तू, मी अन् पाऊस प्रणयी
तू, मी अन् पाऊस प्रणयी
छत्रीने मला पावसात
भिजण्यापासून वाचवले...
प्रेमात चिंब होण्यासाठी मात्र
पाऊसच कारण झाले...१
लाजण्याचा फक्त बहाणा
वाटे क्षणााततुज बिलगावे
गारव्यात भडकलेल्या
ज्वालांस कसे विझवावे...२
मनात चलबिचल, काहूर
परी शब्द फुटेना ओठी
क्षण असेच हे थांबावे
प्रितफुला अपुल्यासाठी...३
त्या अनामिक घटिकेचे
वेध आता लागले
सहावेना, राहवेना
ओठांत फक्त थांबले...४
जड मन, जड पापण्या
धडधडीची बेफाम गती
सांगवेना, थांबवेना
अजब कशी ही सख्या प्रीती...५
शोधते मी ही बहाणे
कारणांना चाळते
येत गाली लाज लाली
बोलायाचे मग टाळते...६
स्पर्श अधरी अधरांचा
आसुसला वेडावतो
प्राणसखा मनसोक्त
घन होऊनी बरसतो... ७

