उशिऱ्या रात्रीची कविता
उशिऱ्या रात्रीची कविता
कुटुंबापासून ते जगापर्यंत खूप काही साऱ्यांनी शिकवलं आणि त्यांच्यामुळेच या धर्तीवर आज स्वतःचा तोल सांभाळतो आहे...दोरीवरच्या कसरतीसारखा...
दुग्धशर्करा सारखा योग जुळून यावा तसा जुळून आला आणि तुझ्या त्या भेटीनं माझ्या आयुष्यानं उसळी घेतली पण कोणत्या दिशेने घेतली ती दिशा आजही शोधतो आहे आयुष्याला नव्यानं दिशा देण्यासाठी...
तूच शिकवलंस वर्षानुवर्षे त्याच स्थितीत असलेल्या चिखलात दगड मारायला अन नसत्या चिखळ्या अंगावर घ्यायला आणि लगेचच पुढचा पाठ शिकवलास त्या चिखलाला आकार द्यायला...
हेही तूच शिकवलंस गजर बंद करून पुढचे काही तास शांत झोपायला आणि हे मात्र खरं कि तुझ्या कॉल मुळे उठायला लागायचं त्याच शांत झोपेतून उरलेल्या आयुष्याचा गाडा ओढायला...
कशाला दुसऱ्याच क्रेडिट आपण घ्यावं आज लिहता होतो मी ते पण तुझ्याच वाईट-चांगल्या शिकवणीमुळे...नाहीतर कधीच मांडला असता या शब्दांचा मोडका-तोडका संसार पण सुरवातीलाच शिकवलंस गजर बंद करून झोपायला आणि तिथंच वकुत झाला पुढं सरकायला...
तंबाखू, बिडी, माव्यापेक्षाही वाईट सवय लावलीस ती वाचायची कि जी सरणावर जाईपर्यंतही सुटायची नाही पण शिकवलंस त्यातनं स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि बरंच... यांच्या जडणघडणीत सहभाग घ्यायला...
शिकवलंस अगदी जबाबदारीनं वागायला, वावरायला, वारेमाप उधळायला असंच राहूदे तुझं प्रेम-साथ-मैत्री अन नातं
अगदी शेवटपर्यंत...लहानपणी अगदी हातातला खाऊ घेऊन जाणारा ते शेवटचा नैवैद्य शिवनाऱ्या कावळ्यासारखं अगदी अनादि अनंत सुखदुःखाचं भागीदार व्हायला...
आयुष्यात तुही खूप शिकवलंस अगदी राखरांगोळी होईपर्यंत...पण ते सुद्धा तूच शिकवलंस राख बाजूला करून आयुष्याच्या रांगोळीत रंग भरायला...
अन तुझ्याच प्रेमापोटी त्या आशीर्वादानं बेफाम जगत आहे उरलेलं आयुष्य...उधळत सुटलो आहे नाव माहित नसलेले रंग सुद्धा...साक्षीदार सुद्धा एकमेव तूच...उरलेल्या आयुष्याचं चितार आता विविध रंगांनी नटू पाहत आहे...
