येशील का गं आई ?
येशील का गं आई ?
येशील का गं आई , परतूनी घरट्यात
आस लावूनी बसली पाखरे
आबाळ होते , तुझ्या चिमण्यांची
निखळली आता सारी प्रेमाची दारे ...
पंखातले बळ आता आमुच्या
तुझ्याविना सारे क्षीण झाले
नाही घेता येत उंच भरारी
रंग आभाळाचे कसे उडूनीया गेले ...
वात्सल्याने आम्हां जवळ घेऊनी
भरवील कोण आता, चोचीत दाणे
दिवस प्रत्येक रात्रीचा करूनी
कोण गाईल आता निजताना गाणे ...
सूर आमुच्या वाणीतले
तुझ्याविना गं करूण झाले
ओठातले गीत आमुच्या
ओठातच असे विरूनीया गेले ...
वाटे मज आता , यावे तुझ्याजवळी
अन् पुन्हा अनुभवावे क्षण प्रेमाचे
विसावूनी तुझ्या पंखाखाली
विसरूनी जावे अस्तित्व स्वतःचे ...
