येता पावसाच्या सरी
येता पावसाच्या सरी
आल्या आल्या पहा सरी, येता मातीशी भेटती
आतुरल्या धरतीचे, तृप्त डोळे ओलावती ||
येता पावसाच्या सरी
बरसता मेघराया, पृथ्वी न्हाती धुती झाली
शालू हिरवा नेसून, शृंगाराचा साज ल्याली ||
येता पावसाच्या सरी
बीज जाई खोल, स्वप्न अंकुराचे पडे
दान असे पावसाचे, तिच्या रोमरोमी भिडे||
येता पावसाच्या सरी
टपटप कधी, कधी खळखळाळूनी
राग कुणास माहीत, कोणता गाते पाणी||
येता पावसाच्या सरी
आल्या धारावर धारा, नदी नाले सुखावले
प्रतिबिंब आभाळाचे , त्यात माडांनी वाचले||
येता पावसाच्या सरी
आकाशीच्या मंडपात, सप्त रंगांची कमान
चुरा मोत्याचाउधळे,साज थेंबाचा लेवून||
येता पावसाच्या सरी
जमे सुरेल मैफिल, कधी कोकिळ स्वरांची
पावसाळा साठवण, चिंब भिजल्या क्षणांची||
येता पावसाच्या सरी
