवाहित होतो. कोणाशीही प्रेमवचनात अडकलो नव्हतो. त्यामुळे माझ्या पश्चात माझ्यासाठी दुःख करणारे कोणीच नव्हते. माझे वडिल आणि तिघे भाऊ काही दिवसांनी मला विसरून जातील. सारखी भा. रा. तांबे ह्यांची कविता आठवत होती,
"मी जाता राहील काय काय
जन पळभर म्हणतील हाय हाय ! "
पण ही माझी किती चुकीची समज होती हे मला घरी पोहोचल्यावरच उमगले!
सकाळी आम्हाला सौदीवरचा एक रबराचा तराफा समुद्रात वाहताना सापडला. आम्ही लगेच सगळेजण त्याच्यावर जाऊन कसेबसे बसलो. त्यात आम्हाला डिस्ट्रेस सिग्नल किट म्हणजे मदतीची संकेत सामग्री सापडली. त्या तराफ्यामध्ये इतर जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक सामग्री / साहित्य (सर्वायवल कीट) देखील होते. हा तराफा आम्हाला समुद्राच्या रौद्र स्वरुप आणि तडाख्या पासुन थोडा फार दिलासा देण्यात खूप उपयुक्त ठरला. मुख्य म्हणजे तिच्यात एक तंबूसारखे संरक्षण / सुरक्षा कवच होते जे सूर्याच्या प्रखर उन्हावर मोठी ढाल ठरले.
आम्ही लगेच शिस्तीने बचाव बोटींना हेरण्यासाठी आळीपाळीने वॉच टीम बनवली. अखेरीस सौदी सोडल्यानंतर दुसर्या दिवशी दुपारी साधारण अकरा वाजता सुतार उत्साहाने ओरडू लागला. त्याला दूर एक बोट दिसत होती. तराफ्यामध्ये हर्षोल्लासाची आरोळी उठली. मुख्याधिकाऱ्यांनी लगेच मला रॉकेट फ्लेर उडवायला सांगितले. रॉकेट फ्लेर खूप प्रकाशमय असते. दुपारच्या उन्हातदेखील ते प्रकर्षांने दिसते. रॉकेट फ्लेअर बघून बोट आमच्या दिशेनी येऊ लागली. पण समूद्र अजुनही खवळलेला होता. 12/15 फूट उंच लाटा अजून उसळत होत्या. त्यामुळे आम्ही दिसेनासे होत होतो. मग आम्ही हात भडका (हॅन्ड फ्लेअर) उडवला. तेव्हा ती बोट आमच्या जवळ आली. आमच्या बचावासाठी अमेरिकन नौदल जहाज यू.एस.एस. जोनास इंग्राम आले होते. बचाव नौदल जहाजाने आमच्या राफ्टवरमोठी रस्सी फेकुन तिला जवळ खेचुन घेतले. एक एक करुन सगळे बचाव बोटीवर जाड रस्सीचे दोर आणि जाळयांच्या मदतीने चढले. मला दोन तगड्या अमेरिकन नाविक खलाशांनी हाताची झोळी करुन एखाद्या लहान बाहुलीसारखे उचलून वर घेतले. एवढ्यात नौदल जहाजाच्या हेलकाव्याने माझा तोल गेला. त्यांना वाटले मला खूप लागले, पण मी त्यांना मी ठिक आहे दर्शवून निश्चिंत केले. मग मी बोटीवरचे इतर आधी वाचवलेले क्रू मेंबर पाहिले. सगळे आनंदाश्रूंनी रडू लागले. आनंदाने हर्षोल्लासाने सर्वच ईश्वराला आम्हाला जिवंत ठेवण्याच्या अनंत कृपेसाठी धन्यवाद देऊ लागले!
तो पूर्ण दिवस इतर वाचलेल्यांना शोधण्यातच गेला. नंतर समजले की सौदी बोटीवरील एकूण 98 क्रू मेंबरपैकी फक्त 61 वाचले. इतर 37 पैकी फक्त 10 शव मिळाले. म्हणजे सत्तावीस व्यक्ती "समुद्रात मिसिंग" श्रेणीत आले. बहुतेक करुन ते सौदी बरोबरच समुद्रात समाधिस्थ झाले. खूप जणांना भरपूर दुखापत आणि मुक्कामार लागला होता. मी खूप सुदैवी की किरकोळ जखमांशिवाय आणि कुठलीही मोठी शारिरीक इजा न होता सुखरूप वाचलो होतो. विशेष करुन मी सौदीवरचा सर्वांत लहान क्रू मेंबर होतो.
यू.एस.एस. जोनास इंग्राम बोटीने आम्हाला फ्रेंच सोमालियाच्या जिबूती पोर्टवर आणून सोडले. तिथे काही दिवस सर्व औपचारिक कार्यवाही संपेपर्यंत आम्हाला हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. अखेरीस सौदी बुडाल्यानंतर पाचव्या दिवशी मी घरी परतलो. मुंबई विमानतळावरील सर्व औपचारिकता, प्रोटोकॉल, आमच्यासाठी खास बाजूला सारले होते. वेटिंग लाउंजमध्ये आम्हाला डायरेक्ट नेण्यात आले. तिथे आमच्या स्वागतासाठी एकच तोबा गर्दी झाली होती. माझ्या एकट्याच्या स्वागतासाठी शंभराहून जास्त लोक आले होते. मला घरी एखाद्या, व्हीआयपी किंवा सेलिब्रिटीसारखे नेण्यात आले. तिथून सत्कार सोहोळयांची सुरुवात झाली.
एवढी गोष्ट सांगून माझे वडिल हसले आणि म्हणाले बोटीवरच्या माझ्या आयुष्यात मी सर्व प्रकारची कामे केली आहेत. शौचालय साफ करण्यापासून ते डेक धुण्यापर्यंत कोणतेही काम सोडले नाही.
त्यांची ही थरारक समुद्री साहस कथा ऐकून मला अंगावर शहारा तर आलाच, पण हे ही उमजले की कुठल्याही यशामागे खूप मोठी जिद्द, आणी त्यासाठी सातत्याने केलेले कठोर परिश्रम असतात...
मी गुपचूप माझे अभ्यासाचे पुस्तक उघडून मन लावून वाचू लागलो!
.......समाप्त......