STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

4  

शिल्पा म. वाघमारे

Others

मी कविता

मी कविता

1 min
359

हे सारस्वता, 

हो मी कविता... तीच कविता जी विविधांगी नटते.

 भावस्पर्शी शब्दांनी विश्वाला व्यापून उरते...

 मायेच्या स्पर्शाने सानुली तुझी लेक होते... 

अन् तुला जग दाखवताना जननीही... १


सारं सारं सोसत आहे... 

माय मराठीला जपताना.. 

मुके दुःख साहते.. . खंत वाहते 

 तिच्या पायी स्व वाहताना... २


 ओव्यांतून फुले उधळली...  

ज्ञानगंध चहूकडे उधळत... 

भारुडे, लोकगीते वा बालगीतांतून

 निरागस हसू खुलवत... ३


भावगीतांत भावनांना नानारुपे फुलवले... 

वाऱ्यालाही कधी ओळींवर झुलवले... 

भक्तीसुगंधाचा तुला काय सांगू भाव... 

कशी वर्णू कळेनाच परमेशाचा स्थायीभाव...४


फक्त जगणंच व्हावं तुझं..

 वेलीवरच्या सुमापरी... 

एक दिवसाचं आयुष्य जणू 

मुद्रा गंधीत हासरी...५


स्वतःलाच पुर्णतः अर्पिताना ...

फक्त वाहवत जावं लागतं...

षड्स्पर्श न होवो कधी.. 

एवढं मात्र पाहावं लागतं... ६


आजही मी जीवंत आहे...

 नवोन्मेषांत न्हात आहे... 

खंत फक्त इतकीच की

ओढाताण साहत आहे... ७


खऱ्याला मरण नसतंच मुळी.... 

अजूनही ती हिरवळ नाही..असं नाही 

अन् बेगडी चमचम चढवल्यानच 

भाव जन्मतो ...तसंही नाही.. ८


गीतारुपी पियुष प्राशून मी अमर तेव्हाच झाले 

मज नाही तमा मरणाची.. कैक आले... आणि गेले... 

स्पर्धा युगीन कोंडीत या .. श्वास माझा बांधला...

 संघर्षातूनच खरा अर्थ मिळतो जीवनाला...९


शुष्कतेतूनही हृदये ओलावणारं गीत येईल 

परीवर्तनाचंही परीवर्तन नक्की होईल... 

मी होते... आहे... अन् पुन्हा पुन्हा येईल... 

भावनांची ओल जपण्या पुन्हा पुन्हा जन्म घेईल... १०


अस्तित्व टिकवण्यासाठी अखंड झुंजत राहिल.... 

कविताच एक दिवस आशेचं गीत होईल.. 

जेव्हा उजाड होईल सारं सारं

विझलेल्या श्वासांची कविताच मशाल होईल.... ११


Rate this content
Log in