वैकुठींचा हरी
वैकुठींचा हरी
वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां ॥१॥
धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥
बाळ ब्रह्माचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एकमेंकां ॥३॥
दहीं भात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी वाढितसे ॥४॥
श्रीहरी वाढिलें गोपाळ जेविलें । उच्छिष्ट सेविलें एका जनार्दनीं ॥५॥
